विचारवंतांमुळे झालेली क्रांती

By Admin | Updated: July 19, 2014 19:14 IST2014-07-19T19:14:47+5:302014-07-19T19:14:47+5:30

कोणत्याही क्रांतीपूर्वी समाजमनाची मशागत करावी लागते. फ्रेंच राज्यक्रांतीही याला अपवाद नव्हती. अन्यायग्रस्त फ्रेंच नागरिकांना काही विचारवंतांनी चेतवले व संतापलेल्या लोकांनी जुलमी राजेशाहीला जोराचा धक्का दिला. जगाला स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्त्वांची देणगी देणार्‍या या क्रांतीला नुकतीच २२५ वर्षे झाली. त्यानिमित्ताने त्या विचारवंतांच्या तत्कालीन कारकिर्दीचा मागोवा.

Revolutionary Thinkers | विचारवंतांमुळे झालेली क्रांती

विचारवंतांमुळे झालेली क्रांती

- प्रा. श्रुती भातखंडे

आधुनिक जगाच्या इतिहासात फ्रेंच राज्यक्रांतीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. १७८९ (१४ जुलै रोजी) मध्ये झालेल्या या क्रांतीने युरोपवर आणि जगावर दूरगामी स्वरूपाचे परिणाम झाले. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांना फ्रेंच राज्यक्रांतीने जन्म दिला. निरंकुश, सत्तापिपासू, भ्रष्ट आणि जुलमी राजेशाही नष्ट करण्यासाठी जनतेने तीव्र लढा दिला आणि जगाला मानवी हक्कांचा जाहीरनामा बहाल केला. मानवी संस्कृतीच्या इतिहासात ही घटना अनन्यसाधारण मानली जाते. जुनी पारंपरिक राजसत्ता नष्ट होऊन जमीनदारी, भांडवलशाही या पद्धती नष्ट झाल्या. या क्रांतीला खर्‍या अर्थाने विचारवंतांनी गतिशील केले. 
क्रांतीपूर्व काळात फ्रान्समध्ये बूबरेन (ब्यूरबॉन) घराण्याची अनियंत्रित राजेशाही होती. जुलमी, अत्याचारी, अन्यायी राजांच्या (१४ वा लुई, १५ वा लुई आणि १६ वा लुई) कारकीर्दीला जनता त्रासली होती. मेरी अन्टॉयनेंट (अन्त्वानेंत) हिचा स्वभाव खर्चिक असल्याने पैशाची उधळपट्टी झाली होती. समाजात सरंजामदार, उमराव, धर्मगुरू या धनिकांचा वर्ग होता आणि सामान्य जनता, शेतकरीवर्ग हा अतिशय हालाखीचे जीवन जगत होता. त्यांना ‘थर्ड इस्टेट’ असे म्हटले जाई. श्रीमंत लोकांना ‘बूज्र्वा’ असे म्हटले जाई. या दोन वर्गांशिवाय फ्रान्समध्ये सर्वसामान्य लोकांमधून पुढे आलेला एक बुद्धिजीवी वर्ग होता. त्यात डॉक्टर, वकील, प्राध्यापक, शिक्षक, पत्रकार यांचा समावेश होता. क्रांतीचे नेतृत्व या वर्गातून उदयास आले. फ्रान्समध्ये क्रांतीपूर्व काळात सरंजामशाही अर्थव्यवस्था होती. करपद्धतीत विषमता होती. व्यापारीवर्ग असंतुष्ट होता आणि फ्रान्सची अर्थव्यवस्था दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर होती. सामान्य जनता दरिद्री व उपासमारीने त्रस्त होती. कायद्यांमधील असमानता, विषमता आणि जाचक न्याय व्यवस्था ही समाज जीवनाची वैशिष्ट्ये होती. क्रांतीपूर्व काळातील राजा १६ वा लुई याने ‘इस्टेट जनरल’ या नावाच्या कायदेमंडळाची बैठक आपल्या कारकीर्दीत भरविली नव्हती. १६१४ पासून ही बैठक राजेशाहीने आयोजित केली नाही. कारण कायदेमंडळात जनतेच्या प्रतिनिधींना नाकारण्यात आले. 
या कायदेमंडळाची बैठक व्हावी, लोकप्रतिनिधींना समाविष्ट करून घ्यावे, असा आग्रह धरला आणि क्रांतीस सुरुवात झाली. इस्टेट जनरलचे राष्ट्रीय सभेत रूपांतर करण्यात आले. सभेस जमलेल्या प्रतिनिधींसाठी सभागृहाचे दरवाजे बंद करण्यात आले. राजावर संतापलेल्या जनतेने टेनिस कोर्टाकडे धाव घेतली व उदारमतवादी राज्यघटना तयार करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याची शपथ घेतली. याला ‘टेनिस कोर्ट शपथ’ असे म्हटले जाते. २३ जून, १७८९ रोजी राजाने बैठक घेण्याची तयारी दर्शविली. संतापलेल्या जनतेने जवळच असलेल्या बॅस्टिल या किल्ल्याकडे धाव घेतली. या किल्ल्यात निरपराध लोकांना कैद केले होते. त्यावर हल्ला करून फ्रान्सच्या जनतेने राजकैद्यांना मुक्त केले, तो दिवस १४ जुलै १७८९ हा होता. या किल्ल्यावर राष्ट्रीय सभेचा ध्वज फडकविण्यात आला. हा पहिला मोठा विजय होता. त्यानंतर अनेक ठिकाणी हिंसाचार झाला. लोकांनी जमिनीची कागदपत्रे जाळली, उमरावांचे खून केले. अखेर ४ ऑगस्ट १७८९ रोजी एका रात्रीत फ्रान्समधील सरंजामशाही नष्ट करण्यात आली. ही एक मोठी सामाजिक क्रांती होती. त्यानंतर मानवी हक्कांचा जाहीरनामा तयार करण्यात आला आणि जनतेला मूलभूत अधिकार देण्यात आले. 
राजा-राणीस कैद करण्यात आले. या क्रांतीसाठी फ्रान्समधील राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थिती कारणीभूत होती. पण, क्रांतीसाठी जनतेची मनोभूमिका तयार करण्याचे कार्य विचारवंतांनी केले. लोकांच्या दु:खांना वाचा फोडणे, स्वाभिमान जागृत करणे, प्रोत्साहन देणे, आत्मविश्‍वास निर्माण करणे, हे कार्य आपल्या लिखाणातून केले. मॉन्टेस्क्यू, रुसो, व्हॉल्टेअर, डिडेराँ, कॅने यांनी क्रांतीला आवश्यक असणारी पार्श्‍वभूमी तयार केली. 
(१) मॉन्टेस्क्यू (१६८९- १७५५) : फ्रान्सच्या अनियंत्रित राजेशाहीवर पहिला हल्ला चढविणारा वकील आणि न्यायाधीशपदी काम केलेला. इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, कायदा यांचा गाढा अभ्यास असलेल्या मॉन्टेस्क्यूने १७४८ मध्ये ‘रस्र्र१्र३ ा छं६२’ कायद्याचे र्ममस्थान हा ग्रंथ लिहिला. त्याने अनियंत्रित हुकूमशाहीचा धिक्कार केला. इंग्लंडमधील संसदीय लोकशाही त्याला योग्य वाटत असे. त्याच्या मते, शासनप्रणाली तीन प्रकारच्या असाव्यात- राजेशाही, हुकूमशाही आणि प्रजासत्ताक. आदर्श राजेशाहीमध्ये राजाच्या हाती सत्ता एकवटली असली, तरी त्याला सल्ला देण्यासाठी अनुभवी लोकांचे मंडळ असावे. हुकूमशाहीत सत्ता एका हाती एकवटली असल्याने प्रजेला स्वातंत्र्य नसते. असे तो म्हणतो म्हणून मॉन्टेस्क्यूने लोकशाहीचा पुरस्कार केला. त्यात प्रजेच्या हिताकडे लक्ष दिले जाते आणि प्रजेच्या हितासाठी कार्य, न्याय व कायदे मंडळ हे स्वतंत्र असावे, हे सत्ताविभाजनाचे तत्त्व त्याने मांडले. 
(२) रुसो (१७१२-१७७८) : एझ्ॉक रुसो हा महान राजकीय विचारवंत होता. ‘सोशल कन्फेशन्स’ या नावाचे त्याचे आत्मचरित्र होते. एमिल आणि सोशल कॉन्ट्रॅक्ट (र्रूं’ उल्ल३१ूं३) हे त्याचे ग्रंथ होय. त्याच्या चिंतनाचा व विवेचनाचा केंद्रबिंदू मानव हा होता. ‘‘मनुष्य हा जन्मत: स्वतंत्र असतो, त्याला स्वातंत्र्य देण्याची गरज नाही. पण, राजकीय, सामाजिक आणि धार्मिक संस्थांमुळे तो बंदिस्त झाला आहे,’’ असे रुसो म्हणतो.  समाजहितासाठी सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे, असे सांगून त्याने कल्याणकारी नियंत्रित राजेशाही असावी, असे प्रतिपादन केले. फ्रान्सच्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक परिस्थितीत अभिप्रेत असलेला बदल विधायक मार्गाने व्हावा, अशी त्याने अपेक्षा ठेवली. त्याची चर्चवर निष्ठा होती, पण फ्रान्समधील धार्मिक भ्रष्टाचार व धर्मगुरूंच्या दांभिकतेवर त्याने टीका केली. कल्याणकारी राजेशाही, नियंत्रित राजेशाही, जनतेचे सार्वभौमत्व, व्यापक व्यक्तिस्वातंत्र्य, रचनात्मक परिवर्तनवाद, कायदेनिर्मितीचा लोकाधिकार, सामाजिक करार या संकल्पनांमुळे त्याला जागतिक तत्त्वज्ञ म्हटले जाते. त्याच्या वैचारिक प्रभावामुळे फ्रेंच राज्यक्रांती झाली. त्याला नेपोलियन  बोनापार्टने ‘क्रांतीचे अपत्य’ म्हटले आहे. 
(३) व्हॉल्टेअर (१६९४-१७९८) : कवी, नाटककार, कायदेतज्ज्ञ आणि साहित्यिक असलेल्या व्हॉल्टेअरने काव्य कादंबरी, कथा असे चौफेर लेखन केले. वादग्रस्त आणि उपहासगर्भ, समीक्षक यामुळे तो सतत प्रसिद्धीच्या वलयात होता. चर्चला विरोध होता, पण नास्तिक नव्हता. धर्मगुरूंच्या चैनी, विलासी व ऐषोरामी जीवनावर त्याने टीका केली. कँडिड हा त्याचा ग्रंथ. अनियंत्रित राजसत्ता आणि धार्मिक भ्रष्टाचार हे त्याचे मुख्य विषय. नियंत्रित राजेशाही त्याला मान्य होती.  ‘शंभर उंदारांपेक्षा एका सिंहाने राज्य करावे,’ असे तो म्हणत असे. त्याने ‘फनी’ येथे एक चर्च उभारले, निगरुण व निराकार परमेश्‍वरावर त्याची श्रद्धा असली, तरी चर्च हे अनाचारी बनले आहे. यावर त्याचा राग होता. त्याच्या मते उत्पादनाच्या प्रमाणात कर असावे. अनेक लोक सत्तेवर आले, तर समाजाचा व राष्ट्राचा र्‍हास होईल, असे या विचारवंताचे मत होते. 
(४) कॅने : या अर्थशास्त्रज्ञाने फ्रान्सच्या राज्यक्रांतीचे प्रमुख कारण घसरलेली आर्थिक परिस्थिती हे होते, असे मत मांडले. रयत गरीब, तर राजा गरीब, राजा गरीब, तर राज्य गरीब हे सूत्र त्याने मांडले. आर्थिक उन्नतीचा व त्याच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे त्याचे लिखाण होते. त्यामुळे फ्रान्समधील जनतेचा आत्मविश्‍वास वाढला. 
(५) डिडॅरो (१७१३ ते १७८४) : या प्रसिद्ध विचारवंताने युद्धातील अनावश्यक खर्च गरिबांचे शोषण, फ्रान्समधील राष्ट्रीय संपत्तीचे मालक, मजूर व शेतकरीवर्गात झालेले विभाजन यावर त्याने लिहिले. त्याचा ग्रंथ नसला, तरी विश्‍वकोषाचा तो संपादक होता. त्याने विश्‍वकोषात अनेक लेख समाविष्ट केले. ज्यामुळे फ्रान्सचे तत्कालीन चित्रण होईल आणि त्यातून जनता जागृत होईल. १७६५ मध्ये १२ खंडांत प्रसिद्ध झालेल्या या ज्ञानकोशामुळे क्रांतीचे मानसशास्त्र तयार झाले. लोकांमध्ये उत्साह आला. राजाविरुद्ध क्रांती करण्यास ते तयार झाले. 
क्रांतीची तात्त्विक बैठक तयार करण्यात फ्रान्समधील विचारवंतांनी मोठे योगदान दिले. हेझन हा इतिहासकार म्हणतो, ‘फ्रेंच तत्त्ववेत्यांच्या लिखाणामुळे फ्रेंच राज्यक्रांती झाली, असे मानणे बरोबर नाही; पण त्यांच्या लिखाणामुळे फ्रेंच जनता क्रांतीस प्रवृत्त झाली, हे नक्की.’ 
(लेखिका इतिहासाच्या अभ्यासक आहेत.)

Web Title: Revolutionary Thinkers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.