पु. ल. देशपांडे जयंती विशेषः तुम्ही अमेरिकन आहात, युरोपियन की आखाती?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2020 06:00 AM2020-11-15T06:00:00+5:302020-11-15T06:00:02+5:30

तुम्ही अमेरिकन आहात, युरोपियन की आखाती ?

P L Deshpande Jayanti which NRI you are American European or Gulf | पु. ल. देशपांडे जयंती विशेषः तुम्ही अमेरिकन आहात, युरोपियन की आखाती?

पु. ल. देशपांडे जयंती विशेषः तुम्ही अमेरिकन आहात, युरोपियन की आखाती?

Next

- सुचित कुलकर्णी 

प्रस्तावना : हा लेख पुलंच्या 'मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर' वर आधारित आहे. पुलंनी आजच्या आधुनिक युगात तो लेख लिहायला घेतला असता तर त्यांनी कदाचित आंतरराष्ट्रीय स्तरावर असंच काहीसं लिहिलं असतं. लहान मुलांच्या चित्र रंगवण्याच्या वहीमध्ये जसे बाजूच्या पृष्ठावरील रंगीत चित्रासारखेच रंग एका आधीच आखून दिलेल्या चित्रात मुलांना भरून दाखवायचे असतात तसाच माझा हा प्रयत्न.

ग्लोकलायझेशन (ग्लोबलायझेशन २.०) झाल्यापासून विभक्तपणाची जाणीव जास्त वाढायला लागली. आणि एकेकाळी मी नुसताच NRI आहे म्हणून जे भागत असे, ती सोय राहिली नाही. NRI म्हणजे युरोपियन, अमेरिकन, की मध्य-पूर्व आशियाई (आखाती), असा प्रश्न यायला लागला. त्यामुळे Overseas Indian Citizens आणि NRIs पुढे स्वपरिचयाचा एक नवाच क्रायसिस निर्माण झाला. NRIs मध्ये केवळ NRI म्हणून ओळखलं जाणं हे न ओळखण्यासारखंच आहे, स्वतः स्वतःलाही. NRIs मध्ये खास व्यक्तिमत्व म्हणजे तीन: ती म्हणजे अमेरिकन, युरोपियन, किंवा आखाती. तसे जगात अनेक देश आणि परकीय प्रांत आहेत, पण ज्यांच्यापुढे कर जोडावेत अशी ही तीनच खास स्थळं, युरोप, आखाती मध्य-पूर्व आशिया, आणि अमेरिका.

अमेरिकन 

आता तुम्हाला अमेरिकन व्हायचंय का ? अमेरिकन व्हायचं असेल, तर प्रथम तुम्हाला अमेरिकेत जन्माला येणं अत्यंत आवश्यक आहे. कारण तुमच्या व्हिसाचा प्रश्न हा तुमच्या जन्मदात्यानेच सोडवायला हवा. एरव्ही मामला बिकट आहे. साधा ट्रान्सीट व्हिसादेखील आता लॉटरी-पद्धतीने प्रदान करतात. त्यापेक्षा तुम्ही जिथे असाल त्या देशी सुखी रहा.  आयुष्यात सगळ्याच महत्वाकांक्षा काही पुऱ्या होत नाहीत. आता अमेरिकेतल्या पुएर्तो रिको अगर हवाई मध्ये दूरच्या नात्यातली असलेली एखादी मावशी किंवा एखादी आत्या जर तुम्हाला दत्तक घेत असेल तर पहा. दुसऱ्यांदा जन्माला येण्याचा हाच एक सोपा उपाय आहे. किंवा मग घरजावई व्हा. घरजावई ह्याचा अमेरिकेतला अर्थ ज्याला मुलीबरोबर व्हिसाही द्यावा लागतो असा आहे. पर्मनंट व्हिसा किंवा नागरिकत्व असेल, तर मात्र अमेरिकन होण्यासारखं सुख नाही, तुम्हाला सांगतो.

अमेरिकेच्या राजकीय दादागिरीबद्दल तक्रार अमेरिकन लोकांपेक्षा इतरच जास्त करत असतात. अमेरिकेतील अर्थव्यवस्था, कौटुंबिक मूल्य, फास्ट फूड, जातीयवाद असल्या गोष्टींना कुणीही कितीही नावं ठेवली तरी त्याला ती खुशाल ठेऊ द्यावीत. कारण अमेरिकेत समाजव्यवस्था आणि अर्थव्यवस्थेचा अभिमान बाळगलाच पाहिजे अशी काही अट नाही आहे. म्हणजे अमेरिकन व्हायला ही अट लागतच नाही. ती युरोपला. तिथे अभिमान पाहिजे. उलट अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला कुणी एक भिकार म्हणत असेल, तर आपण खुशाल सात भिकार असं सांगून मोकळं व्हावं. नव्या येऊ पाहणाऱ्या इमिग्रंटना चुकवायला हे धोरण अतिशय उपयुक्त पडतं. कारण अमेरिकेत येऊ पाहणाऱ्या इमिग्रंटना चुकवणे हे धोरण गनिमी काव्याने चालू ठेवावं लागतं. अमेरिकेत बारमहा बँकरप्सी घडत असतात, तसंच आर्थिक मंदी, मास-शूटिंग हे सुद्धा घडत असतात. प्रत्येक कंपनीला दर काही वर्षांआड आपआपली बँकरप्सी फाईल करून दाखवावीच लागते, त्याला ते तरी काय करणार? तेव्हा नवे इमिग्रंटस येणार असले तर त्यांना येऊ नका असं कळवू नका, "अवश्य यावे, फक्त येताना कमीतकमी दहा हजार डॉलर्स रोख आणि एक मिलियन डॉलर्सची आरोग्य-विमा पॉलिसी घेऊन यावे. गेल्या आठवड्यात वीस हजार चारशे बँकरप्सी झाल्या, पण त्याचे विशेष नाही. बेरोजगारी पुन्हा वाढत आहे, तरी अवश्य यावे. चिरंजीव बाळकुशास आशीर्वाद", हेही त्याच्यामध्ये घालून ठेवावे. इतकं असून सुद्धा काही चिवट इमिग्रंट नक्की करतात येण्याचं. त्यांना विमानतळावरून उतरून घेण्यास येत आहोत, असं सांगून आणायला जाऊ नये. एअर-लाईन कंपनीला फोन करून त्यांची पुढील ब्यान्करप्सी फायलींग किती तारखेला आहे हे विचारावं, आणि त्या दिवशी बोलवावं. इमिग्रंट जर प्रथमच येणार असले, आणि आपण ऍरिझोनामध्ये राहत असलो, तरी त्यांना शिकागोला उतरणे सोयीचे पडेल असं कळवून मोकळं व्हावं. अमेरिकेत एकमेव धोका म्हणजे येऊ पाहण्याऱ्या इमिग्रंटचा. एरवी अमेरिकेसारखा देश नाही पहा. अमेरिकन व्हायचं असेल तर तुमचं इम्मीग्रेशन स्टेटस वर्षानुवर्षे तुमच्या एम्प्लॉयरच्या किंवा व्हिसा-स्पॉन्सरच्या अधीन ठेवावं लागतं; मात्र व्यक्तिस्वातंत्र्यावर बोट दाखवू नये! अस्सल अमेरिकन फक्त व्यक्तिस्वातंत्र्यालाच मूलाधार मानतो.

अमेरिकेत तुम्ही एकदा जन्माला आलात, की तुम्ही अमेरिकन होतच जाता. किंबहुना तुम्हाला दुसरं काही होताच येत नाही. पण बाहेरून येऊन अमेरिकन व्हायचं असेल, तर पहिली गोष्ट म्हणजे अमेरिकेमध्ये भूतकाळाला काहीही किंमत नाही हे ध्यानात ठेवा. अमेरिकेत जसे डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन हे दोनच राजकीय पक्ष, तसे काळही दोनच, वर्तमान आणि भविष्य. अमेरिकेला बिचारीला भूतकाळ वगैरे काही नाहीच आहे. तिला फक्त आज आणि उद्या. अमेरिकनांना दुसऱ्या महायुद्धात मित्र-राष्ट्रे कोणती होती त्यापेक्षा बर्गर किती त्वरित आणि स्वस्तात मिळू शकेल ह्याची माहिती अधिक महत्वाची. एक-एका डॉलरप्रमाणे एक-एक सेन्टही मोलाचे असतात हे अमेरिकेत राहिल्याशिवाय कळत नाही. कारण आर्थिक अनिश्चितता अमेरिकनांच्या नशिबाला बांधलेली असते. पण अमेरिकेत अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेबद्दल आणि समाजव्यवस्थेबद्दल अभिमान असणे हे काहीही सक्तीचं नाही.  हा ऐच्छिक विषय आहे. युरोपात मात्र सांस्कृतिक मूल्ये हे सक्तीचं आहे. आर्थिक स्थिती आणि व्हिसाच्या अनिश्चिततेशी जुळवलं आणि ग्रीन-कार्ड किंवा नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी दशकानुदशके शांत चित्ताने वाट पाहण्याची योगसाधना तुम्ही केलीत की माणूस अमेरिकन झालाच.

अमेरिकेला युरोपसारखा इतिहास नसेल, पण खऱ्या अमेरिकनांचं भूतकाळाविषयीचं प्रेम फक्त एकाच बाबतीत उफाळून येतं, ते म्हणजे शेयर-बाजार ! कारण अमेरिकेत पैसे हे एकच मनोरंजन मानलं जातं. इतर देशात गुंतवणूक विश्वासार्ह गोष्टींत विश्वासार्ह सल्लागाराच्या मदतीने वगैरे केली जाते. पण अमेरिकेत कुणीही सोम्यागोम्या उठता-बसता गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ आखीत असतो. शिवाय गुंतवणूक करायला किंवा समजायला तुमच्याकडे पैसे असलेच पाहिजेत, किंवा अर्थव्यवस्थानपन अथवा वित्तव्यवस्थानपन समजले पाहिजे, अशी अट वगैरे काही नाही. ही समजूत अगदी चुकीची आहे. शेयर-बाजार आणि अर्थव्यवस्था हा मुख्यतः गुंतवणुकीचा नसून बोलण्याचा विषय आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. इथे मात्र अर्थव्यवस्थेच्या इतिहासामध्ये तयार असणं अतिशय आवश्यक आहे. अस्सल अमेरिकन "अहो, ती स्टालिनग्राडची लढाई म्हणतात ती डेन्मार्कमध्ये कुठेशी झाली हो?" हा प्रश्न विचारून एखाद्या अस्सल यूरोपिअनला फेफरं आणील. पण त्याला शेयर-बाजाराचा इतिहास विचारा. एखाद्या युरोपियन-ने सॉक्रेटिस, लिओनार्डो डा विंची, न्यूटन वगैरे नावं फेकावीत नं , तसे मिस्सीसिप्पी फुगवटा, कॅलिफोर्नियातील सोन्यासाठी झालेली झुंबड, १९२९ ची जागतिक महामंदी, १९७० च्या दशकातले तेल संकट, इथपासून नावं फेकत फेकत डॉट-कॉम फुगवटा, ते अगदी अलीकडील २००८ ची मंदी इथपर्यंत हा हा म्हणता सगळे अमेरिकन येऊन पोहोचतात. तेव्हा अमेरिकन व्हायचं असेल तर "हरहर तो वसाहतवाद गेला आणि युरोप-वर्चस्व गेले" ह्या थाटामध्ये "हरहर ते ब्रेटन वूड्स झाले आणि आर्थिक घडी खल्लास झाली" हे वाक्य म्हणावं  लागेल.

अस्सल अमेरिकन आणि इमिग्रंटसचा खरा ऋणानुबंध होता. कारण अमेरिकेवर ब्रिटिश, फ्रेंच, किंवा स्पॅनिश कुणा एकट्यांचं राज्य नव्हतं. एकतर अमेरिकाच नव्हती. ती अमेरिका झाली युरोपियन वसाहतवादी आणि इमिग्रंटस आल्यानंतर. त्यामुळे, अमेरिकेचे पहिले आणि अखेरचे राजे हे इमिग्रण्टसच. अमेरिकेबाहेरचे लोक उगीचच इमिग्रंटसची प्रतिमा अमेरिकेत बिघडवतात. अस्सल अमेरिकनाला युरोपातून येऊ घातलेल्या स्थायिकांचे आधुनिक इतिहासातील लोंढे आठवून असं भडभडून येतं "काय इम्मीग्रेशन होतं". अमेरिका ही बाहेरून येऊन अमेरिकन होणाऱ्यांचीच. बाहेरून येऊन ग्रीन-कार्ड न मिळाल्याने किंवा व्हिसाची मुदत न वाढल्याने परत जाणाऱ्यांनी अमेरिकेची इंग्रजी भाषा बिघडवली. अहो, सॉकर म्हणायच्याऐवजी फुटबॉल म्हणायला लागले!? तात्पर्य, मध्ययुग संपलं, वसाहती गेल्या तरी युरोपचं यूरोपपण सुटलं नाही पण  गोल्ड-स्टॅंडर्ड संपलं आणि अस्सल अमेरिकन अगदी हळहळला. "साली, निदान साली ती न्यू यॉर्क च्या फेडरल रिझर्व्हची तरी गोल्ड-स्टॅंडर्ड ठेवायला पाहिजे होती" ह्या  उद्गारामागचा जो काही कळवळा आहे नं, तो नव्या अमेरिकनांना कळणार नाही.

युरोपियन

आता तुम्हाला युरोपियन व्हायचंय का ? जरूर व्हा, आमचं काहीही म्हणणं नाही. पण मुख्य सल्ला असा की पुन्हा विचार करा. अगदी आग्रहच असेल तर मात्र कंबर कसून तयारी केली पाहिजे. आणि एकदा तयारी झाली की मग त्यासारखी मजा नाही, तुम्हाला सांगतो.

पहिली गोष्ट म्हणजे कसलाही न्यूनगंड बाळगू नका. आणि प्रत्येक बाबतीत इतर यूरोपिअन देशांची उणीदुणी काढायला शिका. म्हणजे आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकूण कर्तृत्व काय, याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं. म्हणजे आता "चंद्रावर खाणकाम करण्याचा यूरोपातील क्ष देशाचा मार्ग अव्यवहार्य कसा ?" या विषयावरती आपण स्वतः प्राग महानगरपालिकेत कीटक-नियंत्रण विभागात नोकरीला आहोत हे विसरून मत ठणकावता आला पाहिजे. चंद्रावरील खाणकाम, ठोका!

दिवसातून एकदा तरी "च्, च्, पूर्वीचा युरोप राहिला नाही, पूर्वीचा युरोप राहिला नाही" हे म्हणायलाच पाहिजे. हे वाक्य म्हणायला वयाची अट नाही. इथे म्हणजे दहा वर्षांचा मुलगासुद्धा चाळीशीच्या अनुभवाचं गाठोडं असल्यासारखा ते चारचौघांपुढे उघडत असतो. त्यामुळे "च्यायला, आमच्या वेळी हे असलं नव्हतं" हे वाक्य कॉलेज, कचेरी, चर्च, पेन्शनर कट्टा, मंडई ... आणि शिशुविहार ... कुठेही ऐकायला मिळेल, "आमच्यावेळी असलं नव्हतं!"

इंग्रजी भाषेच्या अनेक बोली आहेत. त्यात शुद्ध इंग्रजी नावाची एक ब्रिटिश बोली आहे. आता ह्या बोलीमध्ये व्यासपीठावरची इंग्रजी, घरातली इंग्रजी, दुकानदाराची इंग्रजी ह्यातला फरक नीट समजावून घेतला पाहिजे. आता खासगी युरोपियन बोली भाषा आणि जाहीर बोली भाषा ह्यातल्या फरकाचं एक उदाहरण पहा. अशी कल्पना करा की कुणी एक फ्रान्सचे प्राध्यापक एर्मेस हे जर्मनीच्या प्राध्यापक श्मिड्टबद्दल स्वतःच्या घरी बोलतायत, "बोंबला! ह्या श्मिड्टचा सत्कार! च्यायला, श्मिड्टचा सत्कार म्हणजे कमाल झाली. वास्तविक जोड्याने मारायला हवा याला. ओडिसीचे भाषांतर म्हणे! ओडिसीचा बट्ट्याबोळ! आणि ह्याना च्यायला सरकारी अनुदानं, पन्नास पन्नास हजार यूरो!" युरोपियन इंग्रजीमध्ये संताप व्यक्त करायला दुसऱ्याला मिळालेले पैसे हा एक भाषिक वैशिष्ठ्याचा नमुना मानावा लागेल. "ओढा! ओढा लेको पैसे! करा चैन! खा, रोज वॉफल खा, वाईन ढोसा!" अगदी चैनीची परमावधी यूरोपमध्ये इथेच संपते, वॉफल, वाईन वगैरे. "अहो! अहो, चक्क वीस-वीस युरो मिळवले!" हे वाक्य वीस-वीस हजार युरो मिळवले अशा ऐटीत उच्चारावं. "आणि ह्यांचा म्हणे सत्कार करा! ह्यांना सन्मानचिन्हे द्या!" युरोपियन बोलीत कोणत्याही सर्वसाधारण बक्षीसाला सन्मानचिन्ह म्हणतात आणि पायपुसण्याला गालिचा.

आता ह्याच खासगी युरोपियन बोलीचं जाहीर बोली भाषेतील रूपांतर पहा. हाच फ्रान्सचा प्राध्यापक एर्मेस, ह्याच जर्मनीच्या प्राध्यापक श्मिड्टचा सत्कार. "गुरुवर्य श्मिड्टचा सत्कार म्हणजे साक्षात विद्वत्तेच्या सूर्याचा सत्कार! मित्रहो, आजचा दिवस यूरोपच्या सांस्कृतिक इतिहासात सुवर्णाक्षराने लिहून ठेवण्यासारखा आहे. हे माझे गुरु ... म्हणजे मी त्यांना गुरूच मानत आलो आहे, ते मला शिष्य मानतात कि नाही मला ठाऊक नाही." इथे हशा. सार्वजनिक युरोपियन बोलीत व्यासपीठावरच्या वक्त्याने तिसऱ्या वाक्याला हशा मिळवला नाही तर त्याला फाऊल धरतात. तेव्हा होतकरू यूरोपियनांनी जाहीर युरोपियन बोलीचा अभ्यास करताना हे नीट लक्षात ठेवलं पाहिजे. "आता, एका परीने तसा मी त्यांचा शिष्यच आहे - कारण, ते कौन्सिल-च्या (community school) शाळेत शिक्षक असताना मी पहिल्या इयत्तेत त्यांचा विद्यार्थी होतो." म्हणजे प्राध्यापक श्मिड्ट हा एके काळी कौन्सिल-च्या शाळेत मास्तर होता, हे जाता जाता ध्वनित करून जायचं. "त्यांचे तीर्थरूप सरदार ओ'ब्रायन ह्यांच्या वाड्यातील आहार-विभागात सेवक होते." म्हणजे तिकडे वाड्यावर स्वयंपाकी होते, हे सांगून मोकळे व्हायचं. "असो! अत्यंत दारिद्र्यात बालपण घालवल्यानंतर आता बेलग्रेव्हिया मधल्या आपल्या प्रशस्त घरात राहताना प्राध्यापक श्मिड्टना किती धन्यता वाटत असेल!" म्हणजे विद्वत्तेच्या नावावर पैसा कसा ओढला बघा, हे आलं त्याच्यामध्ये. "प्राध्यापक श्मिड्ट आणि जर्मनीचे शिक्षणमंत्री एकाच शाळेत शिकत असल्यापासनूचे स्नेही आहेत."- म्हणजे वशिला कसा लागला ! सार्वजनिक युरोपियन व्हायचं असेल, तर जाहीर युरोपियन इंग्रजीचा खूप बारकाईने अभ्यास करावा लागेल.

दैनंदिन व्यावहारिक युरोपियन इंग्रजी बोलीलादेखील अनेक पैलू आहेत. त्यामुळे रोजच्या व्यवहारातदेखील ही बोली वापरताना वाक्यरचनेकडे नीट लक्ष द्यायला हवे. आता हेच बघा ना, टेलीफोन रिसीव्हर उचलल्यानंतर, "हेलो, हेलो", असं म्हणावं हा जगाने मान्य केलेला शिष्टाचार आहे ना? पण युरोपियन इंग्रजीत, "हेलो" याच्याऎवजी दुपारच्या झोपेतून जागे केल्यावर आवाजाला जो एक नैसर्गिक तुसडेपणा येत असतो तो आणून "हेलो" म्हणण्याऐवजी "कोण आहे ?" असं वसकन ओरडायचं. म्हणजे टेलीफोन करण्याप्रमाणे ऐकणाऱ्यालादेखील पैसे पडले असते, तर माणसू जसा वैतागला असता, तसं वैतागायचं. मग तिकडून विचारतो कोणीतरी, "अहो, जरा प्लीज विल्सनचं एक्स्टेंशन देता का?" असं विचारलं रे विचारलं की यूरोपबाहेरचे तुम्ही आहात हे युरोपियन पोरदेखील ओळखेल. त्याच्याऐवजी, "विल्सनचं एक्स्टेंशन द्या" असा इथून हुकूम सोडायचा. मग पलीकडून आवाज येतो, "अहो इथे दहा विल्सन आहेत! त्यातला कुठला हवाय?" "तो कितवा तो मला काय ठाऊक! NHS मध्ये जाऊन झोपा काढतो त्याचं एक्स्टेंशन द्या !!" मग आपला कॉल ट्रान्सफर व्हायच्या आधी तिकडून आवाज ऐकू येतो, "अरे जॉनी, इथे तुझ्यासाठी फोनवर कोणीतरी पेटलाय रे! च्यायला, ह्या जॉनीचे दिवसाला शंभर फोन." हे सुद्धा आपल्याला ऐकू येतं.

युरोपियन व्हायला कसल्यातरी गोष्टीचा जाज्वल्य अभिमान हवा - नुसता नाही, जाज्वल्य अभिमान. तो नेपोलियन किंवा चर्चिलचाच असला पाहिजे, असं मुळीच नाही आहे. म्हणजे संडे मासला (Sunday mass) आपली गाडी कुठे पार्क असावी इथपासून ते गावातली क्राफ्ट बिअर ह्यापर्यंत कुठल्याही गोष्टीचा असेल तरी चालेल; पण जाज्वल्य अभिमान हवा. इतरांची उणीदुणी काढायला आणि मतभेद व्यक्त करायला ह्या जाज्वल्य अभिमानाची फार मदत होते. म्हणजे VE-day (दुसऱ्या महायुद्धाचा यूरोपमधील विजय दिवस) च्या दिवशी अहिंसेबद्दलचा जाज्वल्य अभिमान, क्रिकेटच्या टेस्टच्या वेळी टेनिसविषयीचा जाज्वल्य अभिमान, अशी त्या त्या अभिमानाची वाटणी करता येते. आपला मतभेद केवळ खासगीमध्ये व्यक्त करून युरोपचे संपूर्ण नागरिकत्व मिळत नाही. अधून-मधून वाचकांच्या पत्रव्यवहारामध्ये एक पत्र पाठवावे लागते. त्यासाठी पत्रलेखनाची एक स्वतंत्र शैली कमवायची हे अत्यंत आवश्यक आहे.

अशा रितीने युरोपियन होण्यातल्या प्रथमा, द्वितीया वगैरे परीक्षा उत्तीर्ण होत होत सार्वजनिक युरोपियन होण्याची पहिली पायरी म्हणजे कुठल्यातरी संस्थेच्या कार्यकारी मंडळामध्ये शिरायची धडपड सुरु ठेवायची. उगीचच काहीतरी 'किंग जॉर्ज पंचम यांचे शुद्धलेखन' किंवा 'ऑलिव्ह-वरील कीड' असल्या फालतू व्याख्यानांना जाऊनसुद्धा हजेरी लावायची, आणि व्याख्यानानंतर त्या व्याख्यात्याला भेटून "अं ... या विषयावर एकदा आपल्याशी चर्चा करायची आहे" असं चारचौघात म्हणून टाकावं. हा हा म्हणता तुम्ही खासगी युरोपियनमधून सार्वजनिक युरोपियन होऊन जाल.

आता तुम्हाला युरोपमध्ये राहून दुकान चालवायची इच्छा असेल तर युरोपियन इंग्रजी बोलीचा फारच अभ्यास वाढवायला लागेल. तरच किमान शब्दांत गिऱ्हाईकाचा कमाल अपमान करता येईल. ती भाषा आली पाहिजे. दुकानदारांनी गिऱ्हाईकांवर सत्ता चालवायची असते. दुकानात सगळ्यात दुर्लक्ष करण्यासारखी वस्तू म्हणजे गिऱ्हाईक - हे सूत्र आहे इथलं! त्यामुळे खास त्या ढंगाचं दुकान हे सात-आठ वर्ष चालतं, पुढे ते टर्किश इमिग्रंटला विकावं. जागेच्या पगडीत उरलेल्या आयुष्याची सोय होते. आणि आपण 'युरोप व्यापारात मागे का' या विषयावर भाषण द्यायला आणि इतर यूरोपिअनांची उणीदुणी काढायला मोकळे ! थोडक्यात म्हणजे युरोपियन व्हायचं असेल तर म्हातारपणाच्या सत्काराच्या दिशेने वाटचाल करायचं धोरण सांभाळावं लागतं.

आखाती

आता तुम्हाला आखाती NRI व्हायचंय का ? तुमची ही महत्वाकांक्षा पार पाडणं अत्यंत सोपं आहे. त्यासाठी एकच अट, ती म्हणजे तुम्ही स्वतः आखाती देशांत राहून चालणार नाही. खरा आखाती NRI हा आखातात आखाती खाक्या दाखवूच शकत नाही कारण तिथे सगळे खाक्या दाखवायलाच उत्सुक! तेव्हा ह्याचा खाक्या कोण बघणार ? युरोप - अमेरिकेत राहिलात तरच आखाती खाक्या दाखवणं शक्य आहे. आपण आखाती NRI आहोत एव्हढं फक्त ऐकवीत राहायचं, बस, हेच मुख्य काम. मग ज्या कुठल्या देशी रहात असाल त्याच्या तुलनेने आखात-प्रशस्ती चालू ठेवायची. पानामध्ये कितीही अस्सल फलाफल (falafel) पडलेलं असलं तरी आखाती फलाफल ह्या विषयावरती बोलावं. संडे रोस्ट खाताना सुद्धा "कबाबचा (kebab) मजा काही और आहे" हे सांगावं. अगदी गुलाबी थंडी जरी पडली असली, तरी "आखाती उन्हाळा, अरे काय, आखाती उन्हाळा, ते खजूर, ते जाळ्याचे पडदे", वगैरे ते ऐकणाऱ्याला त्या थंडीत घाम फुटेपर्यंत ते ऐकवत रहा.

पण हे सगळं आखाती देशांपासून आपण किमान दोन हजार मैल दूर आहोत हे ध्यानात घेऊन. खुद्द आखाती देशांत असलं काही बोलाल तर "चूप बे, काय उगाच फिजूल फोका मारून राहिला बे" असं ते लगेच विचारातील; मग गोंधळ! आखाताबाहेरचा माणूस हा कुठे अगदी रशिया किंवा अर्जेन्टिनाचा जरी असला तरी त्याला हिणवताना "तुमच्या युरोप - अमेरिकेच्या लोकांचं" अश्या तुकड्यानीच त्या वाक्याला सुरुवात करावी. सतत कुणीतरी आपल्याला उपेक्षेने मारून राहिलेलं आहे ही भूमिका घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि आपण स्वतः पाहुण्याला जरी नुसता कपभर चहा सरकवत असलो तरीसुद्धा बोलताना "तुमच्या युरोप - अमेरिकेमध्ये काय बेटी कंजुषी, चहा घ्या". किंबहुना आखाताखेरीज इतर कुठेच खाण्यापिण्याचा शौकच नसतो असा सिद्धांत उराशी बाळगावा. मात्र पदार्थांचा फार तपशील देऊ नका. एखादा इटालियन नुसत्या चीझचे वीस प्रकार सांगेल आणि तुम्हाला तुमच्या कबाबापुढे जाता येणार नाही, म्हणजे पंचाईत सगळी. अश्या वेळेला आपली गाडी खजूर किंवा खनिज-तेल ह्या विषयांवर आणावी. कारण अस्सल अमेरिकन हा खजूर हा एरंडेलाबरोबर खायचा पदार्थ आहे असं मानतो आणि खनिज-तेल हे पेट्रोल-पम्पात तयार होते आणि आतल्या आत वाढायला लागून गाडीत भरण्यासाठी पम्पमधून बाहेर येते अशी त्याची प्रामाणिक समजूत आहे. अहो, प्रत्येक देशातल्या माणसांचे मोर्चे बांधण्याच्या काय जागा आहेत ते नीट तपासून पाहिलं पाहिजे. अमेरिकेत तुम्हाला आपण आखाती आहोत हे ठसवायचं असेल तर समोरचा माणूस हा स्मिथ किंवा जॉन्सन आडनावाचा असल्याची खात्री करा आणि सरळ आखाती बोलीत बोलायला सुरु करा. कारण अस्सल अमेरिकन भूताला भीत नाही इतका परकीय बोलींना भितो.



आखाती NRI होण्यासाठी शिशा (हुक्का) फुंकणे हे आवश्यक आहे ही समजूत अगदी चुकीची आहे. शिशा सगळेच फुंकतात. पण आपला आखाती अस्सलपणा दाखवायचा असेल तर ज्या युरोपियन किंवा अमेरिकानाकडे तुम्ही पाहुणे म्हणून जाणार असाल त्याच्या घरी शिशाचा इंतजाम नाही ह्याची खात्री करून "शिशा नाही का?" असं विचारून टाकावं. म्हणजे तो ओशाळतो. आपला एक पॉईंट सर झाला. "मग शिशा लाऊंजवरून बोलावून घ्या नं बे?" त्याला शिशा-लाऊंज कळत नाही आणि कुणाला बोलवायचं ते कळत नाही. तो ओशाळतो म्हणजे दुसरा पॉईंट सर झाला. "नाही का, मग थोडी कात (qat) तर देऊन द्या नं" असं म्हटल्याबरोबर तो मेंटॉस (mentos) आणतो. लगेच "छ्या, ही च्युईंग-गम, ही तर आमच्या येमेनमधली पोट्टेपाट्टे ही खात नाहीत हो, काय हे?" पुन्हा आऊट तो. आणि त्यातून एखाद्याने कात मागवली, तर सरळ खिडकीतून जोरदार पिंक खाली टाकावी. खालच्या भाडेकरूची झालीच रंगपंचमी तर आपण गेल्यावर शिमगा होईल. आपण निश्चिंत असावं. आपलं आखातीपण सिद्ध झाल्याशी कारण. पण वरून कितीही उद्धटपणा केला तरी आतून मात्र आपण उदार असल्याचा भाव हा चालू ठेवायला पाहिजे. त्यासाठी अमेरिकेत कुणाही अमेरिकनाच्या घरी गेलात आणि तुम्हीही रिटायर होईपर्यंत आणि त्यानंतरही अमेरीकेतच राहणार असलात तरी "एकदा आमच्या कुवैतला येऊन जा नं, खजुरांच्या सीझनला, अरे काय मस्त खजूर खाऊ, वाल्यागिल्याचे तट्टेगित्ते लावून पडले  राहू आरामात, आमच्या अरबी पाहुणचार तर बघा" असा आमंत्रण देत जावं. आता अमेरिका ते कुवैत प्रवासखर्च जमेला धरला, तर अमेरिकेत खजूर स्वस्त पडतात. त्यामुळे ह्या आमंत्रणाचा कुणीही स्विकार करत नाही, काळजी नसावी.

असो, तर आमच्या ह्या विषयावर प्रसिद्ध होणाऱ्या आगामी ग्रंथाची ही एक नुसती झलक आहे. संपूर्ण ग्रंथ लिहून तयार आहे. फक्त प्रकाशन समारंभाचा अध्यक्ष अमेरिकन, युरोपियन, की आखाती NRI ह्याचा निर्णय करणं हा तूर्त आमच्या पुढला क्रायसिस आहे.

Web Title: P L Deshpande Jayanti which NRI you are American European or Gulf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.