शिक्षणाचे नवे दर्शन

By Admin | Updated: September 6, 2014 15:09 IST2014-09-06T15:09:47+5:302014-09-06T15:09:47+5:30

एका गांधीभक्ताने आदिवासी विभागात एक शाळा सुरू केली. जनावरांच्या मागे फिरणारी, शिकारीसाठी वणवण भटकणारी आणि कंदमुळे, मध, जंगलसंपत्ती गोळा करणारी शेकडो मुले पहिल्यांदाच सरस्वतीच्या वीणाझंकारामुळे नव्या जगात वावरू लागली. या शाळेने मूल्यांचा एक नवा आदर्श प्रस्थापित केला. त्याची ही कहाणी..

New philosophy of learning | शिक्षणाचे नवे दर्शन

शिक्षणाचे नवे दर्शन

 प्रा. डॉ. द. ता. भोसले

 
स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊन कारावास भोगलेल्या आणि देश स्वतंत्र झाल्यावर राजकारणाचा त्याग करून समाजसेवा करणार्‍या एका गांधीभक्ताने आदिवासी भागात एक महाविद्यालय सुरू केले. त्यासाठी त्यांनी स्वत:ची जमीन विकून पैसा उभा केला. जवळ असलेली थोडी पुंजी वापरली आणि त्या भागातल्या जाणकार, शिक्षणप्रेमी आणि शिक्षणक्षेत्रात नोकरी करणार्‍या मंडळींना यात सहभागी करून घेतले. त्यांनीही मनापासून सहकार्य केले आणि सर्वांच्या सेवावृत्ती, समर्पणवृत्ती आणि ज्ञानोपासना यामुळे एक आदर्श विद्या केंद्र म्हणून त्याचा विकास केला. लौकिक वाढविला. जनावरांच्या मागे फिरणारी, शिकारीसाठी वणवण भटकणारी आणि कंदमुळे, मध, जंगलसंपत्ती गोळा करणारी शेकडो मुले पहिल्यांदाच सरस्वतीच्या वीणाझंकारामुळे नव्या जगात वावरू लागली. आपल्या मातीमोल जीवनाला आकार देण्यास सर्मथ बनली. संस्थेस स्थैर्य येताच  या गांधीभक्ताने तालुक्यातील सर्व शिक्षणप्रेमींच्या हातात कॉलेजचा कारभार दिला. अट एकच घातली- अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, सेक्रेटरी अथवा मार्गदर्शक असे कोणतेही पद न ठेवता सर्वांनी मिळून एकमताने सर्व निर्णय घ्यायचे. संस्थेच्या पैशाचा चहासुद्धा न घेता संस्थेचा कारभार चोख आणि प्रामाणिकपणे करायचा. देवाला अर्पण केलेला पैसा चोरणे जसे पाप मानले जाते, तसे संस्थेचे पाच रुपये घेणे वा खाणे हे पाप मानायचे आणि सर्वांनीच ही प्रतिज्ञा मनापासून पाळली. 
 एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अशा या कॉलेजला मला भेट देण्याची संधी मिळाली. कार्यक्रमात डामडौल नव्हता; पण त्या साधेपणातही सौंदर्य व सामर्थ्य जाणवले. रात्री मुक्काम केल्यावर तर विश्‍वास बसणार नाहीत, अशा अनेक गोष्टी मला समजल्या. परिसरातील प्रत्येक नोकरदार या कॉलेजला आणि नव्यानेच सुरू केलेल्या विद्यालय व वसतिगृहाला स्वत:हून आणि कर्तव्यभावनेने एक दिवसाचा पगार देतो. तोही वर्षातून दोन वेळा. परिसरातील प्रत्येक नोकरदार आपल्या घरातल्या विवाहानिमित्ताने या संस्थेला वस्तुरूपाने भेट देतो. कुणी पाण्याची टाकी देतो, कुणी भांडी व सतरंज्या देतो, कुणी संस्थेला लागणारे फर्निचर देतो, कुणी खेळांचे साहित्य देतो. समजलेली आणखी एक गोष्ट म्हणजे या परिसरातील काही विद्याप्रेमी मंडळी माध्यमिक मुलांना दप्तर, गणवेश, शालेय वह्या, चपल्स अशा वस्तू भेट देतात आणि महाविद्यालयातील प्राध्यापक व शाळेतील शिक्षक आपल्या विवाहाच्या वाढदिवसानिमित्त वसतिगृहातील विद्यार्थ्यांना जेवण देतात. त्यांच्यासमवेत वाढदिवस साजरा करतात. कुणी तरी असं म्हटलेलं जन्मत:च मलिन असलेल्या ‘स्व’ला विशुद्ध करणं आणि त्याचा परिघ ‘स्व’पासून ‘सर्वस्व’पर्यंत विस्तारणे म्हणजे शिक्षण’. दुसर्‍या शब्दांत मी असं म्हणेन, की एका हातानं घ्यावं आणि दोन्ही हातांनी समाजाला द्यावं, याची जाण म्हणजे खरं शिक्षण. हे शिक्षण मला या संस्थेत दिसलं. लोकांच्या वागण्यातून दिसलं. रात्री वसतिगृहातील मुला-मुलींच्या समवेतच आमचे जेवण झाले. त्यांचे स्वावलंबन, शरीरश्रमाविषयी त्यांना वाटणारी आस्था, स्वत:च्या खोल्या आणि सारा परिसर विद्यार्थ्यांनीच स्वच्छ करण्याची स्पर्धा; प्रत्येक मुलाने एकतरी रोप लावून त्याचे संगोपन करण्याची घेतलेली शपथ; त्यांची एका सुरात म्हटलेली सायंकाळची प्रार्थना, तिथलं प्रसन्न व मोकळे वातावरण या गोष्टी मी बारीक नजरेनं टिपून घेत होतो. मनातल्या मनात साठवून ठेवत होतो. तसेच शहरी भागातल्या शाळा आणि विद्यार्थी यांचे वागणे, बोलणे यांच्याशी तुलना करीत होतो. आम्ही शतपावली करण्याच्या निमित्ताने कॉलेजला लागून असलेल्या टेकडीकडे निघालो. माझ्याबरोबर चार-पाच प्राध्यापकही होते. आम्ही बोलत चाललो असतानाच साधारणत: चौदा-पंधरा वर्षांचा मुलगा तोंडातल्या तोंडात काहीतरी चघळत वसतिगृहाकडे चाललेला दिसला. मी सहज बोलून गेलो, ‘‘जेवल्यानंतर हा गडी तंबाखू चघळण्यात रंगून गेलेला दिसतोय.’’ तेवढय़ात शेजारचे इतिहासाचे प्राध्यापक म्हणाले, ‘‘नाही सर, आमच्या तिन्ही शाखांमधील कुठलाच विद्यार्थी तंबाखू खात नाही- तंबाखू खाणार नाही.’’ मी पुन्हा विचारले, ‘‘कशाच्या जोरावर तुम्ही एवढे आत्मविश्‍वासाने सांगता?’’ त्यावर त्यांनी  असे सांगितले की, आदिवासी आणि बिगर आदिवासी अशी सत्तर टक्के मुले आधी तंबाखू खात होती. वर्गातही तंबाखू खाऊन बसायची. सार्‍या वर्गाचा उकिरडा करायची. आम्ही सारे प्राध्यापक व प्राचार्य यांनी खूपदा सांगून पाहिले, नोटीस लावली, शिक्षाही केली, तरीही फारसा उपयोग झाला नाही. दात आल्यापासून बापाबरोबरच तंबाखू खाण्याची त्यांची सवय  सुटेना. शेवटी आम्ही सार्‍या मुलांना एकत्र केले आणि सांगितले, ‘‘तुम्ही तंबाखू न खाण्याची शपथ घेतल्याशिवाय आम्ही एकही तास घेणार नाही. विद्यापीठाच्या परीक्षेचा फॉर्म घेणार नाही आणि शिक्षा म्हणून आम्ही सारे प्राध्यापक आणि प्राचार्य उपोषणाला बसू. यामध्ये एखादा मेला तरी चालेल. कितीही दिवस लागले तरी आम्ही उपोषण सोडणार नाही.’’ आणि आश्‍चर्य असे की, तीन-चार दिवसांतच सार्‍या मुलांनी  आम्हाला शपथपूर्वक लेखी आश्‍वासन  दिले. समक्ष भेटून प्रतिज्ञा केली.’’ कोवळी मुले शिक्षेपेक्षा प्रेमाने बदलतात. गांधीमार्गाने मन परिवर्तन करता येते, याचा एक आदर्शच त्यांनी माझ्यासमोर ठेवला. या प्रयोगाने मी खूप प्रभावित झालो. 
नंतर इतर गोष्टी बोलता बोलता या प्राध्यापकांनी त्यांच्या महाविद्यालयात मुलांना समृद्ध व्यक्तिमत्त्वाचा आदर्श नागरिक घडविण्यासाठी कोणते उपक्रम राबवितात याची थोडक्यात माहिती दिली. हे सर्व प्राध्यापक सेवावृत्तीने काम करणारे, देश घडविण्याच्या ध्येयाने प्रेरित झालेले, घड्याळावर लक्ष न ठेवता काम करणारे, गुणविकास, कौशल्याचा विकास, व्यक्तिमत्त्वविकास आणि सामाजिक बांधिलकीचे भान मुलांमध्ये निर्माण करण्यासाठी अध्यापन म्हणजे देवपूजा मानणारे असे होते. त्यांनी मुलांना नव्या जगाची, शाश्‍वत मूल्यांची आणि लढण्याची जिद्द संपादन करण्याची भूमिका घेतलेली दिसली. पावसाळ्यापूर्वी डोंगराच्या उतारावर नाना प्रकारच्या बिया टाकण्यापासून तो बापाचे दारूचे व्यसन बंद करण्यापर्यंतचे सारे प्रयोग या विद्यार्थ्यांनी तडीस नेले होते. 
दुसर्‍या दिवशी भारावलेल्या मनाने सार्‍यांचा निरोप घेऊन परतीच्या प्रवासाला निघत असतानाच एक आदिवासी विद्यार्थिनी मला नमस्कार करण्यासाठी जवळ आली. न राहवून मी विचारले, ‘‘नाव काय तुझे?’’ ‘‘माया’’ तिने उत्तर दिल्यावर पुन्हा मी ‘‘कुठल्या वर्गाला आहेस? गुण किती पडले आणि तुला काय काय येते?’’ असे प्रश्न आपले सहज विचारावयाचे म्हणून विचारले. त्यावर तिने सांगितले की, ती बी.ए.ला असून प्रथम श्रेणीचे गुण मिळाले. नंतर म्हणाली, ‘‘सर, मी धावण्याच्या शर्यतीत नंबर काढलाय. मी ट्रेकिंगला जाते. मला प्रथमोपचाराची माहिती आहे. बिनधुराची चूल करायला शिकले. मला ढोल वाजवता येतो आणि आता मी संगणक शिकणार आहे. आमचे सारे सरच आम्हाला प्रोत्साहन देतात.’’ माझ्या मनात आले, व्यक्तीचा विकास, समाजाची प्रगती, मूल्यांची उपासना, आणि कौशल्याची जाणीव करून देणारा शिक्षक हा देशाचा, मुलांचा, समाजाचा शिल्पकार आहे. नायक आहे. उपासक आहे. 
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून, मराठी भाषा, लोकसंस्कृती यांचे ज्येष्ठ अभ्यासक व निवृत्त प्राचार्य आहेत.)

Web Title: New philosophy of learning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.