The sad story of this year's Ashadhi wari |  देऊळ बंद- यंदाच्या न होणार्‍या आषाढी वारीतील अ(न)र्थकारणाची कहाणी.

 देऊळ बंद- यंदाच्या न होणार्‍या आषाढी वारीतील अ(न)र्थकारणाची कहाणी.

ठळक मुद्देएकादशी अवघ्या एक दिवसाची; मात्र पंढरीच्या वारीचा माहोल राहायचा तब्बल वीस-पंचवीस दिवसांपर्यंत. यंदा वारीचं सारं वर्णन भूतकाळात लिहिण्याची वेळ आणली कोरोनानं.

- सचिन जवळकोटे

चंद्रभागा नदीवर विसावलेली पंढरी इतिहासात प्रथमच ‘चैत्री’नंतरचा ‘आषाढी’ सन्नाटा अनुभवतेय. घाटावरच्या पायर्‍याही एवढा शुकशुकाट पहिल्यांदाच पाहताहेत. खरंतर, आषाढी एकादशीची आदली रात्र कशी भारावलेली असायची. वारुळात मुंग्या जमाव्यात तशी लाखोंची गर्दी पंढरीत व्हायची. दुसर्‍या दिवशीची सायंकाळही कशी वेगावलेली असायची. मधाच्या पोळ्याला धक्का लागल्यानंतर मधमाशा जशा झप्कन बाहेर पडाव्यात, तशी हीच गर्दी पुन्हा आपापल्या गावाकडे झेपावयाची.  एकादशी अवघ्या एक दिवसाची; मात्र वारीचा माहोल राहायचा तब्बल वीस-पंचवीस दिवसांपर्यंतचा.
यंदा या वारीचं सारं वर्णन भूतकाळात लिहिण्याची वेळ आणलीय कोरोनानं. ‘फिजिकल डिस्टन्स’नं. होय. चैत्री वारीनंतर आषाढी यात्राही रद्द झाल्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा अन् मध्यप्रदेशातील लाखो वारकर्‍यांच्या काळजाचा जणू ठोका चुकलाय. गेल्या तीन महिन्यांपासून पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिराचा दरवाजा भाविकांसाठी बंद झालाय. ‘उघड दार देवा आता SS’ ही वारकर्‍यांची आर्त हाक अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणतेय.
खरंतर महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा यंदा खंडित झाली, एवढय़ापुरताच हा विषय इथं संपत नाही. पंचवीस दिवसांतल्या वारीच्या उत्पन्नातून वर्षभराचा संसार चालविणारी हजारो कुटुंबंही यंदा उद्ध्वस्त होत चालली आहेत. कारण आषाढी एकादशी यात्रा ही पंढरीत साजरी होत असली तरी देहू-आळंदी ते पंढरपूरपर्यंतच्या मार्गावरील कैक गावांमध्येही होत असते लाखोंची उलाढाल. दीड लाख वारकर्‍यांपासून सुरू झालेली वारी पंढरपुरात पोहोचते, तेव्हा तो आकडा गेलेला असतो बारा लाखांच्या घरात. या पंचवीस दिवसांतली उलाढाल असते शंभर कोटींपेक्षा अधिक.
केवळ दोन जोड कपडे घेऊन वारकरी घरातून निघतो.  गुरफटलेल्या संसारातून बाहेर पडण्याची ‘तुका गाथा’ ऐकत-ऐकत चालू लागतो. भौतिक भोगातून आत्मिक सुखाकडे नेणारी ‘ज्ञानेश्वरी’ वाचत तो पुढं वाटचाल करू लागतो. मात्र त्या बिचार्‍यालाही कदाचित माहीत नसतं की, आपण जसं एक गाव मागं टाकत जातोय, तसं हजारो लोकांचा संसार आर्थिक स्थैर्यानं फुलत जातो.


माऊलींची पालखी ‘नीरा’ ओलांडून लोणंदमध्ये विसावते, तेव्हा प्राप्त झालेलं असतं मोठय़ा यात्रेचं स्वरूप. लहान मुलांच्या गोल पाळण्यापासून ते वृद्धांच्या औषधांपर्यंत सगळ्याच गोष्टी असतात वारकर्‍यांच्या दिमतीला. या वारीत व्यवसाय करणारे व्यापारी येतात थेट मध्यप्रदेश अन् हरियाणातून. मजल दरमजल करत वारी जेव्हा वाखरी ओलांडून पंढरीत प्रवेश करते, तेव्हा प्रत्येक रस्त्यावर कडेला उभारलेले असतात गर्दीची गरज ओळखणारे हुशार व्यापारी. दोन-पाच रुपयांत कपाळाला विठ्ठलाचा गंध लावणारी छोटी-छोटी लेकरंही या काळात कमवून जातात पाच-सात हजार रुपये. मोबाईल चार्जिंगमधूनही हजारो रुपये कमावण्याची क्लृप्तीही अनेकांना गवसते इथंच. वारकर्‍यांची दाढी-कटिंग करायला तर कर्नाटकातून येतात शेकडो नाभिक बांधव. छोटा आरसा, वस्तरा अन् साबण एवढय़ाच वस्तूंवर ते रस्त्यावर तासाला हाताळतात किमान दहा ते बारा चेहरे. वर्षभराची कमाई होऊन जाते ती इथंच.
आषाढी यात्रेत सर्वात मोठी उलाढाल पाण्याची. केवळ दहा रुपयांत मिनरल वॉटरची सीलबंद बाटली मिळते ती फक्त याच ठिकाणी. भरलेल्या तर सोडाच रिकाम्या बाटलीवरही एका दिवसात हजार रुपये कमावणारे महाभाग सापडतील इथंच. पंढरीत रेल्वे पटरीच्या बाजूला आडोसा बघून प्रातर्विधीला जाणार्‍यांसाठी मिळते पाच रुपयात पाण्याची जुनी बाटली. जशी गरज. तशी सेवा.
दरवर्षीच्या वारीतील आर्थिक उलाढालीच्या आठवणी डोळ्यांसमोर आणत ‘लोकमत टीम’ चंद्रभागा तीरी आली, तेव्हा तिथं दिसली केवळ होड्यांची गर्दी. पाणीही नाही अन् माणसंही. वाळवंटात या होड्या गलितगात्र होऊन गपगुमान पहुडलेल्या, मालकाच्या उपाशी पोटाची जणू जाणीव झाल्यासारख्या. या ठिकाणी भेटला भागवत करकंबकर  नामक नावाडी, ‘माझ्या दोन होड्या आहेत. नदी पलीकडं जायला वीस तर गोपाळपूरसाठी चाळीस. मात्र यात्रेच्या काळात प्रत्येकी दीड-दोनशे रुपयेही मिळायचे. वर्षाचा गल्ला आठवडाभरात निघायचा. यंदा मात्र माशा मारत बसलोय. गेल्या तीन महिन्यांत एकच काम केलं बघा. वाळवंटात खड्डे करून त्यातनं चिल्लर पैसे हुडकून-हुडकून कसंतरी पोट भरलं. दिवसाकाठी शंभर-दीडशेंची चिल्लर मिळाली होती. आता मात्र हमाली करूनच स्वत:चा संसार चालवतोय. कामगार तर पुरते लागले कामाला’, भागवत बोलत गेला. चंद्रभागेत डुबकी मारताना पूर्वी वारकर्‍यांनी टाकलेल्या चिल्लरचा असाही फायदा या होडीवाल्यांनी सध्या घेतला. या ठिकाणी नाही म्हटलं तरी अडीचशे होड्या. सार्‍याच किनार्‍याला लागलेल्या. चंद्रभागेचा घाट चढून वर येताना भेटली एक चुडावाली बाई. नाव तिचं नीलम भंडारे. विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर रुक्मिणी मातेच्या नावानं चुडा भरल्याशिवाय परत फिरत नसते कुठलीच वारकरी स्त्री. नीलम सांगू लागली, ‘दोन्ही हातात दोन-दोन चुडे घातले तरच समाधान. वारीत माझे किमान चार-पाच हजार चुडे तरी जायचेच. हे लाखेचे गोल्डन चुडे पंढरपुरातच तयार होतात. सोबतीला कोल्हापुरातून रांगोळ्याच्या  चाळण्याही आणून इथं विकायचे. नाही म्हटलं तरी हजार-दीड हजार चाळण्या जायच्या. त्या पैशावर सहा महिने घर चालायचं. यंदा मात्र लोकांकडूनच मागून-मागून पोट भरतेय.’
नीलमसारख्या कैक बायका ‘रुक्मिणी’च्या नावावर जगायच्या. संसार चालवायच्या. यंदा ‘विठ्ठल’च बंद दरवाज्याआड राहिलाय. मंदिर परिसरातील सारीच दुकानं कुलपाआड गेलीयंत. इतकी दयनीय अवस्था पंढरपूरकरांनी कधीच न पाहिलेली. कधीच न अनुभवलेली. मंदिराच्या नामदेव पायरीसमोर बर्फी-पेढय़ांची कैक दुकानं. पासष्ट वर्षांचे दत्तात्रय देशपांडे सांगू लागले, ‘विठ्ठलाला पेढा आवडतो म्हणून त्याचा प्रसाद घरी घेऊन जाणारे लाखो वारकरी आजपर्य्ंत आम्ही पाहिलेत. दिवसाकाठी पेढय़ांचे एकेक हजार पुडे आम्ही विकलेत. लाख-दीड लाखांचा गल्लाही गोळा केलेला. यंदा मात्र कच्चा खवाही विकत घेण्याचं धाडस होईना आमचं. कामगारांना पगारही देऊ शकत नाही. खर्च कमी करण्यासाठी स्वत:च गल्ल्यावर बसतोय. अख्ख्या दिवसभरात पाचशेची नोट बघितली तरी नशीब समजतोय. खूप SS खूप SS वाईट परिस्थिती आलीय व्यापार्‍यांवर.’

कधी काळी गल्ल्यात लाखो रुपयांच्या नोटा दाबून-दाबून भरणारे हात सध्या एका हिरव्या नोटेलाही मोताद झाल्याची वेदना अनेकांच्या डोळ्यांत तरळत होती. पुढे महाद्वार रोडवर भेट झाली धनंजय लाड यांची. ते अगरबत्त्यांचे व्यापारी. शंभर वर्षांपेक्षाही अधिक काळ त्यांचं घराणं याच व्यवसायात. पणजोबांनी इथं दुकान टाकलेलं. ते माहिती देऊ लागले, ‘पूर्वी रोज पंधरा ते वीस हजारांचा व्यवसाय व्हायचा. एकादशीला तर दोन लाखांच्या खाली कधीच नाही. पंढरपूरच्या मसाला अगरबत्तीला अख्ख्या देशभरातून मागणी. खूप वेळ जळत राहणारी. हालमड्डी नावाची जंगली जडीबुटी त्यात वापरली जाते. ही अगरबत्ती आम्ही घराच्या पाठीमागंच कारखान्यात तयार करतो. कामाला सार्‍या बायकाच. एक बाई दिवसाला हजारो अगरबत्त्या तयार करायची.  इथल्या प्रत्येक व्यापार्‍याचा स्वत:चा असा ब्रॅण्ड. मात्र यंदा सारेच झालेत बेकार. महाराष्ट्रातल्या सार्‍याच यात्रा यंदा रद्द झाल्यानंतर आमचा माल इथंच पडून.’
धुरकटलेल्या भविष्याचा शोध घेत ही अगरबत्तीवाली मंडळी वारकर्‍यांच्या प्रतीक्षेत निवांत बसलेली. अशीच अवस्था पंढरीतील या सार्‍याच व्यापार्‍यांची. यंदा इथले साखर-फुटाणे कडवट झालेत तर मूर्तिकारांच्या मूर्तीही खर्‍या अर्थानं निर्जीव ठरल्यात. जिथं महाराष्ट्रातलं सर्वात मोठ्ठं ‘देऊळ बंद’ झालंय, तिथं मूर्तींसाठी नवी मंदिरं कधी तयार होणार? प्रश्नच प्रश्न. भक्तीच्या महापुराची सवय झालेला हा प्रदक्षिणा मार्गही सन्नाटाच्या वाळवंटाला पुरता सरावलेला. पुढं जाताना कुठल्या तरी अर्धवट बंद असलेल्या दुकानातून एक गाणं ऐकू येऊ लागलेलं, ‘नको देवराया SS अंत आता पाहू.’

ठप्प
1. आषाढी एकादशी यात्रा ही पंढरीत साजरी होत असली तरी खरं अर्थकारण फिरतं ते वारीच्या मार्गावर!
2. देहू-आळंदी ते पंढरपूरपर्यंतच्या मार्गावरील कैक गावांमध्ये दरवर्षी लाखोंची उलाढाल होते.
3. दीड लाख वारकर्‍यांपासून सुरू झालेली वारी पंढरपुरात पोहोचते, तेव्हा तो आकडा जातो बारा लाखांच्या घरात!
4. आषाढी एकादशी एक दिवसाची; पण वारीचं अर्थचक्र तब्बल वीस-पंचवीस दिवसांचं असतं.
5. या काळात शंभर कोटींपेक्षा अधिक उलाढाल होते!
- यावर्षी हे अर्थचक्र पूर्ण ठप्प आहे!!

sachin.javalkote@lokmatil.com
(लेखक लोकमतच्या सोलापूर आवृत्तीचे निवासी संपादक आहेत.) 

छायाचित्रे : संकेत उंबरे, पंढरपूर    

Web Title: The sad story of this year's Ashadhi wari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.