लॉर्ड्सवरचा नियतीचा शोले

By Admin | Updated: July 26, 2014 13:06 IST2014-07-26T13:06:37+5:302014-07-26T13:06:37+5:30

क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्सवरचा भारतीय संघाचा विजय म्हणजे तनामनात क्रिकेट आहे, असे सांगणार्‍या इंग्लंडच्या संघाला त्यांच्याच घरात दिलेली जोरदार थप्पड होती. गोलंदाजी आणि फलंदाजी, इतकेच काय तर क्षेत्ररक्षणातही एखाद्या युद्धाप्रमाणे डावपेच रचून व कौशल्याने खेळून मिळवलेल्या या विजयाचा आँखोदेखा नजारा.

Shadow of Lords | लॉर्ड्सवरचा नियतीचा शोले

लॉर्ड्सवरचा नियतीचा शोले

 द्वारकानाथ संझगिरी

 
भारतीय संघाचा लॉर्ड्सवरचा विजय ही ‘नियती’ नावाची सलीम जावेदने लिहिलेली अफलातून पटकथा होती. म्हटलं तर एक सूडकथा; पण हिरो बघता बघता व्हिलन झाले आणि व्हिलन हिरो. आठवा... या कसोटीची पार्श्‍वभूमी आठवा. अँडरसन-जडेजा प्रकरण इंग्लिश प्रेसने रंगवलं.ठरवून अँडरसनला निष्पाप ठरवलं गेलं. जडेजा-धोनीला शकुनी! अँडरसन हा स्विंगचा शहेनशाह असल्यामुळे त्याला संघाबाहेर काढायचा डाव आहे, वगैरे चर्चा रंगवली गेली. सगळं अगदी टिपिकल ब्रिटिश! त्यामुळे इंग्लिश संघ पेटून उठणार आणि लढणार, ही अपेक्षा. अपेक्षापूर्तीसाठी लॉर्ड्सला हिरवं कारपेट टाकलं गेलं. खेळपट्टी पाहून अँर्डय़ू स्ट्रॉस हा इंग्लंडचा माजी कर्णधार म्हणाला, ‘लॉर्ड्सच्या खेळपट्टीवर मी एवढं गवत पाहिलं नव्हतं. 
पटकथा लिहिणारी नियतीही हुशार. टॉस इंग्लंड जिंकेल, हे पाहिलं; जणू ताटात ब्रिटिशांचा लाडका अँपल पाय फस्त करायची सर्व वाट पाहत होते; पण हिरव्या खेळपट्टीने त्यांना पहिल्या दिवशी फक्त ‘सॅलड’ दिलं; कारण ज्या इंग्लिश वातावरणात इंग्लिश गोलंदाज वाढले, ज्या हिरव्या खेळपट्टय़ांच्या अंगाखांद्यावर खेळले, त्यांना ही खेळपट्टी वापरताच आली नाही. ऐन युद्धात ब्रह्मस्त्र विसरणार्‍या कर्णाप्रमाणे अँडरसन, ब्रॉडसारखे अनुभवी गोलंदाज मूलभूत धडाच विसरले. अशा खेळपट्टीवर चार स्लीप, एक गली आणि ऑफ स्टंपच्या आसपास खोलवर चेंडू ठेवणे आणि खेळपट्टीला सांगणे ‘चल घाल धुमाकूळ,’ हा घोकलेला मंत्र विसरला गेला. प्रेस बॉक्स आणि कॉमेंटेटर बॉक्समधल्या माजी इंग्लिश खेळाडूंनी कपाळावर हात मारून घेतला. भारत ५ बाद पन्नास-साठ वगैरे,  ते स्वप्न पाहत होते. प्रत्यक्षात तिथे दोनच बळी पडले. यशाचा लंबक अपेक्षेपेक्षा विरुद्ध दिशेने निघाला, याची खात्री सर्वांना झाली. लंचमध्ये इंग्लिश गोलंदाजांचं बौद्धिक घेतलं असावं. डावपेच बदलले. भारतीय फलंदाजांना जास्तीत जास्त चेंडू खेळवले गेले. त्यात चुका झाल्या, विकेट्स गेल्या. यशाच्या लंबकाने पुन्हा माघार घेतली; पण त्याला वाटेत अडवलं, एका योद्धय़ाने.. त्याचे नाव अजिंक्य रहाणे. सुरुवात सावध, बचाव कडेकोट; पण येणार्‍या चेंडूवर चौकाराचा टॅग लावलेला असेल, तर मग ती किंमत वसूल करणे. त्याने माघारी फिरलेल्या लंबकाला फक्त रोखले नाही, तर तो दिवसाच्या शेवटी बाद होऊनही यशाच्या लंबकाला स्वत:च ड्रेसिंग रूममध्ये घेऊन गेला. 
लॉर्ड्सवर मी भारतीय फलंदाजांची अनेक शतकं पाहिली आहेत. १९८६चं दिलीप वेंगसरकरचं पाहिलं. ते ऐतिहासिक होतं; कारण तो लागोपाठ तिसर्‍यांदा लॉर्ड्सवर शतक ठोकत होता. १९९0चं अझरुद्दीनचं शतक म्हणजे फटक्यांची डोळे दिपवणारी रोषणाई होती. एक जख्ख म्हातारा क्रिकेटप्रेमी मला तेव्हा म्हणाला होता, ‘अझरुद्दीनच्या रूपात रणजीने पुन्हा जन्म घेतला, असं वाटलं.’ १९९६चं गांगुलीचं शतक हा एक गोड धक्का होता; कारण गांगुलीला सर्वांनी पळपुटा ठरवलं होतं. एकदा सचिनच्या शतकाची वाट पाहत असताना त्याचा मित्र अजित आगरकर शतक ठोकून गेला. लॉर्ड्सवर प्रसादाचं फळ अनपेक्षितपणे कोणाच्याही ताटात पडू शकतं, याची त्या वेळी जाणीव झाली; पण रहाणेच्या ताटात पडलेलं प्रसादाचं फूल हे त्याचं तंत्र, त्याचं बॅकफूट आणि फ्रंटफूटवरचा बचाव, फटक्यांची विविधता, त्याच्या फलंदाजीतला समतोलपणा आणि त्याचं टेम्परामेंट आणि आगीशी लढण्याची जिद्द या सर्व गोष्टींचा प्रसाद होता. हे अत्यंत प्रतिकूल खेळपट्टीवर आणि नवव्या व दहाव्या क्रमांकाच्या फलंदाजांना बरोबर घेऊन काढलेलं शतक होतं. वरच्या सर्व शतकांपेक्षा याबाबतीत भिन्न. त्यामुळेच कदाचित नियतीला त्या शतकाला विजयाचं कुंकू लावावंसं वाटलं. अर्थात, भुवनेश्‍वर कुमारला नवव्या क्रमांकाचा फलंदाज, असं लेखूनही त्याच्या धावा, त्याचा अँप्रोच आणि विशेषत: त्याचा बॅकफूट बचाव पाहून चुकीचं वाटतं. तो शाळेत आघाडीला जायचा, यावर कोणी अविश्‍वास दाखवणार नाही. या भुवनेश्‍वर कुमारने इंग्लिश गोलंदाजांना ही खेळपट्टी कशी वापरावी, याचं प्रात्यक्षिक दाखवलं. इंग्लंडमध्ये भुवनेश्‍वर कुमार कसोटी सामना पहिला खेळतोय. पूर्वी खेळला असेल, तर मागच्या जन्मात. हा गोलंदाज इंग्लंडमध्ये गोलंदाजी टाकायला जन्माला आलाय. फार मोठा वेग नाही; पण तो चेंडू दोन्ही दिशेला स्विंग करू शकतो, बिम करतो. त्याला र्मयादा आहेत. पूर्वी इंग्लिश कौंटीमध्ये असे अनेक गोलंदाज दिसायचे. पृथ्वीवर पाठवताना देवाच्या पोस्ट खात्याने चूक केल्यामुळे हे पार्सल इंग्लंडऐवजी भारतात आलं; पण त्याने इंग्लिश फलंदाजीचा कणा तोडला. अनेकांना कल्पना नसेल, पण लागोपाठच्या कसोटीत पाच बळी आणि अर्धशतक ठोकून तो कुणाच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे, ठाऊक आहे? इयान बोथम आणि रिचर्ड हेडली!
पण, पहिल्या डावात नियतीला पुन्हा गंमत करायची हौस आली. अनपेक्षितपणे प्लंकेटने अर्धशतक ठोकलं आणि इंग्लंडला आघाडी मिळाली. प्रेस बॉक्समध्ये पडलेले इंग्लिश खांदे सरळ झाले. भारताच्या दुसर्‍या डावात मुरली विजय बॅटबरोबर गादी, उशी घेऊन विकेटवर आला. (पांघरूण नव्हतं, कारण इंग्लंडमध्ये एवढा कडक उन्हाळा आहे, की पांघरुणाची गरज लागत नाही.) तो आणि पुजारा खेळत असताना चहा पितापिता वसिम अक्रमही म्हणाला, ‘२६0 तक चलो, गोरे हार जायेंगे.’ .. आणि प्लंकेटच्या रूपात नियतीने पटकथा बदलली. पुजारा धरणीकंप हलवून टाकेल, असे वाटत होते. प्लंकेटने त्याला तीन-चार चेंडूंवर मागे खेळवलं आणि मग एक आऊट स्विंगर ऑफस्टम्पच्या आसपास मारायला दिला. पुजाराचं तप भंगलं. तो मेनकेच्या मागे गेला, थेट पॅव्हेलियनपर्यंत आणि मग विराट कोहली खेळपट्टीवर आला, बॉलिवूडच्या एका मेनकेच्या मिठीतून नुकताच बाहेर आल्याप्रमाणे. चेंडूचा स्विंग, टप्पा, दिशा, बाऊन्स या सर्वांचा त्याचा अंदाज चुकला. त्याने स्वत:च्या हाताने चेंडू आणि दरवाजा उघडला आणि रहाणेच्या आर्मगार्डला लागूनही जेव्हा त्याला बाद दिलं गेलं, तेव्हा नियतीने पटकथेत पुन्हा रंग भरले. त्याचक्षणी पुढच्या कथेचा अंदाज कुणीच लावू शकत नव्हतं आणि मग एक स्ट्रीट स्मार्ट क्रिकेटपटू एक वेगळा प्लॅन घेऊन अवतरला. त्याला आपण जडेजा म्हणतो. रणजीत तीनदा तीनशे ठोकूनही इंग्लिश वातावरणात तो बचाव करू शकत नाही, हे त्याला ठाऊक होते. तो सरळ टी-टष्‍द्वेंटी क्रिकेट खेळला आणि त्याने अँडरसन, ब्रॉडला गोंधळवून टाकले. अशा फलंदाजीची इंग्लंडला अपेक्षा नव्हती आणि त्यामुळे प्लॅनिंगही नव्हतं. ही सौराष्ट्राच्या जडेजाची राणाप्रतापी झुंज होती; जी जडेजा जिंकला. त्याला पुन्हा विश्‍वासू भुवनेश्‍वर कुमारची साथ मिळाली.
३१९चा पाठलाग कठीण आहे, हे इंग्लंडलाही माहीत होतं. चौथ्या दिवशी ४ बाद १0५ असताना प्रेस बॉक्समधले काळवंडलेले गोरे चेहरे हेच सांगत होते, इथून पुढे इंग्लंड हरणार; पण सलीम जावेदच्या पटकथेप्रमाणे नियतीने पुन्हा एकदा थक्क करणारे प्रसंग लिहून ठेवले होते. लंचपर्यंत इंग्लंड बिन बाद ६७ धावांची भर टाकून सुखात दोन घास खाणार, असं वाटत असताना बुद्धिमान धोनी एक वेगळा डावपेच खेळला. त्याला ईशांत शर्मामध्ये आणीबाणीसाठी वापरायची स्टिरॉईड दिसली. त्याने आखूड टप्प्याचे उसळते चेंडू त्याला टाकायला सांगितले. त्याच्या शारीरिक उंचीचा विचार करता ते योग्य होते. त्याने स्लीप काढल्या. दोन शॉर्ट लेग आणि लाँग ऑनला सीमारेषेवर तीन क्षेत्ररक्षक ठेवले. इंग्लिश फलंदाजांना आव्हान दिलं, ‘हिमत असेल तर चेंडू पूल, हुक करून धावा जमवा.’ इंग्लिश गोलंदाजांचं औषध त्यांनाच पाजलं. पुन्हा एकदा धक्कातंत्र. बाऊन्सर्सचा बॉम्बवर्षाव झाला आणि इंग्लिश फलंदाजी होरपळली. दुसर्‍या महायुद्धात हिटलरने लंडनवर असाच बॉम्बवर्षाव केला होता; पण इंग्लंडला सांभाळून घ्यायला त्या वेळी चर्चिल होता. इथे इंग्लंडचा चर्चिल- कुक स्वत:च्याच अपयशाची रेसिपी शोधत होता. १९६१मध्ये असाच एक डावपेच रिची बेनॉ खेळला होता. इंग्लंड विजयाकडे कूच करत होते. लंचनंतर बेनॉने त्याचे लेग स्पिनर्स राऊन्ड द विकेट टाकायला सुरुवात केली. त्या काळात लेग स्पिनर्स राऊन्ड द विकेट टाकत नसत. एकामागून एक बोल्ड काढले आणि इंग्लंड कोलमडलं. ती कसोटी बेनॉच्या डावपेचानं जिंकली. धोनीची धूर्तता त्या दर्जाचीच होती. या पटकथेतील अनेक पात्रं महत्त्वाची होती; तरी शेवटी ऐन मोक्याच्या वेळी जडेजा-ईशांत जय-विरू ठरले आणि धोनी ठाकूर. लॉर्ड्सचा नियतीचा शोले हा सुपरहिट शो आहे मनाच्या थिएटरमध्ये. तोही शंभर आठवडे चालल्याशिवाय राहणार नाही.
(लेखक ज्येष्ठ क्रीडा समीक्षक आहेत.)

Web Title: Shadow of Lords

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.