शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
3
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
4
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
5
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
6
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
7
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
8
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
9
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
10
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
11
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
12
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
13
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
14
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
15
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
17
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
18
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
19
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
20
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!

फुंकर घालणारे स्वर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 00:35 IST

संगीत-नृत्यासारख्या कला या निव्वळ, भरल्या पोटी चार घटका मनोरंजन करण्यासाठी, जीव रमवण्यासाठी नसतात. त्यांचे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असणे हे किती वेगळ्या, अर्थपूर्ण पातळीवरचे असते हे सांगणारी ही सारी उदाहरणे !..

ठळक मुद्देएरवी बिदागीसाठी होणारी मैफल आणि आपले सर्वस्व गमावून बसलेले कुटुंब यांच्यासाठी होणारी मैफल यात नेमके काय वेगळेपण असते? बोटाच्या चिमटीत पकडता येणार नाही ते. पण कोणासाठी तरी आपल्या कलेचे समर्पण करण्याची ही भावना त्या कलाकाराला वेगळ्याच भावावस्थेत नेत असणार.

- वंदना अत्रे

“नृत्य हेच जणू जगातल्या सर्व समस्यांवर उत्तर आहे अशा आवेगाने ती नाचत होती.. अखेर थकून ती कोसळली तेव्हा तिच्यासह सगळे सभागृह स्फुंदून-स्फुंदून रडत होते...” चार्ल्स फाब्री नावाच्या नृत्य समीक्षकाने यामिनी कृष्णमूर्ती यांच्या मैफलीबद्दल केलेली ही नोंद आहे. यामिनी या कुचीपुडी आणि भरतनाट्यम शैलीच्या प्रसिद्ध कलाकार. अनाथ मुलांच्या शिक्षण आणि संगोपनासाठी निधी उभा करण्यासाठी त्यांनी ज्या शेकडो मैफली केल्या त्या मैफलींबद्दल वाचताना जाणवत होता या मैफलींना संस्मरणीय करणारा सहृदय मानवी स्पर्श..! एरवी बिदागीसाठी होणारी मैफल आणि एखादा अनाथ मुलगा किंवा पुरामध्ये आपले सर्वस्व गमावून बसलेले कुटुंब यांच्यासाठी होणारी मैफल यात नेमके काय वेगळेपण असते? कदाचित बोटाच्या चिमटीत पकडता येणार नाही ते. पण कोणासाठी तरी आपल्या कलेचे समर्पण करण्याची ही भावना श्रोत्यांसह त्या कलाकाराला एक वेगळ्याच भावावस्थेत नेत असणार नक्कीच ! ही भावना जाणवली यहुदी मेनुहिन यांच्या चरित्रात. २०व्या शतकातील हा सर्वोत्तम व्हायोलिनवादक. दुसरे महायुद्ध पेटले आणि त्याला वाटू लागले, दोस्त राष्ट्रांच्या सैनिकी तुकड्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी काहीतरी करायला हवे. मग आपले व्हायोलिन घेऊन हा पोहोचला अलास्काच्या लष्करी तळावर सैनिकांना आपले वादन ऐकवण्यासाठी. या काळात अनेक सैनिक तळांवर जाऊन त्याने केलेल्या मैफलींची संख्या किती असेल? तब्बल पाचशे! दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषाविरुद्ध ठणकावून आवाज उठवणाऱ्या या कलाकाराने १९५१ साली भीषण दुष्काळात भारत होरपळून निघत असताना पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना फोन केला आणि विचारले, “मी काय करू शकतो तुमच्या देशासाठी?” पंतप्रधानांनी दिलेले आमंत्रण स्वीकारून त्यांनी भारतात विविध शहरांमध्ये मैफली करीत दुष्काळग्रस्तांसाठी निधी उभारला.

हे वाचताना मग आठवण येत राहते ती एम.एस. सुब्बलक्ष्मी यांची.

कितीतरी हॉस्पिटल्स, अनाथाश्रम, शाळा-महाविद्यालय याच्या उभारणीसाठी चारआणे तिकीट लावून होणाऱ्या त्यांच्या मैफलींना हजारो श्रोत्यांची तुडुंब गर्दी लोटत असे. साक्षात देवाला आपल्या स्थानावरून उतरून पृथ्वीवर भक्ताकडे आणण्याची ताकद असलेल्या त्यांच्या स्वरातील स्तोत्र, भजने ऐकताना श्रोत्यांमध्ये बसलेला एखादा हमाल, गाडी हाकणारा आणि भांडी घासणारी यांच्याही डोळ्याला पाण्याच्या धारा लागलेल्या असत..! कोणतीही लौकिक देवघेव नसलेल्या कलाकार आणि समाज या नात्यातील जिव्हाळ्याचे हे केवढे कोवळे, हृद्य रूप ! आणि जेव्हा युद्ध-स्थलांतर-उपासमार आणि त्यामुळे उद‌्भवलेल्या भलभलत्या साथी अशा संकटांच्या भोवऱ्यात माणसांचे समूह चिरडून-भरडून निघू लागतात तेव्हा ती कोण्या एका देशाची उरत नाहीत. या वेदनांचे घाव सगळ्या जगभरातील संवेदनशील माणसांना घायाळ करू लागतात. त्यातून निर्माण होते एखादी अशी मैफल जी मानवतेसाठी करता येणाऱ्या कामाचा आदर्श उभा करते. Concert for Bangla desh हे या मैफलीचे नाव. बांगला देशाच्या निर्मितीसाठी लढल्या गेलेल्या युद्धानंतर निर्माण झालेले लाखो स्थलांतरितांचे अगतिक लोंढे आणि त्यांची उपासमार आणि आरोग्याची भयावह हेळसांड बघून थेट न्यू यॉर्कमधील मॅडीसन स्क्वेअरमध्ये जमले अनेक कलाकार. त्यात होते पंडित रविशंकर, अल्लारखा, अली अकबर खांसाहेब असे कितीतरी भारतीय आणि त्यांच्या बरोबर होते जॉर्ज हॅरिसन, बॉबी डिलन आणि बिली प्रेस्टन. त्या दिवशी व्यासपीठावर रंगत जाणारी मैफल समोर उपस्थित असलेल्या हजारो रसिक नागरिकांना रिझवत नव्हती तर हेलावून टाकत होती. कारण त्या स्वरांच्या मागे त्यांना दिसत होते जगण्यासाठी लढत असलेले अनेक निरपराध भुकेकंगाल...!

पाच-सात वर्षांपूर्वी चेन्नईमध्ये आलेल्या अक्राळविक्राळ पुराने अय्येल नावाच्या एक कारागिराचे दुकान त्यातील सामानासह गिळंकृत केले. बघता-बघता त्याच्या डोळ्यासमोर सर्वस्व वाहून जाताना तो बघत होता... हा कोणी सामान्य कारागीर नव्हता. अनेक प्रसिद्ध नृत्य कलाकारांचे नृत्यासाठी लागणारे तऱ्हेतऱ्हेचे कपडे सफाईने शिवणारा तो कसबी कलाकार होता. मग, हे सगळे कलाकार अय्येलने शिवलेले कपडे घालून त्याच्या दुकानात आले. कोणाच्या हातात शिलाई मशीन होते, कोणाच्या हातात कापडाचे तागे. या कलाकारांनी मिळून या गरीब कलाकाराला पुन्हा नव्याने उभे केले.. कृतज्ञतेपोटी..! किती सुंदर आहे हा अनुभव...!

(लेखिका संगीत आस्वादक आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

vratre@gmail.com