वन-डेत शेर, कसोटीत ढेर
By Admin | Updated: September 13, 2014 14:34 IST2014-09-13T14:34:00+5:302014-09-13T14:34:00+5:30
आयपीएलसारख्या स्पर्धेमुळे मंडळ श्रीमंत होत आहे; पण क्रिकेट गरीब होत चालले आहे. अर्मयाद पैशांमुळे बीसीसीआयला क्रिकेटजगतात साम्राज्य गाजविता येईल; पण मैदानावर संघ हरू लागला, तर ही श्रीमंती काय कामाची? पैशांपेक्षा ‘खर्या’ क्रिकेटला महत्त्व दिले, तर भारतीय खेळाडू सगळीकडे शेर ठरतील- वन-डेतही अन् कसोटीतही.

वन-डेत शेर, कसोटीत ढेर
विश्वास चरणकर
भारताच्या इंग्लंड दौर्याची गेल्या रविवारच्या टष्द्वेंटी-२0 सामन्याने झाली. हा दौरा भारतासाठी थोडा आशेचा आणि जास्त करून निराशेचा ठरला. भारत इंग्लंडमध्ये खूप दिवसांनी पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार असल्याने या दौर्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले होते. गेल्या दौर्यात भारताने इंग्लंडकडून कसोटी मालिकेत ४-0 असा सपाटून मार खाल्ला होता. त्यानंतर इंग्लंडने भारतात येऊन मालिका जिंकून नेली होती. या पार्श्वभूमीवर ही मालिका लक्षणीय ठरली. दौर्याच्या सुरुवातीला वातावरण सकारात्मक होते; पण नंतर परिस्थिती बदलत गेली अन् भारताला आघाडीवरून पिछाडीवर जावे लागले.
भारताने आधुनिक क्रिकेटमध्ये जे काही सामने जिंकले आहेत, त्यात सलामी जोडीची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. ‘सुरुवात झकास, तर पुढे सगळंच खास’ अशी काहीशी परिस्थिती भारतीय संघाची असते. या वर्षी इंग्लंड दौर्यावर जाणारा भारतीय संघ युवा खेळाडूंनी भरलेला होता. यातील अनेक खेळाडूंना इंग्लंडमध्ये कसोटी खेळण्याचा अनुभव नव्हता. त्यांच्यासाठीही ती चाचणी परीक्षा होती. भारताच्या पाटा खेळपट्टीवर चेंडूच्या चिंधड्या उडविणार्या भारतीय वाघांची इंग्लंड, ऑस्ट्रेलियासारख्या थंड हवामानाच्या देशातील गवताळ खेळपट्टय़ांवर मात्र त्रेधातिरपिट उडते, हे ‘ओपन सिक्रेट’ असल्याने भारतासाठी तेथे ग्रीन कार्पेट असणे स्वाभाविक होते; पण नॉटिंगहमच्या पहिल्या सामन्यात समोर हिरवीगार खेळपट्टी बघूनही नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याच्या महेंद्रसिंह धोनीच्या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या. कित्येक ‘पंडितांना’ हा आत्मघात वाटला; पण सलामीवीर मुरली विजय फलंदाजीला जाताना बॅटबरोबर बिछाना घेऊन गेला होता. ४६८ मिनिटे खेळपट्टीवर त्याने तंबू ठोकून शतक झळकावले. धोनी आणि भुवनेश्वर या दोघांनी अर्धशतके केल्यामुळे भारताने पहिल्या डावात साडेचारशेचा टप्पा ओलांडला होता. हा एका अर्थाने शुभशकुन होता. ही कसोटी राजकारणी लोकांसारखी पक्षांतर करीत होती. भारताने पहिल्या डावात चांगली धावसंख्या उभारली होती. इंग्लंडने त्याला ३ बाद १३४ असे दमदार उत्तर दिले होते; पण तेथून त्यांचा डाव घसरला अन् तो ७ बाद २0२ असा झाला. येथे आघाडी घेण्याची संधी भारताला उपलब्ध होती; पण ज्यो रुट आणि अँडरसन या जोडीने इंग्लंडचे पारडे पुन्हा जड केले. दुसर्या डावात इंग्लिश गोलंदाजांनी भारताची अवस्था ७ बाद २४९ अशी केली; परंतु स्टुअर्ट बिन्नी आणि भुवनेश्वर कुमार यांनी भारताचे वजन वाढविले. शेवटी ही कसोटी अनिर्णीत अवस्थेत संपली.
मालिकेतील दुसर्या कसोटीत इतिहास घडला. २00 वर्षे पूर्ण करणार्या लॉर्ड्सच्या मैदानावरील हिरव्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकणारा अँलिस्टर कुक भारताला फलंदाजीचे निमंत्रण देताना ‘अब आया उंट पहाड के निचे’ असे काही तरी मनातल्या मनात बडबडला असेल. ३ बाद ८६ अशा परिस्थितीनंतर मुंबईकर अजिंक्य रहाणे खेळपट्टीवर उभा राहिला नसता, तर कुकचे मनसुबे नक्की फळाला आले असते. या कसोटीतील तिसर्या डावापर्यंत दोघांनाही समान संधी होती; पण चौथ्या डावात ईशांत शर्माच्या बाँम्बवर्षावापासून ‘चर्चिल’ही इंग्लंडला वाचवू शकला नसता. उसळत्या चेंडूंचे बाळकडू प्यायलेल्या इंग्लिश खेळाडूंपुढे ईशांतने चेंडू असे आपटले, की त्यांच्या पायात दिवाळीतील आपटबार फुटल्यासारखे घाबरून ते तंबूच्या दिशेने ‘पळून’ गेले. भारतीय संघाने इंग्लंडला इंग्लंडमध्ये हरविले होते आणि तेही चक्क लॉर्ड्सवर. मालिकेतील एखादी कसोटी ड्रॉ राहिली तरी खूप झाले, असे वाटत असताना आपण तेथे चक्क १-0 अशी आघाडी घेतली होती. ‘भगवान देता है तो छप्पर फाड के’ याची प्रचिती येथे आली; पण हा हनिमून पिरियड लगेच संपला. पुढच्याच कसोटीत आपण जमिनीवर आलो. लॉर्ड्स कसोटीत ‘भगवानने फाडलेले छप्पर’ शिवायला नॉटिंगहम कसोटीच्या वेळी आपण विसरलो आणि या फाटक्या छपरातून आत शिरली, ती नैसर्गिक आपत्ती. या आपत्तीला कुक, बॅलेन्स, रुट, अँडरसन, ब्रॉड, अली अशी नावे वेगवेगळी होती; पण सगळ्यांचे ईप्सित एकच होते, भारतीय संघाची दाणादाण.
तिसर्या कसोटीपासून भारतीय संघाचे स्टार बदलले. दुसरी कसोटी जिंकून देणारा ईशांत शर्मा जखमी होऊन कट्टय़ावर बसला. फॉर्म हरविलेल्या अँलिस्टर कुकला आपण फॉर्म मिळवून दिला; शिवाय त्याची कॅप्टन्सीही वाचवली. पंकजसिंगच्या गोलंदाजीवर रवींद्र जडेजाने कुकचा स्लीपमध्ये सोपा झेल सोडला, त्या वेळी त्याने १५ धावा केल्या होत्या. तेथून पुढे तो शतकाच्या समीप गेला. भारतीय संघ हा संजीवनी बुटीसारखा आहे. अनेक मरणासन्न पेशंट त्यांनी ठणठणीत केले आहेत. गेल्या दौर्यावेळी स्टुअर्ट ब्रॉडला संघात घेण्यास इंग्लंडच्या अनेक निवडकर्त्यांनी विरोध केला होता; पण काहीनी आग्रह धरल्यामुळे ‘लास्ट चान्स’ म्हणून त्याला संघात निवडला. पण त्यानंतर त्याने जो धुमाकूळ घातला, तो आपण पाहिलाच आहे. त्याचप्रमाणे यंदा कुकच्या कारकिर्दीला जीवदान देण्याचे काम भारतीय संघाने केले. अँशेसमध्ये इंग्लंडला 0-५ असा व्हाईटवॉश मिळाला होता. ही जखम भळभळत असतानाच श्रीलंकेनेही त्यांना हरवून त्या जखमेवर मीठ चोळले. या जखमेचं सेप्टिक होऊन कुक मरणयातना अनुभवत होता. लॉर्ड्सवरील पराभवाने त्याचे वैकुंठागमन जवळ आले आहे, असे वाटत असतानाच तिसर्या कसोटीत आपण त्याला संजीवनी बुटीचा डोस दिला. या एका डोसमुळे तो खडखडीत बरा झाला. त्याचे लडखडणारे पाय सुसाट धावू लागले. सेनापती जोशात असल्यावर सैन्यालाही स्फूरण येते. कुकच्या नावापुढे धावांची वीरश्री दिसू लागल्यावर गॅरी बॅलेन्स आणि ज्यो रुट यांनीही तलवारी चालविल्या. त्यानंतर अँडरसन, ब्रॉड, मोईन अली आदींच्या तोफा, बंदुकांपुढे धोनीसेनेची वाताहत झाली. इंग्लंडने ही कसोटी २६६ धावांनी जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
चौथ्या आणि पाचव्या कसोटीत तर याहून लाजीरवाणे पराभव पाहण्याची वेळ भारतीय चाहत्यांवर आली. इंग्लंडच्या तोफखान्यासमोर आम्ही पाच दिवस खेळू शकलो नाही. केवळ तीन दिवसांत कसोटी खल्लास. जय-पराजय हा खेळाचा एक भाग असतो, हे खरं असले, तरी इतका लाजीरवाणा पराभव मात्र सलत राहतो, अश्वत्थाम्याच्या जखमेसारखा. भारतीय संघ १-0 अशा आघाडीनंतरही १-३ असा पिछाडीवर गेला.
या पराभवाने ‘आफ्टरशॉक’ बसणे अपेक्षित होते. बीसीसीआयने तातडीची उपाययोजना म्हणून रवी शास्त्री यांना संचालक म्हणून पाठविले. ज्यो डावेस आणि ट्रेव्हर पेनी यांची गच्छंती करून संजय बांगर, बी. अरुण आणि आर. श्रीधर यांना सहायक स्टाफपदी नेमले. वन-डे मालिकेपूर्वी हे ‘कामाला’ लागले. त्याचे परिणाम निकालात दिसू लागले. पहिला एकदिवसीय सामना पावसात वाहून गेला. दुसर्या सामन्यात भारताने इंग्लंडला १३३ धावांनी हरवून आपला नवा ‘दम’ दाखवून दिला. पुढचे दोन सामने जिंकून मालिकाही जिंकली. पाचव्या सामन्यात मात्र इंग्लंडने विजयी शेवट केला. कसोटीतील १-३चा बदला भारताने वन-डे मालिकेत ३-१ने घेतला.
या मोठय़ा दौर्यात भारतीय संघाच्या काही उणिवा समोर आल्या; तर काही बाबी सकारात्मकसुद्धा दिसल्या. २0१५चा वर्ल्डकप आता केवळ पाच महिन्यांवर येऊन ठेपला आहे. त्या पार्श्वभूमीवर वन-डे मालिकेतील भारताची कामगिरी सुखावणारी आहे. संघात सगळ्याच जागांसाठी चुरस आहे. प्रत्येकजण आपली कामगिरी उंचावत आहे. डेथ ओव्हरमधील गोलंदाजीचा अपवाद वगळता गोलंदाजीही चांगली होत आहे. इंग्लंडविरुद्धच्या वन-डे मालिकेत भारतीय युवा खेळाडूंनी क्षेत्ररक्षण तर दृष्ट लागण्यासारखे केले आहे. याउलट इंग्लंडचा संघ वन-डेच्या फॉरमॅटमध्ये गोंधळलेला दिसला. हे कशामुळे झाले? तर इंग्लंडच्या खेळाडूंना आयपीएलचा अनुभव नसल्याने ते कमी पडले, असा युक्तिवाद पीटरसन, वासिम अक्रम यांच्यासह अनेकांनी केला आणि तो खराही आहे. क्रिकेटच्या छोट्या प्रारूपात भारतीय खेळाडू बेडरपणे खेळतात, दबावाला प्रोफेशनली हँडल करतात, याचे श्रेय आयपीएलला द्यावेच लागेल. वर्ल्डकपचा विद्यमान विजेता म्हणून भारतीय संघाकडून यंदाही चाहत्यांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे आणि ती करण्याची क्षमता या युवा संघात नक्कीच आहे; पण केवळ वन-डे आणि टी-२0 हेच क्रिकेट आहे का? कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघ का कमी पडतो? वन-डेत शेर असणारे कसोटीत ढेर का होतात? असा प्रश्न जेव्हा येतो, तेव्हा कसोटीप्रेमी विश्लेषक आयपीएलकडे बोट दाखवतात; पण हे अर्धसत्य आहे.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड, अर्थात इसीबी हे आपल्या खेळाडूंना आयपीएलमध्ये भाग घेण्यास परवानगी देत नाहीत; कारण त्यांना आयपीएलपेक्षा कौंटी क्रिकेट महत्त्वाचे वाटते. कारण यातूनच त्यांची नवी पिढी घडणार आहे, जी त्यांना अँशेस जिंकून देणार आहे. अँशेस हा इसीबीसाठी आपल्या ‘काश्मीर’ प्रश्नाइतका सेन्सेटिव्ह विषय आहे. अँशेससाठी इंग्रज तिसरे महायुद्धही लढायला तयार होतील. मग इतकी हायप्राइस अँसेट आपल्या ताब्यात ठेवायची, तर त्यासाठी तयारी नको का करायला? ही तयारी करण्यासाठी इसीबी क्रिकेटच्या इतर प्रकारांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे वन-डे मालिकेत त्यांची कामिगिरी सुमार झाली.
याउलट आपल्या संघाचे आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे लाँग टर्म कोणतेच धोरण नाही. दौरा आखताना कशाला प्राधान्य द्यायचे, हे निश्चित नसते. इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी दौर्यावर भारतीय संघ गेला; पण त्यापूर्वी भारत न्यूझीलंडविरुद्ध कसोटी खेळला होता, तेही फेब्रुवारीमध्ये. त्यानंतर पाच महिन्यांनी भारतीय संघांनी कसोटीची पांढरी जर्सी अंगात चढविली. इंग्लंडने गेल्या डिसेंबरमध्ये भारत दौरा केल्यानंतर विविध देशांबरोबर १७ कसोटी सामने खेळले, तर भारताने खेळले केवळ ९ सामने. यावरून इसीबी कसोटी क्रिकेटला किती महत्त्व देते, ते लक्षात येईल. कसोटीचे सिंहासन पुन्हा मिळवायचे झाल्यास भारताने आंतरराष्ट्रीय कसोटींची संख्या वाढवायला हवी. त्यासाठी रणजीसारख्या स्पर्धांचे महत्त्व वाढविले पाहिजे.
वरिष्ठ खेळाडू रणजी सामने खेळण्याचे टाळतात. त्यांना सक्तीने मैदानात उतरवले पाहिजे. कसोटीला कमी दर्जा द्यायचा, हे बीसीसीआयचे धोरणच भारतीय संघाच्या पीछेहाटीचे मुख्य कारण आहे. कसोटी क्रिकेट हेच खरे क्रिकेट आहे. हे कोणीही मान्य करील. आयपीएलसारख्या स्पर्धेमुळे मंडळ श्रीमंत होत आहे; पण क्रिकेट गरीब होत चालले आहे. अर्मयाद पैशामुळे बीसीसीआयला क्रिकेट जगतात साम्राज्य गाजविता येईल; पण मैदानावर संघ हरू लागला, तर ही श्रीमंती काय कामाची?
(लेखक लोकमत कोल्हापूर आवृत्तीमध्ये वरिष्ठ उपसंपादक आहेत.)