ह्युजच्या निमित्ताने

By Admin | Updated: December 6, 2014 18:05 IST2014-12-06T18:05:05+5:302014-12-06T18:05:05+5:30

ह्युजच्या अपघाती मृत्यूने क्रिकेटसमोर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, त्याचा विचार गोलंदाजांना कसे जखडता येईल किंवा फलंदाज आणखी कसा सुरक्षित करता येईल, अशा दृष्टीने केला, तर क्रिकेटचा हा खेळ बेचव होऊन जाईल. धावांना काही अर्थच राहणार नाही.

On the occasion of Hughes | ह्युजच्या निमित्ताने

ह्युजच्या निमित्ताने

- द्वारकानाथ संझगिरी

 
फिल ह्युजच्या दुर्दैवी मृत्यूनंतर जर एखादा क्रिकेटपटू हादरला नसेल, तर त्याच्या हृदयाच्या जागी देवाने दगड बसवला असावा. रक्ताचं, देशाचं, क्रिकेटचं, असं कसलंही नातं फिलशी नसणार्‍या माणसाच्या डोळ्यात टचकन पाणी यावं, असा हा मृत्यू होता. पण, त्याचबरोबर आज क्रिकेट खेळणार्‍या कुठल्याही मुलाला क्रिकेट खेळतानाही आयुष्य क्षणभंगुर वाटू शकतं.
त्याच्या मृत्यूच्या बातम्यानंतर क्रिकेटच्या चेंडूकडे पाहण्याची दृष्टी बदलू शकते. त्या निष्पाप चेंडूमध्ये जीवघेणी बंदुकीची गोळी दिसू शकते. अति क्रिकेटच्या दृष्टीनेही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे अँबॉटचा चेंडू ह्युजच्या मानेला लागला. मेंदूला रक्त पुरवणारी महत्त्वाची रोहिणी (आर्टरी) त्यामुळे चक्काचूर झाली आणि फिलच्या आयुष्याचा फ्यूज उडाला. कितीही वैद्यकशास्त्र सुधारलं, तरी हा फ्यूज रिपेअर करून मिळणार नाही.  मानेवर नाजूक जागी चेंडू बसला, तर मृत्यू होऊ शकतो, ही भयानक शक्यता आता क्रिकेटपटूला कळली. क्रिकेटमध्ये काळाबरोबर क्रिकेटच्या साहित्याचा विवाद झाला. बॅट, ग्लोव्हज, पॅड सुधारले. पण लक्षात घ्या, साधारण १८७0-८0 च्या दशकात अँबडमन गार्ड जन्माला आलं. पुरुषाला त्या कामाला प्रोटेक्शन घ्यायची गरज वाटली. ते योग्यच होतं. पण, नंतर पुढे हे हेल्मेट यायला शंभर वर्षं लागली. तोपर्यंत अनेकांना डोक्याच्या आसपास चेंडू लागले होते. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चेंडू डोक्याच्या आसपास लागून मृत्यूची नोंद झालेली नव्हती. जेव्हा सुरुवातीला हेल्मेट आलं, तेव्हा ते प्रचंड जड होतं. अनेकांना ते त्रासदायक वाटत असावं. त्याचा वापर वाढला. शाळेतली मुलंसुद्धा ते वापरायला लागली. त्याचं वजन कमी हवं वगैरे चर्चा सुरू होती, मात्र ते पुरेसे संरक्षण करतं, असे बहुतेकांना वाटत होतं. उसळत्या चेंडूला प्रत्युत्तर मिळालंय, असं वाटत असताना ह्युजच्या मृत्यूने दाखवून दिलं, की आधुनिक हेल्मेटही अपुरं आहे. मानेवरचा आघातही घातक ठरू शकतो. हेल्मेटच्या डोळ्यापुढच्या डावीकडून चेंडू आत शिरलाय. तसा तो आत हेल्मेटला बगल देऊन तुमच्यावर हल्ला करू शकतो. फलंदाजाच्या  दृष्टीने ही गोष्ट धक्कादायक आहे. मग आता त्यामुळे नव्या शिरस्त्राणाचा जन्म होणार का, हाही प्रश्न आहे.
एक काळ होता, की क्रिकेटचं साहित्य वेदनारहित असावं, एवढंच फार वाटायचं. त्याबद्दल फारशी जागरुकता नव्हती. पतौडीसारखा फलंदाजपण  बर्‍याचदा स्वत:चे कीट घेऊन यायचा नाही. कुणाची पॅन्ट, कुणाचा तरी शर्ट, कधी विश्‍वनाथची बॅट घेऊन त्याने फलंदाजी केली आहे. आज काळ बदललाय. आज आंतरराष्ट्रीय स्तरावरचा प्रत्येक क्रिकेटपटू हा स्वत:च्या साहित्याबद्दल जागरूक असतो. खास त्याच्या गरजेनुसार बॅट, हेल्मेट वगैरे बनवून घेतलं जाऊ शकतं. पण जेवढी संरक्षण ‘कवच’ वाढतात. तेवढी मानवी वैशिष्ट्य कमी होताना दिसतं. आज मागे वळून पाहताना असा विचार येतो, की ब्रॅडमनने त्या बॉडीलाईन मालिकेत कशी फलंदाजी केली असेल? त्या वेळचे ग्लोव्हज, बॅट्स, पॅड्ससुद्धा आज ‘अश्मयुगातले’ वाटतात. 
त्या वेळचे फलंदाज आजच्यापेक्षा जास्त चांगल्याप्रकारे खेळत होते.  बरं, त्या वेळी वेगाला घरबंद नव्हता. बॉल्सवर नियंत्रण नव्हतं आणि आज नो-बॉलचा फ्रंट फूट नियम बदलल्यामुळे गोलंदाज पाय ड्रॅग करून चेंडू अठरा यार्डवरून टाकतो. आजच्यापेक्षा वेगवान गोलंदाजी खेळणं त्याकाळी प्रचंड कठीण होतं. बाय द वे, त्या काळात तर चेस्टगार्ड, आर्मगार्डही नव्हतं. तरीही सोबर्स काय, व्हिव रिचर्ड्स काय किंवा आपला विजय मांजरेकर काय, वेगवान चेंडू डोक्याजवळून हुक काढत! आज हा विचार करताना ही माणसं मला देव, किन्नर, यक्ष वाटतात, परग्रहावरचे! त्यांचं टायमिंग, त्यांचं फटक्यांच्या पॉझिशनमध्ये येणं आणि त्यांची जिगर पाहिली की त्यांना शिरसाष्टांग नमस्कार घालावासा वाटतो. पण, हेल्मेट आलं आणि जी मंडळी वेगवान चेंडूपासून पळायची ती ग्रेट झाली. कारण ‘चेंडू डोक्याला लागून मृत्यू’ची भीती कमी झाली. बर्‍याच मोठय़ा फलंदाजांना चेंडू त्याच्या हेल्मेटवर लागलाय, पण हेल्मेटमुळे ते वाचले आहेत. 
फिल ह्युजच्या मृत्यूनंतर हे बदलले, कारण आता हेल्मेट अपूर्ण वाटू शकतं. हेल्मेट हा सेकंड लाईन ऑफ डिफेन्स असेल. पहिलं नाही. पहिलं फुटवर्क! दुसरं म्हणजे नरी कॉन्ट्रॅक्टरच्या वेळी सुरुवातीला कित्येक मिनिट त्याच्यावर उपचार झाले नव्हते. त्याचं ऑपरेशनही दुसर्‍या दिवशी झालं. इथे फिल ह्युजच्या वेळी अँम्ब्युलन्स पंधरा मिनिटांत आली. तरी ती उशिरा आली का? अशी चर्चा ऑस्ट्रेलियात आहे. अत्याधुनिक ट्रिटमेंट मिळूनही ह्युज वाचू शकला नाही. ही गोष्ट एक बाब सिद्ध करते, की चेंडू मोक्याच्या जागी बसला की आयुष्य क्षणात संपू शकतं. ही गोष्ट थरकाप उडवणारी आहे. यापुढे काही काळ क्रिकेटपटूंना कौन्सलिंगची गरज राहणार आहे. मानसिक जखम बरी व्हायला बर्‍याचदा जास्त वेळ लागतो. अर्थात, या मृत्यूमुळे क्रिकेटच्या नियमात बदल व्हावा, बाऊन्सरवर बंदी यावी वगैरे मला पटत नाही. मुळात गोलंदाजाला सध्याचे नियम वेठबिगार किंवा धावा देणारी यंत्र बनवतात. त्यांच्यावर अधिक बंधन नकोत. नाही तर धावांना काही किंमतच राहणार नाही. पूर्वी लग्नाच्या जेवणात तिसर्‍या पंक्तीत मठ्ठा पातळ करून वाढला जायचा. तशी फलंदाजी बेचव आणि पातळ होईल. आज चेंडू उसळवणार्‍या खेळपटट्य़ांवर वेगवान गोलंदाजीविरुद्ध काढलेल्या शतकाला सोन्याची किंमत येते. कारण वेगवान चेंडू बंदुकीची वर्मी लागणारी गोळी ठरू शकते म्हणून! म्हणून सनीच्या पर्थवरच्या शतकाचं आपल्याला कौतुक वाटतं. म्हणून वेगवान गोलंदाज बॅटने झेलणारा सुनील गावसकर रॉक ऑफ जिब्रॉल्टर वाटतो आणि त्याच्या बॅटसमोर आपण नतमस्तक होतो.
फिल ह्युजच्या मृत्यूने क्रिकेटसमोर काही प्रश्न उभे नक्की करून ठेवले आहेत. पण, त्याची योग्य उत्तरं आपणाला शोधायला हवीत.
(लेखक क्रिकेट समीक्षक आहेत.)  
 

Web Title: On the occasion of Hughes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.