Sur Jyotsna: "संगीत म्हणजे विक्रीसाठी असलेली वस्तू आहे का?"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 06:07 AM2020-03-15T06:07:00+5:302020-03-15T06:10:04+5:30

इतक्या प्रकारचे संगीत या पृथ्वीवर निर्माण झाले खरे; पण माणसांच्या भावजीवनात या संगीताने नेमके काय घडवले? दर दोन माणसांच्या आड एक व्यक्ती कानात हेडफोन घालून वावरताना दिसते, तरीही इथे माणसे एकमेकांच्या जिवावर का उठली आहेत?

Is music just another item for sale, asks A. R. Rahman | Sur Jyotsna: "संगीत म्हणजे विक्रीसाठी असलेली वस्तू आहे का?"

Sur Jyotsna: "संगीत म्हणजे विक्रीसाठी असलेली वस्तू आहे का?"

Next
ठळक मुद्देभारताला पहिले ऑस्कर मिळवून देणार्‍या रहमानची कहाणी जगाला नवी नाही.आर. के. सेखर यांचा मुलगा असलेल्या दिलीपने  स्वत:साठी नव्या नावाची निवड केली. अब्दुल रहमान अल्लारखा. ए. आर. रहमान!इतक्या प्रकारचे संगीत या पृथ्वीवर निर्माण झाले खरे; पण माणसांच्या भावजीवनात या संगीताने नेमके काय घडवले?

- ए.आर. रहमान

मी तसा बुजरा माणूस. अबोल. माझ्या मनात काय चालू असते, ते सहसा दिसत नाही बाहेर. 

गळक्या छपराच्या सामान्य घरात राहणार्‍या, वयाच्या नवव्या वर्षी वडील गमावलेल्या, त्या दु:खाबरोबर भविष्याबद्दलचा विश्वासही गमावलेल्या, कायमच घट्ट बंद ओठांनी वावरणार्‍या, हसणे कधीच विसरलेल्या, न कळत्या वयापासून कुटुंबाच्या जबाबदारीचे अवघड ओझे पाठीवर वाहणार्‍या, शाळा सोडून स्वत:ला कामाला जुंपून घेणार्‍या आणि तरीही सतत स्वत:ला अपयशी मानणार्‍या मुलाच्या आयुष्याच्या गोष्टीत नवे  रंग भरणारी एकमेव गोष्ट म्हणजे संगीत !

भारताला पहिले ऑस्कर मिळवून देणार्‍या रहमानची कहाणी जगाला नवी नाही. ‘रोजा’पासून सुरू झालेल्या आणि ‘स्लमडॉग’मधील ‘जय हो’ गाण्यामुळे जगभरात गेलेल्या ए.आर. रहमान नावाच्या अत्यंत यशस्वी संगीतकाराच्या प्रवासाचे जाहीर चित्र सुरांनी गजबजलेले असले, तरी या कहाणीला अस्तर आहे ते माझ्या अबोल आणि बुर्ज‍या व्यक्तिगत प्रवासाचे !

नव्वदीच्या दशकापासून कानावर येत असलेली माझी सगळी गाणी, त्यातील भारतीय जातकुळीच्या वाटणार्‍या; पण जगभरातील संगीताच्या संस्कृतीचे माधुर्य स्वत:मध्ये सामावून घेत निर्माण झालेल्या स्वरांच्या रचना, त्या रचनांमध्ये सामोरी येणारी वेगळीच मधुर वळणे, अनवट ठेके, बर्‍याच ओळखीच्या आणि कित्येक अनोळखी वाद्यांचा सहज वापर आणि आग्रहाने वापरले गेलेले नव्या दमाच्या कलाकारांचे ताजे; पण दमदार स्वर याविषयी आजवर कितीतरी बोलले-लिहिले गेले आहे. ज्यांना संगीतातील शास्र काटा समजत नाही, त्यांनी माझे गाणे आपलेसे करीत जिवापाड जपले आहे. पण एका यशस्वी संगीतकाराचा प्रवास असा नेहमीच गाण्याचा एक मुखडा आणि दोन अंतरे यांमध्ये सामावणारा नसतो. कसा असेल? 

जेव्हा हृदयात खोल कुठेतरी वेदनेचा एक ठोका सतत वाजत असतो, भविष्याबद्दलच्या अनिश्चिततेची दाट छाया विसरणे अवघड असते, तेव्हा संगीत आणि त्यातील स्वर सतत साथीला असले तरी ते जिवाला सुकून देत नाहीत. हे संगीत, हे स्वर रोजीरोटी देतात हे खरे; पण त्याने जीव शांत होत नाही. मनात सतत एक भिरभिरणारी असुरक्षिततेची भावना असते. या सुरांच्या मदतीने आजचे निभले, उद्याचे काय?
- हा अनुभव माझ्या अब्बांचा आणि त्यानंतर काही काळ माझासुद्धा. अब्बांना या संगीतानेच रोजीरोटी दिली आणि नंतर अनेक वर्षं मलाही..!

***

आधी मी दिलीप होतो. राजगोपाल कुलसेखर  (आर. के. सेखर) आणि कस्तुरी या जोडप्याचा मुलगा. मुन्दाक्कानी अम्मन मंदिरात रोज संध्याकाळी भागवत सांगणार्‍या आणि स्वत:च चाली लावलेली भजने गात कमालीची लोकप्रियता मिळवलेल्या प्रवचनकाराचा नातू. घरोघरी वीज उपकरणांच्या दुरुस्तीची कामे आमच्या कुटुंबात परंपरेने आली, तसेच संगीतही परंपरेनेच आले. साध्या वायरमनच्या नशिबी असलेली रटाळ कामे नाकारत पहिली बंडखोरी केली माझ्या वडिलांनी. मंदिराजवळच्या बोळीत गळक्या छताच्या जेमतेम वीतभर घरात आम्ही राहायचो. त्या घरातून बाहेर पडण्याची आणि चित्रपटाच्या दुनियेत प्रवेश करण्याची धगधगती महत्त्वाकांक्षा माझ्या वडिलांना कुठल्याकुठे घेऊन गेली,
.. आणि त्यांच्या अकाली मृत्यूनंतर मलाही!

माझे वडील गेले, तेव्हा मी शाळकरी वयाचा बारा-तेरा वर्षांचा मिशीसुद्धा नीट न फुटलेला मुलगा होतो. त्या वयात संगीताच्या दुनियेने मला जगण्याचे कारण दिले आणि साधनही ! शेजारपाजारची माझ्या वयाची मुले खांद्यावर दप्तर घेऊन शाळेत जात तेव्हा मी मात्र स्टुडिओमध्ये जाण्यासाठी निघायचो. आणि अनेकदा दिवसाच्या दोन-दोन शिफ्ट करीत रात्री घरी यायचो. दक्षिणेच्या संगीत सृष्टीवर अनभिषिक्त राज्य करणार्‍या  इलियाराजांचा प्रमुख की-बोर्ड कलाकार अशी माझी ओळख निर्माण झाली. हळूहळू मी स्वतंत्रपणे काम करू लागलो. याच दरम्यान आम्ही आमच्या खासगी आयुष्यात उपासनेसाठी अल्लाचा स्वीकार केला होता..! आर. के. सेखर यांचा मुलगा असलेल्या दिलीपने  स्वत:साठी नव्या नावाची निवड केली. अब्दुल रहमान अल्लारखा. ए. आर. रहमान!

*** 

एक कलाकार म्हणून मला त्या वेळी समजलेली सर्वांत मोठी, माझे आयुष्य आरपार बदलून टाकणारी गोष्ट कोणती होती? तर, कलाकाराच्या आत जे, जसे असते; तेच त्याच्या कलेतून त्याच्याही नकळत, उत्स्फूर्त सहजतेने वाट शोधत बाहेर येत असते. माझ्यासाठी हा शोधाचा क्षण होता. माझ्या आत असलेली स्वरांची ओढ मला कधीच समजली होती; पण ती ओढ असलेला मी, कसा होतो मी? आजवर जे काही बघत, अनुभवत होतो त्याने काय काय बदलत गेले माझ्यात? कोणते कोनेकोपरे काळवंडत-उजळत गेले? माझ्या स्वरांमध्ये किती प्रेम रुजले आणि तिटकार्‍याचे बीज वाढत गेले?

- या प्रश्नांची उत्तरे शोधता शोधता या अनाम शक्तीची, अल्लाची प्रार्थना माझ्यासाठी जिवाभावाची होऊ लागली. की-बोर्डच्या पट्टय़ांवर बोटे ठेवून डोळे मिटून प्रार्थना केली की भोवतालचा विसर पडत जातो आणि फक्त स्वर आसपास वावरू लागतात, हे जाणवू लागले. माझे नाव बदलणे हा केवळ धर्मात केलेला बदल नव्हता. या नव्या धर्माने मला नवा विश्वास दिला, स्वत:कडे पाहण्याची, माझ्या स्वरांशी जोडून घेण्याची नवी दृष्टी दिली. माझ्या आयुष्यात कव्वालीसारखा सूफी संगीतातील नितांत सुंदर गानप्रकार आणला आणि त्यासोबत आले नुसरत फते अली यासारख्या कलाकाराचे अलोट प्रेम.  माझ्या आयुष्यात झालेल्या या बदलाने माझ्या संगीतामध्ये अनेक नवे प्रयोग करण्याची हिंमत मला दिली.

***

‘रोजा’ने माझे आयुष्य बदलले. माझ्याभोवतीच्या सगळ्या सीमा जणू संपवून टाकल्या आणि अख्खे जग माझ्या स्वरांसाठी खुले करून दिले.

या जगात होते शेखर कपूर आणि डॅनी बोयल यांच्यासारखे दिग्दर्शक, जाहीर कार्यक्रमांमधून माझे गाणे ऐकण्यास उत्सुक जगभरातील वेडे र्शोते, माझ्या संगीताची जणू वाट बघत असलेला ‘लॉर्ड ऑफ द रिंग’सारखा भव्य प्रकल्प आणि ‘ऑस्कर’पर्यंत मला नेणारे ‘स्लमडॉग मिलेनियर’चे संगीत. प्रत्येक एक टप्पा मला पुढे, थोडे अधिक उंच नेत गेला !

‘रोजा’ने जी जादू केली, त्यामागचे रहस्य नेमके काय होते? नव्वदीच्या दशकात सगळ्या जगाला आपल्या देशाचे दरवाजे व्यापारासाठी सताड खुले करून देणार्‍या नव्या भारताचे ते संगीत होते ते! जगासाठी उघडलेल्या मोकळ्या-ढाकळ्या दरवाज्यामधून आत येत मनोरंजनाच्या अनेक वाहिन्या जे जगभरातील संगीत इथे आणून ओतत होत्या त्या जगाच्या खुणा ‘रोजा’मध्ये होत्या. लोकांच्या अपेक्षांना धक्का देणारे, त्यांना कदाचित प्रारंभी अजिबात न आवडणारे; पण त्यावर विचार करायला लावणारे असे संगीत. ते एखाद्या लाटेसारखे वेगाने, फेसाळत-फुसांडत आले, ज्यामध्ये शहाळ्याचे देसी माधुर्य होते; पण आधुनिक काळाचा उसांडता वेगही होता.. त्यानंतर मी जे जे काही केले, त्यात काही फसलेले प्रयोग होते, काही वेगळे; पण रसिकांनी न स्वीकारलेले आणि काही हळूहळू झिरपत टिकून राहिलेले.. स्वत:भोवतीची कुंपणे तोडत आजवर न धुंडाळलेल्या दिशांना स्पर्श करू बघणार्‍या  माझ्यासारख्या संगीतकाराचे गलबत मग जगभरातील पाहुण्यांनी गजबजले..

***

जपान ते अमेरिका ते इराण अशा जगाच्या वेगवेगळ्या संस्कृतींच्या लोकांबरोबर मी दीर्घकाळ काम केले आहे. या अनुभवांनी त्या संस्कृतींचे संगीतच केवळ माझ्या आयुष्यात आणले नाही, तर त्यांतली माणसे आणि त्यांची सुख-दु:खे हे सारेच माझ्या आयुष्यात मिसळून गेले.

हैतीच्या विनाशकारी भूकंपापासून ते व्हाइट हाउसमधील उच्चभ्रू मेजवानीपर्यंत ज्या अनेक घटनांचा एक कलाकार म्हणून मी साक्षीदार होतो, तेव्हा तेव्हा मनात येत असते, या पृथ्वीतलावर एक संगीतकार म्हणून वेगळे असे काय करू शकतो मी? काय देऊ शकतो तिला? माणसांच्या कल्याणाची निवळ प्रार्थना पुरेशी नाही इतकी आसपासची परिस्थिती बदलत गेली. मनुष्याच्या अस्तित्वाबद्दल शंका येऊ लागावी इतके क्रौर्य, आक्रमकता वातावरणात तापून, ऊठसूट कोणालाही वेठीला धरू लागली, तेव्हा वाटले या वेदनेवर फक्त स्वरांची फुंकरच काम करू शकेल..!  

 ***

आजवर इतक्या प्रकारचे आणि जातीचे संगीत  या पृथ्वीच्या पाठीवर निर्माण झाले आहे की काही नव्याने सांगावे असे बाकी उरले आहे का? - असा प्रश्न काही दिवसांपूर्वी मला एका मुलाखतीत विचारला गेला होता. उत्तर देण्यापूर्वी काही क्षण थांबलो. निरुत्तर झालो म्हणून नाही, मनात दुसरा प्रश्न आला म्हणून थांबलो !

माझ्या मनात आले, इतक्या प्रकारचे संगीत या पृथ्वीवर निर्माण झाले खरे; पण माणसांच्या भावजीवनात या संगीताने नेमके काय घडवले? दर दोन माणसांच्या आड एक व्यक्ती कानात हेडफोन घालून वावरताना दिसते, तरीही इथे माणसे एकमेकांच्या जिवावर का उठली आहेत? मंदिर-मशिदीमध्ये होणार्‍या प्रार्थनांचे स्वर विरून जाण्यापूर्वीच तिथे बॉम्बचे धमाके का होतात? ‘ओ पालनहारे’सारख्या प्रार्थना ऐकताना माणसांच्या मनात करुणा-प्रेम क्षणभरसुद्धा जागे होत नसेल का? बाजारपेठेत उपलब्ध जगभरातील संगीत म्हणजे विक्रीसाठी असलेली, चकचकीत आवरणात मिळणारी आणखी एक वस्तू आहे का फक्त? आणि तसे असेल तर, माणसांचे आणि सगळ्या पृथ्वीचे आयुष्य बॉम्बच्या वायरला आणि परस्परांच्या फक्त तिरस्काराला बांधून ठेवणार्‍या प्रश्नांना उत्तरे कुठे आणि कशी मिळणार?

मला वाटते, आता प्रश्न संगीताने नवे काही शोधण्याचा उरलेला नाही. जगाला तो आदिम स्वर त्यात अंतभरूत आणि अपेक्षित असलेल्या शांततेच्या मंत्रासह समजावून सांगण्याची मात्र आज नितांत गरज आहे. 
माझ्यासारख्या संगीतकारापुढे आज आव्हान आहे ते हे.. 

सूरज्योत्स्ना

अभिजात भारतीय संगीताच्या अनमोल ठेव्याचे जतन, संवर्धन आणि या संगीताच्या अरण्यात शिरू पाहणार्‍या तरुण साधकांना उत्तेजन यासाठी आकाराला आलेले ‘सूरज्योत्स्ना’ हे एक तीर्थरूप व्यासपीठ आहे. दिवंगत ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्वरांशी एकरूप जीवनाचा उत्सव सतत निनादता ठेवणारे हे व्यासपीठ आजपासून दर रविवारी  ‘लोकमत’मध्येही आपली हजेरी लावणार आहे.

अभिजात गायन-वादन-नर्तनाच्या क्षेत्रातले दिग्गज कलाकार इथे भेटतील आणि या जगात नव्याने पाऊल ठेवत्या झालेल्या तरुण साधकांशीही गप्पागोष्टी होतील. लोक-संस्कृतीचा भाग असलेल्या चित्रपट संगीताचा कॅनव्हास वापरून आपली अभिजातता ठळकपणाने रेखणारे जगप्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान आज या संपादकीय प्रयत्नांचा प्रारंभ करीत आहेत.

http://www.surjyotsna.org/

 
शब्दांकन- वंदना अत्रे
(रहमान यांच्याशी झालेल्या या गप्पा विस्तृत स्वरूपात ‘लोकमत दीपोत्सव 2019’मध्ये प्रसिद्ध झाल्या, त्यातील अंश)
 

Web Title: Is music just another item for sale, asks A. R. Rahman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.