अध्यापनाचे नवे दर्शन

By Admin | Updated: July 5, 2014 15:15 IST2014-07-05T15:15:53+5:302014-07-05T15:15:53+5:30

गावागावांमध्ये शिक्षणाविषयीची अनास्था पराकोटीची असते. पत्ते खेळण्यात रमलेले शिक्षक, उवा मारण्यात गर्क झालेल्या शिक्षिका व कुणाचाच वचक नसल्याने व्हरांड्यातच दंगामस्ती करणारी मुलं.. हे शाळेचं वास्तव व अध्यापनाची परिस्थिती पाहता कुणाला काळजी वाटणार नाही?

New philosophy of teaching | अध्यापनाचे नवे दर्शन

अध्यापनाचे नवे दर्शन

- प्रा. डॉ. द. ता. भोसले

शेजारच्या जिल्ह्यातील एका तालुक्याला शिक्षणाधिकारी असलेले नारायण कोळपे घरी भेटायला आले. ते माझे एकेकाळचे आवडते विद्यार्थी; अनेक अडचणींवर मात करीत ते शिकलेले. शिक्षणातूनच चिरस्थायी समाज परिवर्तन होते, यावर त्यांची श्रद्धा असल्याने चांगली नोकरी सोडून शिक्षणाधिकारी झालेले.  एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्याकडे गेल्यावर, त्यांचा आग्रह आणि माझे कुतूहल यापोटी काही प्राथमिक शाळांना भेट देताना त्यांनी मला बरोबर घेतले. शाळांना भेटीगाठी व तपासणी हा त्यांच्या नोकरीचाच एक भाग होता. 
तालुका ठिकाणापासून बर्‍यापैकी दूर असलेल्या आणि आडमार्गावर असलेल्या एका प्राथमिक शाळेच्या प्रांगणात आम्ही पोचलो, तेव्हा सुमारे बारा वाजले होते. लिंबाच्या झाडाखाली दहा-बारा गावकर्‍यांचा घोळका दिसला. थोडे जवळ जाऊन पाहिले, तर तेथे पत्त्याचा डाव रंगलेला होता. काही नोटा आणि नाणी अंथरलेल्या सतरंजीवर पडलेली होती. त्यांना वळसा घालून पुढे गेलो, तर एका वर्गातील मुलांचा गोंधळ नजरेला पडला. काही मुले व्हरांड्यातच दंगामस्ती करीत होते. काही एकमेकांच्या पाठीवर बसून घोडा घोडा खेळत होती. दरवाजाच्या तोंडाशी असलेली मुले सिनेमातली गाणी म्हणत होती. त्या गाण्यावर चड्डी फाटलेला एक पोरगा वेडावाकडा नाचत होता. आणि वर्गात एका कोपर्‍याला मुलींचा चिवचिवाट सुरू होता. आम्ही पायर्‍या चढून वर गेलो. नाच बघणारी दोन मुले समोर येताच त्यांना विचारले, ‘‘अरे, तुमचा वर्ग का चालू नाही? कुठे आहेत तुमचे गुरुजी?’’ त्यावर एका पोराने बोट दाखवत म्हटले, ‘‘ते काय डाव खेळतात.’’ आपल्याकडे पाठ करून बसलेले ते. ‘त्यांना बोलावून आण’ असे सांगताच तो म्हणाला, ‘‘नाय बाबा, आता कुठे डाव रंगात आलाय. मध्येच त्यांना बोलावले तर मलाच बदडतील ते.’’ 
कोळपेसाहेबाने पुन्हा विचारले, ‘‘अन् तुमचे ते दुसरे गुरुजी कुठे आहेत? त्यांना तरी बोलावून बघ. कोळपेसाहेब आलेत असं सांग.’’ क्षणभर तो विचारात पडला. काय उत्तर द्यावे, खरं सांगावे की थाप मारावी, असा भाव त्याच्या चेहर्‍यावर दिसला. क्षणभराने म्हणाला, ‘‘ते थोरले गुरुजी व्हय? खुर्चीत बसल्या बसल्या झोपतात ते. ते तर गेले आठ दिवस आले नाहीत. त्यांचा वर्ग हेच गुरुजी सांभाळतात. हे गुरुजी पुढच्या आठवड्यात गावाला गेले, की त्यांचा वर्ग ते सांभाळतात. दोघांत बोलीच झाली हाय तशी. बसा जराशीक डाव संपला, की येतील आमचे हे गुरुजी. ’’ असं म्हणून जमलेले सारेच विद्यार्थी खेळण्यासाठी शेजारच्या मैदानाकडे पळाले. आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिले अन् हसलो. मी म्हणालो, ‘‘बसू या का एखादा डाव खेळायला?’’ तो हसला. 
शाळेच्या जुन्या इमारतीला लागूनच जिल्हा परिषदेने नव्याने दोन वर्ग खोल्या बांधलेल्या आहेत. त्या वर्गावर वळसा घेऊन जातो तोच एक अपूर्व दृश्य आम्हास बघावयास मिळाले. स्वच्छ सूर्यप्रकाशात एक खेडूतबाई पुढय़ात बसलेल्या एका बाईच्या केसातील उवा मारण्यात गर्क झालेली दिसली. एकाग्र भावनेने चाललेले हे शोध आणि संशोधन; किंवा संशोधन आणि संहारण आम्हाला बघताच एकदम थांबले. कोळपे हळू आवाजात मला म्हणाले, ‘‘नव्याने इथे आलेल्या शिक्षिकेचे हे ‘अध्यापन’ सुरू आहे. बेपर्वाई व बेजबाबदार काम म्हणून एका ठिकाणची तक्रार आल्यावर या ‘ज्ञान-तपस्विनी’ला इथे बदलले आहे. पण या माऊलीची स्वेटर विणणे, पापड करणे, ब्लाऊज शिवणे, अर्धवट राहिलेली घरातील कामे करणे ही कामे काही थांबली नाहीत. मान दुखेपर्यंत आपल्या माथ्यावरच्या जंगलातील प्राणी मारण्याचे  काम यात समाविष्ट करायला हवे!  सर, शपथपूर्वक तुम्हाला सांगतो. मागे मी त्यांच्या वर्गातील मुलांची तपासणी केली, म्हणजे मी तोंडी काही प्रश्न विचारले. गणिते सांगितली. पाचवीत शिकणार्‍या एकाही मुलाला सतराचा पाढा बिनचूक म्हणता आला नाही. तेवढेच नव्हे तर तेराचा पाढादेखील अनेकांना आला नाही. अशा वेळी माझ्या मनात येते, की शिकवणार्‍या शिक्षकाला तरी हा पाढा येत असेल का? वर्गातल्या एका विद्यार्थ्याला उभे करून मी विचारले- ६७ आणि २८ यांच्या बेरजेतून १७ वजा केल्यावर खाली बाकी किती असेल? पाच मिनिटे तो पोरगा नुसते ओठ हलवत होता. त्याला उत्तर सांगता आले नाही. मग मी सार्‍या वर्गालाच ही बेरीज-बजाबाकी विचारली. फक्त दोन-तीन मुलांना बरोबर उत्तर सांगता आले. आता या जागतिक स्पर्धेत या मुलांची आयुष्ये बेरजेत धरली जातील का?.. याच मॅडमच्या वर्गावरचा हा अनुभव नाही. जिल्हा परिषदेतल्या जवळ जवळ सार्‍याच शाळांचा हा अनुभव आहे. काही शाळा आणि शिक्षक अपवाद म्हणून वेगळ्या काढता येतील इतकेच.  ..अशा या तीव्र स्पर्धेत या लाखो मुलांच्या भवितव्यात काय लिहिले असणार ? यांच्या तळहातावर उद्याचा काळ कोरेल ते फक्त शून्य. शून्य आणि शून्यच : या निष्पाप पोरांचं आयुष्य आणि समाज व देशाची होणारी हानी कशात मोजायची आपण?’’
आम्हाला पाहताच नेकीने चाललेले हे संशोधन अचानक थांबले. माथ्यावर घेतलेल्या पदराचे टोक, नमस्कारासाठी जोडलेल्या दोन्ही हातात घेऊन मॅडमनी कमालीच्या आदबीने आम्हाला नमस्कार केला. स्वागत केले. ऐसपैस देहविस्तार असलेल्या त्या खेडूतबाईला पाणी आणि चहा आणण्यासाठी त्यांनी लगबगीने पाठविले. बाहेर आणलेल्या खुच्र्यावर आम्ही स्थानपन्न होतो न होतो तोच त्या म्हणाल्या, ‘‘आताच दहा-बारा मिनिटांपूर्वी वर्ग सोडला. दहा मिनिटांची छोटी सुट्टी असते ना, त्यासाठी त्याआधी मी सलग दोन तास शिकवत होते. वाटल्यास वर्गातल्या मुलींना विचारून बघा. एवढेच नव्हे तर शेजारचा वर्गही मी सांभाळला.’’ थोड्याशा चिडलेल्या स्वरात कोळपे म्हणाले, ‘‘तुम्ही खरे बोललात. तुम्ही वर्ग सांभाळलाच असणार. कोंडवाड्यात जनावरं कोंडतात तशी वर्गात मुले कोंडून बाहेरून तुम्ही दरवाजा बंद केला असणार. दरवाजा कोणी उघडू नये याचा तुम्ही सांभाळ केला इतकेच.. अन् या वर्गावरचे शिक्षक कुठं गेलेत?’’ हे शेवटचे वाक्य त्यांनी जरा दरडावूनच विचारले. त्यावर या मॅडम म्हणाल्या, ‘‘तुमच्या शिक्षणखात्यानं पहिला माणूस बदलून गेल्यापासून या शाळेवर दुसरा शिक्षक नेमलाच नाही! आपल्या सभापतीला दोन -तीन पत्रे पाठवली. भेटही घेतली. त्यामुळे हा वर्गसुद्धा आम्हीच शिकवितो.’’ हे उत्तर ऐकताच घासलेल्या गारगोटीचा चटका बसावा तसे कोळपेसाहेबांना झाले. त्यांचे प्रशासनही किती उदासीन व अकार्यक्षम आहे. हेच या शिक्षिकेने दाखवून दिले. 
तेवढय़ात डाव संपल्याने मोकळे झालेले गुरुजी धावत आले. त्यांना मुलांनीच आधी सांगितले असावे. आल्या आल्या दोघांच्याही पायांना स्पर्श करीत त्यांनी नमस्कार केला. हात जोडून अजिजीने म्हणाले, ‘‘चला साहेब नाष्टा तयार आहे. तो झाल्यावर शाळेची तपासणी करा आणि तुमच्यासाठी स्पेशल गावठी कोंबडीचा झणझणीत बेत केला आहे. त्याचा छानपैकी आस्वाद घ्या.. दोन-तीन तास शिकवून थोडासा कंटाळलो होतो. त्यातच गावकर्‍यांना एक  भिडू कमी पडत होता- इच्छा नसताना त्यांच्या आग्रहाखातर मला खेळायला बसावे लागले. एरव्ही मी सहसा तिकडे फिरकतसुद्धा नाही. चला, नाष्टा थंड व्हायच्याआधी घेतला पाहिजे.’’
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून, मराठी भाषा, लोकसंस्कृती यांचे ज्येष्ठ अभ्यासक व 
नवृत्त प्राचार्य आहेत.)

Web Title: New philosophy of teaching

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.