ध्यास ऑलिम्पिकचा

By Admin | Updated: July 26, 2014 12:31 IST2014-07-26T12:31:39+5:302014-07-26T12:31:39+5:30

चीन येथे होणार्‍या यूथ ऑलिम्पिकसाठी निवड झालेली कोल्हापूरच्या पहिली महिला कुस्तीगीर रेश्मा माने हिचे वडील म्हणजे मुलीच्या यशासाठी झपाटलेला माणूस आहे. तिच्या यशासाठी दिवस-रात्र झटून त्यांची अथक मेहनत सुरू आहे. भविष्यासाठी धडपडणार्‍या या बाप-लेकीची ही वाटचाल प्रेरणादायी अशीच आहे.

Olympics of Olympics | ध्यास ऑलिम्पिकचा

ध्यास ऑलिम्पिकचा

 सचिन भोसले

स्त्री भ्रूणहत्या करणार्‍या आणि मुलगी झाली म्हणून मुलीच्या आईला जिवे मारणार्‍या बापांची संख्या कमी नाही. मात्र, मुलगी नव्हे माझा मुलगाच म्हणून सतत दिवसातील २४ तासांपैकी १८ तास मुलीच्या सेवेत असणार्‍या ‘अनिल माने’ यांची कथा औरच आहे. त्यांनी मुलगी ऑलिम्पिकमध्ये खेळावी म्हणून अक्षरश: पायाची चाकं केली आहेत. त्यांचा आदर्श अन्य लोकांनी घेतला, तर आपल्या मुलीही आंतरराष्ट्रीय स्तरावर निश्‍चितच चमकतील. 
 कझाकिस्तानमधील बाकू येथे २0१२ मध्ये झालेल्या आशिया कॅडेट रेसलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक पटकाविणार्‍या आणि चीन येथे होणार्‍या यूथ ऑलिम्पिकसाठी निवड झालेल्या कोल्हापूरच्या पहिल्या महिला कुस्तीगीर रेश्मा माने हिचे ते वडील.
कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे येथील माने कुटुंबीयांमध्ये अनिल आणि कल्पना या माने दाम्पत्यास  १९९८ साली एक कन्यारत्न झाले. खेडेगाव असल्याने मुलगी झाली म्हणून नाके मुरडणार्‍यांची संख्या अधिक होती. मात्र, माने दाम्पत्याने मुलगी नव्हे, मुलगाच झाला म्हणून रेश्माला चांगले शिक्षण आणि खेळाडू बनवायचे असे ठरविले. त्यानुसार त्यांनी प्रथम पाचव्या वर्षी शाळेला घालताना कोल्हापुरातील प्रायव्हेट हायस्कूलमध्ये दाखल केले. घरापासून दहा किलोमीटर अंतरावर ही शाळा आहे. याच शाळेची निवड करण्याचे कारण होते शाळेशेजारी असलेली राज्य शासनाची क्रीडा प्रबोधिनी व तिला कुस्ती प्रशिक्षक राम सारंग यांचे मार्गदर्शन व्हावे.  
रेश्माला वयाच्या पाचव्या वर्षी प्रथम शिवाजी स्टेडियममधील जलतरण तलावात प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. जिम्नॅस्टिक प्रशिक्षण आणि वयाच्या सातव्या वर्षी राम सारंग यांच्याकडे कुस्ती प्रशिक्षणासाठी दाखल केले. रेश्माला काही कमी पडू द्यायचे नाही, हा एकच  ध्यास अनिल माने यांनी घेतला. त्यांच्यासह रेश्माचे भाऊ सचिन, युवराज, हृषीकेश आणि बहीण नम्रता हे सर्व कुटुंबीय रेश्माने कुस्तीतील जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेऊन सुवर्णपदक पटकवावे, या एकाच ध्येयाने सकाळी चार वाजल्यापासून तिच्याबरोबर सराव करण्यासाठी राबत आहे. वडील अनिल यांचे कष्ट तर अफाट आहेत. ते कधी प्रायव्हेट हायस्कूल, तर कधी शिवाजी स्टेडियम येथील क्रीडा प्रबोधिनी, तर कधी पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुल, कधी सोनपत, हरियाणा, दिल्लीतील कुस्तीसाठीचा इंडिया कॅम्प, अशा ठिकाणी तिच्याबरोबर सावलीसारखे मागे-पुढे असतात. विशेष म्हणजे शाळेत असताना सकाळी पाच वाजता शिवाजी स्टेडियमला आणणे, पुन्हा आठ वाजता घरी नेणे, त्यानंतर पुन्हा शाळेसाठी साडेअकरा वाजता सोडणे, त्यानंतर संध्याकाळी साडेचार वाजता तिचा खुराक घेऊन शाळेच्या दारात तिची वाट पाहत उभे राहणे, आणलेला खुराक तिला देणे, खुराक दिल्यानंतर तिला व्यायामासाठी सायंकाळी पाच ते आठ शिवाजी स्टेडियम येथे सोडणे, असे दिवसातील १८ तासांपेक्षा अधिक काळ गेले दहा वर्षे ते तिच्याबरोबर सतत आहेत. 
 
आपली मुले ऑलिम्पिकमध्ये जावीत ही प्रबळ इच्छा होती. कोल्हापुरात कुस्तीला पोषक वातावरण असल्याने या वातावरणाचा उपयोग करून कन्या रेश्मास प्रथमपासून कुस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली. यात ज्येष्ठ प्रशिक्षक राम सारंग यांनी तिला मोलाची साथ देत अनेक डावपेच शिकवले. याच आधारावर तिने कुस्तीची पंढरी असणार्‍या हरियाणा, दिल्ली, मध्य प्रदेश, पंजाब, सोनपत येथील महिला कुस्तीगिरांनाही आस्मान दाखविले आहे. या तिच्या कामगिरीने तिने एक दिवस ‘ऑलिम्पिक’साठी भारताचे प्रतिनिधित्व करावे, अशी इच्छा आहे. याकरिता जे जे कष्ट उपसावे लागतील, ते करण्यास मी व माझे कुटुंब सदैव तयार आहे.  
- अनिल माने, रेश्मा मानेचे वडील
 
रेश्मा माझ्याकडे वयाच्या सातव्या वर्षापासून रोज सरावासाठी येथे येते. तिला रोज सहा किलोमीटर धावणे, वेगवेगळे व्यायाम, तसेच विविध तांत्रिक व्यायाम, डावपेच शिकविले जातात. याचबरोबर दिवसातून चार ते पाच किलो घाम व्यायामाद्वारे काढला जातो. तिने सातत्याने तंदुरुस्त राहून यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करावीत म्हणून स्पर्धेच्या काळातही तीन वेळा सराव करून घेतला जातो. यात सराव करताना रेश्मा कधीही कंटाळा करीत नाही. सध्या ती निवड झालेली एकमेव भारतीय महिला आहे. नक्कीच ती ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरून कोल्हापूरचे नाव संपूर्ण जगात करेल.  
- राम सारंग, राष्ट्रकुल पदक विजेते ज्येष्ठ कुस्ती प्रशिक्षक 
 
स्वत: मात्र रेल्वेच्या जनरल डब्याने
नुकतीच रेश्मा बँकॉक (थायलंड) येथे जाऊन आली. या वेळी तिच्यासाठी लाखो रुपये खर्च आला. याकरिता त्यांनी आईचे दागिनेही गहाण ठेवले. रेश्मास कुठलाही त्रास होऊ नये म्हणून अनिल यांनी तिला प्रथम कोल्हापूर ते मुंबई टु टायर एसी रेल्वेने प्रवास करण्यास सांगितले. ते मात्र जनरल डब्यात बसून मुंबईपर्यंत गेले. तेथून भारतीय संघातर्फे विमानाने बँकाँकहून पुन्हा परत आली. रेश्मा विमानाने दिल्लीत थायलंडवरून आली. पुन्हा कोल्हापूरकडे येताना रेश्माला त्रास होऊ नये, म्हणून दिल्ली ते पुणे या प्रवासासाठी विमानाचे तिकीट काढून दिले. मात्र स्वत: अनिल दिल्ली ते पुणे रेल्वेच्या जनरल डब्याने आले. अशा एक ना अनेक ठिकाणी त्यांनी मुलगी दहा दिवस, महिनाभर सराव शिबिरासाठी गेली ते हमखास तिच्या कॅम्पच्या बाहेर एक तर बागेत अथवा मिळेल त्या आश्रम, धर्मशाळा, लॉज या ठिकाणी तिच्या सराव शिबिर कालावधीत ठिय्या मारणे हा त्यांचा नित्याचाच एक भाग झाला आहे. 
खुराकासाठी अफाट खर्च 
रेश्मास रोज व्यायामानंतर मणुका (बेदाण्याचा एक प्रकार), म्हाब्रा बी, गुरुबंधू थंडाई, जायदी खजूर, अक्रोड, मोसंबी ज्युस, तसेच वेगवेगळ्या फळांचे ज्युस, एक खडकी कोंबड्याचे मटण, अंडी व तुपातील डायट आहार दिला जातो. याशिवाय रोज किमान चार ते पाच लिटर दूध. याकरिता पाच म्हशीही त्यांनी तिच्यासाठी पाळल्या आहेत. यासाठी महिन्याकाठी ४0 ते ५0 हजार इतका खर्च होत आहे. 
स्वत:चा आखाडा
यूथ बँकेचे ७ लाख आणि इतर संस्थांचे असे एकूण १५ लाख रुपये खचरून १५ बाय १५चा लाल मातीचा आखाडा बांधला. यामध्ये एक अभ्यास खोली, स्वच्छतागृह आदी असे दोन हजार स्क्वेअर फुटांची तालीमच बांधली. केवळ माझ्या मुलीला सराव करण्यासाठी दहा किलोमीटरवर जावे लागू नये. सतत सराव व्हावा. हा उद्देश अनिल माने यांनी डोळ्यांसमोर ठेवला.
 
 
 
(लेखक लोकमत कोल्हापूर आवृत्तीमध्ये उपसंपादक आहेत.)

Web Title: Olympics of Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.