प्रेरणेचा अखंड झरा

By Admin | Updated: December 27, 2014 19:14 IST2014-12-27T19:14:25+5:302014-12-27T19:14:25+5:30

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर हे विद्यार्थ्यांपासून शास्त्रज्ञांपर्यंत सर्वांसाठीच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व. त्यांच्या लेखनकार्याचा गौरव साहित्य अकादमीने केला, ही सर्वांसाठीच आनंदाची आणि अभिमानाची बाब.

Spontaneous fountain of inspiration | प्रेरणेचा अखंड झरा

प्रेरणेचा अखंड झरा

 डॉ. पंडित विद्यासागर

 
विज्ञान आणि गणितावर मनापासून प्रेम करणारे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ  डॉ. जयंत नारळीकर हे विद्यार्थ्यांपासून शास्त्रज्ञांपर्यंत सर्वांसाठीच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व. त्यांच्या लेखनकार्याचा गौरव साहित्य अकादमीने केला, ही सर्वांसाठीच आनंदाची आणि अभिमानाची बाब. या संशोधकाने जाणीवपूर्वक लेखणी सोपेपणाच्या वाटेवरून चालवली. यानिमित्ताने त्यांच्या लेखनकौशल्याचा व कर्तृत्वाचा वेध.
-------------
डॉ. जयंत नारळीकर हे शास्त्रज्ञ म्हणून जसे प्रसिद्ध आहेत, तसेच सिद्धहस्त लेखक म्हणूनही. मराठी भाषेत विज्ञान लेखनाला जनमानसात स्थान मिळवून देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. किंबहुना त्यांच्या लेखनामुळेच विज्ञानकथांना सुगीचे दिवस आले. यक्षांची देणगीपासून सुरू झालेला हा प्रवास अव्याहतपणे चालूच आहे. अवकाशात घडणार्‍या अद्भुत रम्य घटनांनी वाचकांच्या मनाला भुरळ घातली, ती कायमचीच. व्हायरस, वामन परतून आला, आणि प्रेषित यांसारख्या कादंबरी लेखनाने जनमानसावरील पकड अधिकच घट्ट केली. या लेखनाबरोबरच ‘याला जीवन ऐसे नाव’ आणि ‘आकाशाशी जडले नाते’ यांसारख्या माहितीपूर्ण लेखनाची यात भर पडत गेली. या लेखनामागे समाजशिक्षणाची प्रेरणा होतीच; परंतु त्याचबरोबर लेखनाचा आधार होती एक अलौकिक प्रतिभा!
डॉ. जयंत नारळीकर जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी खगोलशास्त्रात दिलेले योगदान जगन्मान्य आहेच; परंतु विशेष म्हणजे गणित हा त्यांचा आधार आहे. फ्रेड हॉयल आणि नारळीकर यांचा स्थिर स्थिती सिद्धांत त्यांच्या स्वतंत्र विचारसरणीचा द्योतक आहे. ‘आयुका’सारखी दज्रेदार संस्था उभारण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. विज्ञान प्रसार हा त्यांचा ध्यास आहे. त्यासाठी त्यांनी शेकडो व्याख्याने दिली आहेतच; परंतु त्याचबरोबर मुक्तांगण विज्ञान केंद्राची स्थापना केली आहे. महाराष्ट्रभूषण आणि पद्मविभूषण यांसारखे सन्मान देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. पु. ल. देशपांडे यांच्याप्रमाणेच महाराष्ट्राचं ते एक लाडकं व्यक्तिमत्त्व आहे. अशा या असाधारण व्यक्तिमत्त्वाचे ‘चार नगरातील माझे विश्‍व’ हे आत्मचरित्र. अथांग अशा अंतराळाशी आयुष्यभर भावनिक आणि बौद्धिक नाते सांगणार्‍या डॉ. नारळीकरांचे विश्‍व चार शहरांत कसे मावणार? असा प्रश्न साहजिकच मनात येतो. मात्र, जमिनीवर पाय घट्ट रोवूनच अवकाशाचा वेध कसा घेता येतो, याचा उत्तम परिपाठच या आत्मचरित्रातून मिळतो. किंबहुना हेच या आत्मचरित्राचे वैशिष्ट्य म्हणता येईल.
खरंतर हे आत्मचरित्र म्हणजे साध्या आणि सोप्या भाषेत सरळपणे सांगितलेली गोष्ट आहे. यात प्रांजळपणा आहे. कुठेही अभिनिवेष अथवा बेगडीपणा नाही. सर्वसामान्य माणसाला अतिशय अवघड वाटणार्‍या गोष्टी ते सहजपणे कराव्यात, अशा अविभार्वात वर्णन करतात. ‘पहिलेच नगर बनारस’ त्यात ते विशेषत्वाने रमतात. कारण याच नगरात त्यांचे बालपण व्यतित झाले. बालवयात वाटणारी उत्सुकता, खेळ, झालेली फजिती, छोट्या गोष्टींमधून मिळणारा आनंद या सर्व गोष्टी सर्वसामान्य मुलांप्रमाणेच घडतात. मात्र, मॉनिटर असताना वर्ग वेळेअगोदर सोडण्याची केलेली चूक किंवा गणिताच्या नवीन शिक्षकाला बावळट समजण्याची केलेली चूक आणि त्यातून घेतलेली शिकवण त्यांच्या विचारशक्तीची चुणूक दाखवितात. आईकडून घेतलेले संस्कृतचे धडे आणि वडिलांकडून घेतलेली गणिताची प्रेरणा, मोरुमामाकडून गणितातील आव्हान स्वीकारण्याची जिद्द या त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून जातात. इंग्रजी विषयाबद्दलची अनाठायी भीती कशी नाहीशी होते. याचे केलेले सुंदर वर्णन निश्‍चितच उद्बोधक. त्यांनी सहजपणे केलेल्या वर्णनातून शिक्षणपद्धतीमधील त्रुटी सहजपणे समोर येतात.
केंब्रिज या दुसर्‍या नगराने नारळीकर यांना मान्यता मिळवून दिली. त्यांच्या बुद्धीचा कस लागेल, असे वातावरण तिथे होते. आर्थिक पाठबळ कमी असतानाही अविरत कष्ट करून त्यांनी असाध्य ते साध्य करून दाखवले. दोन वर्षांत रँगलर, तीन वर्षांत ट्रामपॉस, डिस्टिंक्शन, एक्झिबिशन मेडल, टायसन मेडल, किंग्ज कॉलेजच्या फेलो यांसारख्या मान्यता केवळ वाचूनही दमछाक होते. नारळीकरांचे वर्णन मात्र फार काही विशेष घडले नाही. या पातळीवर चालू राहते. याच ठिकाणी त्यांना अनेक प्रतिभावान व्यक्तींचा सहवास लाभला. त्यात नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर, प्रसिद्ध लेखक ऑर्थर सी क्लार्क, सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचा समावेश होता. याच ठिकाणी फ्रेड हॉयलसमवेत त्यांनी विश्‍व उत्पत्तीसंबंधी सिद्धांत मांडला. महास्फोटाच्या सिद्धांताला आव्हान देणारा हा सिद्धांत आहे. या सिद्धांताला सद्य:स्थितीत कमी मान्यता असली, तरी तो अद्यापही टिकून आहे. अतिशय वाचनीय, उद्बोधक आणि प्रेरणादायी असे हे अनुभव हा या आत्मचरित्राचा गाभा आहे. नारळीकरांचे विज्ञानामधील योगदान निराळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे आहे. या मातीबद्दल असणारी ओढ नारळीकरांना तिसर्‍या शहरात घेऊन येते. ते शहर म्हणजे मुंबई. मुंबईतील टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्ये प्राध्यापक पदावर ते रुजू झाले. तो काळ अमेरिकेच्या भरभराटीचा काळ होता. तिथे अनेक संधी उपलब्ध होत्या. अनेक संशोधकांनी अमेरिकेत जाणे पसंत केले. नारळीकरांनी जाणीवपूर्वक निर्णय घेतला आणि तो निभावला. घर आणि संसाराची काळजी घेत असताना अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भारतातील खगोल भौतिकीच्या विकासामध्ये मोलाचे योगदान दिले. त्यातूनच ‘आयुका’ची कल्पना पुढे आली. मात्र, ती पूर्ण करण्यासाठी त्यांनी चौथ्या नगरात प्रवेश केला. ते नगर होते पुणे.
पुण्याच्या वास्तव्यात शून्यातून सुरू करून त्यांनी ‘आयुका’ या संस्थेला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून दिला. त्याचबरोबर मुक्तांगण विज्ञान केंद्राची निर्मिती केली. दर शनिवारी शाळेतील मुलांसाठी व्याख्यानाचा परिपाठ सुरू केला. पुण्याच्या समाजजीवनाचा अविभाज्य भाग बनून ते राहिले. त्यातून कृतार्थ जीवनाचा परिपाठच त्यांनी घालून दिला. या जीवनाचे विस्तृत प्रतिबिंब या आत्मचरित्रात पडलेले दिसते. शास्त्रज्ञाचे चरित्र इतरांनी लिहिल्यास त्यात अद्भुतरम्यता घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिल्प असणार्‍या मंदिरांना रंग दिल्यामुळे त्याचा अस्सलपणा झाकला जातो. ती परिस्थिती उद्भवू शकते. शास्त्रज्ञ हा माणूस असतो. त्याच्यातही गुणदोष असतात. त्यांना देवत्व बहाल केल्यास पुढील पिढीला ते कदाचित प्रेरणादायी ठरणार नाही. या शक्यता या आत्मचरित्रामुळे संपुष्टात आल्या आहेत. प्रयत्नातूनच असामान्य व्यक्तिमत्त्व घडतात, हा संदेश अतिशय ठळकपणे समोर येतो. शेवटच्या भागात देव आहे अथवा नाही, अशा प्रश्नांचा केलेला ऊहापोह या आत्मचरित्राला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो.
या आत्मकथनात अवकाश विज्ञानात गेल्या शतकात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी समाविष्ट आहेतच; परंतु त्याचबरोबर अनेक घटना आणि प्रसंगांची रेलचेल आहे. आत्मकथनात प्रांजळपणा आहेच, पण लक्षात राहतो तो त्यांचा इतरांना श्रेय देण्याचा मोठेपणा. श्रेयनामावलीत त्यांनी आई, वडील, गुरू, काका आणि पत्नी यांच्याविषयी भरभरून लिहिले आहे. अगदी गुणदोषासकट, मात्र त्यांनी केलेले जीवनविषयक भाष्य खूपच मार्मिक. एकूणच एका संशोधकाने लिहिलेले हे आत्मचरित्र एक ऐतिहासिक ठेवा आहे. भारताच्या विज्ञानाच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा त्यात सामाजिक स्थित्यंतरासकट अधोरेखित झाला आहे. मराठी भाषा त्यामुळे अधिक समृद्ध झाली आहे. पुढील पिढीसाठी प्रेरणास्रोत निर्माण करण्यात नारळीकर निश्‍चितपणे यशस्वी झाले आहेत. साहित्य अकादमीने त्याचा उचित गौरव केला. त्यामुळे या आत्मकथनाची झळाळी अधिकच 
वाढली आहे. 
(लेखक स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेडचे कुलगुरू व ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत.)

Web Title: Spontaneous fountain of inspiration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.