शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

प्रकाशवाट दाखवणारी माणसे कुठे गेली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 6:01 AM

खाप्रूमाम पर्वतकर, पं. रामकृष्णबुवा वझे यांच्यासारख्या माणसांनी संगीतावर गारुड केलं. अशी माणसं संगीताचा ठेवा आहेत.

ठळक मुद्देज्यांच्या गुणसूत्रांमध्ये फक्त तालाच्या मात्रांचे हिशेब आणि स्वरांचे अंदाज हेच नोंदवलेले आहे, असे कलाकार ही फक्त एका काळाची मक्तेदारी होती की काय, ठाऊक नाही.

- वंदना अत्रेज्यांच्या गुणसूत्रांमध्ये फक्त तालाच्या मात्रांचे हिशेब आणि स्वरांचे अंदाज हेच नोंदवलेले आहे, असे कलाकार ही फक्त एका काळाची मक्तेदारी होती की काय, ठाऊक नाही. शोध घेताना गेल्या शतकातील असे कलाकार भेटतात जे वास्तवातून नाही तर निव्वळ दंतकथेतून उतरले आहेत असे वाटावे. एरवी, रुपये, पैसे, आणे याचा कोणताही हिशोब ज्यांना आयुष्यभर करता आला नाही, असा खाप्रूमामसारखा एखादा कलाकार  एका हाताने एक ताल, दुसऱ्या हाताने दुसरा, दोन्ही पायांनी दोन वेगवेगळे ताल, तोंडाने पाचवा ताल आणि तबल्यावर सहावा ताल वाजवत, शिवाय सर्वांची सम हमखास एकत्र आणण्याचे अशक्य गणित साधत होता यावर विश्वास बसणे कठीण!

एखाद्या अव्वल दर्जाच्या  गणिती डोक्यालासुद्धा अनाकलनीय वाटावे असे मात्रांचे हे हिशोब हा जेमतेम साक्षर असलेला कलाकार सहज मांडत असे. हे कुठून आले असेल? संगीतसृष्टीतील महान कोडे अशा शब्दात खाँसाहेब अल्लादियाखाँ ज्यांचा उल्लेख करीत ते लयभास्कर खाप्रूमाम पर्वतकर हे तबला, मृदंग आणि सारंगी यावर जणू सत्ता गाजवणारे कलाकार. तोच त्यांचा चरितार्थ. पण हळूहळू लय आणि तिचे अनंत बारकावे या अभ्यासाचा इतका ध्यास लागला की वादन किंवा साथसंगत या गोष्टी त्यांच्यासाठी अगदी दुय्यम झाल्या. थोडक्यात खिशात चार पैसे पडण्याची शक्यता जरा अवघडच ! त्या काळजीपोटी मग मित्राने एकदा विचारले, ‘आपल्या हातातील विद्येवर पैसे मिळवण्याची सूतराम शक्यता दिसत नसताना तुमचा प्रपंच चालतो कसा?’ यावर क्षणार्धात ते म्हणाले, ‘तुमचा जसा प्रपंच चालतो तसाच देवाच्या कृपेने माझाही चालतो. तुम्ही पैसे मिळवता म्हणून जेवढे आनंदी आहात त्याच्या लक्षपटीने मी पैसे मिळवत नाही म्हणून आनंदी असतो...!’ डोक्यात अखंड मात्रांचे अतिसूक्ष्म गणित असताना व्यवहाराच्या मैदानात उतरणे हे त्यांच्यासाठी जणू महापापच..!  जगणे म्हणजे जेव्हा फक्त संगीत असते तेव्हा केवळ व्यवहाराचा नाही तर व्यथेचाही विसर पडतो... ही गोष्ट गायनाचार्य पंडित रामकृष्णबुवा वझे यांची..

सारंगीनवाझ उस्ताद बुंदू खाँ यांचे एक शिष्य पुण्यात बुवांना भेटण्यासाठी गेले तेव्हा बुवा आसन्नमरण अवस्थेत होते. उस्तादांनी बुवांना अगदी आर्जवपूर्वक विनंती केली, ‘आप बडे विद्वान है.. आप इजाजत दे तो शामको घंटा आधा घंटा आपको कुछ सुनाना चाहता हूँ... बडी तमन्ना है आपकी सेवा करनेकी...’ बुवांनी मनापासून संमती दिली. संध्याकाळी खाँसाहेबांनी सारंगीवादनास सुरुवात केली. बुवा अंथरुणावर पडून ऐकत होते. तासभर सारंगीवादन झाले. उस्ताद सारंगी खाली ठेवत असताना बुवा एकदम ताडकन उठले आणि शिष्यांना म्हणाले, ‘तंबोरे काढा..’ सगळे दचकले. कदाचित घरी आलेल्या पाहुण्याचा पाहुणचार करण्याचा एवढा एकच मार्ग जणू बुवांना ठाऊक असावा. शिवाय समोर स्वरांची झुळझुळ गंगा वाहत असताना आपल्या व्यथेला कवटाळून काठावर बसणे त्यांना अगदी मान्य नव्हते!  खाँसाहेब अजीजीने म्हणाले, ‘आप बीमार है, आप तकलीफ मत उठायीये..’ यावर बुवा म्हणाले, ‘आपके उस्ताद मेरे दोस्त है. आप मेरे लिये खास घर आये और अपनी सारंगी सुनानेकी तकलीफ उठायी. तो मेरा भी कर्तव्य बनता है, आपको अपना गाना जरूर सुनाऊ...’ बुवांनी श्री चा ख्याल सुरू केला.  त्यानंतर तासभर मैफलीत गावे तसे ते मोठ्या तडफेने गात होते. आजार विसरून...! गाणे संपताक्षणी ते पुन्हा रुग्ण शय्येवर पडले. अर्थात, या आजारातून ते पुन्हा कधीच उठले नाहीत. खाप्रूमामना एकदा कोणीतरी एक प्रश्न विचारला होता, ‘लयीची एवढी अवघड, अशक्य वाटणारी गणिते आपण कशी इतक्या सहज सोडवता?’ ते म्हणाले, ‘लयीचा विचार करताना मला आत स्वच्छ प्रकाश दिसू लागतो. त्या प्रकाशात मला सर्व काही स्पष्ट दिसू लागते. तुम्ही अभ्यास करा, तुम्हालाही हे सर्व काही करता येईल...’ कुठे गेली हा प्रकाश दाखवणारी माणसे आता?(लेखिका संगीत आस्वादक आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत.)vratre@gmail.com