शिवपुत्र छत्रपती राजाराम- पाच दशकांच्या अभ्यासातून साकारलेले समग्र चरित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 03:00 IST2018-07-29T03:00:00+5:302018-07-29T03:00:00+5:30
स्वराज्याच्या अतिकठीण काळात छत्रपती राजाराम महाराजांनी केलेली अतुलनीय कामगिरी या ग्रंथाद्वारे सर्वापुढे आली आहे

शिवपुत्र छत्रपती राजाराम- पाच दशकांच्या अभ्यासातून साकारलेले समग्र चरित्र
ठळक मुद्देछत्रपती राजाराम महाराजांना सेतुमाधवराव पगडींचा अपवाद वगळता कोणीच श्रेय दिले नाही. डॉ. जयसिंगराव पवार यांनी छत्रपती राजाराम महाराजांचे पहिले चिकित्सक चरित्र लिहून ती मोठी उणीव आता भरून काढली आहे.
<p>प्रा. डॉ. जयसिंगराव पवार हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध इतिहास संशोधक ! गतवर्षी त्यांचे ‘शिवपुत्र छत्रपती राजाराम’ हे राजाराम महाराजांवरील बृहद्चरित्र प्रकाशित झाले. इतिहासकारांनी छत्रपती राजाराम महाराजांबद्दल लिहिताना ‘दुबळा व अकार्यक्षम राजा’ अशी त्यांची प्रतिमा तयार केली. त्यांच्या काळात जे सामुदायिक नेतृत्व उभे राहिले, त्याचेच गोडवे सर्वानी गायले; परंतु त्यांचे नेतृत्व करणार्या छत्रपती राजाराम महाराजांना सेतुमाधवराव पगडींचा अपवाद वगळता कोणीच श्रेय दिले नाही. डॉ. जयसिंगराव पवार यांनी छत्रपती राजाराम महाराजांचे पहिले चिकित्सक चरित्र लिहून ती मोठी उणीव आता भरून काढली आहे. त्यांनी आपल्या पूर्वेतिहासकारांचे असंख्य मुद्दे खोडून काढले आहेत. यातून त्यांचे गुरु वा. सी. बेंद्रे हेदेखील सुटले नाहीत.राजाराम महाराज हे छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे पराक्रमी नसले तरी राज्यकत्र्याला रणांगणावरील पराक्रमच केवळ पुरेसा नसतो तर त्यापेक्षा रणनीती महत्त्वाची असते ! या ग्रंथातून डॉ. पवार यांनी छत्रपती राजाराम महाराजांची रणनीती सर्वागाने मांडली आहे.
स्वराज्य मोगल शत्रूने व्यापले असता, छत्रपती राजाराम महाराज कर्नाटकातील जिंजीकडे गेले आणि तेथे त्यांनी राजधानी बनविताना दुसरी रणनैतिक आघाडी उभारली. त्यामुळेच तर औरंगजेबाला नाइलाजाने आपले सैन्य कर्नाटकात रवाना करावे लागले. परिणामी, स्वराज्यावरचा दबाव एकदमच कमी झाला. मराठय़ांनी नाशिक ते तंजावर अशा विस्तीर्ण रणमैदानात मोगलांना गनिमी काव्याने हैराण केले.
छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूनंतर रायगड पडला, तेव्हा औरंगजेबाला अत्यानंद झाला. अनेक वतनदार मोगलांना मिळाले. मोगलांनी मराठय़ांचे असंख्य किल्ले जिंकले. तेव्हा हिंदवी स्वराज्य बुडाले, असेच सर्वाना वाटले; पण छत्रपती राजाराम महाराजांनी रणनीतीबरोबरच कर्नाटकात जाऊन मोगलांना राजनैतिक शहदेखील दिला. त्यामुळेच अत्यंत बिकट परिस्थितीतून मराठे बाहेर येऊ शकले. सहा महिने स्थिरस्थावर होण्यासाठी गेल्यावर मराठय़ांनी मोगलांवर जागोजागी हल्ले करण्यास व गेलेले किल्ले जिंकून घेण्यास सुरुवात केली. छत्रपती राजाराम महाराजांच्या आदेशाने व प्रेरणेने संताजी व धनाजींनी कर्नाटकात मोठे विजय मिळविले.
जुल्फिकारखानाने रायगड जिंकल्यावर जिंजी जिंकण्याचा प्रयत्न केला. जिंजी अवाढव्य व दुर्भेद किल्ला असल्यामुळे त्याने औरंगजेबाकडून अधिक कुमक मागविली. तेव्हा औरंगजेबाने जुल्फिकारखानाच्या मदतीला वजीर असदखान (हा जुल्फिकारखानाचा बापदेखील होता) व शाहजादा कामबक्षाला पाठविले; पण त्यांच्यात वितुष्ट आले. याचा नेमका फायदा छत्रपती राजाराम महाराजांनी उचलला. त्यांनी आपला दूत जुल्फिकारखानाकडे पाठवून औरंगजेबानंतर जेव्हा त्यांच्या मुलांत यादवी सुरू होईल, तेव्हा त्याला कर्नाटकात स्वतंत्र राज्य स्थापन करण्यासाठी मराठे मदत करतील, अशी महत्त्वाकांक्षा जुल्फिकारखानाच्या मनात निर्माण केली. त्याला त्याने लगेच मान्यता दिली. तेव्हा छत्रपती राजाराम महाराजांनी फक्त एकच अट घातली, ती म्हणजे औरंगजेब जिवंत असेर्पयत जुल्फिकारखानाने जिंजीचा वेढा रेंगाळत का होईना, चालूच ठेवायचा. जिंजी जिंकण्याचा शर्थीचा प्रयत्न बिलकुल करायचा नाही. जुल्फिकारखानाने हे मान्य केल्यामुळेच पुढे सहा वर्षे हा वेढा चालूच राहिला.
छत्रपती राजाराम महाराजांनी शाहजादा, वजीर व सरसेनापती अशा तीन मातब्बर आसामींना वश करण्यात यश मिळविले होते. यामुळे मराठय़ांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला. म्हणूनच दक्षिणेत मराठेच मोगलांवर राजनैतिक व लष्करी विजय मिळवू लागले. खरे तर काही वर्षापूर्वी मराठय़ांचे राजपुत्र संभाजीराजे मोगलांना मिळाले होते; त्याचा एक प्रकारे छत्रपती राजाराम महाराजांनी घेतलेला हा बदलाच होता.
अशा अनेक पुराव्यांच्या आधारे आपल्या ग्रंथात डॉ. जयसिंगराव पवार यांनी छत्रपती राजाराम महाराजांचा पराक्रम मांडला आहे.
या पुस्तकात एकूण 24 प्रकरणे आहेत. पहिले प्रकरण संभाजीपर्वाचे आहे. प्रकरण 2 ते 15 मध्ये छत्रपती राजाराम महाराजांच्या काळातील लढय़ांची महाराष्ट्र व कर्नाटक अशी उपविभागानुसार प्रत्येक वर्षनिहाय मांडणी आहे. उर्वरित प्रकरणांमधून मराठय़ांचे प्रशासन, लष्कर, युद्धनीती, लोकजीवन आदी विषय मांडले आहेत. सोबत चार परिशिष्टे जोडली आहेत. त्यातही पत्रे, कालसूची, राजाराम महाराजांच्या मुद्रा, स्वराज्यविस्तार आदी गोष्टी सविस्तर मांडल्या आहेत. या 450 पानांच्या बृहद्चरित्राचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे यात वापरलेल्या किल्ल्यांची, समकालीन व्यक्तींची व त्यांच्या समाधींची, वस्तूंची रंगीत छायाचित्रे.
छत्रपती राजाराम महाराजांचा अवास्तव गुणगौरव न करता अस्सल संदर्भाचा आधार घेऊन हे चरित्र डॉ. पवार यांनी साकारले आहे. स्वराज्याच्या अतिकठीण काळात छत्रपती राजाराम महाराजांनी केलेली अतुलनीय कामगिरी या ग्रंथाद्वारे सर्वापुढे आली आहे.