कोई... सादो... इतादाकीमास
By Admin | Updated: September 13, 2014 13:50 IST2014-09-13T13:50:49+5:302014-09-13T13:50:49+5:30
जपानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व तिथले पंतप्रधान तळ्यात माशांना खाद्य घालताना दिसले. जपानमध्ये अशा कित्येक प्रथापरंपरा मनापासून जपल्या जातात; नव्हे त्या जपानी लोकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहेत. त्या जाणून घ्यायचा प्रयत्न..जपानमध्ये गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तिथले पंतप्रधान तळ्यात माशांना खाद्य घालताना दिसले. जपानमध्ये अशा कित्येक परंपरा मनापासून जपल्या जातात;नव्हे त्या जपानी लोकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहेत.

कोई... सादो... इतादाकीमास
- भावना जोशी
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ३0 ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या काळातील जपान दौरा झाला. पंतप्रधानांनी दौर्याआधीच्या व्यूहनीतीने व प्रत्यक्ष आपल्या वागणुकीने जपानी माणसांची मने जिंकली. अतिशय संकोची व परंपराप्रिय जपान्यांनीपण त्यांना मोकळेपणाने प्रतिसाद दिला. नेहमीच्या ‘लिफाफा अदलाबदली’सारख्या रूक्ष राजकीय परंपरांना फाटा देऊन त्यांना ‘माशांना खाऊ घालणे’ किंवा ‘चाय पे चर्चा’ म्हणून चहा समारंभाला आमंत्रित करणे यांसारख्या खास जपानी पद्धतीने त्यांचे स्वागत करून, जपान-भारत मैत्रीवर शिक्कामोर्तब केले.
जपान हा परंपरा व रूढीप्रिय देश आहे. तेथे रोजच्या जीवनात व सणांमध्ये अनेक रूढी आजही पाळल्या जातात. पंतप्रधानांनी ज्या माशांना खाऊ घातले त्यांना तेथे खूप महत्त्व आहे. त्यांना जपानीत ‘कोई’ असे म्हणतात. त्यांना खायला घातले, की त्यांनी खाल्लेल्या प्रत्येक दाण्याबरोबर आपली दुष्कर्मे/पापे नाहीशी होतात, अशी बौद्धधर्मातील संकल्पना त्यामागे आहे. तसेच, कोई मासा हा धबधब्यात किंवा नदीत खालून वर, प्रवाहाच्या विरुद्ध पोहून जातो व वरपर्यंत पोहोचतो आणि जपान्यांना पवित्र अशा ड्रॅगन रूपाला पोहोचतो, अशी समजूत आहे. म्हणून या माशाला ताकद व इच्छाशक्तीचे प्रतीक समजतात. आपल्या मुलातही असेच गुण असावेत, कोणत्याही परिस्थितीचा सामना करून त्यांनी यश संपादन करावे या भावनेतून ‘तानगो नो सेक्कू’ हा सण मुले असलेल्या घरात खास करून साजरा केला जातो. प्रत्येक मुलासाठी कोई माशाच्या आकाराचा पतंग आपल्या गुढीसारखा घरावर लावला जातो. चहा समारंभ हा अजून एक विशेष जपानी रिवाज आहे. नेहमीचा चहा हा साग्रसंगीत पद्धतीने बनवून व अनेक नियम पाळत पिणे म्हणजेच जपानी चहा समारंभ. याला जपानीत ‘सादो’ असे म्हणतात. हा खास अशा खोल्यांमध्ये पार पाडला जातो. या चहाच्या खोल्या अत्यंत रमणीय ठिकाणी, बागांमध्ये असतात. खोल्यात फक्त जपानी चटया असतात व अगदी थोडकी सजावट असते. चहा पिताना फक्त निमंत्रितांकडे लक्ष देता यावे, हा त्यामागचा उद्देश आहे. चहा पिताना त्यासोबत खास अशी जपानी मिठाईपण दिली जाते. ती आधी खाऊन चहा पिल्यास चहाची लज्जत वाढते असे म्हणतात. खोली व बाहेरील निसर्गरम्य वातावरण, लयबद्ध समारंभ यामुळे चहा समारंभानंतर मानसिक शांती मिळते, असे म्हणतात.
घरातून बाहेर निघताना घरच्यांना ‘जाऊन येतो’ असे म्हटल्याशिवाय बाहेर पडत नाहीत. तसेच परतल्यावर ‘आलो’ म्हणणे देखील क्रमप्राप्तच असते. घरात आल्यावर चपला काढून ठेवण्याचीदेखील विशिष्ट पद्धत असते. घरच्यांनी आतल्या बाजूस तर पाहुण्यांनी बाहेरच्या बाजूला तोंड करून चपला ठेवायच्या असतात. जेवताना आपल्या ‘वदनी कवळ’च्या आशयाचे ‘इतादाकीमास’ म्हटल्याशिवाय जेवण सुरू करत नाहीत व संपल्यावर ‘गोचिसोसामा’ म्हणत अन्नपूर्णेला धन्यवाद दिले जातात.
खाण्यासाठी वापरण्यात येणार्या चॉपस्टिक्स अन्न स्वत:च्या ताटात घेताना उलट्या बाजूने वापरतात. उष्ट्या हाताप्रमाणे खाण्यासाठी वापरण्यात येणारा समोरील भाग वेगळा ठेवण्याची ही पद्धत आहे. या सगळ्या परंपरा जपानी माणूस एकटा असला तरी पाळतोच. सकाळी उठल्यावर, रात्री झोपताना किंवा इतरही वेळेस वापरण्यात येणारे अभिवादन (¬१ी३्रल्लॅ२) कौटुंबिकसुद्धा एकमेकांशी बोलताना वापरतात. घरातील किंवा बाहेरील लोकांना आदर देण्याची ही पद्धत खरंच प्रशंसनीय आहे.
जपानी शाळेत मुले रोज आपली शाळा झाडतात. स्वच्छ करतात. सार्वजनिक स्वच्छतेचे धडेच यातून त्यांना मिळत असतात. मंदिरात गेल्यावर, प्रवेश करण्यापूर्वी पळीने हात धुऊन, एक टाळी वाजवून, आल्याची वर्दी देऊन प्रवेश करतात. देवापाशी दोन टाळ्या वाजवून नंतर आपले गार्हाणे मांडले जाते. त्यानंतर एक टाळी वाजवून देवाचा निरोप घेतला जातो. कंपनी किंवा ऑफिसच्या कार्यक्रमाची सुरुवात व शेवट देखील अशाच प्रकारच्या टाळ्यांनी करतात. मोठय़ांचा आदर करणे, एकजुटीने बहुमताचा आदर करून कामाला वाहून घेणे, समाजाला मान्य असेल अशा रीतीने वागणे, अशी वागणूक व शिस्तप्रियता, अथक मेहनत घ्यायची तयारी ही जपानी माणसांची गुणवैशिष्ट्ये आहेत. पाश्चात्यांचे अंधानुकरण न करता, स्वत:च्या परंपरांचा आदर करूनही देशाला प्रगतिपथावर नेता येते, हेच जपानने सार्या जगाला दाखवून दिले आहे.
(लेखिका पुणे विद्यापीठाच्या जपानी विभागात प्राध्यापिका आहेत.)