राजकीय भांगेतील तुळस..
By Admin | Updated: July 12, 2014 14:42 IST2014-07-12T14:42:24+5:302014-07-12T14:42:24+5:30
बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर नाव घ्यावे असे एक आदरणीय नेतृत्व म्हणजे सुधीरभाऊ जोशी! त्यांनी नुकतेच अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा आलेख..

राजकीय भांगेतील तुळस..
- अरुण पुराणिक
गोरा रंग, उंचपुरी देहयष्टी, रुबाबदार मिशी, शालिन मृदू बोलणं आणि चेहर्यावर प्रसन्न हास्य! गळाबंद जोधपुरी कोटात तर भाऊ खानदानी संस्थानिक वाटतात. शिवसेनेसारख्या लढाऊ, आक्रमक संघटनेत राहूनही भाऊंनी शालिनता आणि सुसंस्कृतपणा कधी सोडला नाही. मराठी माणसाच्या न्याय्य-हक्कासाठी लढताना अनेक आस्थापनांतून संप, मोर्चे, घेराओ झाले. तरीही तेथील मराठीद्वेष्टे उच्च अधिकारी भाऊंचा आदर करीत. त्यांच्या शब्दाला मान देऊन सन्मान्य तोडगा काढून अन्याय निवारण करीत. अनेक संघर्ष झाले. पोलीस कारवायाही झाल्या. परंतु, आपल्या मुत्सद्दीपणामुळे कोणत्याही कार्यकर्त्यावर नोकरी गमाविण्याची वेळ येऊ दिली नाही.
एकेकाळी दत्ताजी साळवी, वामनराव महाडिक, मनोहर जोशी, प्रमोद नवलकर व सुधीर जोशी हे शिवसेनेचे पाच पांडव म्हणून ओळखले जात. शिवसैनिक प्रेमाने भाऊंना धर्मराज म्हणत. कारण भाऊंनी कधीही, कुणाकडूनही कसल्याही कामाचा मोबदला घेतला नाही. कधी पान, सिगारेट, दारू नाही; मग बाकीच्या गोष्टी तर दूरच राहिल्या. चाळीस-पन्नास वर्षे सक्रिय राजकारणात राहूनही भाऊंनी सामाजिक नीतिमूल्ये व शुचिभरूतता जपली. आम आदमी पार्टीनेही आदर्श घ्यावा, असे हे व्यक्तिमत्त्व आहे.
दादरच्या ६१ नंबर शाखेत, नंतर शिवसेना भवनात कामासाठी येणार्या लोकांना शिफारस पत्र देण्याची भाऊंची स्वत:ची अनोखी पद्धत होती. कोणत्याही बेकायदेशीर, अनैतिक कामांसाठी ते शिफारस करीत नसत. मोत्याच्या दाण्यासारख्या सुवाच्च अक्षरात विनंतीवजा शिफारसपत्र, खाली कलात्मक स्वाक्षरी आणि तळाला जो कार्यकर्ता त्या लोकांना घेऊन येत असे त्याचे नाव, संदर्भ आणि कामाचे संक्षिप्त स्वरूप लिहीत असत. भाऊंच्या कोणत्याही शिफारस पत्राचा कधी अवमान अथवा दुरुपयोग होत नसे.
बँका, विमा कंपन्या, रेल्वे, जहाज, वीज, ऑईल, गॅस कंपन्या, सरकारी-निमसरकारी, खासगी कार्यालये यातील सर्व सुशिक्षित पांढरपेशा नोकरवर्गाला भगव्या झेंड्याखाली संघटित करण्याचे ऐतिहासिक कार्य सुधीरभाऊ व गजाभाऊ कीर्तिकरांनी केले. या स्थानीय लोकाधिकार समितीमुळेच विद्यार्थी सेनेलाही बळ मिळाले. त्यांना मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर वर्चस्व मिळवता आला.
पूर्वीपासून पदवीधर मतदारसंघावर जनसंघाचे, नंतर भाजपाचे निर्विवाद वर्चस्व होते. मधू देवळेकर यांची ती हक्काची सीट होती. भाऊंनीच कल्पक व्यूहरचना करून या मतदारसंघातून स्वत: उभे न राहता आपल्या मित्राला प्रमोद नवलकरांना निवडून आणले. लोकाधिकारच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या हस्ते विजयी उमेदवाराचा सत्कार करण्याची कल्पना मांडली. त्याप्रसंगी शिवसेनाप्रमुखांनी मोठी मार्मिक प्रतिक्रिया व्यक्त केली, ‘‘विजयी कोण होतो? त्यापेक्षा तो कोणामुळे विजयी होतो ते अधिक महत्त्वाचे आहे. देवळाच्या कळसावर कावळासुद्धा येऊन बसतो. सत्कार करायचा असेल, तर ज्यांनी या देवळाची निर्मिती केली त्या माझ्या लाडक्या शिवसैनिकांचा करा.’’ गेल्या ४५ वर्षांत शिवसेनेने मुंबई व ठाण्याला अनेक महापौर दिले. परंतु, सुधीरभाऊंचा मुंबईवरील व सतीश प्रधान यांचा ठाण्यावरील ठसा आज इतक्या वर्षांनंतरही पुसला जाऊ शकत नाही. शिवाजी पार्कवर स्वा. सावरकरांचे स्मारक उभारण्यात सुधीरभाऊंचा सिंहाचा वाटा होता. भाऊंच्या कर्तृत्वाविषयी कुणाचेही दुमत होऊ शकत नाही.
नोव्हेंबर १९८५ला शिवसेनेचे दोन दिवसांचे राज्यव्यापी अधिवेशन रायगडावर करण्याचे ठरले. त्याच्या संयोजनाची बैठक शिवसेना भवनात चालू होती. मनोहर जोशी स्वागताध्यक्ष झाले. मग इतर नेत्यांनीही सोईस्कर जबाबदारी वाटून घेतली. पण, रायगड, पाचाडसारख्या दुर्गम स्थळी हजारो कार्यकर्त्यांच्या भोजन, निवासस्थानाची जबाबदारी घेण्यास कुणीच नेता पुढे येईना. गजाभाऊ कीर्तिकर, राम भंकाळ व इतर कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव शेवटी सुधीर भाऊंनी ते आव्हान स्वीकारून लोकाधिकारच्या शिस्तबद्ध कार्यकर्त्यांच्या मदतीने ते यशस्वी करून दाखवले.
या अधिवेशनानंतरच विधानसभेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला. भावी मुख्यमंत्री म्हणून आदल्या दिवसापर्यंत सुधीरभाऊंचे नाव चर्चेत होते. पण, त्या एका रात्रीत नाट्य घडले, भाऊ महसूलमंत्री झाले. ज्याने आयुष्यात कधीच आर्थिक लफडी केली नाहीत, आपल्या पदाचा व संघटनेचा उपयोग करून वडिलोपार्जित यशवंत भोजनालयाची दुसरी शाखासुद्धा काढली नाही ते आता राज्याचे आर्थिक गुंतागुंतीचे महसूल खाते सांभाळत होते. प्रत्येक फाईल वाचून, स्वत:चे पूर्ण समाधान झाल्याशिवाय भाऊ त्यावर स्वाक्षरी करीत नसत. त्यामुळे मंत्रालयात फायलींचे ढिगारे वाढू लागले. ज्यांचे यात आर्थिक संबंध गुंतलेले होते ते दुखावले गेले. शेवटी भाऊंकडे शिक्षणमंत्रिपद आले.
मंत्री म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय लोकाभिमुख ठरले. मामा मनोहरपंत व भाचे सुधीरभाऊ दोघेही सेनेचे ज्येष्ठ नेते! दोघेही दादरचे, एकाच मतदारसंघातले! भाऊंचा पत्ता आपोआप कापला गेला. परंतु भाऊंच्या वागण्याबोलण्यात कधीही हे शल्य जाणवत नसे. खरंतर भाऊंवर झाला इतका अन्याय अन्य कुणाही नेत्यावर झाला नसेल! सुरुवातीची काही वर्षे नगरसेवक मग महापौरपद, काही वर्षे विधान परिषदेवर आमदारकी बस! त्यानंतर फक्त स्था. लोकाधिकार समिती ग्राहक कक्ष व बँक कर्मचारी सेनेचे अध्यक्षपद! तिथेसुद्धा राष्ट्रीय स्तरावर भाऊंनी बँक कर्मचार्यांची युनियन स्थापन केली. समाजकारण, संगीत आणि क्रिकेट हे भाऊंचे जिव्हाळ्याचे विषय. समाजकारण चालू होते तोवर संघटनेत भाऊ टॉपला होते. पुढे सत्ता आली. अंतर्गत राजकारण वाढत गेले; तसे सत्तास्पर्धेत भाऊ मागे पडत गेले. नंतरच्या दुर्दैवी अपघातानंतर भाऊ शारीरिकदृष्ट्या खचले व मुख्य प्रवाहापासून अधिकच दूर झाले. तरीसुद्धा त्यांची लोकप्रियता अबाधित राहिली. हजारो कार्यकर्त्यांचे भाऊ दैवत होते. नगरपालिकेच्या निवडणुकीत अजित पंडित यांनी सुधीरभाऊ त्यांना आशीर्वाद देत आहेत, असे मोठे पोस्टर दादरच्या चौकात लावले. तेथील सुज्ञ लोकांनी भाऊंच्या या शिष्योत्तमाला भरभरून मते देऊन निवडून आणले. पण, दादरमध्ये भाऊंचे एकट्याचे मोठे पोस्टर लागले याचेही राजकारण करण्यात आले. भाऊंना त्याचा त्रास झाला.
बाळासाहेबांनंतर नाव घ्यावे असे एक आदरणीय नेतृत्व म्हणजे सुधीरभाऊ जोशी! शिवसेनाप्रमुखांनी सुधीरभाऊंना घडविले, तर सुधीरभाऊंनी हजारो सुशिक्षित कार्यकर्त्यांची फौज घडविली. गजाभाऊ कीर्तिकर, आनंद अडसूळ, रामराव वळुंज, सूर्यकांत महाडिक, अरुण नाबर, राम भंकाळ, प्रशांत देशप्रभू, बबन गावकर, विलास पोतनीस, उमाकांत कोटनीस, अरविंद सावंत, हेमंत गुप्ते, प्रदीप मयेकर, अनिल देसाई, विठ्ठल चव्हाण, शांताराम बेर्डे, रघू सावंत, जी. एस. परब, प्रवीण हाटे, राजीव जोशी, सुरेश शिंदे अशी शेकडो नावे घेता येतील.
उद्धवजींसारख्या सुसंस्कृत सज्जन नेत्यावरही जाणूनबुजून मवाळ असल्याचा आरोप केला जात आहे. अशा प्रसंगी प्रेमळ आणि सज्जन सुधीरभाऊंची आठवण प्रकर्षाने होते. मधल्या जीवघेण्या भीषण अपघातानंतर ते आता बरेचसे सावरले आहेत. अशा या आदर्श नेत्याला उत्तम आयुआरोग्य लाभो, हीच शुभेच्छा!
(लेखक स्थानिक लोकाधिकार समितीचे माजी पदाधिकारी आहेत.)