भौतिक जगातील हिरा

By Admin | Updated: December 27, 2014 18:50 IST2014-12-27T18:50:26+5:302014-12-27T18:50:26+5:30

वयाच्या ८७ व्या वर्षापर्यंत शास्त्रज्ञ म्हणून झपाटून काम करणारे एक व्यक्तिमत्त्व म्हणजे भालचंद्र उदगावकर. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर डॉ. होमी भाभांना सापडलेला हा हिरा. भौतिकशास्त्रामध्ये बहुमोल काम करणार्‍या या शास्त्रज्ञाचे नुकतेच निधन झाले. त्यांच्याविषयी.

The physical world's diamond | भौतिक जगातील हिरा

भौतिक जगातील हिरा

विनय र. र.

वयाच्या ८७ व्या वर्षापर्यंत शास्त्रज्ञ म्हणून झपाटून काम करणारे एक व्यक्तिमत्त्व म्हणजे भालचंद्र उदगावकर. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर डॉ. होमी भाभांना सापडलेला हा हिरा. भौतिकशास्त्रामध्ये बहुमोल काम करणार्‍या या शास्त्रज्ञाचे नुकतेच निधन झाले. त्यांच्याविषयी.
--------------
स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरू यांनी वैज्ञानिक कार्यासाठी संशोधनसंस्था बांधायला प्रोत्साहन दिले. त्याला अनेक मान्यवर वैज्ञानिकांनी साथ दिली. त्या वेळी डॉ. होमी भाभा यांना एक हिरा सापडला. त्यांचे नाव डॉ. भालचंद्र माधव उदगावकर. १९४५ मध्येच टाटांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च-मूलभूत संशोधन संस्था स्थापन केली होती. १९४८ मध्ये भारत सरकारने अणुऊर्जा आयोग स्थापन केला. यामध्ये काम करण्यासाठी प्रखर बुद्धिमत्ता आणि संशोधकवृत्ती असणार्‍यांचा शोध चालू होता. त्या वेळी नुकताच एम. एस्सी. उत्तीर्ण झालेला विशीतला एक तरुण डॉ. होमी भाभा यांनी तावून सुलाखून निवडला तो म्हणजे उदगावकर. 
डॉ. उदगावकरांचे मूलभूत संशोधन अणू आणि अणूपेक्षाही लहान असणारे कण, त्यांची रचना, त्यांची प्रभावक्षेत्रे यामध्ये झाले. डॉ. उदगावकरांचे संशोधन देशाबरोबर परदेशातही नावाजले. देशोदेशीच्या संशोधकांना संशोधनाबद्दल आपसात देवाणघेवाण करण्यासाठी अनेक संधी दरम्यानच्या काळात खुल्या झाल्या होत्या. त्याचा डॉ. उदगावकरांनी भरपूर फायदा करून घेतला. कणभौतिकातील समजायला अवघड वाटणार्‍या कल्पना आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या सत्रांमधून, परिसंवादांमधून समजून देण्याबाबत डॉ. उदगावकरांची वाहवा होत असे. अतिऊर्जायुक्त कणांचा वापर अणुऊर्जामुक्त करण्यासाठी होत असे, त्यामुळे त्याच्याकडे नवी ऊर्जा म्हणून सर्वच जगाचे लक्ष होते. इतक्या वरच्या पातळीवर डॉ. उदगावकर आपला ठसा उमटवत होते.
डॉ. उदगावकरांनी टाटा इन्स्टिट्यूटमध्ये दर आठवड्याचा एक अभ्यास वर्ग सुरू केला. साप्ताहिक अभ्यासवर्गांना मिळणारा प्रतिसाद वाढवण्यासाठी डॉ. उदगावकरांनी एक वेगळा प्रयत्न करायचे ठरवले. वेगवेगळ्या महाविद्यालयांतून राष्ट्रीय पातळीवर प्रशालाची शिष्यवृत्ती मिळवलेल्या विद्यार्थ्यांना आधुनिक विज्ञानाची माहिती करून देण्याचा घाट त्यांनी घातला. प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा अभ्यासवर्ग चालवण्याच्या या प्रकारात अनेक विद्यार्थी समाविष्ट झाले. त्यापैकी कित्येक पुढे निष्णात वैज्ञानिक झाले. विज्ञान संशोधन संस्थाचे प्रमुखही झाले. असाच आणखी एक प्रयोग म्हणजे व्हिजिटिंग स्टुडंट्स रिसर्च प्रोग्रॅम या नावाने सुरू झालेला उन्हाळी उपक्रम गेली चाळीस वर्षे अजूनही चालू आहे.  विद्यापीठांचे काम केवळ परीक्षा घेणे नाही, तर आधुनिक संशोधनाला वाव देणे, प्रेरणा देणे हेही आहे, असे ते सतत मांडत. विद्यापीठ अनुदानाच्या रचनेत संशोधन करणार्‍यांना अधिक वाटा देऊन त्यांनी विद्यापीठांचा दृष्टिकोन बदलण्यास पुढाकार घेतला. विद्यापीठे, संशोधन संस्था आणि औद्योगिक रचना, उद्योगपती यांची सांगड घालण्याचे कार्य महत्त्वाचे आहे, हे डॉ. उदगावकरांनी जाणले. भाभा अणुसंशोधन केंद्र, टाटा इन्स्टिट्यूट यांच्याच जोडीने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अँस्ट्रोफिजिक्स, इंटरनॅशनल फिजिक्स, ऑलिंपियाड, सॅटेलाईट इन्स्ट्क्शनल टेलिव्हिजन एक्स्पेरिमेंट असे अनेक उपक्रम त्यांच्या प्रेरणेने सुरू झाले.
मुंबई महापालिकेच्या शाळांमधल्या मुलांना प्रयोगातून विज्ञान कसे शिकवता येईल. याबाबतची शालेय पुस्तकेही त्यांनी केली.  मध्यप्रदेशमध्ये होशंगाबाद येथे ‘किशोर भारती’च्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या मुलामुलींनाही प्रत्यक्ष अनुभवातून विज्ञान कसे शिकता येईल, याचे सफल प्रयोग झाले. ज्या-ज्या ठिकाणी त्यांना दिसले, जाणवले त्या -त्या ठिकाणी झपाटल्यासारखे जाऊन डॉ. उदगावकरांनी काम केले. एकाच वेळेला शालेय पातळीवरील विद्यार्थ्यांपासून अतिविशेष पातळीवर रिअँक्टर फिजिक्समध्ये संशोधन करणार्‍या व्यक्तीलाही विज्ञानाची आवड लावू शकेल, अशा प्रेरणा डॉ. उदगावकरांनी दिल्या आहेत. मराठी विज्ञान परिषदेसारख्या मुक्तपणे विज्ञान प्रसार करणार्‍या संस्थेचे डॉ. उदगावकर अध्यक्ष होते. विज्ञानाचा अभ्यास केवळ शाळा-कॉलेजमध्ये नाही, तर सर्व समाजात होण्याचे त्यांचे स्वप्न होते. विज्ञानातून संस्कृती निर्माण करण्यासाठी झपाटलेल्या या व्यक्तिमत्त्वाची अखेर  झाली असेल, पण तो झपाटा समाजात अजूनही घोंगावत आहे.
(लेखक मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाचे कार्याध्यक्ष आहेत.)
 

Web Title: The physical world's diamond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.