पावसाचा थेंब

By Admin | Updated: January 17, 2015 17:06 IST2015-01-17T17:06:12+5:302015-01-17T17:06:12+5:30

जूनमध्ये समोर पावसाचा एक थेंब पडलेला दिसतो आणि आपण म्हणतो, ‘अरे, पावसाळा आला बरं का

Rain drops | पावसाचा थेंब

पावसाचा थेंब

 - धनंजय जोशी

 
- सहज
 
एक गंमत अशी!
जूनमध्ये समोर पावसाचा एक थेंब पडलेला दिसतो आणि आपण म्हणतो, ‘अरे, पावसाळा आला बरं का!’ म्हणजे पावसाचा तो एक थेंब फक्त थेंब राहिलेला नसतो. त्यामध्ये सबंध पावसाळा भरलेला असतो! आपल्या साधनेचंही तसंच आहे. आपण दैनंदिन साधना करतो, ध्यानास बसतो, पूजा करतो. आपल्याला वाटतं, ही आपली व्यक्तिगत साधना, पूजा! पण ते खरं नाही. जसा पाण्याचा एक थेंब आणि पावसाळा एकमय आहेत, तसंच आपली साधना, ध्यान, पूजा आणि जगाची साधना, जगाचं ध्यान आणि जगानं केलेली पूजा.. सर्व एकमय आहे! आपली साधना ही आपलं वेगळं वाटणारं व्यक्तिमत्व विरघळून टाकते.
सान सा निम मला सांगायचे, ‘व्हेन युअर माईंड इज कंप्लीट, द होल वर्ल्ड इज कंप्लीट!’
सान सा निम आमच्यासाठी ध्यानशिबिर दुसर्‍या झेन गुरूबरोबर घडवून आणत असत. कधी कधी आम्हाला ते एकांत शिबिराला पण पाठवीत असत. एकांत शिबिर मला खूप आवडतं! तुम्ही आणि तुमचं मन. बाकी कोणी नाही! तुमचे गुरू आठवड्यातून एकदा भेटून जायचे तुमची प्रगती बघण्यासाठी.
माझा मित्र बिल आणि मी पुष्कळ शिबिरं बरोबर (मौन पाळून) एकमेकांची साथ धरून केली. सान सा निमनी त्याला एकशे आठ दिवसांसाठी एकांत शिबिराला पाठवलं. बिल एका घनदाट जंगलामधल्या झोपडीमध्ये जाऊन राहिला. रोज २0-२२ तास ध्यान-धारणा. जेमतेम दोन तास झोप! साठ दिवसानंतर बिलला विलक्षण साक्षात्कार झाला. त्याला एक-दोन दिवसांनी सान सा निम भेटले. प्रसन्न चेहर्‍यानं बिल त्यांना म्हणाला, ‘आय हॅव्ह अंडरस्टुड! मला आता ज्ञान झालं आहे. प्लीज गिव्ह मी परमिशन टू एण्ड धीस रिट्रीट! माझी साधना संपूर्ण झाली असं वाटतं!’
सान सा निम काय म्हणाले असतील?
ते म्हणाले, ‘नाही. यू आर नॉट डन! साठ दिवस तू स्वत:साठी साधना केलीस! आता अठ्ठेचाळीस दिवस जगासाठी, इतरांसाठी साधना कर!’ 
- बिलला झालेलं ज्ञान अपूर्णच होतं! स्वत:ची साधना आणि जगाची साधना दोन्हींचं एकतत्व त्याला समजलं नव्हतं! पाण्याच्या थेंबामधला पावसाळा त्याला दिसला नव्हता! नंतर एकदा मी सान सा निमना विचारलं, ‘मलाही एकांत शिबिराला जायचं आहे.’
ते मला म्हणाले, ‘एकशे आठ दिवस आणि आत्ताचा एक क्षण यात फरक काय? फरक आहे म्हणालास तर ही झेन काठी तुला तीस फटके देईल. फरक नाही म्हणालास तरीही तुला तीस फटके मिळतील!’
सान या निम जाऊन काही वर्षे झाली, पण ती काठी मात्र माझा अजून पाठलाग करते आहे!
(अमेरिकेतील शिकागो शहरात वास्तव्याला असणारे लेखक झेन साधक / अभ्यासक आहेत.)

Web Title: Rain drops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.