देवासाठी व्याकूळ सोपान

By Admin | Updated: July 26, 2014 12:53 IST2014-07-26T12:53:26+5:302014-07-26T12:53:26+5:30

निरपेक्षपणे एखादी गोष्ट करत राहिल्यास त्याचे फळ नक्की मिळते. त्यासाठी सातत्य, धीर आणि चिकाटी अत्यंत महत्त्वाची. अपेक्षित गोष्ट कमी कालावधीत मिळावी, अशा आशेपोटी हाती केवळ निराशाच येते, तेव्हा निरपेक्षपणे विश्‍वासाने आपले काम चालू ठेवा, यश तुमचेच.

Standing up for God | देवासाठी व्याकूळ सोपान

देवासाठी व्याकूळ सोपान

 डॉ. संप्रसाद विनोद

पुण्यातल्या कसबा पेठेत एका जुन्या चाळीत १0 फूट बाय १५ फुटांच्या खोलीत आई, वडील, बहीण आणि धाकट्या भावासह राहणारा सोपान फारसा शिकला नाही; पण गरिबीचे, हालअपेष्टांचे आणि गुन्हेगारांच्या संगतीतले जगणेच त्याला जीवनाविषयीचे भीषण वास्तव शिकवून गेले. हे ‘शिक्षण’ त्याला कायम उपयोगी पडले. पुढे त्याने आय.टी.आय. केले. एका कंपनीत कामाला लागला. कसबी कामगार म्हणून नावारूपाला आला. मंदीच्या काळात इतर कामगारांना कामे मिळत नसताना त्याचे कसब पाहून त्याला मात्र सहज कामे मिळायची.  या गोष्टीचा त्याला रास्त अभिमान वाटायचा. 
लहानपणापासून त्याची खरी आंतरिक ओढ मात्र विशुद्ध अध्यात्मच राहिली. गुरूंच्या शोधात त्याने अनेक मठ, आश्रम पालथे घातले; पण त्याच्याच भाषेत सांगायचे तर, त्याला कुठेही आतून ‘कौल’ मिळाला नाही. तरीदेखील जमेल तसे, सुचेल तसे, जिथे त्याचे मन रमेल अशी ठिकाणे आणि व्यक्ती तो शोधत राहिला. वडील दारू पिणारे, आई पाळणाघरात काम करणारी आणि भाऊ वाईट संगतीमुळे बिघडलेला. सोपानने कितीही सांगितले, मारले, रागावले तरी न ऐकणारा. सोपानला समजून घेणारे घरात कोणीच नाही. तरीही धीर न सोडता तो त्याच्या परीने धडपड करीत राहिला. फारसे समजले नाही तरी ज्ञानेश्‍वरी, दासबोध यासारखे ग्रंथ वाचत राहिला. कोणीतरी सांगितले म्हणून उपवास, पूजाअर्चा, जप करत राहिला; पण या सगळ्या प्रयत्नांमधून म्हणावे तसे समाधान काही त्याला मिळाले नाही. तरी त्याचा शोध चालूच राहिला.
एकदा चांगल्या आध्यात्मिक पुस्तकाच्या शोधात तो अप्पा बळवंत चौकातल्या एका दुकानात गेला. तिथे त्याला ‘धवलगिरी’ हे पुस्तक सापडले. दुकानात बाजूला उभे राहून तो ते चाळायला लागला. वाचण्यात रमून गेला. दुकानदार खेकसला, ‘विकत घ्यायचेय का असेच फुकट वाचायचेय?’ सोपानला असे खेकसून घ्यायची सवय होती. त्याने पुस्तकाची किंमत पाहिली. या पुस्तकाच्या १९६0 सालच्या पहिल्या आवृत्तीची किंमत फक्त ९ रुपये होती. घरी आल्यावर उत्साहाने तो पुस्तक वाचू लागला. अल्प किमतीत त्याला अनमोल ठेवा सापडला. लवकरच हा ग्रंथ त्याच्या नित्य अभ्यासाचा विषय झाला. त्याची कित्येक पारायणे झाली. आता त्याला ग्रंथकर्त्याला भेटावेसे वाटले. ग्रंथाचे लेखक महर्षी न्यायरत्न विनोदांना भेटण्याच्या ओढीने तो पुण्यातल्या त्यांच्या वास्तूत- शांतिमंदिरामधे पोचला; पण महर्षी तेव्हा ब्रह्मलीन झाले असल्याने त्याची भेट होऊ शकली नाही. 
सोपान तरीही वारंवार शांतिमंदिरात येत राहिला. माझ्याशी अध्यात्माविषयी भरभरून बोलत राहिला. सांगत राहिला. विचारत राहिला. दिवसभर कष्टाची कामं करून झाल्यावर संध्याकाळी तो यायचा. उशिरापयर्ंत थांबायचा. काही वेळा नुसता भेटून परत जायचा. त्याच्या उत्साहाचे मला कौतुक वाटायचे. साधना, विशुद्ध ज्ञान आणि अनुभूतीविषयीची त्याची ओढ विलक्षण  होती. घरचे आणि आजूबाजूचे वातावरण पाहता त्याची ही तळमळ अचंबित करणारी होती. 
आमच्या भेटींमधून मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, की हा मुलगा फार भावनाप्रधान आहे. त्यामुळे, अध्यात्माच्या नावाखाली कोणी त्याचा गैरफायदा तर घेणार नाही ना, याची मला नेहमी काळजी वाटायची. एकदा, समाधी अवस्थेत बसलेल्या एका व्यक्तीचा फोटो घेऊन तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘या व्यक्तीने मला स्वप्नात येऊन दृष्टांत दिला आणि मला ‘श्रीराम जयराम जय जय राम’ असा जप करायला सांगितले. मी त्याला सुचवले, की ‘हा तुझा भ्रम नसून  दृष्टांत आहे याची तुला पूर्ण खात्री असेल, तर तू जरूर हा जप करून पाहा; पण खात्री नसेल तर मात्र करू नकोस.’
मधे काही दिवस गेले. पुन्हा एकदा तो आला आणि कन्सल्टिंग रूमच्या बाहेर बसला. दुसर्‍या काही कारणासाठी मी स्वागतकक्षात गेलो, तेव्हा त्याची माझी नजरानजर झाली; पण आज तो नेहमीसारखा हसला नाही. व्यक्तिगत मार्गदर्शन करण्याचे काम संपल्यानंतर मी त्याला आत बोलावले. त्याची विचारपूस केली आणि त्याचा बांध फुटला. तो रडू लागला. नेमके काय झालेय? असे विचारल्यावर म्हणाला, ‘आता कितीही प्रयत्न केला तरी पूर्वीसारखे स्वामींचे स्वप्न-दर्शन होत नाही. जपही होत नाही. काय करावे काही समजत नाही.’ मी त्याला समजावून सांगितले की ‘स्वामींचं स्वप्न-दर्शन ही ‘ईश्‍वरी इच्छेने’ घडलेली एक ‘अनपेक्षित’ घटना होती. अशा घटना अनपेक्षित असण्यातच त्यांचे वेगळेपण आणि सार्मथ्य दडलेले असते. म्हणून, त्या पुन्हा घडाव्यात अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरते. त्यापेक्षा, तू आपला निश्‍चिंत आणि निरपेक्ष मनाने तुझा जप चालू ठेव. योग्य वेळी ईश्‍वरी इच्छेने तुला स्वामींचे                             दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. यथावकाश तू परिपक्व झालास, की स्वामींमधील ‘गुरुतत्त्व’ आणि ईश्‍वरातील ‘ऐश्‍वर्य’ तुझ्यातच सामावलेले आहे, याची तुला प्रचिती येईल. कदाचित, हे व्हायला वेळ लागेल; पण धीर धरलास आणि निरपेक्षपणे साधना केलीस तर ‘अपेक्षेपलीकडे’ तुझ्या अपेक्षा पूर्ण होतील, असा मला विश्‍वास वाटतो.’
तो आश्‍वस्त झाला. पुन्हा एकदा त्याला रडू फुटले; पण आताच्या अश्रूंना कृतज्ञतेची ऊब होती; जी माझ्या पायांना स्पष्टपणे जाणवली.
(लेखक हे महर्षी न्यायरत्न विनोद यांचा विशुद्ध अध्यात्माचा आणि अभिजात योगसाधनेचा वारसा चालविणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे योगगुरू आणि योगोपचार तज्ज्ञ आहेत.)

Web Title: Standing up for God

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.