प्लँचेटचे भूत आणि संशोधनाची प्रेरणा
By Admin | Updated: August 9, 2014 14:49 IST2014-08-09T14:49:04+5:302014-08-09T14:49:04+5:30
महासंगणकनिर्मितीच्या क्षेत्रात आदरानं घेतलं जाणारं नाव म्हणजे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर. असे हे व्यक्तिमत्त्व प्लँचेटसारख्या अंधश्रद्धेला खतपाणी घालणार्या विषयाचं सर्मथन करूच कसं शकतं? अशी शंका येऊन अनेकांच्या भुवया उंचावल्या; परंतु खरंच अंधश्रद्धांचं सर्मथन होतंय की ते काही वेगळं, त्यापलीकडचं सांगू, शोधू पाहताहेत? विज्ञानाच्या कसोटीवर सारं तपासून घ्यायला ते सांगताहेत का? हे जरा समजून घ्यायला हवं. त्यांची भूमिका त्यांच्याच शब्दांत..

प्लँचेटचे भूत आणि संशोधनाची प्रेरणा
डॉ. विजय भटकर
भूत असते की नाही, मला माहीत नाही; परंतु प्लँचेट नावाचे एक भूत मात्र माझ्या मानगुटीवर गेल्या काही दिवसांपासून बसलेले आहे. वृत्तपत्रांतून आणि नंतर काही वाहिन्यांवरून मी प्लँचेटचे सर्मथन करत असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या आणि सगळीकडे संभ्रमाचे वातावरण तयार झाले. एक संगणकतज्ज्ञ, शास्त्रज्ञ असताना डॉ. भटकरांसारखा माणूस प्लँचेट मानतो?, असे म्हणत अनेकांच्या भुवयाही उंचावल्या. मी केलेल्या विधानांचा विपर्यास झाल्याने, तसेच संदर्भ सोडून रोचक बातमीसाठी सोयीचे तेवढेच घेतल्याने हा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळेच या विषयाबाबत सविस्तर भूमिका मांडावी, असे वाटले; पण इतक्यापुरतेच र्मयादित न राहता यानिमित्ताने अतींद्रिय शक्ती आणि त्याविषयीचे माझे विवेचन करणेही मला तितकेच अगत्याचे वाटते.
मी प्लँचेटवर विश्वास ठेवतो का? मी त्याचे सर्मथन करतो का? मी स्वत: ते कधी करून पाहिले आहे का? असे काही प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत; त्यांचे एकच उत्तर आहे, ते म्हणजे अजिबात नाही. माझे कोणत्याही संदर्भात उचलले गेलेले एखादे वक्तव्य जर चुकूनसुद्धा अंधविश्वास वाढवण्यास कारणीभूत ठरत असेल, तर मला याविषयी सांगायला हवे. ब्लॅक मॅजिक, प्लँचेट असल्या कुठल्याही विषयात कुणीही पडू नये. आपल्या ज्ञानाधिष्ठित संस्कृतीमध्ये व धर्मशास्त्रांत अशा गोष्टी अनिष्ट व निषिद्ध मानल्या गेल्या आहेत. मी स्वत: अशा प्रथांचा संपूर्ण निषेध करतो व त्यांना निषिद्ध मानतो.
माझ्या वक्तव्याचा प्रसंग असा होता, की डॉ. मेधा खासगीवाले यांच्या ‘आत्म्याचा प्रवास व मृत्यूपश्चात जीवन’ या मराठी व इंग्रजी अनुवाद केलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा तो प्रसंग होता. मी पुनर्जन्म आणि मृत्यू या विषयावर बोलत असताना एकूण विषयाच्या संदर्भात आलेला तो उल्लेख होता. त्यातही प्लँचेट या विषयावर खूप चर्चा सुरू असल्याने त्याचा संदर्भ देत, ‘या प्लँचेट प्रकरणाचे गूढ उकलण्यासाठी आता नव्याने प्लँचेट करावे लागेल,’
असे केवळ उपहासाने, विनोदाने म्हटले होते; परंतु त्याचाही विपर्यास झाला. मी एका व्यापक अशा विषयावर विशिष्ट संदर्भात बोलत असताना समग्र विषय समजून न घेता केवळ त्यातील एक तुकडा उचलल्याने हा विपर्यास झाला आहे.
यावरून भूताचे भूतच मानवाच्या मानगुटीवर बसले आहे असे दिसते.
माझ्या वक्तव्याचा प्रसंग असा होता की, डॉ. मेधा खासगीवाले यांच्या ‘आत्म्याचा प्रवास व मृत्यूपश्चात जीवन’ या मराठी व इंग्रजी अनुवाद केलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा तो प्रसंग होता. मी पुनर्जन्म आणि मृत्यू या विषयावर बोलत असताना एकूण विषयाच्या संदर्भात आलेला तो उल्लेख होता. त्यातही प्लँचेट या विषयावर खूप चर्चा सुरू असल्याने त्याचा संदर्भ देत, ‘या प्लँचेट प्रकरणाचे गूढ उकलण्यासाठी आता नव्याने प्लँचेट करावे लागेल.’, असे केवळ उपहासाने, विनोदाने म्हटले होते. परंतु त्याचाही विपर्यास झाला. मी एका व्यापक अशा विषयावर विशिष्ट संदर्भात बोलत असताना समग्र विषय समजून न घेता केवळ त्यातील एक तुकडा उचलल्याने हा विपर्यास झाला आहे. भाषेची र्मयादा, संदर्भ, भावना, त्यातील अव्यक्त अर्थ हे सारे निघून गेले की, असे संभ्रम निर्माण होतात. अतींद्रीय शक्तींविषयी जगात कसे संशोधन सुरू आहे व त्याचा कसा वापर होतो आहे हे सांगत असताना हे ‘प्लॅचेटचे भूत’ माझ्याच मानगुटीवर येऊ न बसले व त्यातून अंधश्रद्धेला खतपाणी देतो असा गैरसमज निर्माण झाला. पुन:श्च स्पष्ट सांगायचे तर, प्लँचेट, काळी जादू या असल्या प्रकारांचा मी पूर्ण निषेध करतो आणि करीत राहीन.
आता या निमित्ताने आणखीही काही बाबी अधोरेखित करायला हव्यात. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा जेव्हा आणला जात होता तेव्हा सुरूवातीला त्यातील काही बाबींविषयी माझ्याही मनात आक्षेप होते. या विषयी समाजातील आध्यात्मिक, विवेकी व्यक्तींशी, वारकरी संप्रदायाशी व्यापक विचार विनिमय व्हावा अशी माझी भूमिका होती. तसे सरकारने केलेही. परंतु आता कायद्याचे जे काही स्वरूप तयार झाले आहे ते बव्हंशी चांगले आहे. त्यामुळे हा अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लवकरात लवकर व्हावा, असे माझे मत आहे. अंधश्रद्धेच्या विरोधात जागर करणार्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली. त्यानंतर त्यांच्या कामाचे मोठेपण लक्षात घेऊ न त्यांना शासनाने ‘महाराष्ट्रभूषण’ द्यावे ही मागणी प्रथमत: मी केली होती, ती त्यांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाचे महत्व व गरज पटल्यामुळेच. अनिंसने जरी माझ्या वक्तव्याचा संदर्भ लक्षात न घेता माझा निषेध केला असला तरी अंनिसच्या कार्याचे मी अभिनंदन करतो. अंनिस सारख्या संस्था समाजात असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी ‘श्रद्धा-अंधश्रद्धा’ या विषयावर डोळसपणे सतत अभ्यास करीत राहावे व त्यांनी जाहीर केलेले २१ लाखांचे बक्षिस या अभ्यासासाठी वापरावे.
गुन्हे अन्वेषणासाठी, हेरगिरीसाठी प्रगत जगातील अनेक प्रसिद्ध इंटलिजन्स व काउंटर इंटलिजन्स संस्था अंतींद्रीय शक्तींचा (इएसपी, पॅरानॉर्मल) आजही उपयोग करताना दिसतात. या विषयावर इंटरनेटवर खूप पेपर्स, फाईल्स, व माहिती उपलब्ध आहेत. एवढेच नव्हे, तर अमेरिकेने यासाठी ‘स्टार गेट’ नावाचा रिसर्च प्रोजेक्ट स्टॅनफर्ड रिसर्च इन्स्टिट्यूट व अनेक प्रसिद्ध युनिव्हर्सिटींमध्ये राबविला होता व असे अनेक संशोधन प्रकल्प आजही राबविले जात आहेत. ब्रिटन, युरोप व रशियामध्ये असेच संशोधन केले गेले व केले जात आहे, असे गुगल वेबसर्चमधून दिसते. पुनर्जन्म, मृत्यूपश्चात् जीवन, अतींद्रीय शक्ती या विषयांवर अनेक जगप्रसिद्ध वैद्यकीय व मानस शास्त्रज्ञांनी आपले विचार त्यांच्या अत्यंत लोकप्रिय झालेल्या विविध पुस्तकांतून मांडले आहेत. जिज्ञासूंनी त्यांची दखल घ्यावी. या गूढ विषयावर मला भावलेला सर्वात महत्वाचा व अनुभवजन्य ग्रंथ आचार्य श्रीराम शर्मा यांचा आहे.
रिमोट व्हिविंग (दूर अंतरावर काय चालले आहे हे पाहण्यासाठी वापरली जाणारी एक पद्धती) या पद्धतीद्वारे एखाद्या व्यक्तीचा, संघटनांचा माग घेतला जातो. त्यासाठी मानसिक शक्तीचा वापर केला जातो. नुकत्याच हरवलेल्या एम एच ३७0 या मलेशियन विमानाचा शोध या रिमोट व्हिविंगवरही करण्यात आला होता. हे जाणकारांनी लक्षात घेतले पाहिजे. उघड झालेल्या त्यांच्या काही गोपनीय अहवालांतूनही ही बाब पुढे आली आहे. नेचर आणि आयईईई या जागतिक दर्जाच्या रिसर्च र्जनल्समधूनही या विषयांवरील संशोधन वेळोवेळी प्रसिद्ध झालेले आहे. भारतातही अतींद्रीय शक्ती मृत्यू, मृत्यूपश्चात् जीवन आदी विषयांवर पुष्कळ ग्रंथ व माहिती उपलब्ध आहे. प्रश्न असा आहे की, आपण त्याकडे डोळसपणाने पाहायला तयार आहोत का? त्याचा अंधपणाने पुरस्कार करणार आहोत का? या गोष्टी आहेतच, हे मानणे जसा अंधविश्वास आहे त्याचप्रमाणे हे नाहीच, असे प्रमाणाविना मानणे हाही अंधपणाच नव्हे का? मग या संपूर्ण विषयाचे गूढ अद्याप पूर्णपणे उकललेले नसताना या सार्या विषयाकडे एका विज्ञाननिष्ठ भूमिकेतून पाहण्याची आपली तयारी आहे का? मी अंत:करणापासून वैज्ञानिक आहे आणि विज्ञाननिष्ठ विचार व बुद्धीप्रामाण्यवाद मी मानतो. तसेच मी अध्यात्मशास्त्रालाही मानतो. अध्यात्मशास्त्र म्हणजे ‘मी’ कोण आहे याचे अनुभवजन्य ज्ञान. ज्याला ज्ञानेशर महाराजांनी ‘स्वस्वरूपभूत’ ज्ञान म्हटले आहे. त्यामुळे कोणताही विषय मला विज्ञानाच्या व अध्यात्माच्या कसोटीवर पारखून घ्यायला आवडेल. शरीर, मृत्यू आणि मृत्यूनंतरचे जीवन या सार्या विषयांचा वेध घेताना त्याचे संगणकाशी साधम्र्य असल्याचे मला प्रकर्षाने जाणवते. कंप्यूटरच्या संपूर्ण बाह्य भागाचे कार्य आणि क्षमता ही त्याच्या अंतर्भागात असणार्या सॉफ्टवेअरवर अवलंबून असते. त्यात माहितीचा साठा असतो. त्याचप्रमाणे इंटरनेट वेबमध्ये अमूर्त आणि सूक्ष्म माहितीचा संग्रह (डाटा) हा ‘क्लाऊड कॉम्प्युटिंग’द्वारे आभासी अवकाशात साठवला जातो व हवा तेव्हा हव्या त्या संगणकावर मूर्त स्वरूपात आणता येतो. त्याचप्रमाणे सर्व सजीवांच्या सर्व जन्मांतील स्मृतींची माहिती चित्तामध्ये साठवलेली असते व जीवाच्या पुढच्या जन्मातील हार्डवेअर व सॉफ्टवेअर निश्चित होत असते. या विचारसरणीमागे नक्की एक वैज्ञानिक पाया आहे. परंतु हे नक्की कसे काय होते याचे गूढ मानवाला उकललेले नाही. त्या दिशेने प्रयत्न होण्याची निश्चितपणे गरज आहे. ‘आत्म्याचा प्रवास आणि मृत्यूपश्चात जीवन’ या विषयावरील व्याख्यानामध्ये बोलताना माझा हाच संदर्भ प्रामुख्याने होता. आजच्या कल्पना हे उद्याचे वास्तव असू शकते. साय-फायमध्ये तर याचे अनेक दाखले देता येतील. वैज्ञानिक कादंबर्यांमध्ये कल्पनारम्यतेतून निर्माण केलेले काही विषय आजच्या घडीला खरोखर वास्तवात आलेले आपण पाहतो आहोत. रोबोट आणि रोबोटीक्स तंत्रज्ञान हे त्याचे अत्यंत बोलके उदाहरण आहे. या गोष्टी जेव्हा कल्पना म्हणून अस्तित्वात होत्या तेव्हा त्यांना मानले गेले नाही परंतू आता त्या प्रत्यक्षात दिसत आहेत व मोठय़ा प्रमाणावर वापरल्या जात आहेत.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयात माणसाला ज्ञान कसे होते? त्याची परिमाणे कोणती? हे समजण्याच्या प्रयत्नांत विज्ञानाच्या कक्षा खूप विस्तारल्या आहेत. क्वान्टम मेकॅनिक्समुळे विज्ञानात एक नवीन क्रांती घडून आली आहे. त्यामुळे काही प्रमाणात विश्वाचे गूढ उकलू लागले आहे. द्रष्टा, दृष्य व दर्शन ही एकात्मक त्रिपुटी आता विज्ञानाला समजू लागली आहे. १९ व्या शतकात मात्र हीच गोष्ट अंधविश्वास ठरली असती. या विषयावर जगभरात खूप संशोधन सुरू आहे. माझेही या विषयामध्ये संशोधनाचे काम सुरू आहे. पुढच्या काळातील संगणक क्वान्टम व बायोलॉजीकल असतील हे मात्र नक्की. हे गूढ विज्ञानाला समजून घ्यायचे आहे. मी कोण, सृष्टी काय, तसेच मृत्यू काय, मृत्यूनंतर काय हे शोधण्याचे दोन मार्ग असतात. एक आहे तो विज्ञानाचा आणि दुसरा आहे आध्यात्मिक ज्ञानाचा. भारतीय ज्ञानप्रणालीत यावर सर्वात जास्त संशोधन झालेले आहे व अजून होण्याची गरज आहे. केवळ प्रपंचज्ञानाला सर्वज्ञान समजणे हे अज्ञान, असे ज्ञानेश्वरांनीही म्हटले आहे. त्यामुळेच ज्ञानाची प्रमाणे आपल्याला समजून घ्यावी लागतील. वेदांत दर्शनात मात्र ज्ञानाची सहा प्रमाणे दिलेली आहेत- प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, प्रमाण, अर्थोत्पत्ती, अनुपलब्धी याशिवाय ऐतिह आणि संभाव्य अशी दोन गौण प्रमाणे आहेत. विज्ञान मात्र दोनच प्रमाणे मानते एक म्हणजे प्रत्यक्ष व दुसरे म्हणजे अनुमान. त्यामुळेच आजचे विज्ञान हे एका दृष्टीने अपूर्ण ज्ञान आहे. आपल्याला ओढ असायला हवी ती त्या पूर्ण ज्ञानाची. त्यासाठी त्याच्या कक्षा वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्याप्रमाणे विज्ञानाला मन काय, जीव काय, भावना काय, चैतन्यशक्ती काय, आत्मा काय हे कळलेले नाही पण त्याचा वेध घेण्याचा प्रयत्न होत आहे. पण त्या नेमकेपणाने विषद करून सांगता आलेल्या नाहीत. विज्ञानाच्या कक्षा जशा विस्तारतील व त्यात ज्ञाता, ™ोय व दर्शन या तिन्हींचा समग्र विचार होईल तेव्हा समग्र ज्ञान प्राप्त होईल. त्याचेच एक मोठे पाऊ ल म्हणजे क्वान्टम मेकॅनिक्स. त्यामध्ये ज्ञाता, ™ोय व दर्शनाचा एकत्र विचार अभिजात महत्वाचा हे समजू लागले आहे. आजच्या घडीला नॅनो तंत्रज्ञान, जीवशास्त्र, मानसशास्त्र यांचे ‘कॉन्व्हर्जन्स’ ही त्या बदलांचेच द्योतक आहेत. त्यामुळेच यापुढील काळामध्ये जीव, जगत व ईश्वर यांच्या एकात्मिक अभ्यासाची गरज निर्माण झाली आहे. त्यात उपनिषदे व वेदांचे विचार महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. पाश्चात्य वैज्ञानिकांनी त्याचा अभ्यास केलेला आहे. हेच विचार स्वामी विवेकानंदांनीही मांडले होते. त्यामुळे येत्या काळात विज्ञान व अध्यात्म यांचा संयोग होऊ न मानवाला अंतिम सत्याचे दर्शन होऊ शकेल याविषयी माझ्या मनात तीळमात्र शंका नाही. आपण श्रद्धा हा शब्द वापरतो, श्रद्धा म्हणजेच ‘सत्’चे धारण करणे. विज्ञान व अध्यात्म दोन्ही
याच श्रद्धेतून सत्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून दोन्हींचे अंतिम ध्येय एकच आहे. विज्ञान बहिर्रंगाचा तर अध्यात्म अंतरंगाचा शोध घेते. माझाही हाच प्रयत्न आहे. विज्ञान व अध्यात्म यांचा एकात्मिक अभ्यास करून मानवाच्या कल्याणासाठी वेध घेण्याची माझी धडपड सुरू आहे. त्यासाठी त्या दिशेने तसे संशोधन व्हावे व तसे शिक्षण मिळावे ही माझी इच्छा आहे. याच भूमिकेतून भारत जगाला दिशा देऊ शकेल व विश्वगुरूही बनेल असा माझा विश्वास आहे. अध्यात्म व विज्ञानाच्या संयोगातून आपण नवी शिक्षणपद्धती विकसित केली तर नालंदा, तक्षशिला या जागतिक विद्यापीठांचे गतवैभव आपण परत आणू शकू. मी कोण आहे? या ब्रह्मंडात माझे स्थान काय आहे? मला सुखदु:ख का आहेत? शाश्वत सुख म्हणजे काय?, मृत्यू म्हणजे काय? मृत्यूपश्चात काय होते?, मला पुनर्जन्म आहे का?, सर्व बंधनांतून मी कसा मुक्त होऊ शकेन?, चिरकालीन आनंद कसा प्राप्त होईल? अशा प्रकारचे शिक्षण व ज्ञान विद्यापीठांतून मिळायला हवे. परंतु हे सारे अंधपणाने न होता? विज्ञानाची व प्रमाणबद्धतेची कास धरणे अनिवार्य आहे. माझे संगणकातील पुढील ेसंशोधन महासंगणकाबरोबर ‘पुनर्जन्म घेणारे संगणक’ हेही आहे. अर्धवट ज्ञानातून अनेक विकृती जन्माला येतात. त्यातूनच अंधविश्वास निर्माण होतात व त्याचा समाजात दुरुपयोग केला जातो. धर्माच्या, अध्यात्माच्या नावाखाली त्याचा वापर होतो. विज्ञान व तंत्रज्ञानाचाही किती सर्रास दुरुपयोग केला जातो. याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे स्त्रीभ्रूण हत्या, अनाकरण केल्या जाणार्या शस्त्रक्रिया, अतिरेक्यांच्या हाती असलेले बाँब, हॅकिंग, इ. समाजहीतासाठी त्याचे नियमन व नियंत्रण करणे आवश्यक असते म्हणूनच अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आवश्यक आहे. त्याचवेळी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील धूसर सीमारेषा जाणून घेऊन व्यापक सामाजिक हीत साधण्यासाठी जाणकार, अनुभवी व विवेकी न्यायाधीशांचा त्यावर अंकुशही लागेल. वाईटातून चांगले निघते असे म्हणतात. त्यामुळे प्लँचेट प्रकरणामुळे जो काही गोंधळ उडाला त्यानिमित्ताने अध्यात्म व विज्ञान यांच्या संयोगातून खर्या ज्ञानाचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त व्हावे व त्यादिशेने संशोधन व्हावे हा विचार मला प्रकर्षाने मांडण्याची संधी मिळाली. यासाठी मी पुण्यामध्ये आता एक सेंटर फॉर रिसर्च इन कॉन्शिअसनेस स्थापन करण्याचा संकल्प सोडला आहे. त्यामध्ये अनेक भारतीय व विदेशी वैज्ञानिकांना आवाहन करीत आहे व त्याला उत्तम प्रतिसादही मिळत आहे. अमेरिका, युरोप व रशियामध्ये असे संशोधन केंद्र तयार होत आहे. खरे म्हणजे मला ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये जिला ‘स्वसंवेद्या’ किंवा चैतन्यशक्ती म्हटले आहे. त्या शक्तीला मला विज्ञानातून व अध्यात्मातून शोधायची आहे. हेच माझ्या जीवनाचे पुढील प्रयोजन आहे.
(लेखक महासंगणकनिर्माते आणि ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ आहेत.)