पुणेरी कट्टा- नावात काय आहे.....? 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 06:00 AM2019-02-10T06:00:00+5:302019-02-10T06:00:10+5:30

पुणे शहरात अनेक क्षेत्रांत उत्तम कार्य केलेल्या व्यक्तींची आठवण राहावी; म्हणून अनेक रस्त्यांना, चौकांना, पुलांना नावे दिली जातात. पण, काही नावांची स्मृती न राहिलेली बरी अशी नावे ही मतांच्या राजकारणासाठी दिली जातात.

puneri katta - What is in the name.. ? | पुणेरी कट्टा- नावात काय आहे.....? 

पुणेरी कट्टा- नावात काय आहे.....? 

googlenewsNext

- अंकुश काकडे-  
आपल्या देशात मृत व्यक्तींची स्मृती म्हणून त्यांनी केलेल्या उत्तम कार्याचा गौरव म्हणून पुलांना, रस्त्यांना, चौकांना त्या व्यक्तींची नावे दिली जातात. नवीन पिढीला ही व्यक्ती कोण हे समजावे, त्यांचे कार्य समजावे हा, मुख्य उद्देश असतो. आपल्या पुणे शहरात तर रस्ते, चौकांना नावे तर दिली जातातच; परंतु अनेक ठिकाणी तो चौक नसतो, तिव्हाटा असतो, पण तरी त्याला नाव दिले जाते.
पुणे शहरात गेली कित्येक वर्षे हे नामकरण चालू आहे. आजमितीस पुणे शहराकडे नोंद असलेली नावे ३,५०० इतकी आहेत. याशिवाय, नोंद न केलेली नावेदेखील तेवढीच असतील. अगदी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या व्यक्तींची नावे रस्त्यांना, चौकांना दिली आहेत; पण ती नावे देत असताना त्या माणसांचे कर्तृत्व, त्यांचे योगदान याचा विचार करून त्यांचा सन्मान म्हणून त्याच योग्यतेचा रस्ता असावा, ही माफक अपेक्षा. मात्र, अनेक वेळा ती पाळली जात नाही.

१० फुटांच्या बोळाला महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवाजीमहाराज, शाहू, फुले अशा महान व्यक्तींची नावे दिलेली आपल्या 
पाहण्यात येतील. अशी नावे सुचविणाऱ्यांच्या भावना निश्चितच चांगल्या असतील; पण अशा चुकीच्या ठिकाणी अशी नावे देऊन आपण त्या महान व्यक्तींचा काय सन्मान करतो? असा प्रश्न पडतो. काही नावांच्या बाबतीत तर किती रस्ते, चौकांना नाव द्यायचे? असादेखील प्रश्न पडतो. अशी नावे देताना काही वेळा राजकीय, सामाजिक, धार्मिक बाबींचा प्रश्न समोर येतो, दबाव येतो हीदेखील वस्तुस्थिती आहे. अर्थात, ही नावे देण्याचा अधिकार महापालिकेला, पर्यायाने तेथे काम करणाºया नगरसेवकांना. पूर्वी शहर छोटं होतं, सभासदसंख्या मर्यादित होती; त्यामुळे अशी नावे देण्याबाबत फारसे वाद झाल्याचे निदर्शनास येत नाही; पण गेल्या काही वर्षांत नगरसेवकांची संख्या वाढत गेली, शहर वाढत गेले. त्यामुळे अनेक रस्ते, चौक निर्माण झाले आणि अशी नावाची यादी वाढत गेली. नावे देण्याबाबत महापालिकेने काही वर्षांपासून निश्चित असे धोरण आखले आहे; पण अनेक वेळा महापालिका खात्याचा अभिप्राय डावलून नगरसेवक मंडळी अशी नावे देत असतात. अनेक ठिकाणी नाव देण्यावरून फार मोठे वाद झाले आहेत. काही ठिकाणी तर मोठा संघर्षदेखील झालेला आहे. 
साधारणत: पूर्वी एखादे नाव दिले असेल तर ते बदलण्यात येऊ नये, असा संकेत आहे. समंजस सभासद हा संकेत पाळतात; पण काही वेळा स्वत:च्या हट्टापायी हे संकेतदेखील मोडण्यात माननीय मागे राहत नाहीत. हल्ली एक गोष्ट अनेक वेळा लक्षात येऊ लागलीय, आपण नगरसेवक झालो, की ज्या वॉर्डातून निवडून आलोय तो भाग माझ्या मालकीचा, असा (गैर)समज माननीय करून घेतात आणि मग काय! आपल्या कुटुंबीयांतील व्यक्तीचे नाव देण्याचा आग्रह, हट्ट धरून बसतात. (त्या व्यक्तीने खरोखर सामाजिक किंवा विशेष कार्य केले असेल तर नाव देण्यास कुणाचीच हरकत असण्याचे कारण नाही.) पण, केवळ आपल्या कुटुंबातील आहे, हाच एकमात्र निकष त्याला असतो. मग तेथील नागरिकांचे मत काय आहे, त्यांची संमती आहे का, याचा थोडादेखील विचार केला जात नाही.
अशी नावे देण्यावरून काही वेळा जातीय तणावदेखील निर्माण झाला आहे. अशी अनेक उदाहरणे पुणे शहरात घडली आहेत. अर्थात, ही नावे देत असताना एकदा महापालिकेने तेथे नाव दिले तर सरकारी कागदोपत्री त्याची नोंद केली जाते; पण प्रत्यक्षात त्या रस्त्याला, चौकाला प्रचलित नाव दुसरेच असते. नागरिक जुन्याच नावाने त्याची ओळख कायम ठेवतात. काही ठिकाणी तो रस्ता किंवा चौक नामांकित व्यक्ती, संस्था यांचे नाव दिले गेले आहे; पण त्याची आठवण कुणालाच राहत नाही. कळत-नकळतपणे आपण अंगवळणी पडलेल्या नावाचाच उल्लेख करतो. आता हेच पाहा ना. डेक्कन जिमखाना येथून शेतकी कॉलेजकडे जाणाºया रस्त्याला ‘कै. नामदार गोपाळ कृष्ण गोखले मार्ग’ असे नाव आहे; पण आजही तो रस्ता ‘फर्ग्युसन कॉलेज रोड’ या नावानेच ओळखला जातो. तर, तेथेच असलेल्या मोठ्या चौकाला ‘गोपाळ कृष्ण गोखले चौक’ हे नाव आहे; पण आजही तेथे प्रख्यात असलेल्या जुन्या गुडलक हॉटेलवरून त्या चौकाची ओळख ‘गुडलक चौक’ अशीच आहे. हीच परिस्थिती स्वारगेट चौकात. खरे म्हटले तर देशभक्त केशवराव जेधे यांचे नाव दिले आहे; पण वर्षानुवर्षे तेथे स्वारगेट पोलीस चौकी आहे. त्यामुळे आजही हा चौक ‘स्वारगेट चौक’ म्हणून ओळखला जातो. टिळक रोडवर असलेल्या ‘पुरम चौका’ची ओळख आजही ‘अभिनव कॉलेज चौक’ अशीच पुणेकरांना आहे. आता हेच पाहा ना, संचेती हॉस्पिटल चौकातून- खरे तर त्या चौकाचे नाव आहे ‘नेताजी सुभाषचंद्र बोस चौक’- औंधकडे जाणाºया रस्त्याला पुणे विद्यापीठ रस्ता हे नाव आहे, हे किती जणांना ठाऊक आहे? आपण सगळे जण त्या रस्त्याला ‘गणेश खिंड रस्ता’ म्हणूनच आजही ओळखतो. पुणे शहरात काही चौकांना, रस्त्याला नकळत तेथील वास्तू, कार्यालय याचे महत्त्व म्हणून नाव प्रचलित झाले आहे. आता हेच पाहा ना, ‘बेलबाग चौक’ कुठं आहे? असं तुम्ही कुणाला विचारलं तर त्या चौकात गेली अनेक वर्षे राहणाऱ्या  पुणेकराला ते सांगता येणार नाही; पण ‘सिटी पोस्ट चौक’ कुठे आहे? असे विचारले तर तो क्षणात सांगेल कुठे आहे ते. तेथे वर्षानुवर्षे असलेल्या पोस्ट ऑफिसमुळे हे नाव प्रचलित झाले आहे. वडारवाडीजवळील ‘दीप बंगला चौका’ची महापालिकेत ‘कै. चिं. वि. जोग चौक’ अशी नोंद आहे, हे कुणालाच माहीत नाही.    (पूर्वार्ध)

(लेखक प्रसिद्ध राजकीय-सामाजिक  कार्यकर्ते आहेत.)
 

Web Title: puneri katta - What is in the name.. ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.