कापडाचा एक तुकडा
By Admin | Updated: August 8, 2015 13:40 IST2015-08-08T13:40:04+5:302015-08-08T13:40:04+5:30
एकीकडे एकेका माणसाकडे कपडय़ांचा महामूर पूर, तर दुसरीकडे थंडीच्या कडाक्यातून ऊब मिळेल एवढी चिंधीही अंगावर मिळणं मुश्कील! - समाजातल्या या विसंगतीचा त्रस होऊन एका तरुणाने एक साधी कल्पना उचलली- ज्यांच्याकडे जुने, जास्तीचे कपडे आहेत, त्यांनी ते ज्यांच्याकडे कपडे नाहीत, त्यांच्यासाठी द्यायचे! पण देणारा उदार दाता नाही, आणि घेणारा लाचार याचक नाही. त्यातून उभ्या राहिलेल्या एका चळवळीची अनोखी कहाणी!

कापडाचा एक तुकडा
एका साध्या संकल्पनेतून सुरू झालेलं ‘गुंज’चं काम आता 21 राज्यांत पसरलं आहे. याच कार्याची दखल घेऊन अंशू गुप्ता यांना सन्मानाचा ‘मॅगसेसे’ पुरस्कार जाहीर झाला. त्यानिमित्ताने..
- समीर मराठे
माझ्या मनावर कायमच्या कोरल्या गेलेल्या त्या दोन घटना.
त्यावेळी मी पत्रकारितेचं शिक्षण घेत होतो. जुन्या दिल्ली भागात कायम जायचो. तिथेच माझी हबीबशी ओळख झाली. हबीब मृतदेह उचलण्याचं काम करायचे. ज्यांना घरदार नाही, अंत्यविधी करण्यासाठीही ज्यांना कुणीच नाही किंवा ‘परिस्थिती’नं ज्यांना अखेरच्या क्षणीही बेवारसच सोडलं आहे, अशांचे मृतदेह उचलण्याचं काम हबीब करायचे.
गार वा:यानं पार गाळपटवणारी, हाडं गोठवणारी डिसेंबरमधली कडाक्याच्या थंडीची ती रात्र मी आयुष्यात विसरू शकणार नाही. हबीबबरोबर मी दिल्लीतल्या खुनी दरवाजा भागात गेलो होतो. तिथे आम्हाला एक डेड बॉडी मिळाली. अंगावर फक्त एक पातळ कॉटनचा शर्ट होता. अंगावर पुरेसे कपडे नसल्यानं, पांघरायला काही नसल्यानं थंडीनंच त्याचा मृत्यू झाला होता, हे स्पष्ट होतं.
दुसरी घटना.
सहा वर्षाची एक चिमुरडी. स्मशानभूमीत एकटीच शोधक नजरेनं फिरत होती. काही मिळतंय का ते पाहत होती. मृतदेहांच्या अंगावरचे, अंत्यविधीच्या वेळी तिथेच टाकलेले कपडे शोधत होती. गोळा करत होती. सहज म्हणून तिला विचारलं,
‘काय करतेहेस तू? मेलेल्या माणसांचे हे कपडे तू का गोळा करते आहेस?.’
- थंडीपासून बचाव करण्यासाठी ती चिमुरडी स्मशानभूमीतून मृतांचे कपडे गोळा करत होती, हे तर खरंच; पण तिच्या पुढच्या शब्दांनी मी अक्षरश: हादरलो. ती म्हणाली,
‘.कडाक्याच्या थंडीत ज्यावेळी माझ्याकडे पांघरायला काहीही नसतं, त्यावेळी इथल्या मेलेल्या लोकांच्याच कुशीत झोपते मी!.’
- माझ्या अंगावर काटा उभा राहिला.
कोणी असं करू शकतं?
अशी परिस्थिती वास्तवात असू शकते?
अंगावर घालायला, पांघरायला कपडे नाहीत म्हणून कोणी मृतदेहाचा ‘ऊर्जा’ म्हणून उपयोग करू शकतो?
स्मशानभूमीतील जळत्या निखा:यांतली एक ‘ठिणगी’ त्याचवेळी माङयाही डोक्यात चमकली. त्या ठिणगीनं मला स्वस्थ बसू दिलं नाही.’’
- अंशू गुप्ता सांगत होते.
अंशू गुप्ता हे ‘गुंज’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ‘वर्क फॉर क्लोथ’ ही एक अनोखी संकल्पना राबवली. एकीकडे एकेका माणसाकडे कपडय़ांचा महामूर पूर, तर दुसरीकडे कपडय़ांअभावी जाणारे मृत्यू.
माणसांच्या आयुष्यातलं कपडय़ाचं महत्त्व त्यांनी जाणलं आणि नको असलेले, पण चांगल्या स्थितीतले कपडे गोळा करून ते वंचितांना वाटायला सुरुवात केली. पण हे करीत असताना त्या गोरगरिबांच्या स्वाभिमानाला धक्का बसणार नाही, त्यांना लाचार वाटणार नाही याचीही त्यांनी काळजी घेतली. ग्रामीण भागातील हजारो बेकार, अर्धबेकार हातांना त्यांनी काम मिळवून दिलं, श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली. लोकसहभागातून जीवनावश्यक असलेली अनेक मोठमोठी कामंही त्यातून उभी राहिली. यामुळे त्यांचं जगणं तर सुसह्य झालंच, पण ताठ मानेनं उभं राहण्याचा त्यांचा हक्कही शाबूत राहिला.
‘हे सारं मी केलंय. मला मिळालेला पैसा, मदत ही दान, दया किंवा भिकेच्या स्वरूपात मला मिळालेली नाही, त्यासाठी मी स्वत: कष्ट घेतले आहेत’ याची जाणीव त्यांनी ग्रामीण भागातील या वंचितांमध्ये रुजवली. याच माध्यमातून गावागावांत पाण्याच्या टाक्या उभ्या राहिल्या, विहिरीतला गाळ काढला गेला, शाळा उभारल्या गेल्या, मुलं शाळेत जायला लागली, गावांत रस्ते बांधले गेले, पावसाळ्यात संपर्क तुटणा:या गावांत पूल बांधले गेल्यानं संवाद आणि दळणवळणाचा मार्ग पुन्हा खुला झाला. असं कितीतरी. ‘वर्क फॉर क्लोथ’ या संकल्पनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची तब्बल 1500 कामं केली जातात. वंचितांना, गरजूंना कपडे दिले जातात, पण त्याबदल्यात त्यांनी काम करणं अपेक्षित असतं. भले मग ते स्वत:च्या किंवा समाजाच्या (पर्यायानं स्वत:च्याच) फायद्याचं असो.
‘फेकून’ दिलेल्या, ‘निरुपयोगी’ एका कापडाच्या तुकडय़ानं अशा अनेक गोष्टी घडवून आणल्या. इतकंच नाही, पारंपरिक अर्थव्यवस्थेतील वस्तुविनिमयासारखी (बार्टर), कुठल्याही प्रकारच्या चलनाशिवाय चालणारी पर्यायी अर्थव्यवस्थाच त्यातून उभी राहिली. ‘श्रम’ आणि ‘वस्तुविनिमय’ ही दोन नवी चलनंच तयार झाली.
या साध्या संकल्पनेतून सुरू झालेलं ‘गुंज’चं काम आता तब्बल 21 राज्यांत पसरलं आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन अंशू गुप्ता यांना सन्मानाचा ‘मॅगसेसे’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
त्याच निमित्तानं अंशू गुप्ता यांच्याशी संपर्क साधला. त्यांचं म्हणणं अगदी साधं आणि स्पष्ट होतं, ‘‘मॅगसेसे पुरस्कार मिळाला म्हणून माङया कामात बदल होणार नाही, कपडय़ांचे आणखी दहा- पंधरा- वीस ट्रक माङयाकडे आले म्हणून गोरगरिबांचा, माझा खूप फायदा होईल असंही नाही, पण आत्मसन्मान टिकवून समाजविकासाला चालना देणारी ही कल्पना जर त्यामुळे लोकांमध्ये रुजली तर मला त्याचा जास्त आनंद होईल. ‘अन्न, वस्त्र, निवारा’ या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत असं आपण अनेकदा सांगतो, बोलतो; पण त्यातल्या ‘वस्त्र’ या मूलभूत गरजेकडे कायम दुर्लक्षच झालं आहे. त्या कपडय़ाला सन्मान देताना आपण त्याकडे अधिक जबाबदारीनं आणि जाणिवेनं पाहिलं पाहिजे.’’
स्मशानभूमीतल्या त्या घटनांनी अंशू गुप्ताचं आयुष्यच पूर्णपणो बदलून गेलं. त्यावेळी ते महाविद्यालयीन शिक्षण घेत होते, पण ‘कपडय़ां’ची ती ‘चिंगारी’ डोक्यात आतल्या आत धुमसत होती.
अंशू गुप्ता यांनी अर्थशास्त्रत एम. ए. केलं आहे, पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी घेतली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर सुरुवातीला त्यांनी मुक्त पत्रकार म्हणून काम केलं, पुढे एका जाहिरात एजन्सीमध्ये ‘कॉपी रायटर’चं, एका पब्लिक सेक्टर कंपनीतही काम केलं, कॉर्पोरेट मॅनेजर म्हणून एका मोठय़ा कंपनीत लठ्ठ पगाराची नोकरीही केली; पण या सर्व काळात त्यांच्या डोक्यातली ‘ठिणगी’ तशीच धगधगत होती. शेवटी 1998 मध्ये त्यांनी नोकरीला पूर्णविराम दिला आणि इतक्या वर्षापासून त्यांना अस्वस्थ करणा:या क्षेत्रत काम करण्यासाठी 1999मध्ये ‘गुंज’ या सेवाभावी संस्थेची स्थापना झाली. हीच होती जुन्या कपडय़ांच्या ‘बार्टर’ इकॉनॉमीची सुरुवात!
अंशू यांची पत्नी मीनाक्षी यांनीही त्यांना साथ देताना बीबीसी साऊथ एशियाची ‘न्यूज पब्लिसिटी हेड’ म्हणून असलेली प्रतिष्ठेची नोकरी सोडली आणि ‘गुंज’च्या कार्यात स्वत:ला झोकून दिलं.
सुरुवात झाली ती फक्त 67 जुन्या कपडय़ांपासून! काम हळूहळू मोठं होतं गेलं. लोक जुळू लागले, व्याप वाढू लागले. पण हे सर्व इतक्या सहज झालं असं नाही.
‘‘कोणतीही गोष्ट माणसं लगेच स्वीकारत नाहीत. आधी त्यांचा विश्वास संपादन करावा लागतो. कितीही अडचणी आल्या तरी धीर सोडून चालत नाही’’ -अंशू गुप्ता सांगत होते, ‘‘सुरुवातीला मलाही लोकांनी- ‘देखो, ये जीन्स पहननेवाला एनजीओवाला, ये क्या काम करेगा’ असं म्हणून हिणवलंच, आत्मविश्वासाला धक्का पोहेचेल, नाउमेद होईल अशाही घटना घडल्याच; पण माझ्या डोक्यातला ‘किडा’ सगळ्यांना पुरून उरला. सामाजिक आणि आर्थिक विषमतेचे बळी ठरलेल्यांसाठी काही करायचं हे डोक्यात पक्कं होतं. त्याला अभ्यास आणि अनुभवाची जोड मिळाली. चुकाही झाल्या, पण त्या लगेच सुधारल्या. सुधारणोची ही प्रक्रिया अजूनही सुरू आहे. पण एक मात्र नक्की, जिद्द असली, ध्येय निश्चित असलं तर अडचणी आपोआपच दूर होतात.’’
कापडाचा एक तुकडा, पण तो किती ‘अर्थपूर्ण’ असतो. तुमच्या आयुष्याचा, सन्मानानं जगण्याचा तो एक भाग असतो याचं खोल भान हे काम सुरू केल्यांनतर अंशू गुप्ता यांना येत गेलं आणि काम वाढत गेलं.
‘वर्क फॉर क्लोथ’शिवाय ‘गुंज’चे अनेक उपक्रम आहेत. अभ्यास आणि अनुभवानंतर आकाराला आलेली त्यांची आणखी एक महत्त्वाकांक्षी संकल्पना म्हणजे ‘नॉट जस्ट अ पिस ऑफ क्लोथ’!
- महिलांच्या मासिक पाळीच्या दरम्यान वापरलं जाणारं साधं कापड किंवा अगदी आधुनिक सॅनिटरी नॅपकिन्स हा अजूनही आपल्याकडे न बोलण्याचाच विषय आहे. ‘बहुतांश ग्रामीण महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स वापरणं परवडतच नाही. आजही देशातल्या निम्म्यापेक्षा अधिक महिला मासिक पाळीच्या काळातल्या रक्तस्त्रवावर नियंत्रण ठेवण्यासाठी गोणपाटाचे तुकडे आणि गायीचं शेण वापरतात’ - असा आपल्या अभ्यासाचा निष्कर्ष अंशू गुप्ता सांगतात, तेव्हा विश्वास ठेवणं कठीण जातं.
आज एकविसाव्या शतकातही या विषयाची नुसती सुरुवात करणंही किती अवघड आणि जटिल आहे हे लक्षात घेऊनच त्यांनी जुन्या टी-शर्ट्सपासून आणि होजिअरी कपडय़ांपासून सॅनिटरी नॅपकिन्स तयार करण्याचा, महिलांना वाटण्याचा ‘नॉट जस्ट अ पिस ऑफ क्लोथ’ हा उपक्रम 2क्क्5 मध्ये सुरू केला. सॅनिटरी नॅपकिन्स बनवायला त्यांनी सुरुवात तर केली, पण पुढे आणखीच मोठा प्रश्न उभा राहिला. ग्रामीण, आदिवासी भागातील अनेक महिलांना अंतर्वस्त्रंची ‘चैन’ परवडतच नाही आणि काही समाजात परंपरेनंच अंतर्वस्त्रं वापरली जात नाहीत. आता अंतर्वस्त्रचं वापरली जात नसतील, तर सॅनिटरी नॅपकिन्सची घडी वापरणार कशी हाही प्रश्न होताच. त्यामुळे सॅनिटरी नॅपकिन्सच्या जोडीला जुन्या, स्वच्छ कपडय़ांपासून महिलांच्या अंतर्वस्त्रंचीही निर्मिती ‘गुंज’मध्ये सुरू झाली.
अंशू गुप्ता सांगतात, ‘‘आम्ही बनवलेल्या सॅनिटरी नॅपकिन्समध्ये महिलांच्या आरोग्याबाबत आवश्यक ती सारी काळजी घेण्यात आलेली होती. पण कमीत कमी खर्चात तयार केलेली ही नॅपकिन्स काही ‘आधुनिक’, फॅशनेबल विंग्ज असणारी नव्हती. त्यामुळे या नॅपकिन्सच्या आधारासाठी दो:यांच्या लूपपासून ते लंगोटीसारख्या कापडार्पयत अनेक प्रयोग आणि ‘जुगाड’ आम्ही केले. शेवटी महिलांची अंतर्वस्त्रेच बनवायचा निर्णय घेतला. आतार्पयत चार कोटी सॅनिटरी नॅपकिन्स आम्ही वाटली आहेत. पण अब्जावधीच्या आपल्या लोकसंख्येत ‘चार कोटी’ची ती काय किंमत?.’’
‘स्कूल टू स्कूल’ हा ‘गुंज’चा आणखी एक अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत नवी-जुनी पुस्तकं, रिसायकल केलेली स्टेशनरी, दप्तरं, खाऊचे डबे, पाणी पिण्यासाठी बाटल्या, वॉटरबॅग्ज. अशा अनेक गोष्टी ग्रामीण भागातील शाळांत पाठविल्या जातात.
अंशू गुप्ता सांगतात, शहरी भागातील एखादा मुलगा जेव्हा त्याच्या स्कूलबॅगवरील काटरून आता ‘जुनं’ झालं किंवा ते तितकंसं फॅशनेबल, आकर्षक राहिलं नाही, म्हणून आपली स्कूलबॅग फेकून दुसरी घेतो, त्याचवेळी, तीच ‘फेकलेली’ (पण चांगली असलेली) स्कूलबॅग ग्रामीण भागातील अनेक मुलांना स्वत:हून शाळेच्या दरवाजार्पयत चालत जायला उद्युक्त करू शकते; शिवाय ग्रामीण भागातील अनेक पालकांसाठी शाळेच्या दप्तराचा वाचलेला छोटा खर्चही त्यांच्यासाठी मोठा ‘हातभार’ ठरू शकतो. ग्रामीण भागातील अनेकांसांठी हा साधा खर्चही त्यांची ‘क्रयशक्ती’ वाढवतो आणि सामाजिक, परिसर बदलासाठीचा तो एक बिनखर्चिक उपाय ठरू शकतो!
जुन्यातून नव्याचा ‘जुगाड’
- ‘गुंज’तर्फे दरवर्षी सुमारे एक हजार टन कापडावर पुनप्र्रक्रिया केली जाते.
- फेकल्या’ जाणा:या सुमारे 5क् लाख किलो जुन्या कपडय़ांपासून चटया, गोधडय़ांपासून ते स्कूल बॅग्जर्पयत अनेक उपयोगी गोष्टी तयार केल्या जातात.
- जे कपडे कधीच उपयोगात येऊ शकणार नाहीत, फाटलेले आहेत, पण ज्या कापडाचा दर्जा चांगला आहे, उदाहरणार्थ. कॉटन सुट्स, बेडशिट्स, ब्लाऊज, पेटिकोट. इत्यादिंपासून सॅनिटरी नॅपकिन्स बनवले जातात. जीन्स आणि इतर पॅण्ट्सपासून शाळेची दप्तरं बनवली जातात.
- साडय़ांपासून विद्याथ्र्याना बसण्यासाठी, योगासनांसाठी मॅट, ओढण्यांपासून नाडय़ा तयार केल्या जातात.
- लहान मुलांचे रंगीबेरंगी कपडे आणि लेडिज सुट्सच्या पुढील भागापासून शाळेची आकर्षक दप्तरं तयार होतात.
- जुने टी-शर्ट आणि होजिअरी कपडय़ांपासून महिलांची अंतर्वस्त्रे तयार होतात. जुन्या बेडशिट्स, टॉवेल्स, सोफा कव्हर्सपासून नव्या बॅगा तयार होतात.
- जुन्या पाश्चात्त्य धाटणीच्या कपडय़ांचा उपयोग निरनिराळ्या उत्पादनांत आकर्षक रंगसंगती आणि डिझाइनसाठी होतो.
- जे कपडे मोठय़ा आकाराचे आहेत, ज्यांचा ग्रामीण लोकांसाठी काहीही उपयोग नाही, अशा कपडय़ांचे तुकडे करून निरनिराळ्या उत्पादनांसाठी वापरले जातात.
- जिन्स आणि पॅण्टचं रूपांतर हाफ पॅण्टमध्ये होतं. उरलेला भाग पुन्हा शाळेच्या दप्तरांसाठी वापरात आणला जातो.
- पुनर्वापर करण्यापूर्वी अगोदर जुन्या कपडय़ांच्या चेन आणि बटणं काढून घेऊन वेगवेगळ्या कामांसाठी, तसंच डिझाइन म्हणून त्यांचा वापर केला जातो.
- अगदी उरलेल्या चिंध्यांचाही वापर मॅट आणि लहान मुलांच्या आसनांसाठी केला जातो.
‘तू कधीच चालू शकणार नाहीस!.’
कॉलेजला असताना अंशू गुप्ता यांना एक जीवघेणा अपघात झाला होता. वर्षभर त्यांना हॉस्पिटलात राहावं लागलं. अंशू गुप्ता सांगतात, ‘कदाचित मी आयुष्यात कधीच चालू शकलो नसतो. या प्रसंगानं मी खूप अंतर्मुख झालो. डेहराडूनच्या ज्या शासकीय रुग्णालयात माङयावर उपचार सुरू होते, तेथील डॉक्टरांना लाच देण्यास वडिलांनी लाच देण्यास स्पष्ट नकार दिल्यानं डॉक्टरांनी उपचारात जाणूनबुजून निष्काळजीपणा केला.
वेदनांच्या अनुभूतीशिवाय आजही मला खूप वेळ उभं राहता येत नाही’ असं सांगताना अंशू गुप्ता म्हणतात, ‘त्या दिवसापासून ‘लाच’ माझ्या डोक्यात बसली आणि ‘मी कधीच चालू शकणार नाही’ हे डॉक्टरांचं भाकित खोटं ठरवण्याचाही मी चंग बांधला.’
अंशू गुप्ता यांना वेदनारहित उभं राहता येत नाही, हे ‘सांगितल्या’शिवाय त्यामुळेच लक्षात येत नाही.