निव्वळ कवी माणूस...

By Admin | Updated: September 27, 2014 15:19 IST2014-09-27T15:19:19+5:302014-09-27T15:19:19+5:30

कवी शंकर वैद्य यांचं कवितेवर निस्सीम प्रेम होतं .. त्यांचा स्वभाव अंतर्मुख होता आणि आयुष्यभर कविता हीच त्यांची खर्‍या अर्थानं सोबतीण होती. स्वत:च्या निर्मितीइतकंच इतरांच्या कवितेचं सौंदर्यर्मम उलगडणं त्यांना महत्त्वाचं वाटायचं. त्यामुळेच संपादनातही त्यांनी त्यांचा वेगळा ठसा उमटवला. असा हा ज्येष्ठ कवी नुकताच काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या जागवलेल्या आठवणी..

Net poet ... | निव्वळ कवी माणूस...

निव्वळ कवी माणूस...

- डॉ. अरुणा ढेरे

 
शंकर वैद्यांचं जाणं तसं अचानक नव्हतं. वय ८६ वर्षांचं तर होतंच; पण सोबतीला सततचं क्षीण होत जाणं आणि एकटेपणही होतं. विशेषत: बाई म्हणजे सरोजिनीबाई गेल्यानंतर ते एकटेपण वाढलेलंच होतं. मुलगा एकच आणि तोही परदेशी. हे व्यावहारिक जगातलं वास्तव तर होतंच; पण खरं तर ते एकटेपण अंतर्यामीचंच होतं. वैद्य तसे फार लौकिक जगामध्ये रमलेले, प्रकाशझोतात असलेले किंवा व्यावहारिक वाड्मयीन व्यवहारात गुंतलेले असे नव्हते. त्यांचा स्वभाव अंतर्मुख होता आणि आयुष्यभर कविता हीच त्यांची खर्‍या अर्थानं सोबतीण होती. 
मी वैद्य सरांना प्रथम भेटले ती माझ्या महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळामध्ये. त्या वेळी मला आणि माझ्यासारख्या इतर काही मित्रमैत्रिणींना कविता नुकती-नुकती भेटलेली होती. कवितेची धुंदी, बेहोशी, तिचं आकर्षण आमच्यावर चढलेलंच होतं. अशा काळात ‘कालस्वर’ हा वैद्यांचा पहिला संग्रह हाती आला. पॉप्युलर प्रकाशनानं काढलेली ती ‘नवे कवी, नवी कविता’ या नावाची कवितासंग्रहांची मालिकाच होती. वैद्यांचा संग्रह त्या मालिकेतला चौथा संग्रह. आजही मला त्या संग्रहातील पहिली कविता तेव्हा जशी वाचली होती, तशी आठवते. धागा नावाची ती कविता होती. 
विश्‍वी पावलोपावली बीजे जन्मांची सांडली 
पाय पाय टाकताना त्यांची फुले फुले झाली
अशा ओळींनी ती कविता सुरू झाली होती आणि तिचा शेवट मला आठवतो -  
जन्म जन्म वेचताना आलो आदिबिंदूतून 
तुला फुलांची त्या शय्या संगतीस माझे मन 
त्या वेळी या पहिल्या कवितेपासूनच त्या संग्रहात मन गुंतत गेलं होतं. 
किती पाहू किती घेऊ 
सारी घेऊन उपाशी 
सारे देऊन कशी तू 
पुन्हा नव्याने भरशी 
असा प्रश्न विचारणारी वैद्यांच्या कवितेतली ती त्या वेळी मनात कशी कायमची वसतीला आली होती. पुढे शांताबाई शेळक्यांबरोबर मराठी प्रेमकविता संग्रहित करताना ‘अभिषेक’ नावाची वैद्यांची कालस्वरमधलीच कविता आम्ही निवडली होती. रतिक्रीडेचा अनुभव अतिशय कुलवंत शब्दांत वैद्यांनी त्या कवितेत मांडला होता. 
वैद्यांच्या सगळ्याच कवितेत एक अभिजात कूलीनपणा होता. वृत्तछंदांचा गोडवा होता. नाजूक अनुभवांना तितक्याच अलवारपणे उचलण्याची त्यांची कुशलता त्यांच्या पुढच्या कवितांमध्येही जाणवत राहिली होती. काळाचा एक मोठा पट आणि त्यावर चाललेला जन्ममृत्यूंचा खेळ असा एक संदर्भ नेपथ्यासारखा वैद्यांच्या कवितेला कायमचा होता. 
पुढे जेव्हा सरोजिनी आणि शंकर वैद्य असे दोघेही जण परिचयाचे झाले, तेव्हा आम्ही परस्परांच्या घरी येऊ-जाऊ लागलो. वैद्य सर तेव्हा जास्त जवळून भेटले. त्यांच्या स्वभावात असलेला जिव्हाळा आणि मार्दवाचा एक धागा अनुभवाला येत गेला. अनेकदा मुंबई कविसंमेलन असायचे. मुंबईत माझ्या परिचयाचं किंवा नात्यातलं कुणीच नव्हतं. पुण्याहून कविसंमेलनासाठी जाणं आणि कार्यक्रम संपवून रात्री परतणं अनेकदा अवघड असायचं. सुरुवातीला एकदोनदा माझ्या जुजबी परिचयाच्या एखाद्या घरी मी उतरलेली असायची. तिथवर कार्यक्रमानंतर वैद्य मला अगत्यानं पोचवायला यायचे. एकदोनदा त्यांच्याही घरी ते मला घेऊन गेले होते. यात ते काही फार विशेष करीत होते, असं ते कधी जाणवूही द्यायचे नाहीत. पण, मला मात्र त्या अडचणींच्या दिवसांमध्ये त्यांचा तो जिव्हाळा फार मोलाचा वाटायचा. 
किती तरी वेळा अनेक दज्रेदार संमेलनांमधून वैद्यांबरोबर मी कवितावाचन केलं. त्या-त्या वेळी व्यासपीठावर बसलेली त्यांची शांत, अबोल मूर्ती मला आजही लख्ख आठवते. कार्यक्रमाआधी आणि कार्यक्रमानंतरही वैद्य कधी वाड्मयीन गावगप्पांमध्ये रमले नाहीत. ते कवितेत होते. कवितेतच असायचे. बोलणं व्हायचं. अगदी भरभरून व्हायचं; पण ते कवितेविषयीच. त्या अर्थानं वैद्य हे अंतर्बाह्य कवी होते. निव्वळ कवी माणूस. मराठीतली नवी-जुनी कविता त्यांना माहीत होती, बरीचशी तोंडपाठही होती. ते पाठांतर तोंडापुरतं नव्हतं. कवितांचा आस्वाद हा जाणकारीनं त्यांनी घेतलेला असायचा. 
एका अर्थी वैद्य कवी होते तितकेच किंबहुना त्याहूनही अधिक सरस असे कवितेचे अभ्यासक होते, आस्वादक होते. त्यांचं कवितेवर प्रेम होतं. अगदी एखाद्या प्रियकराचं- निष्ठावंत प्रियकराचं आपल्या प्रेयसीवर असावं तसं प्रेम होतं. कवितेचं बाह्यरूप ते जितक्या प्रेमानं न्याहाळत असत, तितक्याच प्रेमानं ते तिचं अंतरंग जाणून घेत असत. त्यामुळे सहजपणे मराठीतल्या कोणत्याही कवीविषयी किंवा कवितेविषयी बोलणं निघालं, तर त्या कवितेचे शब्द, त्या शब्दांचा न्यास, त्या कवितेचा घाट आणि एकूणच अभिव्यक्तीची तर्‍हा यांच्याविषयी वैद्य ज्या र्ममज्ञतेनं बोलायचे, त्याच र्ममज्ञतेनं ते त्या कवितेच्या अर्थगुणांविषयी बोलायचे. 
मी त्यांना काही वेळा वाड्मयाच्या विद्यार्थ्यांसमोर बोलताना ऐकलं आहे आणि कविता शिकवावी तर वैद्यांनीच, असं मला त्या-त्या वेळी वाटून गेलं आहे. ते प्राध्यापक होते; पण सगळेच प्राध्यापक उत्तम शिकवू शकतात, असं नाही. मराठी कवितेची गोडी एखाद्या अरसिक विद्यार्थ्यालाही लागावी इतक्या सुंदर रीतीनं कविता उलगडून दाखवणारा वैद्यांसारखा शिक्षक जर भेटला तर काय होऊ शकतं, याचं उत्तम उदाहरण त्या समोरच्या श्रोत्यांकडे-विद्यार्थ्यांकडे पाहताना मला दिसतं आहे, असं वाटायचं. 
वैद्यांचं बोलणं हळू, मृदू, सहसा कुणाला न दुखावणारं. वाड्मयीन मतभेद त्यांच्या संदर्भात असलेच तरी ते मांडण्याची त्यांची तर्‍हा नेहमी सौम्य, मवाळ असायची. त्यामुळे वैद्य सर कुणावर टीका करताहेत, कुणाविषयी अनुदारपणे बोलताहेत असं अनुभवाला येणारा एकही माणूस मला वाटतं सापडायचा नाही. त्या अर्थानं ते वाड्मयविश्‍वामध्ये उदार आणि कदाचित त्यामुळेच अजातशत्रूही होते. 
वैद्यांचं कवितेवर निस्सीम प्रेम होतं, याचा आणखी एक समृद्ध असा पुरावा म्हणजे त्यांनी केलेली उत्तम संपादनं. स्वत:च्या निर्मितीइतकंच इतरांच्या कवितेचं सौंदर्यर्मम उलगडणं त्यांना महत्त्वाचं वाटायचं. त्यामुळे कुसुमाग्रजांच्या कवितेचं त्यांनी केलेलं संपादन- प्रवासी पक्षी, इंदिरा संतांच्या कवितेचं संपादन- मृण्मयी किंवा मनमोहन नातूंच्या कवितेचं संपादन- आदित्य यासारखी त्यांनी केलेली संपादनं अतिशय रसाळ आणि तितकीच अभ्यासपूर्ण अशी झालेली आहेत. त्यांच्या कवितालेखनाइतकंच त्यांचं हे काम त्यांच्या कवी असण्याचा एक अविभाज्य अंश होता. 
वैद्य बहुधा त्यांच्या समवयस्क कवींमध्ये फारसे रमले नसावेत. आयुष्याच्या उत्तरार्धात अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे यांच्यासारखे तरुण कवी त्यांना वारंवार भेटत असत. त्यांच्याशी आणि फोनवर किंवा प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी कवितेवर संवाद साधणार्‍या कुणाशीही त्यांची चांगली मैत्री होत असे. माझ्या आठवणीत १९८८चा ललित मासिकाचा कविता विशेषांक आहे. त्याचं संपादन शंकर वैद्य यांनी केलं होतं. त्या वेळी कवितेवर ज्यांचं लेखन त्यांनी मागवलं होतं, त्या सर्वांना त्यांनी पाठवलेली एक प्रदीर्घ प्रश्नावली अजून माझ्या आठवणीत आहे. ती प्रश्नावली म्हणजे वैद्यांनी कविता किती बारकाईनं वाचली होती, तिच्याविषयी त्यांनी किती तपशीलवार विचार केला होता, याचं एक सुंदर उदाहरण होतं. 
आज वैद्य सोबत नाहीत. वय झालं होतं, क्षीणता होती, ही वस्तुस्थिती लक्षात घेतली तरी कवितेच्या क्षेत्रात गांभीर्यानं, मन:पूर्वक आणि निष्ठेनं वावरणारा एक ज्येष्ठ कवी-मित्र गेला याचं दु:ख मनात आहेच. वारंवार प्रत्यक्ष भेटी झाल्या नाहीत, तरी अलीकडच्या काळात मी फोनवरून सतत त्यांच्या संपर्कात होते. त्यांचा आवाज, त्यांनी जिव्हाळ्यानं केलेली चौकशी आणि त्यांनी पुरवलेले कवितेचे संदर्भ आता असणार नाहीत. संवादाची एक जागा कायमची मिटली आहे. कित्येक वेळा नात्याच्या माणसांपेक्षाही अशा माणसाच्या जाण्याचं दु:ख हे अधिक खोलवर सलत राहतं. ते आपल्या लिहिण्याशी- जगण्याशी निगडित असतं. 
नवे कवी कविता लिहिताहेत, लिहीत राहतील. रिकाम्या जागा पुन्हा भरून निघतील. काळ कुणासाठी थांबत नाही. हे सगळं खरं असलं, तरी एक धागा तुटलाच आहे. 
तू झेंडुची फुले ओवत होतीस 
ओवता ओवता सगळा धागाच केशरी होत गेला 
तुझ्या-माझ्या संबंधांबद्दल 
मला एवढंच सांगायचं आहे 
अशी कविता लिहिणारे वैद्य सर तो धागा कवितेतून तसाच ठेवून गेले आहेत, एवढाच दिलासा. 
 
(लेखिका ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)

Web Title: Net poet ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.