मनोरुग्णांच्या सेवेचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 07:05 IST2019-02-03T07:02:02+5:302019-02-03T07:05:04+5:30
समाजाने, कुटुंबाने आणि व्यवस्थेने नाकारलेल्या मनोरूग्णांसाठी ‘सेवा संकल्प प्रतिष्ठान’ हे हक्काचं घर उभं करून माणुसकीला जपण्यासोबतच थोडं जगावेगळं जगण्याचे काम या सेवाव्रती दाम्पत्याने अविरतपणे चालविले आहे.

मनोरुग्णांच्या सेवेचा संकल्प
सुधीर चेके पाटील
समाजातील अनेक निराधार, बेवारस आणि मनोरूग्ण असलेल्या व्यक्ती शहरातील विविध भागात दिसतात, भान हरपलेले, स्वकीयांनी झिडकारलेले, दुर्गंधीयुक्त, ओंगळवाणे, ना जगाची पर्वा ना स्वत:च्या पोटापाण्याची, ना शरीरावरील जखमांची. असे मनोरूग्ण किंवा शरीराने जर्जर होऊन रस्त्यावर बेवारस असलेल्या गोरगरीब व्यक्ती. यांच्याकडे कुणी पाहतही नाही आणि साहाय्यही करीत नाही. मात्र याला नंदकिशोर व आरती पालवे हे दाम्पत्य अपवाद ठरले आहेत. समाजाने, कुटुंबाने आणि व्यवस्थेने नाकारलेल्या मनोरूग्णांसाठी ‘सेवा संकल्प प्रतिष्ठान’ हे हक्काचं घर उभं करून माणुसकीला जपण्यासोबतच थोडं जगावेगळं जगण्याचे काम या सेवाव्रती दाम्पत्याने अविरतपणे चालविले आहे.
मनोरूग्णांची वाढणारी संख्या व त्यानंतर त्यांची होणारी हेटाळणी हे समाजात नविन नाही. त्यामुळे फक्त व्यवस्थेवर टीका-टिप्पणी करून नामानिराळे होणेही उचित ठरणारे नाही. त्याने मूळ प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी दूरगामी परिणाम करणारं सेवाकार्य उभं करावं लागेल ही या पालवे दाम्पत्याची धारणा. रूग्णांना मायेचा हात मिळाला तर त्यातून परिवर्तनाची आशा बळावते. या रूग्णांची एकूण स्थिती व त्यातून त्यांना होणारा त्रासही प्रचंड असतो. ज्या रूग्णांकडे जाण्यास आणि दगड-वगैरे मारतील या भितीपोटी अगदी पाहण्यास देखील बरेच जण घाबरतात. अशा मनोरूग्णांचे मायबाप होण्याचे धारिष्ट्य दाखविण्यासोबत हे दिव्य कार्य नेटाने तडीस नेत आहेत. अर्थातच गेल्या सहा वर्षांचा हा प्रवास तितकासा सोपा नव्हता आणि पुढचा देखील राहणार नाही. मात्र या प्रवासात खंड पडणार नाही; याची खात्री नंदकुमार आणि आरती पालवे यांच्या आजवरच्या कार्यावर दृष्टीक्षेप टाकल्यास निश्चित देता येईल.
साधारणत: दहा वर्षांपूर्वी नंदकुमार व आरती यांचे मैत्रीतून प्रेम फुलले. बसस्थानकावरील निराधार, बेवारस मनोरूग्ण हे त्यांच्या पे्रमाचे साक्षीदार. प्रेमाच्या आणाभाका घेत असताना सुखी संसाराचे स्वप्नरंजन करण्याऐवजी त्यांनी आपले सहजीवन त्यांच्या प्रेमाच्या साक्षीदारांसाठीच अर्पित करण्याचा ध्यास घेतला. त्यादृष्टीने सन २००८ पासून प्रत्यक्ष कृतीला सुरूवात देखील केली. ७ आॅक्टोबर २०१२ रोजी बुलडाणा येथील गर्दे वाचनालयाच्या सभागृहात ‘सेवा संकल्प’ची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. सुरूवातीला चिखली-बुलडाणा व परिसरातील शहरी व ग्रामीण भागातील मनोरूग्णांचा शोध घेवून त्यांना एकवेळचे अखंडीत जेवण पोहचविण्याचे काम केल्या गेले. रस्त्याच्या कडेला पडलेल्या रंजल्या जिवाला रात्रीचं जेवण, कपडे व शरीराच्या स्वच्छतेसोबत नेमक्या उपचाराचे प्रयत्न सुरू झाले. याकामी अनेक मित्रांची मदतही होत होती. मात्र, एवढ्यानेच भागणारे नव्हते.
या निराधारांना हक्काचे छत असावे ही भावना पुढे आली. ही बाब नंदकिशोर पालवे यांचे वडिल ज्ञानेश्वर पालवे यांना कळली आणि त्यांनी बुलडाणा-उंद्री रोडवरील पळसखेड सपकाळ येथील त्यांची १ एकर १० जमीन सेवासंकल्पला दान दिली. यावर पालवे दाम्पत्याने मोठ्या परिश्रमातून टीनशेड उभारून मनोरूग्णांचा सांभाळ करणे सुरू केले. सन २०१५ च्या दिवाळीला पद्मश्री डॉ.प्रकाशबाबा आमटे आणि डॉ.मंदाताई आमटे यांच्या हस्ते सेवासंकल्पावर उद्घाटनाचा दीप प्रज्वलीत झाला. तेव्हापासून अनेक रूग्णांवर उपचार व त्यांचा सांभाळ करणे सुरू झाले.
सेवासंकल्पमधील ५ रूग्णांच्या जखमांमध्ये अळ्या पडलेल्या अवस्थेत असल्याने त्यांना इतर रूग्णांसोबत ठेवणे दिवसेंदिवस कठीण होत आहे, त्यांच्या जखमांचा संसर्ग इतर रूग्णांना होत आहे, त्यामुळे त्यांना उपचारासाठी वेगळं ठेवणं खूप आवश्यक आहे. सोबतच महिलांचा कक्ष फुल्ल झाल्यामुळे रस्त्यावरील अनेक माता भिगनींना प्रकल्पावर आणता येत नाही, पुरूषांचं रस्त्यावरच जगणं गृहीत धरता येईलही पण महिलांचा एक दिवस ही रस्त्यावर जाणं म्हणजे त्यांच्यावर अगणित अत्याचार होऊ देणं असतो... त्यांच्या निवास आणि उपचारासाठी ‘मायनर ओटी’ (सर्वसामावेशक शल्यचिकित्सा गृह) व निवासी हॉलची प्रकल्पावर अत्यंत आवश्यकता आहे. राज्यभरातून दररोज किमान २ ते ३ बेवारस रूग्णांसाठी फोन येतात; मात्र, प्रकल्पावर या रूग्णांना ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने, रूग्ण घेणं बंद केलं आहे. सद्यस्थितीत बांधकाम सुरू केलं आहे, लवकरच मनोरूग्ण, बेवारस मातांना हक्काचं घर द्यायचंय.
- नंदकुमार पालवे