शाक्तिशाली राफेल
By Admin | Updated: August 30, 2014 15:07 IST2014-08-30T15:07:28+5:302014-08-30T15:07:28+5:30
संरक्षणसिद्धता हेच सार्मथ्याचे खरे लक्षण. भारतीय वायुदलाने त्या दिशेने अतिशय चांगली पावले उचलायला सुरुवात केलेली आहे. वायुदलात नव्याने येऊ घातलेले शक्तिशाली राफेल हे आपली सिद्धता आणखी भक्कम करण्याच्या दिशेने टाकलेले आणखी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. काय आहेत या राफेलची वैशिष्ट्ये आणि त्याचा देशाला काय लाभ होणार आहे?

शाक्तिशाली राफेल
विनायक तांबेकर
नुकतेच फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री घाईघाईने दिल्लीत आले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन निघून गेले. त्यांचा मुख्य उद्देश राफेल या फ्रेंच बनावटीच्या मल्टिरोल फायटर विमानाच्या ७ वर्षांपासून भिजत पडलेल्या कराराची पूर्तता करणे, हा होता. सुमारे १ लाख कोटी रुपयांच्या या कराराद्वारे भारतीय वायुदलाला १८ पूर्णत: तयार असलेली राफेल आणि नंतर हिंदुस्थान डायरॉनिटक्स लिमिटेड (अछ) बंगलोर यांच्या सहकार्याने आणखी १0८ अत्याधुनिक विमाने भारतातच तयार करून वायुदलाकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. संरक्षण सामग्री खरेदीतील हा सर्वांत जास्त किमतीचा करार आहे. या राफेल विमानामुळे भारतीय वायुदलाच्या शक्तीत लक्षणीय भर पडणार असून, वायुदलाची गेल्या १0 वर्षांपासूनची गरज काही प्रमाणात पूर्ण होणार आहे. राफेल हे फ्रान्सच्या डिसाल्ट कंपनीने तयार केलेले अत्याधुनिक बहुउपयोगी फायटर-मीडियम मल्टिरोल कॉम्बट एअर क्राफ्ट (टटफउअ) आहे. याची भारतीय वायुदलाला तातडीची आणि आत्यंतिक गरज होती. कारण, वायुदलातील मिग २१, मिग २७, जग्वार, मिराज २000, मिग २३ ही विमाने गेली १५ ते २0 वर्षे सेवेत आहेत. त्यातील तंत्रज्ञान मारक शक्ती, वेग आणि लढाईतील हालचालींची क्षमता कालानुरूप कमी झाली आहे. त्यामुळे भारतीय वायुदलाने काहींचे आधुनिकीकरण, काहींना कालबद्ध कार्यक्रमानुसार मोडीत काढण्याचा कार्यक्रम तयार केला.
विमाने, रणगाडे, तोफा जुन्या झाल्या, की मोडीत काढा म्हणणे सोपे आहे; परंतु ते करण्याआधी त्यांच्या जागी काय आणायचे, याची योजना हवी. या योजना मार्गी लावण्याच्या प्रक्रियेत अक्षम्य विलंब लागला. त्याचे कारण संरक्षण सामग्री खरेदी करण्यामध्ये असलेले निरनिराळे विभाग आणि अधिकारी विमान किंवा रणगाडा कोणता चांगला, याचे मत वायुदल आणि सैन्य दल देतात; परंतु त्याच्या पुढच्या गोष्टी-किंमत, करारातील अटी, पूर्तता करण्याचा कालावधी, ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी, पेमेंट करण्याची पद्धत इ. गोष्टी संरक्षण मंत्रालयातील सचिव व इतर ठरवितात. त्यावर शेवटचे शिक्कामोर्तब संरक्षणमंत्री यांचे असते. या सगळ्या नोकरशाहीच्या नियमानुसार आणि लाल फितीच्या कारभारामुळे राफेल भारतीय वायुदलात येण्यास अक्षम्य उशीर झाला.
त्याला जबाबदार कोण, याबद्दल कोणीच काही भाष्य करीत नाही. राफेल आणि इतर लढाऊ विमान पुरवठय़ाची टेंडर्स २00७मध्ये सरकारने काढून ती विमान निर्मितीच्या क्षेत्रातील ६ देशांना दिली. त्यामध्ये फ्रान्सचे डिसॉल्ट राफेल, अमेरिकेच्या बोईंग कंपनीचे सुपर हॉर्नेट प्रसिद्ध लॉकहीड मार्टिन कंपनीचे एफ १६, फाल्कन, युरोफायटर टायफून, रशियाचे मिग ३५ आणि स्वीडनचे ग्रीपेन जास्ब या प्रसिद्ध कंपन्यांचा समावेश होता. या सर्व विमानांच्या लडाख, राजस्थान, नेफा इ विशिष्ट भागांत भारतीय वैमानिकांनी स्वत: ती चालवून चाचण्या घेतल्या.
त्या चाचण्यांनंतर फ्रान्सचे ‘राफेल’ आणि युरोफायटर ‘टायफून’ या दोन लढाऊ मल्टिरोल विमानांची शिफारस- निवड वायुदलाने संरक्षण मंत्रालयाकडे केली. ती तारीख होती २७ एप्रिल २0११! संरक्षण मंत्रालयाच्या चाकोरीतून निर्णय होण्यास जानेवारी २0१२ उजाडले आणि फ्रेंच कंपनीच्या डेसाल्टच्या राफेलची निवड नक्की करण्यात आली. आज ऑगस्ट २0१४मध्ये दोन वर्षे झाली, तरी राफेल अजून भारतीय वायुदलात सामील झालेले नाही. याचे कारण करारातील इतर अटी आणि त्याची पूर्तता करण्यावरून झालेली चर्चा आणि विवाद. भारताचा देशांतर्गत विमान बांधणी आणि टेक्नॉलॉजी ट्रान्सफर यांवर जोर होता. कारण, त्यामुळे संरक्षण उत्पादनात स्वयंपूर्णता या आपल्या गेले ३0 वर्षांपासूनच्या धोरणाचा पाठपुरावा होणार होता. त्यासाठी आपल्या तंत्रज्ञान्यांना, इंजिनिअर्सना प्रशिक्षण देण्याची तरतूद रुपयांमध्ये किंवा डॉलर्समध्ये आणि केव्हा व किती करायची, यावर फ्रान्स आणि भारतामध्ये एकमत हवे. त्या चर्चांनाही आणि निर्णयास वेळ लागतो, हे जरी खरे असले, तरी इतक ा २ वर्षांचा कालावधी जाणे योग्य नव्हते.
शेवटी एकमत झाल्यानंतर फायनल ऑर्डर भारताने द्यावयाची असते. या सर्व विलंबामुळे राफेलची किंमतही वाढली. २00७मध्ये १२६ राफेल विमाने भारताला पुरविण्याची किंमत ४२ हजार कोटी रुपये होती. ती जानेवारी २0१२मध्ये सुमारे ९0 हजार कोटी रुपयांवर गेली आणि आता त्याच १२६ राफेलसाठी भारताला सुमारे १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत द्यावी लागणार आहे. या आवाढव्य खरेदीची गरज आहे का? असा प्रश्न एखाद्याच्या मनात येणे साहजिकच आहे. त्याचे उत्तर ही गरज आहे. कारण, भारतीय वायुदलाकडे सध्या असलेली फायटर्स आणि इतर विमाने १२ ते १५ वर्षांपासून असून, त्यांच्या जागी नवीन अत्याधुनिक विमानांची गरज आहे. सध्या भारतीय वायुदलात मिग २१, मिग २७, जग्वार, मिराज २000 आणि मिग २९ या लढाऊ विमानांचा समावेश आहे. त्यापैकी मिग २१ आणि २७ कालबाह्य झाले असून, मिराज २000चे नूतनीकरण करण्यात आले आहे. याशिवाय ट्रान्सपोर्ट विमाने, हेलिकॉप्टर्स यांचाही समावेश आहे. भारतीय वायुदलाचा जगात चौथा क्रमांक आहे. तसेच, आधुनिकीकरणाची प्रक्रिया सतत चालू असते. दररोज नवीन तंत्रज्ञान विकसित होत असल्याने भारतीय वायुदलालाही त्याची दखल घेणे भाग आहे. तशी ती घेतली जात आहे; परंतु नवीन विमाने, उपकरणे, साधनसामग्री आणि तंत्रज्ञान यांसाठी हजारो कोटींची तरतूद लागते. राफेलच्या खरेदीमुळे ती अंशत: पूर्ण होत आहे.
२६ जानेवारी किंवा वायुदलाच्या वर्धापन दिनी ‘सारंग’ हेलिकॉप्टर्सनी केलेली कसरत किंवा ‘किरण’ विमानाच्या कसरती अंगावर शहारे आणणार्या असतात; परंतु हे सर्व आणि युद्धात शत्रूला नामोहरम करण्यास दोन गोष्टींची गरज असते. ती म्हणजे उत्कृष्ट विमान आणि ते चालवणारा उत्कृष्ट पायलट. म्हणूनच जुनी विमाने टप्याटप्याने मोडीत काढून त्या जागी नवी आणणे, ही कायमची आणि सतत चालणारी पक्रिया आहे. राफेलची खरेदी आणि निर्मिती हा त्यातील एक भाग आहे.
राफेलची क्षमता आणि गुणवत्ता वाखाणण्यासारखी आहे. राफेल मल्टिरोल कॉम्बॅट एअर क्राफ्ट-म्हणजेच बहुउपयोगी लढाऊ फायटर विमान असून, त्याची लांबी ५0 फूट, विंग स्पॅन ३५ फूट, उंची १७ फूट आहे. याचाच अर्थ ते छोटे विमान आहे; परंतु लढाऊ विमानाची क्षमता ही ते विमान किती वेगाने आणि किती वेळात आकाशात झेप घेऊ शकते आणि आकाशात शत्रूशी लढताना स्वत:भोवती किती वेगाने पलट्या मारीत शत्रूच्या विमानावर रॉकेट किंवा इतर स्फोटांचा मारा करून, शत्रूचा मारा चुकवीत, त्याच्या आवाक्यातून बाहेर जाते, यावर अवलंबून असते. राफेल या सर्व चाचण्यांना पूर्णपणे उतरले आहे. राफेलचे जास्तीत जास्त पे लोड ९५00 के.जी. आहे. टेक ऑफ लोड २४ हजार किलो ग्रॅम आहेत. हे विमान एकदा टाकीत इंधन भरल्यानंतर ३७00 किलोमीटर्सपर्यंतचा प्रवास करू शकते. म्हणजेच पाकिस्तान ओलांडून पुढे जाऊ शकते. तसेच, याचे लढाऊ क्षेत्र १८00 किलोमीटर्स त्रिज्येमधील क्षेत्र एवढे मोठे आहे.
राफेल १७ हजार मीटर्स उंचीपर्यंत जाऊ शकते. आणि वर चढण्याचा वेग दर मिनिटाला ६0 हजार फूट इतका प्रचंड आहे. त्यामुळे शत्रूच्या रॉकेट्सचा मारा चुकविणे सहज शक्य आहे. या बहुगुणी विमानाची किंमतही तशीच प्रचंड आहे. राफेलच्या एका विमानास ८४.४८ मिलीयन डॉलर्स म्हणजेच ४ कोटी २५ लाख रुपये मोजावे लागणार आहेत; परंतु विमानाची उपयोगिता आणि इतर विमानांच्या किमतीच्या तुलनेत ही रक्कम योग्यच म्हणावी लागेल. म्हणूनच एवढा मोठा व्यवहार करताना १00 वेळा विचार करावा लागतो. म्हणूनच राफेलचे अँग्रीमेंट २१0 पानांचे आहे, असे सांगितले तर खरे वाटणार नाही. उशिरा का होईना, राफेल हे बहुविध विमान भारतीय वायुदलात येत आहे, ही आनंदाची गोष्ट असून, आपण त्याचे स्वागत करू या.
भारतीय वायुदलाचे सार्मथ्य :
भारतीय वायुदलात सामील असलेले
१) सुरवॉय ३0 टङक- २00 विमाने (रशियन)
२) मिराज २000 - ४९ (फ्रेंच बनावटींची)
३) मिग २९ - ५६ (रशियन)
४) मिग २१ - २५४ (रशियन)
५) जग्वार - ११७ (ब्रिटिश)
६) तेजस- ८ (भारतीय) + ४0 विमानांची ऑर्डर (मिग २१, मिग २७ विमानांची जागा घेणार)
या फायटर विमानांव्यतिरिक्त ट्रान्सपोर्ट विमाने उ 17, कछ76, उ130 सुमारे ३0 वायुदलात आहेत. एअरबॉर्न अर्ली वार्मिंग विमाने ३ आणि नवीन पायलट्सना प्रशिक्षण देण्यासाठी हॉक, किरण, पिलाट्स मिळून सुमारे २00 ट्रेनर विमाने भारतीय वायुदलाकडे आहेत. रशियन बनावटीची एम १८ ही १८७ हेलिकॉप्टर्स, भारतीय बनावटीचे ध्रुव हेलिकॉप्टर्स ४७ आणि इतर अनेक छोटी-मोठी विमाने भारतीय वायुदलात आहेत.
(लेखक निवृत्त कर्नल आहेत.)