-रंगमंच- नाट्यशिबिर, कार्यशाळा, अभिनय वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 06:00 IST2018-10-14T06:00:00+5:302018-10-14T06:00:00+5:30
आपण फ्रेमईन कसं व्हावं, कुठे बघावं, सरळ बघत राहिलो तर चकणे बघायला लागतोय का, अशा अनेक शंकांचं निरसन स्वत:च स्वत:ला करता येतं, पण माझा अनुभव असा आहे....

-रंगमंच- नाट्यशिबिर, कार्यशाळा, अभिनय वर्ग
- योगेश सोमण -
मुळात कार्यशाळेत श्रवणभक्ती कमी आणि प्रत्यक्ष कामावर जास्त भर असला पाहिजे. तोंडात बसायला किमान पाच दिवस वेगवेगळी स्वगत, कविता शिबिरार्थींकडून म्हणून घेतली पाहिजेत. प्रशिक्षक हा स्वत:चे शूटिंगचे किस्से आणि अनुभव सांगणारा नसावा, तर रंगकर्मींना अनुभव घ्यायला उद्युक्त करणारा असावा. काही शिबिरांमधून शेवटी त्यातील विद्यार्थ्यांचे सादरीकरण होते. त्यात एकांकिका, नाट्यछटा, उत्स्फूर्त आविष्कार इत्यादी सादर केले जातात. मला वाटतं, असं शेवटचं सादरीकरण वगैरे काही ठेवू नये. कारण होतं काय, प्रशिक्षण आणि विविध एक्सरसाईजमधून सराव करणं राहतं बाजूला आणि प्रशिक्षक आणि विद्यार्थी शेवटच्या दिवशी होणाऱ्या सादरीकरणाच्या तयारीतच वेळ घालवू लागतात. शेवटच्या दिवशी झालेल्या सादरीकरणाचे फोटो शेअर करणे, एकांकिका यूट्यूबवर टाकणे, प्रसिद्ध व्यक्तीच्या हातून प्रशस्तिपत्र घेतानाचे फोटो व्हॉट्सअॅप करणे यातच शिबिरार्थी आणि त्यांचे पालक खूश असतात. तीन-चार महिन्यांच्या कार्यशाळेत आपण नक्की काय साधलं, याचा विचारसुद्धा विद्यार्थ्यांच्या मनात येत नाही. माझ्या कार्यशाळेतला अनुभव सांगतो, ‘आॅडिशन कशी घ्यावी’ याबाबत बोलण्याऐवजी कार्यशाळेच्या हॉलमध्ये, क्लोजप किंवा मिडलाँग फ्रेम कॅमेºयावर सेट करून लावून ठेवलेली असते आणि आपणच आपल्याला पाहू शकू, असा स्क्रीन ठेवलेला असतो आणि विद्यार्थ्यांना कितीही वेळ कॅमेºयासमोर जाण्याची मुभा असते.
आपण फ्रेमईन कसं व्हावं, कुठे बघावं, सरळ बघत राहिलो तर चकणे बघायला लागतोय का, इत्यादी इत्यादी अशा अनेक शंकांचं निरसन स्वत:च स्वत:ला करता येतं, पण माझा अनुभव असा आहे, विद्यार्थी नुसते कॅमेऱ्या च्याभोवती फिरत बसतात, सगळी मिळून ५ मिनिटंसुद्धा कॅमेऱ्यासमोर स्वत:ला न्याहाळत नाहीत किंवा डबिंग एक्सरसाईजमध्ये समोर स्क्रीनवर वेगवेगळे सीन प्रोजेक्ट केले जातात, माईक असतो कितीही वेळ तो सीन बघून डबस्मॅश करण्याची मुभा असते, जेणेकरून सीनमधील नटाच्या आवाजाची नक्कल न करता त्याच्या अभिनयानुसार आपल्या आवाजाची पट्टी सेट करणं, संवादातील विरामांचा अभ्यास करणे याचा सराव करायला मिळावा. पण याही आणि अशा अनेक एक्सरसाइजेसना विद्यार्थी वेळच देत नाहीत.
मला वाटतं, बरेचसे विद्यार्थी सगळ्यांसमोर होणाऱ्या चुकांना घाबरतात. पण आपण अशा क्षेत्रात काम करणार आहोत, की इथे चुका या सगळ्यांसमोरच होणार असतात. त्यामुळे चुकांना घाबरून चालणारच नाही, लोकांसमोर उभं राहण्याची भीड ही चेपली गेलीच पाहिजे.
अभिनय कार्यशाळा या स्वत:ला आजमावण्याची व्यासपीठं असाव्यात. या कार्यशाळांमधून आपल्या विचारांना चालना मिळू शकते आणि अभिनेता म्हणून घडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते. ही शिबिरं, कार्यशाळा, प्रशिक्षणवर्ग हे असे आरसे असावेत, की त्यात होतकरू रंगकर्मींनी स्वत:च्या गुणदोषांसकट स्वत:ला बघायला शिकावं आणि नट म्हणून घडण्याच्या प्रक्रियेची मुहूर्तमेढ करावी. (उत्तरार्ध)
(लेखक प्रसिद्ध रंगकर्मी आहेत)