शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
2
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
3
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
4
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
5
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
6
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
7
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
8
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
9
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
10
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
11
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
12
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
13
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
14
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
15
Mumbai: १४ वर्षाच्या मुलीशी लग्न करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल
16
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
17
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
18
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
19
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
20
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा

ब्रिटीश कोलंबियात रंगलं संगीत नाटक; व्हॅन्कुवर मराठी मंडळानं सादर केलं 'पती गेले गं कोठेवाडी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 17:40 IST

“अगं आम्ही या शनिवारी व्यंकटेश माडगूळकरांनी लिहिलेलं ‘पती गेले गं काठेवाडी’ हे दोन अंकी नाटक बघायला चाललोय. तुम्ही पण ...

“अगं आम्ही या शनिवारी व्यंकटेश माडगूळकरांनी लिहिलेलं ‘पती गेले गं काठेवाडी’ हे दोन अंकी नाटक बघायला चाललोय. तुम्ही पण येताय ना?” असा संवाद जर तुमच्या कानावर पडला आणि तुम्ही महाराष्ट्रातल्या एखाद्या शहरात आहात असं तुम्हाला वाटलं तर त्यात तुमची काहीही चूक नाही. अहो कारण भारताबाहेर असे संवाद कानावर पडणं जरा दुर्मिळच. पण हा समज आम्ही म्हणजेच कॅनडामधल्या ब्रिटीश कोलंबिया राज्यातील व्हॅन्कुवर मराठी मंडळाने (मराठी सोसायटी ऑफ ब्रिटीश कोलंबिया) खोटा ठरवला. कारण १० फेब्रुवारी २०२४ला आमच्या मंडळाने ‘पती गेले गं काठेवाडी’ या दोन अंकी संगीत नाटकाचा देखणा प्रयोग सादर केला. २४-२५ कलाकारांच्या मोठ्या समूहाने ४ ते ५ महिने घेतलेली अथक मेहनत रंगमंचावर दृश्यस्वरुपात साकारताना पाहणं हा प्रेक्षकांसाठी डोळ्यांना आणि कानांना सुखावणारा अनुभव होता. 

स्वतःचीच पाठ स्वतः थोपटून घेणे हा या लेखाचा हेतू अजिबात नाही तर भारताबाहेर अशी एखादी कलाकृती निर्माण करताना येणारे अनुभव, होणार्‍या गमतीजमती, येणार्‍या अडचणी किंवा अडथळे आणि या सगळ्यानंतर रंगमंचावर प्रयोग साकारताना पाहताना मिळणारं कमालीचं समाधान हे सगळं आजच्या सोशल मीडियाच्या भाषेत सांगायचं झालं तर तुमच्याशी शेअर करावंसं वाटलं म्हणून हा लेखनप्रपंच. तर त्यासाठी आधी थोडंसं मागे जाऊया...

माणूस पोटापाण्यासाठी आपली जन्मभूमी सोडून कर्मभूमी शोधत दुसर्‍या देशात आला तरी तो आपली कला सोबत घेऊनच येतो. आमच्या शहरातही गायन, वादन, नृत्य, अभिनय, नेपथ्यकला अशा विविध कला घेऊन भारतातून अनेक जण इथे आले व महाराष्ट्र मंडळाशी जोडले गेले आणि मग एक दिवस या सगळ्यांना एकत्र आणून काही सुंदर कलाकृती निर्माण करता येईल का? या विचारातून संगीत नाटक करायच्या विचारांचं बीज मनात रुजलं. पण या बीजाचा वृक्ष होण्याची प्रक्रिया वाटते तितकी सोपी नव्हती. त्यासाठी बर्‍याच आव्हानांना पार करावं लागणार होतं पण इच्छा असली ना मार्ग दिसत जातात फक्त त्यासाठी कष्ट घ्यायची तयारी असायला हवी.

संगीत नाटक म्हटलं की अर्थात संगीत ही त्यातली सगळ्यात महत्वाची बाजू. ती खंबीर असायलाच हवी. त्यामुळे या नाटकातली गाणी बसवण्याची प्रक्रिया सगळ्यात आधी सुरू झाली. इथे गुणी गायक-वादक असतात पण ते त्यांच्या उपजिविकेचं साधन नसल्यामुळे सगळ्यांचा तेवढा रियाज असेलच असं सांगता येत नाही. पण या नाटकातली गाणी बसवण्यासाठी गायक-वादकांनी  नोकरी आणि घर सांभाळणे ही तारेवरची कसरत करत जवळजवळ ३ ते ४ महिने वेळ दिला, कष्ट केले. त्याचवेळी एकीकडे कलाकारांचा शोध सुरु होता, मनासारखे कलाकार मिळाल्यावर नाटकातल्या गद्य प्रवेशांचीही तालीम सुरू झाली. जोपर्यंत या गद्य आणि पद्य तालमी समांतरपणे सुरु होत्या तोपर्यंत गोष्टी त्यामानाने सोप्या होत्या पण जेव्हा एकत्रितपणे तालमी करायची वेळ आली तेव्हा २० पेक्षा जास्त लोकांच्या वेळेची उपलब्धता बघून त्यांची मोट बांधणे ही किती कठीण गोष्ट असेल याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. त्याचबरोबर बर्‍याच वेळा मूळ संहिता ही ज्या काळात लिहिली गेली असेल त्या काळाप्रमाणे कधीकधी खूप मोठी असते पण इथल्या प्रेक्षकांना रुचेल त्यानुसार आणि साधनांच्या उपलब्धतेनुसार त्यात लेखकाच्या किंवा त्या संहितेचे हक्क ज्यांच्याकडे असतील त्यांच्या परवानगीने वेळप्रसंगी बदलही करावे लागतात.      

   

नाटकाच्या तालमी एकीकडे जोरात सुरू होत्या पण नाटकात पेशवाईचा काळ दाखवला गेल्यामुळे त्या काळाला साजेशी वेशभूषा आणि नेपथ्यनिर्मिती करणे हे शिवधनुष्य उचलण्यासारखं होतं. कारण तसा कपडेपट आणि नेपथ्यासाठी लागणार्‍या गोष्टी परदेशात उपलब्ध नसतात. त्यामुळे कपडेपट भारतातून मागवणे आणि नेपथ्य स्थानिक कलाकारांनी तयार करणे याला पर्याय नव्हता. मग यासाठीही लोकं कामाला लागले. प्रत्येकाच्या मापाप्रमाणे आणि गरजेप्रमाणे बाराबंद्या, अंगरखे, शेले, पगड्या, फेटे या सगळ्याची जमवाजमव करण्यासाठी भारतात आमच्यातल्या कलाकारांच्या पालकांनी अगदी उत्साहाने मदत केली. हे सगळं जमवणं जितकं अवघड, त्याहूनही जास्त अवघड ते सगळं इथे घेऊन येणे. कारण हे सगळं सामान कुरियरने मागवायला प्रचंड खर्च येतो. त्यामुळे भारतातून जेव्हा कुणी येणार असेल त्यांना त्यांच्याबरोबरच ते आणावं लागतं. त्यासाठी सुद्धा मदतीचे हात पुढे सरसावले. हळुहळू एक एक गोष्टी जमत गेल्या, आणि अनेक दिवसांच्या तालमीतून नाटक आकार घेत गेलं. 

नाटकाच्या प्रयोगाच्या दिवशी साऊंड सिस्टिम लावण्यापासून ते रंगभूषा-वेशभूषा, नेपथ्य, पार्श्वसंगीत, प्रकाशयोजना, रंगमंचव्यवस्था या सगळ्या गोष्टी घरचं कार्य असल्यासारख्या निभावून नेण्यासाठी एकूण ३२ लोकं आनंदाने हसतखेळत काम करत होते. आपला व्यावसायिक हुद्दा, आर्थिक परिस्थिती अशा कुठल्याही गोष्टींचे विचार ही कामे करताना एकाही माणसाच्या मनाला शिवले नाहीत हे आमच्या व्हॅन्कुवरच्या मराठी कुटुंबाचं आम्हाला यश वाटतं. आपलं नाटक सुंदर झालं पाहिजे या एकाच विचाराने सगळ्यांना झपाटलं होतं. आणि चांगला उद्देश मनात ठेवून काम केलं की अंतिम निर्मिती ही उत्तमच होते या गोष्टीचा काल आम्हाला पुन्हा एकदा प्रत्यय आला. 

दिलेल्या वेळेलाच, जराही उशीर न होता, रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना अभिवादन करत नाटकाचा पडदा उघडला....नांदीचे सूर कानावर पडले... नाटक सुरळीत पार पडलं आणि ते संपल्यावर प्रेक्षकांनी केलेल्या टाळ्यांच्या कडकडाटातून मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी त्याच्या नसानसातून मराठी नाटक वाहतं आणि कायम वाहत राहील या गोष्टीवर पुन्हा एकदा सोन्याच्या मोहोरीचं शिक्कामोर्तब झालं. त्यामुळे शेवटी इतकंच म्हणावंसं वाटतं की..... तुम्हा तो शंकर सुखकर हो....तुम्हा तो शंकर सुखकर हो

- नेत्रा जोशी