ओळख भारतरत्नांची - इंदिरा गांधी
By Admin | Updated: September 13, 2014 15:00 IST2014-09-13T15:00:45+5:302014-09-13T15:00:45+5:30
गंगा, यमुना आणि गुप्त सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेल्या अलाहाबाद शहरात इंदिरा गांधींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी झाला.

ओळख भारतरत्नांची - इंदिरा गांधी
>(भारतरत्न पुरस्कार सन १९७१)
गंगा, यमुना आणि गुप्त सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेल्या अलाहाबाद शहरात इंदिरा गांधींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी झाला. इंदिराजींचं शिक्षण महात्मा गांधींच्या आश्रमात, रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘शांतिनिकेतन’मध्ये झालं. पुढील शिक्षणासाठी त्या इंग्लंडला गेल्या. वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी ‘कायदेभंगाच्या चळवळी’त भाग घेतल्याबद्दल त्यांना कारावास भोगावा लागला होता. स्वातंत्र्यलढय़ात सहभागी झालेल्यांना मदत करण्यासाठी त्यांनी ‘बालसेना’ स्थापन केली. इंदिराजींचा स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय सहभाग होता. चळवळी, मोर्चे, सत्याग्रह, जखमींची सेवा, तुरुंगवास हे इंदिराजींच्या जीवनाचे अंग बनले होते.
इंदिरा गांधींनी अपंगांविषयी सहानुभूती होती. दीनदुबळ्या लोकांविषयी कळकळ वाटत होती. त्यांच्यासाठी त्यांनी खूप मोठे समाजकार्य केलं. त्या कार्याचा गौरव म्हणून अमेरिकेने त्यांना १९५३ मध्ये ‘मातृ’ पारितोषिक दिलं. चीनने भारतावर आक्रमण केले, तेव्हा राष्ट्रीय संरक्षण मंडळाच्या सभासद म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. त्यानंतर भारताच्या माहिती आणि नभोवणी मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं. १९६६ला भारताच्या पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधींची निवड झाली. भारताच्या इतिहासात या एकाच स्त्रीनं पंतप्रधानपद भूषविलं. प्रौढ शिक्षण, शेतीचा विकास, पाणी, वीज, औद्योगिक विकास, संशोधन, अणुशक्ती, अंतराळ संशोधन, बँकांचे राष्ट्रीयीकरण याद्वारे भारताला प्रगतिपथाकडे नेण्यासाठी इंदिरा गांधींनी भरपूर परिश्रम घेतले. १९७१ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने बांगलादेशविरुद्धचे युद्ध जिंकले होते. कुशल, कणखर, धाडसी, कर्तबगार व झुंजार नेत्या म्हणून त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा राजकीय क्षेत्रावर उमटवला होता.
३१ ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांची निर्घृण हत्या झाली.
‘मृत्यू जवळपास वावरतो आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे; पण रक्ताचा अखेरचा थेंब असेपर्यंत मी देशसेवेचे व्रत सोडणार नाही! ’ हे मृत्यूपुर्वी काढलेले उद्गार इंदिराजींनी खरे करून दाखविले.
- सुबोध मुतालिक
(लेखक पुणे मराठी ग्रंथालयाचे कार्यकारिणी सदस्य आहेत.)