शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

खरंच, हा ‘माझा’ देश आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 6:03 AM

तब्बल ४६ वर्षं आम्ही मेरिलॅण्ड, वॉशिंग्टन डीसी या भागात राहिलो, गेल्या ६ जानेवारीला लुटलं गेलं, ते खरंच माझं गाव होतं का?

ठळक मुद्दे- आता मनाची समजूत घालायची की यातून काहीतरी चांगलं घडेल. चांगले विचार, शक्ती एकत्र येऊन विकृत मनोवृत्तीला, प्रवृत्तीला आळा घालण्यात यश मिळवतील..

- शोभा चित्रे

२०२० साल संपलं. प्रत्येकानेच सुटकेचा नि:श्वास टाकला. नवीन वर्ष चांगलं उजाडणार यावर सर्वांचा विश्वास. शिवाय लवकरच लस मिळेल आणि काही महिन्यांतच नॉर्मल आयुष्य जगता येईल ही खात्री. आम्ही अमेरिकेतले लोक वेगळ्या कारणासाठी नववर्षाची वाट पाहत होतो. देशावरचं एक मोठंच गंडांतर नोव्हेंबरमध्ये टळलं होतं. आता २० जानेवारीला नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन येतील, देशाची धुरा समर्थपणे सांभाळतील या आशेने दिवस मोजणं चालू होतं... मनात कुठेतरी पाल चुकचुकत होती; ती का हे गेल्या ६ जानेवारीला जगाने पाहिलं.

अमेरिकेच्या इतिहासातला काळा दिवस. वॉशिंग्टन डीसीमधल्या कॅपिटॉल या अमेरिकेच्या संसदेवर जमावानं केलेला तो हल्ला. मन सुन्न करणारा! बधिर अवस्थेत मी टीव्ही पाहात होते. तो नंगानाच करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर विजयाचा आसुरी आनंद आणि जिवाच्या भीतीनं पळून जाऊन लपून बसलेले आतले सर्व, सिनेटर्स, काँग्रेसमन्स इत्यादी मला बघवेना. टीव्ही बंद केला. मती गुंग झाली. मनाचा थरकाप उडाला. हा माझा देश?

जिथे हा हल्ला झाला ते माझं अमेरिकेतलं गाव. आज जरी मी फ्लोरीडात राहात असले, तरी आयुष्यातली महत्त्वाची - चांगली ४६ वर्षं आम्ही मेरिलॅण्ड, वॉशिंग्टन डीसी या भागात व्यतीत केली. त्या गावावर आम्ही मनापासून प्रेम केलं. ते आमचं ‘होम टाऊन’.

गेले कित्येक दिवस अमेरिकेच्या वेगवेगळ्या भागांतून बसेस भरभरून माणसं वॉशिंग्टन डीसीमध्ये गोळा होत होती. त्यांच्या मनातली द्वेषाची आग भडकवत ठेवण्याचं काम पद्धतशीर चालू होतं. इतक्या मोठ्या संख्येने आक्रमकपणे पुढे येणाऱ्या जमावाला तोंड देण्यासाठी फक्त मर्यादित पोलीस दल. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून अनेकांनी राष्ट्राध्यक्षांना सतत विनवणी करूनही कुमक मागवण्यात झालेली दिरंगाई. लोकशाहीच्या, देशाच्या प्रतिष्ठेपेक्षा फक्त कुणा एकाचा इगो इतका मोठा ठरतो?

मी टीव्हीसमोरून उठले. घरात इकडे-तिकडे गेले. बाहेर बागेत चक्कर टाकली. मनात त्या गावाच्या, तिथल्या वास्तव्याच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या. अमेरिकेत पाय ठेवल्यावर पाच वर्षं न्यू जर्सीला राहून १९७६ साली आम्ही मेरिलॅण्डला राहायला आलो. याची नोकरी वॉशिंग्टन डीसीच्या भागात. त्या वर्षी अमेरिकेला स्वातंत्र्य मिळून दोनशे वर्षं पूर्ण होणार असल्याने, ४ जुलैला अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन मोठ्या प्रमाणावर साजरा होणार होता. या उत्सवासाठी पाच लाख माणसं ठिकठिकाणांहून आली होती. त्यातच त्या गर्दीत आम्ही दोघं, आमची दोन लहान मुलं. धाकटा तर जेमतेम अडीच वर्षांचा. त्या प्रचंड गर्दीत हा मला माहिती देत होता. एका बाजूला कॅपिटॉल, विरुद्ध दिशेला दोन मैलावर लिंकन मेमोरियल. मध्ये वॉशिंग्टन मॉन्युमेन्ट. हा सगळा परिसर ‘मॉल’ या नावाने ओळखला जातो. मॉन्युमेन्टच्या एका हाताला जेफरसन मेमोरियल आणि दुसऱ्या हाताला व्हाइट हाऊस. ठिकठिकाणी चालू असलेले करमणुकीचे कार्यक्रम. बॅण्ड‌्स, गाणी, फ्लोट‌्स, काय न‌् काय! नुसती धमाल. सकाळपासून सुरू केलेली भटकंती. घरी येईपर्यंत अडीच वाजलेले. पायाचे तुकडे पडायची पाळी. आल्या आल्याच इतक्या मोठ्या सोहळ्यात सहभागी होता आलं याचा कोण आनंद वाटला होता आम्हाला. गाव एकदम आवडून गेलं.

निदान चार-पाच वर्षं तरी इथे राहायचं म्हणताना एवढी वर्षं कशी गेली कळलंच नाही. आमच्या नोकऱ्या, मुलांचं मोठं होणं, याचं लष्करच्या भाकऱ्या भाजण्याचं काम. त्यानिमित्तानं घडणारे अनेकविध कार्यक्रम आणि घरी सतत असणारी पाहुणे मंडळी, साहित्यिक कलावंत. घर सतत काव्य, शास्रात रमलेलं. पाहुण्यांना अगत्याने घडवलेलं वॉशिंग्टन दर्शन.

राजधानीचं गाव. प्रशस्त. सुंदर दगडी इमारती. भरपूर झाडं, हिरवं गवत, फुलांच्या कुंड्या. शिवाय या परिसराचं वैशिष्ट्य म्हणजे सरकारी इमारती सोबत असलेली भरपूर नि:शुल्क म्यूझियम्स. दरवेळी इथे बदलली जाणारी प्रदर्शनं. आमच्या दोघांच्या नोकऱ्याही याच भागात असल्याने लंच टाइममध्ये पटकन कुठेतरी फेरफटका मारून येता येई.

याशिवाय इथे होणारे राजकीय सोहळेही अनुभवले. दर चार वर्षांनी होणारी निवडणूक. त्याचे प्रतिसाद, डिबेट आणि इतर चर्चा हे सर्व बघताना लोकशाहीवरचा विश्वास दृढ झाला. बराक ओबामा निवडून आले तेव्हा डोळे आनंदाने भरून आले. हा देश बदलतोय, म्हणून अभिमानही वाटला. कॅपिटॉलच्या त्या भव्य पायऱ्यांवर बराक ओबामांचा राष्ट्राध्यक्ष म्हणून झालेला विलक्षण शपथविधी सोहळा, अंगावर रोमांच आणणारा. त्यापूर्वीही हे सोहळे पाहिले होते; पण ओबामांचा शपथविधी बघताना आलेला अनुभव विलक्षण होता. असं हे गाव. त्याच्यावर मनापासून प्रेम केलं.

निवृत्तीनंतर वाढत्या वयाचा विचार करून फ्लोरिडाच्या उबदार हवेत आलो. मात्र मनात ते गाव, त्याच्या आठवणी आहेतच. त्यामुळे अशी एखादी अगम्य घटना मनाला हादरवून सोडते, मात्र एवढं भीषण नाट्य तिथे घडल्यावरही काही तासांतच आतील सर्व मंडळींनी एकत्र येऊन कामकाज चालू ठेवलं. प्रत्येकाने या घटनेचा निषेध केला आणि रात्री चारपर्यंत जागून जो बायडन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.

- आता मनाची समजूत घालायची की यातून काहीतरी चांगलं घडेल. चांगले विचार, शक्ती एकत्र येऊन विकृत मनोवृत्तीला, प्रवृत्तीला आळा घालण्यात यश मिळवतील..

shobha_chitre@hotmail.com

(लेखिका फ्लोरीडा येथे वास्तव्यास आहेत.)