अरे, अशी कुठे असतचे का शाळा?
By Admin | Updated: June 7, 2014 18:59 IST2014-06-07T18:59:24+5:302014-06-07T18:59:24+5:30
शाळेचा पहिला दिवस आठवतो ? रडण्याचा, ओरडण्याचा, कंठ दाटून येण्याचा! प्रत्येकाच्याच चेहर्यावर असतात त्यादिवशी अश्रूंचे कढ आणि एक प्रकारची एकटेपणाची भिती! आपल्या एकूण असंवेदनक्षम शिक्षण व्यवस्थेचेच हे प्रतिबिंब आहे. प्रत्येक चिमुकल्याचा हा पहिला दिवस आनंददायी करता येणे शक्य आहे. मात्र त्यासाठी तशी वृत्ती निर्माण करायला हवी.

अरे, अशी कुठे असतचे का शाळा?
पराग पोतदार
तुला शाळेत घालायची जय्यत तयारी आम्ही केव्हापासून करतोय.. कारण तू शाळेत पाऊल टाकणार हा आमच्यासाठी केवढा मोठा आनंदाचा क्षण! कालपर्यंत तू फक्त घरात बागडत होतास..अगदी घरभर आनंदाचे माणिक-मोती सांडत होतास.. आता तू पहिल्यांदा जगाच्या आकाशाखाली उभं राहून स्वत:साठी पहिलं पाऊल टाकणार.. तू शाळेत जाणार याची आम्हीच किती स्वप्नं रंगवत होतो. तुझ्या शाळेमध्ये आम्ही फिरून आमचंच बालपण शोधत होतो. तुझ्यासाठी तुला आवडेल, असं छोटं दप्तर आणलं.. तुझ्या चिमुकल्या बोटांत मावतील असे छोटे खडू आणले. पाटी, पुस्तकं, छोटुसा डब्बा आणि वॉटरबॅगही.आवडीने तुझ्या वह्या पुस्तकांना कव्हरं घातली.. तुझ्या आयकार्डवर तुझा छोटुसा फोटो लावला. तुझी पहिली आयडेंटिटी!!
नव्या जगातली ही तुझी पहिली ओळख..तू घाबरायला नकोस, बुजायला नकोस म्हणून आमची किती धडपड. रोज गाडीवरून नेताना तुला शाळा दाखवत होतो. आता इथे येऊन शिकायचं हे समजावत होतो. घरात कसा छान रमला होतास, शाळेतही रमावास म्हणून शाळेबाहेरची रंगीत चित्रं दाखवत होतो. शाळेतला तुझा पहिला दिवस आनंदी असावा, असं आम्हाला वाटत होतं.. शाळेत अजिबात रडायचं नाही हे तुझ्या कोवळ्या मनाला सारखं बजावत होतो.. शाळेतली इतर मुलं रडली, तर तूच त्यांना समजावायचं असं मोठेपणही उगीच, कारण नसताना लादत होतो.
तू पण माझ्या गळ्यात इवलेसे हात टाकून म्हणालास, ‘‘बाबा, मी शान्गेन शगल्यांना. मी आहे ना. ललू नका. गानं पन म्हनून दाखवेन त्यांना..’’ कुठून आलं तुझ्यात हे समजूतदारपण. मुळातलं शहाणपण की अजून काही.? तुझे बोबडे बोल मला सांगत होते, तू शाळेत नक्की रमशील..
अन् शाळेचा पहिला दिवस उगवला..
तुही लवकर उठलास. कुतुहलाचं केवढं आभाळ भरलं होतं, तुझ्या इवल्याशा डोळ्यांत..
तुला तयार केलं. घडी न मोडलेला शाळेचा पहिला ड्रेस तुझ्या अंगावर आला. तू आनंदानं टाळ्या वाजवल्यास..सारं मजेने करून घेत होतास. आनंदाने हसत होतास.आजी-आजोबांच्या पाया पडून शाळेत निघालास.. एक छोटं, गोड स्वप्न इवल्याशा मनात घेऊन. आपण शाळेच्या दारात पोहोचलो आणि मुलांच्या रडण्याचा एकच गलका ऐकू आला.. तुझी माझ्या माने भोवतालची मिठी नकळत घट्ट झाली..
मनातल्या गोड स्वप्नांना एक भीतीची तार छेदून गेली.. तो आवाज तुला नको होता. तू एकदा माझ्या डोळ्यांत पाहिलंस आणि काहीतरी सांगायचं होतं तुला. मला ते कळलं, पण न कळल्यासारखं दाखवून आपण पुढेच गेलो. मी हट्ट सोडायला तयार नव्हतो. मला तुला आनंदात आणि ‘हसत हसत’ शाळेत जाताना पाहायचं होतं.. तू मात्र आता मला सोडायला तयार नव्हतास.
शाळेला सगळीकडे फुगे लावले होते. रांगोळ्या काढल्या होत्या.. वर्गही सजवले होते, पण वर्गाचे दरवाजे मात्र बंद होते. वर्गा-वर्गासमोर पालकांची मुलांना घेऊन गर्दी झालेली. मुलं एकेका वर्गात कोंबली जात होती. मुलांना काही समजायच्या आत आई-वडिलांच्या हातून त्यांना घेतलं जायचं आणि वर्गात घेतल्यानंतर दार धाडकन बंद व्हायचं..मग आतून एकच गलका आणि हमसून हमसून रडण्याचा आवाज. बाहेर उभे असलेले आई-वडिल त्या गलक्यात आपल्या मुलाचा आवाज शोधत तिथंच स्तब्ध उभे.
मला तुला असं सोडायचं नव्हतं, पण मीही त्यातलाच मीही तुला असाच अचानक, तुला समजायच्या आत अनोळखी हातांत देऊन मोकळा होणार होतो.. दोन मजले चढून आपण शाळेच्या खोलीपर्यंत आलो. तिथं पण तिच रडारड. तुला एव्हाना सगळं समजलं होतं बहुदा. तुझ्या मनातली शाळा, आम्ही दाखवलेली शाळा अशी नव्हतीच बहुदा. तुला हुंदका फुटत होता, पण तू निकराने मागे ढकलत होतास.
‘रडू नकोस..’ मी तुला समजावलं. नकळत स्वत:लाही!
वर्ग बंद होता. आतून फक्त रडण्याचा आवाज येत होता. मी कडी वाजवली. त्या आवाजानंही तू दचकलास. पुन्हा एकदा मला बिलगलास..
किलकिलं होतं थोडसंच दार उघडलं..
भसकन एखादा आगीचा लोळ बाहेर यावा तसा चिमुरड्यांच्या रडण्याचा आवाज कानांवर येऊन अक्षरश: आदळला.
मी काही बोलणार इतक्यात आतून फक्त दोन हात बाहेर आले आणि चेहराही नीट दिसू न देता मुलाला आत घेऊन गेले.
मी सुन्न!!!
दार बंद होताना त्या निरागस मनाची ओझरती दृष्टिभेट झाली.. डोळ्यांत अक्षरश: समुद्र होता आणि मनात प्रचंड वादळ..
असहायता, हतबलता, भीती, कारुण्य.. किती किती होतं त्या डोळ्यांत.. मी त्या नजरेला नजर देऊ शकलो नाही. माझा श्वास अडकला..
एका क्षणाच्या आत दरवाजा धाडकन बंद झाला. मी तिथेच दाराच्या बाहेर उभा.. मागून एकाने पाठीला हात लावला. मी वळून पाहिलं आणि तीन-चार जणांना असंच त्यांच्या मुलाला आत सोडायचं होतं..
माझ्या मुलाला मीच कितीतरी स्वप्नं दाखवली आणि मीच त्यांचा चुराडा करून या खुराड्यात त्याला एकट्याला सोडून दिलं होतं. नव्हे अक्षरश: कोंबलं होतं.. त्याच्या शाळेचा पहिला दिवस असा असावा असं वाटत होतं का मला? तरीही मी असं का केलं?..
रडणार्या त्या कितीतरी जिवांमध्ये मी माझ्याही पिल्लाला सोडून आलो होतो. एकटा, एकाकी.. आता बाहेर उभा राहून मीही त्या चिमुकल्यांमध्ये माझ्या मुलाचा आवाज शोधू पाहत होतो..
बंद दरवाजे आणि बंद खिडक्यांमध्ये असलेल्या त्या शाळा नावाच्या एका खोलीत तिथल्या बंद मनांना चिरून हजारो रडणारे आवाज कानावर आदळत होते. आता त्या आवाजात मला माझ्या पिल्लाचा आवाज शोधावासा वाटत नव्हता. ते सारे आवाज एकच होऊन माझ्याच मुलाचे आहेत असे वाटू लागले..
यांत्रिकपणे पायर्या उतरून मी खाली आलो. शाळेच्या पहिल्या दिवसासाठी केलेली ती सजावट, शाळेत सगळीकडे लावलेले फुगे, प्रत्येक खोलीसमोर काढलेली रांगोळी.. हे सारे काही मला आता कृत्रिम, निर्थक वाटू लागले. कारण निरागसपण आतून धाय मोकलून रडत होते!
‘‘तीन दिवस रडतात पोरं. नंतर रुळतात..’’ तोंडातून गळणारा लाल रस सावरत एक जण मला पाहून बोलला. त्यानं गेट लावून घेतलं आणि कसलीही पर्वा नसल्यासारखा हसला. ‘‘शाळा सुटल्याशिवाय येऊ नका.’’ असं म्हणत आई-बापांना हाकलून एका कोपर्यात निवांत गप्पा मारत बसला.
रस्त्यावरून असंख्य गाड्या धावत असतात, आपण ऐकतो का सारे आवाज कान देऊन? तसेच त्याच्यासाठी हे मुलांचे रडण्याचे आवाज. त्याला काही घेणं देणं नव्हतं. आणि कशासाठी असावं?
मी मात्र अजूनही आतून पूर्ण अस्वस्थ होतो.
नातू शाळेत जाणार म्हणून पाहायला खास त्याचे आजी-आजोबा आले होते. पाय दुखत असतानाही. पण, त्यांना यायला उशीर झाला म्हणून वर्गात कसा गेला हे त्यांना पाहता आलं नाही. मनात आलं, त्यांनी नाही पाहिलं ते बरंच झालं, नाहीतरी होतं तरी काय त्यात पाहण्यासारखं.
मी एका कोपर्यात उभा राहून विचार करत राहिलो.. मी का सोडलं मुलाला या अशा शाळेत? मलाही आई-बाबांनी शाळेत सोडलं तेव्हा असंच झालं होतं का? त्याच्या कोवळ्या मनावर, कोर्या पाटीवर जाणूनबुजून असे चरे कशासाठी मारले? त्याला किती स्वप्नं दाखवली आणि त्यावर का मीच असं पाणी फिरवलं? त्याच्या आनंदाचं जग असं हिरावून घेत त्याला असं कोंडवाड्यात कोंबणारा मी कोण? त्याला फसवून का सोडलं असं .?
त्या कोलाहलात किती भांबावून गेला असेल बिच्चारा.. माझ्या हातातून अनोळखी हातात जाताना किती बावरला असेल तो? खोलीतलं ते अनोळखी जग आणि नुसती रडारड पाहून किती वेळा त्याच्या काळजाचा ठोका चुकला असेल? चटकन जाऊन बिलगावे अशी जागाच न सापडल्याने किती सैरभैर झाला असेल?
मन भरून आलं. डोळ्यात पाणी साठलं..
तिथंच ओरडून विचारावंसं वाटलं, ‘‘अरे, अशी कुठे असते का शाळा?’’
खालच्या वर्गातली एक खिडकी अचानक उघडली गेली. मी चमकून त्या दिशेने पाहिलं. अश्रूंनी डबडबलेले दोन डोळे आणि मदतीसाठी बाहेर आलेले दोन हात मला दिसले. क्षणात खिडकी बंद झाली आणि मी पुन्हा सुन्न!
मला त्या प्रत्येक मुलात आता माझाच मुलगा दिसत होता. हमसून हमसून रडणारा..
वर्गातला कोलाहल आता जरा शांत झाला होता. रडून रडून दमली असावीत मुलं.. पालकांनी मात्र ती रमली असा आपलाच आपण समज करून घेतला.
मनाची कसोटी पाहणारा घड्याळाचा काटा अखेर शाळा संपल्याची वेळ दाखवू लागला. शिपायाला मात्र अजून वरून हुकूम आला नव्हता. तो विचारायला गेला. इतका वेळ रोखून धरलेले मन त्या निरागस जिवाकडे ओढ घेऊ लागले.
मी सगळ्यांच्या पुढे जाऊन वर्गासमोर दारात उभा.. गेलेले दीड-दोन तास डोळ्यांपुढून सरकले. वर्गात जातानाचा त्याचा चिमुकला चेहरा आठवला. दरवाजा बंद होतानाचे त्याचे भरून आलेले डोळे आठवले. मला मारलेली घट्ट मिठी आठवली. दरवाजा उघडला.. माझी नजर भिरभिरत त्याला शोधू लागली. वर्गाच्या एका कोपर्यात भेदरून उभा राहून तो रडत होता. दरवाजाकडे त्याचं लक्ष गेलं. मला पाहताच त्याने धाव घेतली..गर्दीतून वाट काढण्यासाठी तो त्याची सगळी शक्ती लावून केविलवाणी धडपड करत होता.
मी पुढे होऊन त्याला उचललं. मी त्याला उचलून कडेवर घेतलं.. पुन्हा त्याचा बांध फुटला.. रडून रडून माझा खांदा ओला झाला. त्याच्या अश्रुंनी मी पुरता भिजून गेलो.. पार आतूनही!!!
‘‘ संपली रे बाळा शाळा.’’ असं त्याला समजावत त्याला बाहेर आणलं. पुन्हा पुन्हा त्याला रडूच फुटत होतं. त्याच्या खिशात बिस्किटांचा पुडा होता. पण, त्याला त्याने हातही लावला नव्हता.
‘‘आवडली का रे शाळा?’’ माझा एक अत्यंत फालतू प्रश्न.
‘‘नाही.’’ एकच उत्तर आणि फुलस्टॉप.
‘का नाही?’ हे विचारण्याचं धाडस नव्हतं माझ्यात.
.....
हळूहळू शांत झाल्यावर तोच मला म्हणाला, ‘‘बाबा, तू मला आत का सोडलं? आणि दार का लावून घेतलं? मी खूप रडलो. तुला खूप शोधलं मी बाबा.’’ मला खूप भरून आलं. मी त्याला जवळ घेतलं, ‘‘मी नाही रे लावलं दार. चुकून लागलं. मी बाहेरच उभा होतो.’’
माझ्या खांद्यावर डोकं ठेवून मला तो म्हणाला, ‘‘बाबा, असं जाऊ नको रे मला सोडून..’’ माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं. मी त्याला थोपटत राहिलो. रडून थकलेला तो जीव शांतपणे, विश्वासाने पडून राहिला.
माझ्या मनात येत राहिलं..
शाळेचा पहिला दिवस खरंच असा असावा? किती स्वप्नं दाखवतो आपण त्यांना आणि आपणच त्यांचा भ्रमनिरास करून टाकतो? मुलांच्या निरागसपणाचा विचारच न करणारी ही काही पहिली शाळा नव्हे. अशा शाळा ठिकठिकाणी आहेत. शाळेचा पहिला दिवस असाच असतो. असणार हे जणू आपण मानलं आहे आणि तेच मुलांवर लादत राहतो.
खरंच, कोवळ्या मुलांचा शाळेतला हा पहिला दिवस आपल्याला आनंददायी करता येणार नाही का?
मुलं हळूहळू शाळेच्या वातावरणाला सरावतात.. आपण म्हणतो, मुलं रुळली एकदाची. खरंच ती रुळतात, की त्यांची तीच जुळवून घेतात. नवे मित्र जमतात. नवं जग सुरू होतं हे सारं खरं.. पण त्या सार्या नव्या जगाची सुरुवातही तितकीच आनंददायी करता येणार नाही का? केवळ वर्गातली काटरून्स, रांगोळी आणि फुले मुलाचं हे विश्व पहिल्या दिवशी फुलवू शकतील का?
इतक्या लहान वयात शाळेची सुरुवात ही अशीच करायला हवी का? दुसरे काहीच पर्याय असूच शकत नाहीत का? आपण याचा विचार करणार आहोत का, की याचा विचारच करू नये इतक्या संवेदना बोथट होताहेत आपल्या? एकदा आपल्यातच डोकावून पाहायला हवं.
शाळेचा पहिला दिवस नक्की आनंददायी करता येईल. अगदी छोट्या छोट्या गोष्टी केल्या, तरी हे करता येईल. फक्त निरागस जग समजून घ्यायची संवेदनशीलता जागवावी लागेल.. चार भिंतींच्या खुराड्यातून पहिल्यांदा मुलांना बाहेर काढावं लागेल. नवे सहवास, नवी माणसं छान असतात, हे त्यांना उमगू द्यावं लागेल. अनोळखी हातात एकदम सोपविण्याऐवजी ते ओळखीचे, मैत्रीचे करून नाही का देता येणार? मुलंही मुलांमध्ये रमतील ना, पण अशी दार खिडक्या बंद करून कोंडून नको. निसर्गाच्या सोबतीने, लहानग्यांना विश्वासात घेऊन शाळेतलं हे पहिलं पाऊल नाही का टाकता येणार?..
शाळेत नेऊन सोडण्याचे सोपस्कार करताना मुलांना गृहीत धरून त्यांच्या भावविश्वावर अतिक्रमण नको करुया.. अगदी खूप काही नाही बदलावं लागणार..थोडं अधिक संवेदनशील व्हावं मात्र लागेल. चिमुकल्यांच्या मनात शिरून त्यांना नक्की काय हवं हे थोडं समजून घ्यावं लागेल. तेव्हाच मग, अरे, अशी कुठे असते का शाळा, हा प्रश्न मनात येणार नाही आणि चिमुकल्यांच्याही मनात नसतं काहूर माजणार नाही.
या घडीला मात्र, मी आणि माझ्या मुलामधली ती दृश्य-अदृश्य भिंत अजूनही तशीच उभी आहे.तो वर्गात रडतोय आणि मी बाहेर उभा आहे. डबडबलेल्या डोळ्यांनी तो मला विचारतोय..
बाबा, तू दार का लावलं रे..
मला नको रे असा सोडून जाऊ..
मला वाटतं, ते दार उघडण्याची वेळ आता आली आहे!
(लेखक लोकमत पुणे आवृत्तीमध्ये वरिष्ठ उपसंपादक आहेत.)