सर्पराज

By Admin | Updated: September 26, 2015 14:10 IST2015-09-26T14:10:55+5:302015-09-26T14:10:55+5:30

माझे वडीलही वनाधिकारी असल्याने अगदी लहानपणापासून मी अनेक जंगलं पालथी घातली, मोठं आवार असणा:या मोठाल्या जुन्या बंगल्यात, वनविश्रमगृहात मी राहिलो आहे.

Sarpraj | सर्पराज

सर्पराज

>प्रकाश ठोसरे
अनुवाद : अरविंद आपटे
 
माझे वडीलही वनाधिकारी असल्याने अगदी लहानपणापासून मी अनेक जंगलं पालथी घातली, मोठं आवार असणा:या मोठाल्या जुन्या बंगल्यात, वनविश्रमगृहात मी राहिलो आहे. त्यामुळे गोचिडी, कोळी, जळवा, घोणी, विंचू असे कितीतरी विषारी जीव माङो मित्र झाले होते. त्याशिवाय घुशी, सापसुरळ्या, सरडे आणि पाली हेही त्यात समाविष्ट होते. पण त्यात सर्वात वरचं स्थान होतं सापांचं! पक्ष्यांचे साद-प्रतिसाद ऐकणं हा माझा लहानपणाचा आवडता छंद! त्यातही पावसाळ्यात मैनेचे आवाज टिपण्याकडे माङो लक्ष असायचे. पावसाळ्यात साप सक्रिय होतात आणि मैना ओरडून ओरडून त्यांचा ठावठिकाणा इतर जिवांना सांगत राहते, हे मला माहीत असल्याने मी पण सावध होत असे.
त्याकाळी साप म्हटला की पहिल्यांदा साप मारणा:या शूरवीराला आमंत्रण जायचं. त्यातही बहुतेकवेळा धामण हा बिनविषारी साप बळी जायचा. साप या जिवाबाबत इतक्या दंतकथा, गैरसमजुती आहेत की त्याचे अस्तित्व लवकरात लवकर कसं संपवता येईल हे बघितलं जातं. तेव्हा याच सापाची (नाग) आपण श्रवणात पूजा करतो हे नजरेआड केलं जातं. भक्तिभावाने केलेली ही पूजाही ब:याचदा नागाच्या जिवावर बेतते. त्याने दंश करू नये म्हणून त्याचे दात काढले जातात, त्यामुळे पूजेनंतर त्याला रानात सोडलं तरी त्याचं शिकारीचं अस्त्र निकामी झालेलं असतं. जबरदस्ती दूध पाजल्याने त्यांचा मृत्यूही संभवतो. 
 आमच्या लहानपणी आमच्या सर्व्हट्स क्वार्टरमध्ये एकतरी साप पकडणारा राहत असे. साप पकडण्यापासून बरीच कामं करणारा एक हरफन मौला, मोहनलाल मेहरौलिया नावाची एक व्यक्ती पन्नास वर्षापूर्वी आमच्या सर्व्हट्स क्वार्टरमध्ये राहत होती. तो रेल्वे खात्याचा कर्मचारी होता आणि आमचं आवार झाडत असे. त्याच्या सुरकुत्यांनी जाळीदार झालेल्या काळ्या-सावळ्या चेह:यावर शांत सात्त्विक भाव असे. कोणी तापानं फणफणला किंवा कोणाला कसलीशी बाधा झाली की त्याच्या आश्वासक स्पर्शासाठी त्याला बोलावणं जायचं. आमच्या आवारात किंवा बंगल्यात साप दिसल्यावर लहान चणीच्या या मोहनलालच्या अंगात न जाणो कुठून एक वेगळंच क्रौर्य संचारायचं. तो क्षणात परिस्थितीचा ताबा घेत असे. त्यामुळे घरात असा आगंतुक पाहुणा आल्यावर मोहनलालच्या आगमनाने आमचा जीव भांडय़ात पडत असे. घरात साप आढळल्यास मोहनलाल सापाच्या अंगावर गोडंतेल टाकण्याची विशेष दक्षता घेत असे. तेलामुळे सापाचं अंग बुळबुळीत होऊन त्याच्या हालचाली मंदावत. त्याने साप मारण्यासाठी एक खास काठी ठेवली होती. मोहनलालच्या मुलाने रेल्वेत नोकरी करण्यापुरती त्याची गादी चालवली, पण वडिलांचे इतर खास गुणविशेष उचलले नाहीत. 
सापांबाबत खूप सा:या दंतकथा होत्या (आणि आहेतही) त्यामुळे त्याच्या देहाची विल्हेवाट लावायची काही खास पद्धत आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे त्याचं दहन करणो, काही एक मंत्र म्हणणो, त्या चितेत भोकं असलेला तांब्याचा पैसा टाकला जाई. साप पकडणा:याला त्याच्या कामगिरीबद्दल बक्षीस दिलं जाई. सापांना जाळण्याबाबातही त्यांचं स्पष्टीकरण असे, जोपर्यंत आपण त्याला जाळत नाही, पूर्ण विधी करत नाही तोपर्यंत त्या सापात जीव असण्याची शक्यता असते. सापाने त्याच्या डोळ्याने घेतलेल्या फोटोच्या मदतीने तो साप मारणा:याचा पाठलाग करून त्याला चावून सूड घेऊ शकतो. नाग आणि नागिणीच्या बाबतीत ह्या सूडकथेवरचा विश्वास दृढ होता. ‘सापाला दोर म्हणावं’ आणि त्याचा रोष ओढवून घेऊ नये यासाठी आमचा नोकरवर्ग आम्हाला विनवत असे. साप आडवा आल्यास बाहेर जाऊ नये, साप आकृष्ट होतात म्हणून शीळ घालू नये, सुगंधी वनस्पतीच्या जवळ सापाचं वास्तव्य असतं म्हणून त्या वनस्पतींच्या जवळ जाऊ नये असे कितीतरी त्यांचे शकुन-अपशकुन होते. 
आता एक वनाधिकारी म्हणून पावसाळ्यात नवीन रोपवनाची, तिथल्या निंदणीच्या कामाची पाहणी करणो हा एक कामाचा भाग असल्याने जंगलात फिरावं लागायचं. अशी पाहणी उंच सखल भागातून, पावसाळ्यात माणूस दडेल इतक्या उंच वाढलेल्या गवत, झाडीझुडपातून करावी लागते. त्यावेळी सापांशी नेहमीच आमनेसामने व्हावं लागतं. मला अशीच एक फसलेली पाहणी आठवते. आम्ही रोपनवात शिरल्या शिरल्या एका जरा जास्तच संवेदनशील कमर्चा:याला गवतात दडलेला साप दिसला, त्यासरशी त्याने ओरडून आम्हाला सावध केलं आणि आम्ही पुढे निघालो. पण त्याचं मन इतकं शंकेखोर झालं होतं की दर पाच मिनिटाने तो पायात साप आल्याप्रमाणो साप, साप असं ओरडायचा आणि पहिल्या प्रसंगावरून आम्हालाही खरंच वाटायचं आणि आम्ही लगबगीने दूर व्हायचो. पण प्रत्यक्षात साप नसायचाच. शेवटी हा प्रकार इतका वाढला की वैतागून आम्ही आमची पाहणी अध्र्यातच सोडून दिली.
सापातही नागाला सगळे चांगलेच टरकून असतात. तारुबंदाच्या काळात माङया अशा नागांशी जवळून गाठभेटी झालेल्या होत्या त्या अजूनही अगदी कालपरवा घडल्यासारख्या आठवतात. त्यातली पहिली भेट ऑगस्ट 1979 मधली आहे. माङो वरिष्ठ सक्सेनासाहेब तारुबंद्याच्या दौ:यावर आले होते. तारुबंदा-आढाव रस्त्यावरील आढावच्या कूप नंबर 4 मधील छापणीचं काम तपासायला ते आले होते. काम पाहता पाहता आम्ही जंगलात खूप आतवर गेलो होतो. काळोख पडू लागला तसं आम्ही लगबगीने जीपकडे परतू लागलो. अचानक अंधुक उजेडात सक्सेनासाहेबांच्या पायाशी चमकणारी एक गोष्ट मला दिसली. माङया साहेबांचा पाय त्या सहा फुटी नागावर पडता पडता राहिला. मी त्यांच्या मागेच असल्याने तो साप त्यांच्या दोन पायांच्या मधून जात आहे हे पाहताना मला माङया पायांना चटकन ब्रेक लावावा लागला. सक्सेनासाहेब आश्चर्यकारकरीत्या अगदी थोडक्यात वाचले.  
दुसरी आठवण काहीशी विनोदी आहे. चिखली (माङया क्षेत्रतील वन परिमंडळाचं मुख्यालय असणारं एक गाव) आश्रमशाळेतला दहावीतला एक मुलगा सिपना नदीवर अंघोळीला गेला होता. अंघोळीवरून परतताना त्याच्या सायकलीच्या चाकाखाली एक नाग आला. नागाचा पवित्र पाहून त्या मुलाची घाबरगुंडी उडाली आणि तो सायकलवरून धाडकन खाली पडला. तितक्यात आमची फेरी तिथे झाली. पाहतो तर काय! एका पूर्ण वाढ झालेल्या नागाने सायकलला विळखा घातला होता आणि फणा काढून त्या गरीब बिचा:या मुलाला जागच्या जागीच खिळवून टाकलं होतं. मी जीपमधून उतरून त्या मुलाच्या मदतीला जायचं ठरवलं. पण तो नाग सायकलवरची त्याची मालकी काही सोडेना. सापाला घाबरवण्यासाठी जीपचा आवाज वाढवला तरी तो साप बधेना. शेवटी त्या मुलाला जीपमध्ये घातलं, थोडं इकडेतिकडे फिरवलं. दरम्यानच्या काळात सगळं काही आलबेल आहे हे पाहून नाग जवळच्या जंगलात नाहीसा झाला. 
तिसरी भेट तारुबंद्यातील माङया निवासस्थानातच झाली होती. ह्या घराला मागे बंदिस्त अंगण होतं आणि तिथे एका कोप:यात शौचालय होतं. एके दिवशी सकाळी काहीशा अंधारातच मला त्याचा वापर करावा लागला. माझी चाहूल लागल्याने मी जाऊन आल्यावर बादली भरण्यासाठी माझा मदतनीस पाणी आणि कंदील घेऊन शौचालयात गेला. तो तसाच घाबराघुबरा होत बाहेर पडला. मला वाचवल्याबद्दल देवाचे आभार मानत होता. मी खरोखरच सुदैवी होतो. कारण मी जाऊन आलेल्या त्या शौचालयात माङयासोबत नागही होता. अंधारात त्याच्यावर माझा पाय पडण्याची शक्यता होती आणि त्या दोन-चार मिनिटातच मला नाग डसू शकला असता. 
मेळघाटातला आणखी एक महत्त्वाचा साप म्हणजे अजगर. त्याची माझी पहिली भेट जीपमधूनच झाली. आम्ही जीपमधून जात असताना अचानक ब्रेक मारत जीप थांबली. रस्त्यात काही तरी पडलं होतं. मला आधी वाटलं की ट्रकमधून चुकून पडलेला सागवानी वासा असावा. पण लगेच लक्षात आलं की तो अजगर आहे. रस्त्याच्या रुंदीइतका तो लांबलचक आणि वाशाइतका जाडजूड होता. त्याने कोणतंतरी मोठं भक्ष्य गिळलं होतं. त्यामुळे त्याला रस्ता ओलांडायला पाच मिनिटं लागली. 
माकडं, हरिणासारख्या मोठय़ा भक्ष्यालाही अजगर गिळंकृत करतो. अशावेळी काही काळ त्याच्या हालचाली मंदावतात. ह्या अवस्थेत तो रस्त्याजवळ असला आणि एखाद्या वाटसरूने त्याला पाहिल्यास त्याच्याशी खेळ केला जातो, त्याला ढकललं जातं, दगडं मारली जातात, कधी कधी मारूनही टाकलं जातं. त्याला डिवचल्यास तो खाल्लेलं भक्ष्य ओकून काढतो. मी असं अजगराने ओकून काढलेलं माकड पाहिलं होतं, ते तर जिवंत असल्यासारखंच वाटत होतं. एका दहा फुटी अजगराने मोठं हरीण खाल्लं होतं आणि ओकून बाहेर काढताना हरणाच्या अणुकुचीदार शिंगाने अजगराचं पोट फाटलं आणि त्यातच त्याचा अंत झाला. त्याचं कातडं व्याघ्र प्रकल्पाच्या संग्रहालयात जतन करून ठेवलं आहे. 
नोव्हेंबर 1979 ची गोष्ट. व्याघ्र प्रकल्पाच्या गाभ्याच्या हद्दीवरच्या साखरी या गावात माझी फिरस्ती चालू होती. तिथल्या गर्द रानात एका धबधब्याच्या पायाशी छानसं कुंड तयार झालं होतं. फक्त माङयाकरता असणारा हा नैसर्गिक पोहण्याचा तलाव पाहून त्यात पोहायला उतरल्याशिवाय मला राहवलं नाही. एवढं भाग्य अगदी सप्ततारांकित हॉटेलमध्येही मिळालं नसतं. छानपैकी अर्धा तास पोहल्यावर, मनसोक्त डुंबून ताजातवाना होऊन कुंडाच्या एका बाजूने मी बाहेर पडलो. त्याचवेळी दुस:या बाजूने एक महाकाय अजगरही सरपटत बाहेर पडला. या प्रसंगातून कायमचा लक्षात राहील असा एक धडा मला मिळाला की अनोळखी पाण्याशी कधी खेळू नये आणि अजगर बराच काळ पाण्याखाली राहू शकतो.
 
(लेखक महाराष्ट्राचे सेवानिवृत्त 
प्रधान मुख्य वनसंरक्षक आहेत.)
pjthosre@hotmail.com

Web Title: Sarpraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.