सिंदबादचे पूर्वज!

By Admin | Updated: August 22, 2015 18:48 IST2015-08-22T18:48:54+5:302015-08-22T18:48:54+5:30

माणसानं सव्वा लाख र्वष भ्रमंती केली, संस्कृतीच्या जन्मानंतर तो स्थिर झाला आणि अधिक ‘सुखा’साठी पुन्हा बाहेर पडला. अनेकदा खुल्या समुद्राशी झुंज द्यावी लागे. पाणी संपे, वादळं येत, हल्ले होत, जहाजांना भोकं पडत, गलबत भरकटे. अशा वेळी ‘टोपलीतला कावळा’ बिनचूक दिशा दाखवे.

Sindhad's ancestor! | सिंदबादचे पूर्वज!

सिंदबादचे पूर्वज!

>- डॉ. उज्ज्वला दळवी
 
साडेचार हजार वर्षांपूर्वी, सिंधू खो:यात कुणी हुरहुरता जीव नदीकाठी चालत दूरदेशींच्या खलाशांचं गाणं गात होता. सरत्या पावसाळ्यात त्याला अपार सागराचे वेध लागले होते. तो धाडसी दर्यावर्दी खलाशी होता. पावसाळा सरल्यासरल्या मेलुह्हा (सिंधू खो:या)तल्या हराप्पाहून निघून अरबी समुद्रावाटे पर्शियन आखातात घुसायची त्याला ओढ लागे. त्याचं बाकदार कण्याचं सागवानी गलबत साग-शिसवीच्या लाकडाने, सुती कापडाने, तिळेलाच्या बुधल्यांनी लादून निघे. सोबत मेलुह्हाच्या कारागिरांनी घडवलेले, निळयाभोर मौल्यवान लापिस लाझुलीचे, लालसर इंद्रगोपाचे आणि ङिालईदार संगजि:याचे देखणो दागिनेही असत. 
वाटेतल्या बंदरांत थांबत, जवळच्या मालाचा थोडा हिस्सा देऊन बदल्यात मागन (ओमान)च्या तांब्याची, उदाधुपाची आणि दिल्मून (बाहरेन)च्या पाणीदार मोत्यांची खरेदी होई. तसं शेलकं सामान घेऊन तो थेट मेसोपोटेमिया (इराक)पर्यंत मजल मारत असे. नेलेल्या सगळ्या मालाचा ‘क्लीअरन्स सेल’ करून तो तिथलं तलम सणाचं कापड आणि त्रिकोणी-चौकोनी भौमितिक नक्षीची, मातीची सुबक भांडी गलबतात भरून घेई. 
तशी सगळी उलाढाल करून परत हराप्पाला यायला बहुधा पाच-सहा महिन्यांच्या वरच काळ जाई. कधीकधी जास्तही वेळ लागे. एकदा मोठय़ा वादळामुळे त्याला मागनहून निघता आलं नव्हतं. आणि एकदा तर इराणी चाच्यांना चकवताना जहाज भर समुद्रात भलतीकडेच भरकटलं होतं. एकदोनदा त्याने अतिउत्साहाने युफ्रॅटिस नदीतून वरपर्यंत जाऊन कानेशाच्या (तुर्कस्तानातलं शहर) लोकरी कापडाचे तागे बांधून आणले होते! त्या प्रत्येकवेळी सफर रेंगाळली होती आणि मधल्या पावसाळ्यात त्याला युफ्रॅटिसकाठी पोटापुरती वाटशेतीही करावी लागली होती. पुढल्या पावसाळ्यात मात्र घरशेती करायला तो मेलुह्हात पोचला होता. पावसाळ्यात सारी वाहतूक ठप्प होई आणि त्याला मनाविरुद्ध एकाच जागी बसावं लागे. बाकीचे सगळेच खलाशी त्याच्याइतकी लांब पल्ल्याची सफर करत नसत. काहीजण मेलुह्हाहून फक्त दिल्मूनपर्यंत जा-ये करत, तर काहीजण तैग्रिस-युफ्रॅटिसच्या मुखापासून दिल्मूनपर्यंत पर्शियन आखातात मागे-पुढे जात. त्यातला बराचसा प्रवास किनारी-काठाकाठानेच चाले. दिल्मूनच्या मध्यवर्ती स्थानमाहात्म्यामुळे तो भोज्जा सर्वांनाच करावा लागे. तिथल्या खा:या समुद्रातल्या गोडय़ा झ:यातून पाण्याचीही सोय होई.
त्या खलाशांचा सागरी प्रवास शोधी-पारधी वृत्तीचा कलंदर प्रवास नव्हता. सुस्थापित, सुखवस्तू मानवाची ती हौशी, हव्यासी भटकंती होती. सव्वा लाख वर्षांच्या भ्रमंतीनंतर, सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी माणसाला शेती साधली आणि त्याने नद्यांच्या काठी गावं वसवली. धनधान्याच्या समृद्धीमुळे कामांमधलं वैविध्य परवडलं. सुतार-लोहार-विणकर-कुंभार वगैरे कलावंतांचे व्यवसाय बहरले. देवाचे आभार मानायची ऊर्मी जागली आणि गावक:यांनी देवळं बांधली, पुजा:यांची नेमणूक केली. गावांची शहरं झाली. स्थैर्य-समृद्धीमुळे मेसोपोटेमियात, इजिप्तमध्ये, सिंधू खो:यात संस्कृतीचा जन्म झाला. आबादीआबाद झाली आणि सुखाच्या अपेक्षा बदलल्या. अधिकच्या उत्पादनाच्या बदल्यात चैनीच्या वस्तू हव्याशा वाटायला लागल्या. घरगुती अदलाबदलीच्या जागी व्यापार नावाचा नवा व्यवसाय निर्माण झाला. दूरदूरच्या शहरांशी धाडसी व्यापार-प्रवास सुरू झाला. आपल्या मेलुह्हाकर खलाशाच्या सागरी मोहिमाही तशाच प्रवासाचा भाग होत्या.
मेसोपोटेमिया, इजिप्त किंवा सिंधू खोरं या सा:यांच्या जवळ मोठय़ा नद्या होत्या. त्यांच्या प्रवाहातून आणि कालव्यांतून तराफे, होडगी आणि जहाजं वापरून मालाची ने-आण करणं सोपं होतं. चाकू-वस्त:यांची पाती बनवायला लागणारी, तुर्कस्तानातल्या ज्वालामुखीची काळी काच सुमारे चौदा हजार वर्षांपूर्वीच नदीतल्या होडग्यांतून युफ्रॅटिसच्या खो:यात सगळीकडे पोचली.  माणसांच्या रोजच्या दळणवळणालाही नद्या-कालव्यांचा मोठाच उपयोग होता. मेसोपोटेमियातल्या नद्या आणि तिथला वाराही उत्तरेकडून दक्षिणोकडे वाहत असे. म्हणून त्यांच्यातली जहाजं दक्षिणोकडे जाताना शिडात हवा भरून झपाटय़ाने जात. उत्तरेकडे जाताना नदीत मोठा बांबू रोवून नाव ‘चालवली’ जाई किंवा किना:यावरून चालणा:या गाढवांकडून ओढून नेली जाई. समुद्रात लोटायचं जहाज अधिक भक्कम बनवलं जाई. जाडजूड लाकडी तुळयांच्या आधाराने आडवी फळकुटं लावून ती वेताने बांधून पक्की केली जात. त्यांच्यामधल्या फटी वेताच्या विणकामाने भरल्या आणि डांबर चोपडलं की झालं जहाज सागरसफरीला सज्ज. तशा पंचाहत्तर फूट लांबीच्या जहाजातून खराखुरा लांब पल्ल्याचा प्रवास चाले. इजिप्तच्या सहुरे नावाच्या फरोहाने पंटपर्यंत (सोमालिया) रक्तसागरी मोहीम पाठवली आणि जहाजं भरभरून मौल्यवान माल आयात केला अशी इजिप्तच्या चित्रलिपीत नोंद आहे. सागरकिना:यावरची लोथाल-ढोलावीरासारखी बंदरंही वैशिष्टय़पूर्ण होती. लोथालच्या गोदीत तीस टन वजनाची साठ गलबतं एका वेळी मावत! लोथाल बंदर साबरमतीच्या मुखाशी होतं. गलबत समुद्रातून नदीत शिरताना त्याला धक्का बसू नये म्हणून ते स्थित्यंतर एका पाणकोठडीत होई. त्यात अतिशय प्रगत अभियांत्रिकी ज्ञान वापरलेलं होतं. 
पुरातन काळात व्यापारासाठी शिस्तबद्ध सागरसफरी होत. मौल्यवान लिपस लाझूली सात-आठ हजार वर्षांपूर्वीपासूनच सागरलहरींवर तसा स्वार झाला असावा. सहा हजार वर्षांपूर्वी किंवा कदाचित त्याच्याही आधीपासून पर्शियन आखातात मेसोपोटेमिया (इराक)-दिल्मून (बाहरेन)-मागन (ओमान)-मेलुह्हा (सिंधू खोरं) असा अडीच हजार किलोमीटर लांबीचा प्रस्थापित व्यापारपट्टा होता. त्यातली बरीचशी सागर-सफर किना:यालगत होत असली तरी ओमानपासून थेट कच्छ-गुजरातेतल्या लोथाल-ढोलावीरासारख्या बंदरांशी जायला खुल्या समुद्राशी झुंज द्यावी लागे. वाटेत पिण्याचं पाणी संपे, वादळं येत, इराणी चाच्यांचे हल्ले होत. कधी खडकाळ किना:याला घासून नाजूक विणीच्या जहाजांना भोकं पडत. कधी गलबत भरकटलंच तर टोपलीतून मुद्दाम आणलेला कावळा सोडून दिला जाई. तो बिनचूक जमिनीच्या दिशेने उडत जाई आणि दिशा दाखवे.
निळा लापिस लाझूली आणि तांबडा इंद्रगोप
पुरातत्व शास्त्रज्ञांच्या संशोधनात त्या काळातल्या समुद्रसाहसांचा पुरावा सापडला. मेसोपोटेमियाची त्रिकोणी-चौकोनी नक्षीची भांडी, मेलुह्हाची एकसारखी प्रमाणबद्ध वजनं-मापं आणि मालावर व्यापा:याची मालकीमोहर उठवायचे त्या दोन्ही ठिकाणचे, एकमेकांशी साधम्र्य साधणारे शिक्के त्या सागरमार्गावरच्या अनेक मुक्कामी मिळाले. मेसोपोटेमियाच्या, इजिप्तच्या राजे-राण्यांच्या कबर-खजिन्यात प्राचीन भारतातला इंद्रगोप, अफगाणस्तिानातला लापिस लाझूली आणि दिल्मूनचे मोतीही एकत्रच मिळाले. आधुनिक तंत्रंनी त्या रत्नांची वयं आणि मूळस्थानं नेमकी ठरवता आली. मेसोपोटेमियाच्या ‘पाचर-लिपी’मध्ये दिल्मून-मेलुह्हांची वर्णनं वाचता आली. दिल्मून-मेलुह्हांच्या कोलंबसांनी किना:याकिना:यानेच जातानाही ‘किनारा तुला पामराला’ असं सागराला चिडवत आपल्या अनंत ध्येयासक्तीने इतिहासावर ङोंडा रोवला. त्यांनी सागरावरच नव्हे, तर साक्षात कालार्णवावरही मात केली!
 
पेशाने वैद्यकीय डॉक्टर असलेल्या लेखिका गेली तीस वर्षे सौदी अरेबिया आणि त्याआधी इंग्लंडमध्ये 
वास्तव्याला होत्या. ‘जेनेटिक्स कशाशी खातात?’ 
आणि ‘सोन्याच्या धुराचे ठसके’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘मानवाचा प्रवास’ हा गेली दोन दशके त्यांच्या वाचनाचा, संशोधनाचा विषय आहे.)
 
ujjwalahd9@gmail.com

Web Title: Sindhad's ancestor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.