रिश्ता जो तुटता नही

By Admin | Updated: December 31, 2016 13:27 IST2016-12-31T12:30:35+5:302016-12-31T13:27:30+5:30

कधी कधी सामान्य माणसंच मोलाचं काहीतरी बोलून जातात. काश्मीर खो:यातल्या प्रवासात आमचे ड्रायव्हर गुलामभाई एकदा गप्पांच्या ओघात म्हणाले, ‘कश्मिरीयोंके दिलमें दो इंडिया बसते है. एकसे हमारा रिश्ता कभी टूट नहीं सकता. और दुसरा इंडिया- सत्ता और दमनका, जिससे हम नफरत करते है..’

Relationships which do not break | रिश्ता जो तुटता नही

रिश्ता जो तुटता नही

- यातनाघर

- प्राजक्ता धुळप

काश्मीर खोऱ्यात अटक करण्यात आलेल्या राजकीय कैद्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. या राजकीय कैद्यांची सुटका करण्याची मागणी आता जोर धरतेय. मुस्लीम लीगचे नेते मसरत आलम भट यांना आतापर्यंत तीसवेळा पीएसएअंतर्गत अटक करण्यात आली. जुन्या श्रीनगरमधल्या घरी आम्ही त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. जवळपास १८ वर्षं त्यांनी जेलमध्ये शिक्षा भोगली आहे. ‘पीएसए’ लागल्यावर दोन वर्षांची शिक्षा होते. मसरत यांच्या कुटुंबाच्या म्हणण्यानुसार ते जेलच्या आत असतानादेखील पीएसए लावला गेला. आतापर्यंत तीस पीएसए लावले गेले, त्यातले काही कोर्टाने खारीज केले, काहींची शिक्षा त्यांना भोगावी लागली. मसरत यांचे सहकारी अ‍ॅडव्होकेट कादीर नासीर यांच्या मते मसरत यांची लोकप्रियता जेलबाहेरही टिकून आहे. 
‘आझादी के लडाईमें जितने लोग जेल के अंदर सजा काट रहे हे, जाहीर है आझादीकी लडाई जिंदा रहेगी’ - कादीर यांनी बाहेरच्या असंतोषाचं हेही एक कारण असल्याचं सांगितलं. गिलानी यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या आॅल इंडिया हुरियत पार्टीचे मसरत आलम भट हे जनरल सेक्र ेटरी आहेत. 
फुटीरतावादी राजकीय नेत्यांच्या घराबाहेर पोलीस आणि सुरक्षा जवानांची फौज तैनात असते. तसंच चित्र मसरत आलम भट यांच्या घराजवळही होतं. एके-४७ घेऊन उभे असलेले जवान, अगदी दहा-बारा फूट अंतरावर क्रि केट खेळणारी शाळकरी मुलं, बंद दुकानांच्या पायऱ्यांवर बोलत असलेले काश्मिरी बुजुर्ग आणि फोनवर बोलत उभे असलेले तरुण. यात शाळकरी मुलं आणि बंदूकधारी जवान हे समीकरण न पेलणारं आहे. पण लहानपणापासून अशा वातावरणाची सवय असलेल्या काश्मिरी मुलांसाठी आता या बंदुकीचा धाक राहिलेला नाही. एका गावात त्याचा थरारक प्रत्यय आला. कॅमेरा पाहून शाळकरी मुलांनी भोवती गराडा केला. ‘मी आवाजावरून आर्मीने कोणती बंदूक वापरली ते ओळखू शकतो. पेलेट गन, टिअर गॅस शेल आहे, बुलेट आहे की एके-४७ चा आवाज आहे हे मला ओळखता येतं’ - एक शाळकरी मुलगा आम्हाला कौतुकाने सांगत होता. हीच मुलं आझादीच्या लढाईत मरण पावलेल्या काश्मिरींच्या दफनभूमीत आम्हाला घेऊन गेली. काश्मीर खोऱ्यात अनेक ठिकाणी आझाद काश्मीरसाठी मृत्यू झालेल्यांसाठी स्वतंत्र दफनभूमी आहे. 
वाढत्या असंतोषाचं कारण शोधण्यासाठी आमची टीम परवीना अहंगारना भेटली. १९९१ मध्ये परवीना यांचा १७ वर्षांचा मुलगा जावेदला सुरक्षा दलांनी अटक केली. त्यानंतर तो बेपत्ता झाला. पुढे १९९४ मध्ये त्यांनी अढऊढ ही हरवलेल्या व्यक्तींच्या पालकांची संस्था सुरू केली. काश्मीरच्या कानाकोपऱ्यात जाऊन अशा बेपत्ता माणसांच्या कुटुंबांचा शोध त्या घेतात. २०१० पासून त्यांच्या संस्थेला संयुक्त राष्ट्रसंघाकडून अनुदानही मिळालं. त्यातून या गरजू कुटुंबांना आर्थिक मदत दिली जाते. काश्मीरमधल्या असंतोषाची कारणं अनेक वर्षांपासूनची असली तरी गेल्या जुलैपासूनचा असंतोष वेगळा आहे, असं लोकांना वाटतं आहे. शहरांखेरीज गावागावातून आझादीच्या आंदोलनाचा प्रभाव आम्हालाही जाणवत होता. अनेक ठिकाणी बुरहान चौक अशी नावं दिली गेलेली दिसतात. आम्ही पाहिलेल्या दहा जिल्ह्यांमध्ये संघटित स्वरूपाची निदर्शनं सुरू होती तशीच आणखी एक पद्धत आम्हाला कळली. आजही अनेक ठिकाणी ती वापरली जाते. बंदच्या काळात काश्मिरींना ‘बैतुलमाल’ या पद्धतीचा उपयोग होतो. बैतुलमाल ही इस्लामी संकल्पना काश्मीर खोऱ्यात प्रसिद्ध आहे. मोहल्ल्या-मोहल्ल्यातून निधी, शिधा आणि वस्तू गोळा करण्याची ही पद्धत आहे. त्या गरजूंना पुरवल्या जातात. ‘एरवी थंडीच्या काळात ‘बैतुलमाल’ या पद्धतीचा सर्वाधिक वापर व्हायचा, पण आता त्याचा उपयोग बंदच्या दिवसांमध्ये होतो’ - पालनहालमधले इम्तियाजभाई सांगत होते. पण इथला इस्लाम वेगळा आहे असंही अनेकांनी आवर्जून सांगितलं. खोऱ्यातली मुख्य भाषा काश्मिरी आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी आम्हाला दुभाषाची गरज लागली. सर्वसामान्य काश्मिरी जनता अजूनही काश्मिरियत बयान करत असते. सर्वसमावेशक इस्लामबद्दल बोलत असते. पालनहालमधली दोन ओसाड घरं इम्तियाजभार्इंनी दाखवली. ती काश्मिरी पंडितांची होती. ‘या कुटुंबांसोबतचं नातं आमचं अजूनही टिकून आहे. वर्षाकाठी एक-दोनवेळा ते गावात येतात. आम्ही जम्मूमध्ये त्यांच्याकडे जातो. अनेक पिढ्या आम्ही एकत्र गावात राहिलो, वाढलो. पण जे झालं ते वाईट झालं. हालातही उस वक्त खराब थे’ - इम्तियाजभार्इंनी त्यांच्या अनेक आठवणी सांगितल्या.
लाल चौकमधल्या फरान (काश्मिरी पोशाख) शिवणाऱ्या टेलर अब्दुल्ला चाचांनीही गप्पांच्या ओघात १९९० च्या जानेवारीतील घटनांची अस्वस्थता सांगितली. ‘कौन कहता है कश्मिरी पंडितोंपे अत्याचार कश्मिरीने किये? जो ये कहते है वो आके यहॉँ हमसे बात करे.. जाने की उस जनवरी १९९० के दिनो यहॉँ क्या हुवा था. हम नही चाहते थे की सालोंसे रहनेवाले हिंदू यहॉँसे जाये. कुछ संघटनोंने ऐलान किया और हालात बिगडते गये. हमारे हिंदू भाई-बहनोंपर अत्याचार हुए. कई जगह रोकनेकी कोशीशभी हुई.. इन संघटनोका मक्सद और कश्मिरियत दोनो अलग है. यहॉँ आज भी कश्मिरियत जिंदा है, जो चाहती है की यहॉँ कश्मिरी पंडित वापस आये... श्रीनगरमें मेरे मोहल्लेमें आजभी कश्मिरी पंडित फॅमिली रहती है.’ 
कश्मिरियतचा अभिमान असणाऱ्या काश्मिरी जनतेत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आजही हिरो आहेत. त्यांनी काश्मीरचा ‘मसला’ चर्चेद्वारे सोडवण्यासाठी ‘कश्मिरियत, इन्सानियत, जमूरियत’ या त्रिसूत्रीचा आधार घेतला. ‘ती धमक आणि पुढाकार घ्यायची हिंमत कॉँग्रेसच्या कोणत्याही नेत्याकडे नव्हती. पण आता पंतप्रधान मोदींकडून ही अपेक्षा आम्हाला आहे’ - काश्मीर फ्रुट असोसिएशनचे उपाध्यक्ष अनिलकुमार सांगत होते. अनिलकुमार स्वत: काश्मिरी पंडित आहेत. आणि त्यांच्या मते ‘कश्मिरियतमध्ये अनेक धर्म सुखाने राहत होते. हिंदू-मुस्लीम तेढ हा सत्तेच्या राजकारणाचा मुद्दा म्हणून इथे वापरला गेला.’ 
अनेक ठिकाणी चर्चेच्या दरम्यान सामान्य काश्मिरींमध्ये दादरीची घटना, बीफबंदी आणि अर्णब गोस्वामी हे विषय यायचेच. त्याविषयी नाराजी असायची. मुस्लीमविरोधी घटनांचा मुस्लीमबहुल भागात दूरगामी परिणाम होतो हे तोपर्यंत जाणवलं नव्हतं. असं असलं तरीही काश्मीरचा प्रश्न सोडवण्यासाठी मोदी हे हिंदूंचे प्रतिनिधी न वाटता ते वाजपेयींचे प्रतिनिधी आहेत असं अनेकांना वाटतं आहे. काश्मीरभेटीत आम्ही विचारलेल्या दोन प्रश्नांची लोकांकडून मिळालेली उत्तरं खूप महत्त्वाची आहेत. ‘पाकिस्तानातल्या राजसत्तेबद्दल काय वाटतं? - या प्रश्नावर बहुतांश लोकांचं म्हणणं होतं - ‘पाकिस्तान आश्वासक वाटत नाही’. 
..भारताविषयी असंतोष असताना २०१४ च्या निवडणुकीत जवळपास ६५ टक्के विक्र मी मतदान तुम्ही कसं केलंत? - असा आणखी एक प्रश्न आम्ही सर्वत्र विचारत होतो. या प्रश्नाचं उत्तर आम्हाला बुरहान वानीच्या त्राल गावातल्या लोकांनी जे दिलं तेच सर्वत्र ऐकायला मिळालं.
- ‘आम्ही पीडीपीला निवडून दिलं कारण मुफ्ती मोहम्मद सईद यांनी निवडणुकीपूर्वी वचन दिलं होतं की भारत, पाकिस्तान आणि हुरियतच्या फुटिरतावादी संघटनांमध्ये संवाद करण्यासाठी पीडीपी पुढाकार घेईल. आता पीडीपीवरचा लोकांचा विश्वास उडाला आहे. आणि भारतीय नेते जर मतदानाचा मुद्दा पुढे करत असतील तर त्यांनी काश्मिरींना आश्वासन दिलेलं जनमत (Referendum) आजमावून पाहावं.’ ‘काश्मीर हा राजकीय प्रश्न आहे, तो भारत आणि पाकिस्तानने फुटबॉलसारखा खेळवू नये. हे कुठलं जग आहे जिथे इतकी वर्षं झाली तरी तोडगा निघू शकत नाही?’ 
- त्रालमधले तरु ण विचारत होते. काश्मीर हा भारताचा अंतर्गत नाही तर वादग्रस्त भूभाग (disputed land) आहे, हे समोर ठेवून चर्चा करण्याची मागणी जोर धरतेय. आज हुरियतच्या नेतृत्वाखाली जे कॅलेंडर जाहीर केलं जातं त्यात धार्मिकतेचा प्रभाव अधिक जाणवतो. काश्मीरमधील ज्येष्ठ पत्रकारांच्या म्हणण्यानुसार हा प्रभाव चिंताजनक आहे. बुरख्याचं प्रमाण वाढतं आहे. धर्माचा वाढणारा प्रभाव हेही कश्मिरियतसमोर वाढतं आव्हान असणार आहे. 
कधी कधी सामान्य माणसंच मोलाचं काहीतरी बोलून जातात. आमचे ड्रायव्हर गुलामभाई एकदा गप्पांच्या ओघात म्हणाले, ‘कश्मिरीयोंके दिलमें दो इंडिया बसते है.. एकसे हमारा रिश्ता कभी टूट नहीं सकता.. और दुसरा इंडिया- सत्ता और दमनका, जिससे हम नफरत करते हे...’ 
नव्या वर्षात काश्मीरमध्ये पहिला इंडिया बरकरार राहो.. हीच प्रार्थना!
(समाप्त)

(लेखिका पत्रकार आहेत.) prajakta.dhulap@gmail.com

Web Title: Relationships which do not break

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.