रिओ-दि-जानेरिओ रंगीन दिवस, बेंधुंद रात्री..
By Admin | Updated: March 1, 2015 15:37 IST2015-03-01T15:37:40+5:302015-03-01T15:37:40+5:30
रिओमध्ये किस करण्यात जो मोकळेपणा आहे, त्याचे वर्णन करता येणार नाही. रस्तोरस्ती, समुद्रकिनारी, दुकानात, भाजी घेताना, लिफ्टमध्ये अगदी कुठेही कसले बंधन म्हणून नाही

रिओ-दि-जानेरिओ रंगीन दिवस, बेंधुंद रात्री..
>सुलक्षणा वर्हाडकररिओ, ब्राझील
ब्राझीलची राजधानी रिओमध्ये राहताना वाटते कि इथे दिवसासुद्धा नाईटलाईफ असते की काय? म्हणजे समुद्रकिनारी बिकिनी घालून जाणे समजू शकतो आपण, पण भाजी आणायला किंवा सार्वजनिक वाहनात अगदी सहजपणे कुणी बिकिनी घालून किंवा अर्ध्या मीटर कपड्यात आले, पूर्ण जगाला विसरून, आपले स्टेशन आलेले विसरून, आलेली बस/ट्रेन सोडून देऊन आपल्या प्रिय व्यक्तीच्या गळ्यात पडून अगदी थेट मुद्यालाच हात घालावा अशा पध्दतीने किस केले तर काय वाटेल?
- मी हे इथे रोज बघते.
रिओमध्ये किस करण्यात जो मोकळेपणा आहे, त्याचे वर्णन करता येणार नाही.
रस्तोरस्ती, समुद्रकिनारी, दुकानात, भाजी घेताना, लिफ्टमध्ये अगदी कुठेही कसले बंधन म्हणून नाही. भर दिवसाच ज्या शहरात पार्टीचे वातावरण असते, तिथे रात्नीच्या दुनियेत असे काय वेगळे होत असणार?
संपूर्णपणे दिगंबर अवस्थेत फिरण्यासाठीचे समुद्रकिनारे ब्राझीलला किंवा रिओला नवीन नाहीत . लोक अतिशय सहजपणे ‘देह देवाचे मंदिर’ म्हणत इथे वावरत असतात. अशा या रंगीन नगरीच्या रात्रजीवनाबद्दल माझ्या नव्या ब्राझिलियन मित्न-मैत्रिणींशी बोलले तेव्हा समजले की इथली रात्न म्हणजे एक अलिबाबाची गुहा आहे. निर्गुण निराकार आत्म्यापेक्षा सगुण साकार देह जास्त महत्वाचा हे रिओमध्ये राहिले की कळते. शारीर सहवास इतका उत्कट की पाहणारा मंत्नमुग्ध होणेही विसरून जातो.
रिओ ही एक मोहनगरीच आहे. चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस पार्टी. कधी समुद्रकिनारी, क्लबमध्ये तर कधी रस्त्यावर! डोहाळे जेवण असो कि ब्रेकअप, सर्व क्षण इथे साजरे केले जातात. तेही नाचून, गाऊन, खाऊन आणि मुख्य म्हणजे पिऊन! पाचूच्या रंगाचे पाणी, उंच उसळणार्या फेसाळत्या लाटा, लांबच लांब पसरलेले किनारे, नारळपाण्याच्या जोडीला बियर आणि बर्फ विकणारे, अगदी आपल्या कटिंग चहाप्रमाणे पेग विकणारेसुद्धा इथे रस्तोरस्ती दिसतात. इथल्या स्त्नी-पुरुषांचे देह मोठे आखीव रेखीव! बिपाशा किंवा सनी लियोनसारख्या स्त्रिया रस्तोरस्ती दिसतात.
इथले रात्रजीवन मुक्त असले, तरी त्याभोवती नियमांचा फेरा आहेच. इथे क्लबमध्ये नियम आहेत. ड्रेसकोड आहेत. प्रवेश फी आहे. पुरुषांनी स्त्नीसोबत येणे गरजेचे आहे. इथे समलिंगी बार पुष्कळ. पण परदेशी नागरिकांना ओळखपत्न म्हणून पासपोर्टची कॉपी न्यावी लागते. अनेक बारमध्ये ग्राहकांना एक प्लास्टिक कार्ड दिले जाते. त्यात कुणी किती ड्रिंक्स घेतली, याचीे नोंदणी होते. र्मयादेबाहेर मद्य मिळत नाही.
क्लबमध्ये ज्यांना सांबा, फवेलाफंक, रॉक, हेवी बास, पॉप, हिपहॉपसारख्या गाण्यांवर थिरकायचे नसेल त्यांच्यासाठी वेगळ्या मजल्यावर गप्पा मारण्यासाठी, कॉकटेल घेण्यासाठी वेगळी आकर्षक सोय असते. स्ट्रिपटीजचे क्लब्ज ही अत्यंत सर्वसाधारण आणि सर्वमान्य गोष्ट आहे. अशा ठिकाणी पर्यटकांइतकीच स्थानिक स्त्री-पुरुषांचीही गर्दी असते. दिवस असो वा रात्र, जोरात वाजणारे संगीत आणि मदहोश करणारा डान्स इथे समुद्रकिनारी अखंड सुरू असतो. इथल्या मुली ‘इतक्या’ जवळ येतात की पुरुषांना नाही म्हणणे जड जाते म्हणे. सुरुवात एकत्न नृत्यापासून होते. कुणी कुणाला जबरदस्ती करीत नाही. होकार मिळाला कि गोष्ट पुढे सरकते. त्यामुळे देहप्रदर्शन आणि देहव्यापार सारेच चालत असूनही बलात्कारासारख्या घटना तुरळकच!
चर्च आणि कार्यालये, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये सोडल्यास कुठेही कधीही ‘बेम जेलादा’ म्हणजे बर्फाइतकी थंडगार बियर घेता येते. दारू वाहात असते, पण दारू पिऊन कुणीही गाडी चालवीत नाही. ड्रिंक्स घेताना आपला ग्लास सोडून जावू नये असा सल्ला अनुभवी देतात. कारण तुमच्या ग्लासात ड्रग मिसळून तुम्हाला बेशुद्ध केले जाते.
मग अंगावर कपडेही उरत नाहीत. कारण? - चोरी! रिओमध्ये बलात्काराची भीती नाही, परंतु चोरीची भीती खूप आहे. त्यामुळे शक्यतो मोजके पैसे सोबत ठेवावे लागतात. महाग घड्याळे, पर्सेस, गाड्या, अंगठ्या, फोन काहीही घेवून क्लबमध्ये जावू नये असे सांगितले जाते. कुणी तुमच्यावर हल्ला केला तर प्रतिकार करू नये, शांतपणे सर्व काही देवून टाकावे कारण चोरांच्या हातात बंदुका असतात आणि विरोध झाल्यास गोळी घालायला ते मागेपुढे पाहत नाही.
या देशात म्हणजे अख्ख्या दक्षिण अमेरिकेत मुलगी पंधरा वर्षांची झाली कि एक आनंदसोहळा होतो ज्याला ‘क्विसीएनेरा’ किंवा ‘फेस्ता दे देब्यूतान्तेस’ म्हटले जाते. या सोहोळ्यात त्या मुलीच्या विशेष मित्नाला मान असतो. मुलगी त्याच्यासोबत नृत्य करते. लहानसा लग्नसोहळा असावा असा हा कायक्रम असतो. मुलीच्या वयात येण्याला इतक्या सहजपणे स्वीकारणार्या संस्कृतीमध्ये मुली स्वत:च्या खुशीने निर्णय घेतात.
ही संस्कृतीच निराळी आहे. इथे ‘स्वीकार’ आहे, ‘साजरे करणे’ आहे, नियम म्हणावेत असे काही संकेतही आहेत आणि ते पाळण्याची वृत्ती दिसते. त्याबळावरच भारतातून आलेल्या माझ्यासारख्या स्त्रीला अवघड वाटेल असे वातावरण सर्वत्र असूनही सारे सुरळीत चालू शकते.
- समाज म्हणून आपण अजून इतक्या मोकळेपणाला तयार नाही आहोत, असे मला वाटते. कारण मनाची बंधने आपण पाळतच नाही. संधी मिळत नाही तोपर्यतच आपण सज्जन असतो. गर्दीत एरवी काही नाही तर एखादा चिमटाच काढला, खांद्याने धक्काच मारला, हळूच हातच फिरवला, शेकहॅण्डच्या बहाण्याने हात दाबून पाहिला, असे लहान-लहान उद्योग आपण करीतच असतो, ‘अशा’ संस्कृतीत नाईटलाईफचा विचार करणे मला तरी अडचणीचेच वाटते.
स्त्रीच्या संमतीने आनंदासाठी तिच्यासोबत नृत्य करणे आणि मुंबईचे ‘डान्स बार’ याला एका तराजूत कसे तोलावे?
दिवसभर काम करून थकून रात्नी संगीताच्या तालावर पाय मोकळे करावे म्हणून डान्स करणे, जवळच्या मित्रांबरोबर नाचणे ही वेगळी ‘संस्कृती’ आहे. ती अजून आपल्याकडे नाही.