शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नो दसविदानिया, प्लीज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 03:26 IST

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे कट्टर विरोधक असलेल्या अलेक्झी नवाल्नी यांनी 17 जानेवारी रोजी रशियात पाऊल ठेवताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर संपूर्ण रशिया पेटून उठला आहे...

- विनय उपासनी ताला दोर लावून स्वत:ला फाशी घेण्याचा माझा विचार नाही. किंवा एखाद्या टोकदार चमच्याने स्वत:च्या हाताच्या नसा वा गळा कापण्याचाही विचार माझ्या मनात येत नाही. ते दररोज माझ्यावर लक्ष ठेवून आहेत. माझ्या वजनाचा अंदाज ते घेत आहेत. त्यामुळे मला अचानक हृदयविकाराचा झटकाही येऊ शकत नाही. मानसिक आणि भावनिकदृष्ट्या सध्या मी अत्यंत स्थिर आहे...”-_ अलेक्झी नवाल्नी यांनी २२ जानेवारी रोजी इन्स्टाग्रामवर लिहिलेली ही पोस्ट आहे. त्यात एक अनामिक भीती दडली आहे. एकेकाळी महासत्ता असलेल्या सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर लुळापांगळा झालेल्या रशियाला गतवैभव प्राप्त करून देण्याचे स्वप्न जनतेला दाखविणाऱ्या व्लादिमिर पुतिन यांची कारकिर्द प्रत्यक्षात रक्ताळलेली आहे. आपल्या विरोधात उठणारा आवाज निर्दयपणे दाबून टाकणे हेच त्यांच्या निरंकुश सत्तेचे यशसूत्र! आता अलेक्झी नवाल्नी नावाचे वादळ त्यांच्याविरोधात घोंघावत आहे. या वादळाला शांत करण्याची त्यांची योजना गेल्या वर्षी फसली. परंतु आता सावज स्वत:हून जाळ्यात आले आहे. त्याचे काय करायचे, याचा अत्यंत थंड डोक्याने विचार सध्या क्रेमलिनमध्ये सुरू असेल.तत्पूर्वी... पुतिन यांनी आपल्या विरोधकांना कसे संपवले किंवा संपविण्याचा प्रयत्न केला याची वानगीदाखल उदाहरणे!  सर्गेई स्क्रिपल आणि त्याची मुलगी युलिया. ‘ग्रु’ या लष्करी गुप्तचर संस्थेचा वरिष्ठ अधिकारी असलेल्या सर्गेईला  पुतिन यांची धोरणे पटली नाहीत. त्याने थेट त्यांच्याविरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. मग, स्क्रिपलला खोट्या आरोपाखाली तुरुंगात टाकण्यात आले.  एमआय५ या ब्रिटिश गुप्तचर संस्थेच्या पुढाकारने स्क्रिपलचे हस्तांतरण करण्यात आले. सर्गेईला संपविण्याची खुमखुमी कायम होतीच. ४ मे २०१८ रोजी सर्गेई आणि त्याला भेटायला आलेली युलिया यांच्यावर ब्रिटनमधील सॅलिसबरी येथील एका बगिच्यात विषप्रयोग करण्यात आला. थोडक्यात वाचले दोघेही. त्यांच्यावर नोव्हिचोक विषाचा प्रयोग करण्यात आला होता.मिखाईल खोदोर्कोव्हस्की हे एकेकाळी पुतिन यांचे कट्टर समर्थक. रशियाचे भावी नेते. तेलसम्राट. अगणित संपत्तीचे मालक. मात्र, त्यांची संपत्ती डोळ्यात खुपू लागल्यानंतर २०१५ मध्ये त्यांच्यावर  गुन्हे दाखल करून कारागृहात डांबण्यात आले. पाश्चात्त्य मानवाधिकार संघटनांनी मध्यस्थी करून खोदोर्कोव्हस्की यांना रशियातून बाहेर काढले. आज ते लंडन येथून पुतिन यांच्याविरोधात जनमत तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. बोरिस नेेमत्सोव्ह हेही पुतिन यांचे विरोधक. लोकांचा पाठिंबा असणारे. नेमत्सोव्ह यांना २७ फेब्रुवारी २०१५ रोजी क्रेमलिनच्या बाहेर नदीच्या पुलावर गोळ्या घालून संपविण्यात आले. पुतिन यांचा केजीबीमधील माजी सहकारी अलेक्झांडर लिटविनिन्को. पत्रकार परिषद वगैरे घेऊन त्याने पुतिन राजवटीचे वाभाडे काढले. त्याला अटक करण्यात आली. पुढे तो लंडनला पळून गेला. पोलोनियम-२१० नावाचा विषारी पदार्थ त्याला चहातून चाटविण्यात आला. २३ नोव्हेंबर २००६ रोजी रुग्णशय्येवर तडफडून मेला तो. ॲना पोलित्कोव्हस्काया या धडाडीच्या महिला पत्रकाराने पुतिन राजवटीला जेरीस आणले होते. २००४ मध्ये तिच्यावरही विषप्रयोग करण्यात आला. मात्र, त्यातून ती वाचली. पुढे दोन वर्षांनी ॲनाला गोळ्या घालून ठार मारण्यात आले.  ही यादी अजूनही वाढवता येईल. कारण नवाल्नी यांनी इन्स्टाग्रामच्या पोस्टवर जे लिहिलंय. त्यानुसार अनेकांच्या हत्या या आत्महत्या वाटाव्यात अशा पद्धतीने घडवून आणण्यात आल्या आहेत.आताही..अलेक्झी नवाल्नी यांच्यावर गेल्या २० ऑगस्ट रोजी टोम्स्क ते मॉस्को या विमान प्रवासादरम्यान विषप्रयोग करण्यात आला. त्यांच्यावर व्यवस्थित पाळत ठेवण्यात आली. महिना - सहा महिने नव्हेतर, चांगली दोन - तीन वर्षे. दौऱ्यावेळी नवाल्नी यांचे निवासाचे ठिकाण, तेथे त्यांना भेटायला येणाऱ्या व्यक्ती, चहापानाची वेळ, जेवणाची वेळ, जेवणातील पदार्थ या सगळ्या सगळ्याची इत्थंभूत माहिती रशियाची अंतर्गत गुप्तचर यंत्रणा असलेल्या एफएसबीकडे  तयार असायची.  नवाल्नी यांच्यावर नोव्हिचोकचा प्रयोग करण्याचे निश्चित झाले. टोम्स्क येथे एका हॉटेलात नवाल्नी यांचा मुक्काम होता. या हॉटेलातील लाँड्रीवाल्याची भूमिका एका एफएसबी एजंटवर सोपविण्यात आली. नवाल्नी यांच्या अंतर्वस्त्रावर नोव्हिचोकची पावडर फासायची, एवढीच जबाबदारी! त्याने ती चोख पार पाडली. परिणामी, नवाल्नी यांना विमानातच अस्वस्थ वाटू लागले. पुढील इतिहास सर्वज्ञात आहे. नवाल्नी यांनी स्वत: एका एफएसबी एजंटलाच बोलते केल्यानंतर ही माहिती उजेडात आली. एफएसबीचा एक वरिष्ठ अधिकारी बोलत असून नवाल्नी यांच्यावरील विषप्रयोगाच्या कटाचे दस्तऐवज बनवायचे आहेत, अशी बतावणी करत नवाल्नी यांनी या एजंटला बोलते केले. फसलेल्या कटाचे गांभीर्य विचारात घेऊन अखेरीस त्याने सर्व माहिती फोनवरून नवाल्नी यांना दिली. यूट्युबवर ती ध्वनिफीत  अवघ्या काही तासांत जगभरात व्हायरल होऊन रशियाची व्हायची ती बदनामी झाली. एवढे सारे होऊनही नवाल्नी प्रचंड जोखीम पत्करून पुन्हा मायदेशी परतले आहेत. देशात बदल घडवायचा असेल तर हे धाडस गरजेचे आहे, असे त्यांचे म्हणणे. १७ जानेवारी रोजी मॉस्कोत परतताच विमानतळावरच नवाल्नींना अटक करण्यात आली. त्यानंतरच्या चार दिवसांनी नवाल्नी यांनी इन्स्टाग्रामवर वरील पोस्ट लिहिली आहे.  पुढे काय होईल, याचा तूर्तास तरी नेम नाही... परंतु पुतिन यांच्याविरोधात जनमानस पेटून उठले आहे, हे नक्की. या पार्श्वभूमीवर इतर पुतिन विरोधकांप्रमाणे नवाल्नी यांच्यावरही मायदेशाला दस विदानिया (इंग्रजीत - गुडबाय) म्हणण्याची पुन्हा वेळ येऊ नये इतकेच!vinay.upasani@lokmat.com(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत.)

टॅग्स :russiaरशियाPoliticsराजकारण