हडप्पा नव्हे, राखीगढी!

By Admin | Updated: August 22, 2015 19:02 IST2015-08-22T19:02:07+5:302015-08-22T19:02:07+5:30

भारताच्या नागरी संस्कृतीचा उगम हडप्पा-मोहेंजोदडो येथून झाला, असे आजवरचा शास्त्रीय आधार सांगतो, पण या दाव्याला पुण्याच्या डेक्कन कॉलेजने धक्का दिलाआहे. सिंधू संस्कृतीचे मूळ पाकमधील हडप्पा-मोहेंजोदडो नसून हरयाणातील राखीगढीत दडलेले आहे, असे हे संशोधन सांगते. त्यामुळे सिंधू संस्कृतीचा कालखंड वेदाआधीचा असल्याचा निष्कर्ष निघू शकेल!

Not Harappa, Rakhihi! | हडप्पा नव्हे, राखीगढी!

हडप्पा नव्हे, राखीगढी!

- सुधीर लंके
 
आर्य आणि वेदांपासून भारताचा इतिहास सुरू झाला अशी मांडणी काही संशोधक करतात. अर्थात त्याबाबत वाद आहेत. उत्खननातील भक्कम व शास्त्रीय पुराव्यांच्या आधारे बोलायचे झाल्यास हडप्पा-मोहेंजोदडो येथून भारताच्या नागरी संस्कृतीचा उगम झाला. पण, आता याही दाव्याला धक्का देणारे एक संशोधन देशात नामांकित असणा:या पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या पुरातत्वशास्त्र विभागाने पुढे आणले आहे. हडप्पा-मोहेंजोदडो या शहराच्याही आधीचे शहर हरियाणात राखीगढी गावाजवळ जमिनीच्या पोटात दडलेले आहे, असे हे संशोधन सांगते. या शहराचे वय हे आजपासून साडेसात हजार वर्षापूर्वीचे आहे, असे प्राथमिक अनुमान आहे. हे अनुमान साधार सिद्ध झाले तर आजच्या भारताचे, पाकिस्तानचे व एकूणच सिंधू संस्कृतीचे मूळ हे पाकिस्तानातील हडप्पा, मोहेंजोदडो नसून ते राखीगढी आहे, असा एक नवा इतिहास समोर येईल. कदाचित हा इतिहास व भारतीय संस्कृतीचा उगम वेदांच्याही मागे जाईल. 
माणूस दोन पायांवर चालू लागला तेव्हापासून तो उत्क्रांत झाला. माणसाच्या दोन पायांवरील अवस्थेला ‘होमो इरेक्टस’ म्हटले गेले. पुढे तो वेगवेगळ्या प्रदेशात पसरला. वस्ती करून राहू लागला. त्याने साधने निर्माण केली. नगरे रचली. इजिप्तसारख्या अनेक देशांत जुनी नगरे म्हणजे जुनी नागरी संस्कृती सापडली. भारतातील सर्वात जुनी नगरे 1921-22 मध्ये पंजाब प्रांतातील उत्खननात हडप्पा व मोहेंजोदडो येथे सापडली. अखंड भारतात सिंधू नदीच्या काठी ही शहरे आढळल्याने या नगरांच्या संस्कृतीला ‘सिंधू संस्कृती’ म्हटले गेले. आपला मूळ वंश या संस्कृतीत मानला जातो. आज ही दोन्ही शहरे पाकिस्तानात आहेत. त्यामुळे अनेक भारतीयांना आपले हे मूळ इच्छा असूनही बघायलाही मिळालेले नाही. 
हडप्पा-मोहेंजोदडो या शहरांचे नेमके वयोमान किती, याबाबत मत-मतांतरे आहेत. ब्रिटिश अधिकारी जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली या शहरांचे उत्खनन झाले. त्यांनी या शहरांचे वय हे इ.स. पूर्व 235क् ठरविले आहे. अनेक 
 
शास्त्रज्ञांच्या मते या शहरांचा कालखंड इ.स. पूर्व 2क्क्क् ते 35क्क् वर्षापलीकडे जात नाही. म्हणजे आजपासून ही शहरे साधारणत: चार ते साडेपाच हजार वर्षापूर्वीची ठरतात. तत्पूर्वीच्या शहरांचा पुरावा भारतात अजून मिळालेला नाही. तो प्रथमच डेक्कन कॉलेजला राखीगढी येथे मिळत आहे. 
भारतात यापूर्वी उत्खनन अनेक ठिकाणी झाले. परंतु या उत्खननातून वेगळा इतिहास समोर येण्याची शक्यता आहे. 
डेक्कन कॉलेज या अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू व राखीगढीच्या संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. वसंत शिंदे हे हडप्पन संस्कृतीचे अभ्यासक आहेत. त्यांनी यापूर्वी हरियाणातील फरमाणा, गिरावड व मिथाथल या गावांत उत्खनन केलेले आहे. हरियाणातच उत्खनन का? यालाही काही आधार आहे. वैदिक काळापासून लिखित साहित्य आले. ऋग्वेद हा वैदिकांचा पहिला ग्रंथ. त्यात ‘सरस्वती’ नदीचा उल्लेख आहे. ही सरस्वती म्हणजेच ‘घग्गर-हाकरा’ नदी असे अनेक विद्वानांचे मत आहे. हरियाणात या नदीला ‘घग्गर’ म्हणतात व पुढे पाकिस्तानात ‘हाकरा’. सरस्वती नदीचा ऋग्वेदात जो प्रवाह सांगितला आहे, तसाच प्रवाह ‘इस्त्रो’ने जी सॅटेलाईट फोटोग्राफी केली त्यात ‘घग्गर-हाकरा’ नदीचा दिसून आला. त्यामुळे या दोन्ही नद्या एकच असल्याचा निष्कर्ष निघतो. डॉ. शिंदे यांच्या मते ऋग्वेदात सिंधू किंवा यमुना नदीचा उल्लेख येत नाही, पण सरस्वतीचा येतो. ऋग्वेदात शहरांचाही उल्लेख आहे. नदीकाठी शहरं असतात. म्हणजे घग्गर खो:यात शहरे असली पाहिजे असा तर्क असून, त्याआधारे शिंदे यांचे या भागात उत्खनन सुरू आहे. शहरे आजर्पयत केवळ हडप्पन म्हणजे सिंधू संस्कृतीत दिसतात, त्यामुळेच घग्गर खो:यातही सिंधू संस्कृती आहे, असे गृहीतक आहे. 
त्याप्रमाणो या खो:यात वसाहती असल्याचे पुरावे पूर्वी हरियाणा, गुजरातमधील उत्खननात सापडलेही आहेत. राखीगढीत शेतकरी नांगरट करत असताना त्यांना काही भांडय़ाचे तुकडे मिळाले होते. तसेच, हरियाणा सरकारच्या पुरातत्व शास्त्र विभागाने 1997 साली केलेल्या उत्खननात काही मानवी सांगाडे मिळाले होते. त्यामुळे डॉ. शिंदे यांनी राखीगढीवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या मते गुजरात व हरियाणातील उत्खननात जे पुरावे मिळाले त्यांचा कालखंड हा पाच-साडेपाच हजार वर्षार्पयत म्हणजे हडप्पा-मोहेंजोदडोच्याही मागे जातो. यापूर्वी हरियाणाच्या फतेहबाद जिल्ह्यातील भिरडाणा या गावात जे पुरातत्वीय अवशेष मिळाले त्यात कोळशाची ‘कार्बन-14’ ही तपासणी करण्यात आली होती. (कार्बन-14 म्हणजे काय? यासाठी सोबतची चौकट पाहा). या तपासणीत भिरडाणातील अवशेषांचा कालखंड हा इ.स. पूर्व साडेपाच हजार वर्षावर गेला. म्हणजे आजपासून साडेसात हजार वर्षे. फरमाणा, गिरावड व मिथाथल येथेही एवढाच जुना पुरावा मिळाला आहे. राखीगढीतही आता कार्बन-14 ही तपासणी सुरू आहे. जर येथेही तो कालखंड आढळला तर हडप्पा-मोहेंजोदडोच्या आधीची संस्कृती राखीगढी परिसरात होती यावर शिक्कामोर्तब होईल. 
हडप्पाकालीन लिपीचे अजून वाचन झालेले नाही. त्यामुळे या माणसांबद्दल ठोस अशी माहिती मिळत नाही. परंतु राखीगढीत कार्बन-14 तसेच कोरियन शास्त्रज्ञांची मदत घेऊन ‘डीएनए’चा अभ्यास केला जात असल्याने हडप्पा-मोहेंजोदडो यापेक्षाही काही ठोस व ठाम निष्कर्ष हाती येण्याची शक्यता आहे.
शिंदे यांच्या मते राखीगढी येथे जमिनीखाली असलेले संपूर्ण शहर उत्खनन करून बाहेर काढले तर ते कदाचित मोहेंजोदडोपेक्षाही मोठे असू शकेल. तसा प्रयत्न डेक्कन कॉलेज व हरियाणा सरकार करणार आहे. उद्या हे शहर बाहेर आलेच तर भारतीयांना आपल्या देशातच प्राचीन नागरी संस्कृतीचा एक मोठा पुरावा पाहायला मिळणार आहे. आज पाकिस्तानातील हडप्पा-मोहेंजोदडोचा जो इतिहास आहे तो कदाचित भारताकडे राखीगढीत सरकेल. या बाबीमुळे पाकिस्तान काहीसे चिंतेत आहे. भारत जाणीवपूर्वक हा पुरावा मागे नेऊ पाहतेय, असा आरोपही तेथे सुरू झालाय. अर्थात डेक्कन कॉलेजचे मत याबाबत स्पष्ट आहे. ‘आम्हालाही अंतिम सत्य गवसले आहे किंवा सापडेल असा आमचा दावा नाही. उद्या एखाद्या उत्खननात कदाचित यापेक्षाही जुने पुरावे हाती येतील. कदाचित ते पाकिस्तानातही असू शकतील. शेवटी संशोधन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे,’ असे डॉ. शिंदे यांचे म्हणणो आहे. 
पाकिस्तानलाच नाही, तर वैदिक संस्कृती हीच मूळ संस्कृती आहे असा दावा करणा:यांनाही या संशोधनातून धक्का बसण्याची शक्यता आहे. डॉ. आ. ह. साळुंखे व संजय सोनवणी यांच्यासारखे संशोधक वेदाआधीच्या काळापासून सिंधू संस्कृती घडत होती, अशी मांडणी सातत्याने करतात. आता तर सिंधू संस्कृतीचा कालखंड आणखी मागे सरकण्याची शक्यता आहे. म्हणजे राखीगढी वेदाआधीचे आहे, असाही निष्कर्ष निघू  शकेल.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
नऊ टेकडय़ा, 52 स्तर!
हरियाणात हिस्सार हा जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या ठिकाणापासून चाळीस किलोमीटरवर राखीगढी हे साधारण पाच हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावाला लागून असलेल्या 35क् हेक्टरच्या परिसरात डेक्कन कॉलेज व हरियाणा सरकारच्या पुरातत्व विभागाकडून हे उत्खनन सुरू आहे. यावर्षी 15 जानेवारी ते 14 मे असे चार महिने उत्खनन चालले. या कालावधीत गावाजवळील एकूण नऊ टेकडय़ांपैकी तीन टेकडय़ांवर उत्खनन केले गेले. एका टेकडीवर तर 22 मीटर खोलीर्पयत उत्खनन झाले आहे. वेगवेगळे 52 स्तर तेथे आढळले. याचा अर्थ या जमिनीच्या पृष्ठभागावर 52 वेळा बदल झाले. (उदाहरणार्थ मातीवर मुरूम टाकणो, सारवणो, पुन्हा माती टाकणो असे वेगवेगळे स्तर.)  या उत्खननात घरांच्या कच्च्या विटांच्या जाड भिंती, मातीची भांडी, मातीची खेळणी, त्या काळातील मुद्रा, दगडाची वजने, लाल-निळ्या रंगाचे मणी असे साहित्यही मिळाले आहे. धान्यही मिळाले. याशिवाय या गावाची दफनभूमी सापडली असून, त्यात चार मानवी सांगाडे मिळाले आहेत. 
 
काय आहे कार्बन-14 तपासणी?
उत्खननात आढळलेले एखादे शहर किती जुने आहे हे ठरविण्यासाठी कार्बन-14 ही पद्धत वापरली जाते. कोळशात कार्बन-14 हा घटक असतो. या घटकाचे प्रमाण 5 हजार 37क् वर्षानंतर अर्धे होते. हे प्रमाण आज किती आहे ते मोजले की हा कोळसा किती जुना आहे ते कळते. त्यावरून कालखंड काढता येतो. राखीगढीतील उत्खननातून जो कोळसा मिळाला त्याची दिल्लीत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर राखीगढीचे नक्की वय समजेल. 
 
राखीगढीत माणसाचा ‘डीएनए’!
 
डीएनए हा माणसाचे जनुक, थोडक्यात कूळ म्हणजे जन्माचा इतिहास सांगतो. आजर्पयतच्या उत्खननात तत्कालीन माणसांचा डीएनए मिळालेला नाही. त्यामुळे जुनी माणसे कशी होती, त्यांचा वंश मूळचा कुठला याबाबत नक्की अनुमान लावता आलेले नाही. केवळ जे साहित्य आढळले त्यातून जुनी माणसेही वेगवेगळ्या प्रांतात भटकत होती, व्यापार करत होती, साहित्याची आदानप्रदान करत होती याचे अनुमान काढले गेले. उदा. मेसोपोटीया व भारताचा व्यापारी संबंध होता असे काही पुराव्यांवरून दिसते. त्यामुळे राखीगढीतील संशोधनात मानवी सांगाडय़ांतून डीएनए मिळविण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी कोरियन शास्त्रज्ञांची मदत घेतली जात आहे. डीएनएच्या आधारे माणसाचे चित्र रेखाटण्याचे तंत्रज्ञान कोरियन शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. म्हणजे माणसाचा रंग, केस, डोळे, उंची हे सगळे 
दिसू शकते. 3-डी प्रकारात हा माणूस दिसेल. नुकतेच दोन सांगाडय़ांतून डीएनए मिळाले आहेत. त्यामुळे राखीगढीतील हडप्पापूर्वीचा साडेसात हजार वर्षापूर्वीचा माणूस कसा दिसत होता, त्याच्यात व आजच्या हरियाणातील माणसात काही साम्य आहे का? हे समजू शकणार आहे. यापूर्वी डॉ. शिंदे यांना फरमाणा येथील उत्खननात मानवी सांगाडे मिळाले होते. डीएनए हा माणसाच्या शरीरात कोठेना कोठे असतो. परंतु ते सांगाडे शास्त्रीय पद्धतीने योग्य रीतीने हाताळले न गेल्याने डीएनए मिळाला नव्हता. कारण डीएनए लगेच दूषित होतो. राखीगढीत मानवी सांगाडे दूषित होऊ नये म्हणून योग्य काळजी घेतली गेली आहे. मजूर व संशोधक पर्यवेक्षक यांच्याव्यतिरिक्त उत्खननस्थळी कोणालाही जाण्याची मुभा दिली गेली नव्हती. संशोधकांनी सजिर्कल मास्क, ग्लोव्ह्ज, अॅप्रन वापरून जुने सांगाडे बाहेर काढले. 
 
भारतीयांना उत्खननाची संधीब्रिटिश अधिकारी जॉन मार्शल हे भारतीय पुरातत्व विभागाचे महासंचालक असताना हडप्पा-मोहेंजोदडो येथे उत्खनन झाले. अर्थात, पुढे या कामात त्यांना राय बहादूर साहनी, एम. एस. वत्स, आर. डी. बॅनर्जी या भारतीय पुरातत्व शास्त्रज्ञांनी मदत केली. मार्शल यांच्यामुळे हडप्पा, मोहेंजोदडोच्या उत्खननाचे श्रेय ब:याचअंशी ब्रिटिश अधिका:यांकडे जाते. राखीगढीचे उत्खनन पूर्णत: भारतीय शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखाली होत आहे. डॉ. वसंत शिंदे यांना या उत्खननात नीलेश जाधव व हरियाणाच्या पुरातत्व विभागाचे डॉ. रणवीर शास्त्री हे सहाय्य करत आहेत. याशिवाय डेक्कन कॉलेजचे डॉ. सतीश नाईक, डॉ. आरती देशपांडे, संशोधन सहायक पंकज गोयल, प्रतीक चक्रवर्ती, अमिल पेंडाम, आस्था दिब्योपमा, योगेश यादव, नागराजा, मालविका चटर्जी, शाल्मली माळी, कोरियन विद्यार्थी किम अशा अनेक विद्याथ्र्यानाही या उत्खननाचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली आहे. 

 

Web Title: Not Harappa, Rakhihi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.