त्याच्या प्रत्येक श्वासात संगीत

By Admin | Updated: May 31, 2014 16:34 IST2014-05-31T16:34:07+5:302014-05-31T16:34:07+5:30

माझी आणि आनंदची पहिली भेट १९७२ला जब्बार पटेल यांच्या घाशीराम कोतवाल या नाटकाच्या वेळी झाली. आमच्यातल्या या ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि कालांतराने कौटुंबिक सलोख्यात कधी झाले हे कळालेच नाही. ही निखळ मैत्री मागच्या ४२ वर्षांपासून कायम फुलतच गेली.

Music in each and every breath | त्याच्या प्रत्येक श्वासात संगीत

त्याच्या प्रत्येक श्वासात संगीत

 रवींद्र साठे 

माझी आणि आनंदची पहिली भेट १९७२ला जब्बार पटेल यांच्या घाशीराम कोतवाल या नाटकाच्या वेळी झाली. आमच्यातल्या या ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि कालांतराने कौटुंबिक सलोख्यात कधी झाले हे कळालेच नाही. ही निखळ मैत्री मागच्या ४२ वर्षांपासून कायम फुलतच गेली. 
पुण्यात मोहन गोखलेंच्या घरासमोर आनंदची मावशी राहायची आणि शिक्षणासाठी आनंद अकोल्याहून मावशीकडे आला होता. त्यामुळे मोहन हा त्याचा पहिला मित्र होता. पुण्यात येण्यामागे संगीत क्षेत्रात काम करता येईल, हाही एक उद्देश होता. तेव्हा मी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये ध्वनिमुद्रणाचा अभ्यासक्रम शिकत होतो. 
घाशीराममध्ये सोबत काम करणारा अभिनेता म्हणून माझी आनंदशी ओळख झाली. त्या वेळी त्याला संगीताची असलेली आवड आणि त्याचा कल माझ्यासहित सर्वांच्याच लक्षात आला. ही तर फक्त सुरुवात होती. त्याच्या रोमारोमांत संगीत होतं. 
‘घाशीराम’नंतर सतीश आळेकरांचं महानिर्वाण त्याला मिळालं. त्यातील अभंगांना संगीत देणे हे त्याचे संगीत दिग्दर्शनाचे पहिले काम. त्याच्यातील प्रतिभा आळेकरांनी नेमकेपणाने हेरली आणि त्याला संगीत क्षेत्रात ब्रेक मिळाला. हे काम पाहून हा एक प्रकारचा वेगळा संगीत दिग्दर्शक आहे हे आम्हा सगळ्यांच्या तेव्हाच लक्षात आले. नाटकाचं संगीत कसं असावं याचा पूर्ण अभ्यास करून तो काम करत असे. 
जब्बार पटेल यांचे तीन पैशाचा तमाशा या नाटक रंगभूमीवर येत होते. त्याचे संगीत भास्कर चंदावरकर देत होते. नाटकाचा पहिला अंक त्यांनी पूर्ण केला आणि काम सोडले. त्यामुळे दुसर्‍या व तिसर्‍या अंकाचे काम नंदू भेंडे आणि आनंदने केले. त्या कामातून पडघम नाटकाचे काम मिळाले. त्याच्या प्रतिभेमुळे अशी एकातून एक कामे त्याला पाठोपाठ मिळत गेली. 
थिएटर अँकॅडमीमध्ये नाटकासाठी परिणामकारक संगीत कसे द्यावे हे तो शिकला. त्यामुळे स्वत:ची कलाकृती तो एकदाच नाही तर कित्येकदा तपासून पाहत असे. दुसरी एखादी आवडलेली चाल तुमच्या कामात नकळत येऊ शकते; परंतु असे होऊ नये यासाठी तो कायम जागरूक असायचा. तो अतिशय मनस्वी असून त्याची कोणतीही चाल, कलाकृती कारणाशिवाय होत नसे. त्याची कोणतीही गोष्ट जीव ओतून केलेली असायची. 
घाशीरामनंतर संगीत नाटकाचे एक नवीन पर्व सुरू झाले आणि आनंदसारख्या संगीत दिग्दर्शकांमुळे या कलाकृतीला एक वेगळीच उंची मिळाली. नाटकातील नाट्य बाहेर आणण्यासाठी संगीत असतं आणि ते जास्तीत जास्त प्रभावी व्हावे यासाठी ते बराच अभ्यास करत असत. 
अफलातून नाटकातून विनय आपटेंनी एका वेळी अनेक मराठी कलाकारांना ब्रेक दिला आणि या गाजलेल्या नाटकाचे संगीत आनंदने केले होते. नाटकांना संगीत देत असताना ‘महानिर्वाण’चे काम पाहून त्याला चाफेकर बंधूंच्या खून खटल्यावरील २२ जून १८९७ हा चित्रपट मिळाला. त्यानंतर आनंदने मागे वळून कधी पाहिलेच नाही. मुळात संगीताचे उपजत असे गुण होतेच. त्याला जिद्दीची आणि कष्टांची जोड लाभली. त्याला एकामागून एक असे जवळपास ५0 चित्रपट मिळाले. संगीताच्या बाबतीत त्यांनी कधीच तडजोड केली नाही. एखादे गाणे दिग्दर्शकाला पटले नाही तर पुन्हा पुन्हा त्याचे संगीत देण्याची त्याची कायम तयारी असायची. सध्याच्या नवीन ट्रेंडप्रमाणे कोणाचे पाहून किंवा आवडलेल्या एखाद्या गाण्याच्या प्रभावाखाली आपल्या गाण्याची चाल असू नये यासाठी तो कायम प्रयत्नशील असायचा. पारंपरिक संगीतापासून ते तीन पैशाचा तमाशा आणि पडघम यांसारखे मॉडर्न संगीतही त्याने दिले. नंदू भेंडे हे मराठीतले पहिले रॉक सिंगर म्हणून प्रसिद्ध आहेत. पण त्या गाण्याचे संगीत हे आनंदचे होते हेही तितकेच महत्त्वाचे. एक होता विदूषक, मुक्ता, दोघी यांसारख्या कलाकृतीत त्यांनी संगीतातील अनेक प्रकार एकाच वेळेला हाताळले होते. हे करत असताना भारतीय पारंपरिक संगीताचा गाभा, आत्मा त्याने हरवू दिला नाही. दोन किंवा तीन संगीतकारांनी मिळून एका चित्रपट किंवा नाटकाचे संगीत देणे या गोष्टीला त्याचा कायम विरोध होता. मी सर्व प्रकारचे काम करू शकतो, हा आत्मविश्‍वास त्यामागे होता आणि आपल्या या भूमिकेशी तो ठाम होता. 
संगीत हे त्याचे पहिले प्रेम होते. त्यामुळे आयुष्यात संगीताशिवाय कोणत्याही गोष्टीचा त्याने विचार केला नाही. या एककल्ली स्वभावामुळे तो काही वेळा एकटा पडायचा. काही जणांकडून तो टाळलाही जायचा. परंतु माझी आणि त्याची संगीताची आवड सारखी असल्याने आम्हाला एकमेकांचा सहवास कायम हवाहवासाच वाटला. रेडिओवर काम करताना त्याने संगीतामध्ये त्याने जितके प्रयोग केले, तितके प्रयोग क्वचितच एखाद्या संगीत दिग्दर्शकाने केले असतील. 
त्याने मला खूप जवळून पाहिले, ऐकले आहे. काळानुसार बदलणारे तंत्रज्ञान, विविध स्टुडिओ या सगळ्या प्रवासात तो संगीतकार आणि मी गायक म्हणून आम्ही कायम सोबत होतो. त्याने दिलेल्या प्रत्येक चालीमागे त्याच्याकडे कारण असायचे, त्याविषयी त्याने बराच अभ्यास केलेला असे. श्रीनिवास खळे, पंडित हृदयनाथ मंगेशकर, मदनमोहन, ओ. पी. नय्यर, एस. डी. बर्मन यांसारख्या संगीतकारांच्या संगीताचे वैशिष्ट्य अभ्यासून त्याचा खोलवर अभ्यास त्याने केलेला होता. त्याचे वैशिष्ट्य हे की, त्याने या दिग्गज संगीतकारांच्या संगीताचे तत्त्व समजून घेतले परंतु त्याची सरसकट कॉपी मात्र कधी केली नाही. 
खळे आणि हृदयनाथ यांनी भावगीत आणि भक्तिगीताला वेगळे वळण दिले. त्याचप्रमाणे त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये आनंद आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 
संगीतातील इतकी विविधता असणारा आमच्या पिढीतील तो एक अमूल्य कलाकार होता. संगीतातील कोणताही प्रकार त्याला वज्र्य नव्हता, पॉप, रॉक, बॅले, भावसंगीत, पारंपरिक संगीत या सगळ्यांत तो तितकाच प्रगल्भ होता. एखादा प्रकार श्रेष्ठ आणि एखादा गौण असे त्याच्या दृष्टीने कधीच नसे. संगीत हे संगीत आहे, असे त्याचे म्हणणे होते. चित्रपट किंवा नाट्य क्षेत्रामध्ये वेगळे काही करू पाहणार्‍या दिग्दर्शकांपुढे आता कोणीही संगीतकार नाही, अशी एक मोठी पोकळी आनंदच्या आपल्यातून जाण्याने निर्माण झाली आहे. 
संगीतातील नव्याने येणार्‍या गोष्टींबाबत आपल्याला ज्ञान असावे यासाठी तो कायम तत्पर असायचा.  त्याचा कॅनव्हास त्याने कायम मोठा ठेवला. आपल्या ग्रहणशक्तीला त्याने कधीच र्मयादा घातली नाही. अलीकडेच एका बंगाली गायिकेने गायलेली दोन बंगाली भाषेतील गाणी त्याने फेसबुकवरील आपल्या वॉलवरून शेअर केली होती. त्याने संगीत दिलेल्या गाण्यांसाठी गायक म्हणून त्याची पहिली पसंती कायम मला असायची. असे असले तरी कित्येक गाण्यांसाठी गायक सुचव, असे तो मला मोकळेपणाने विचारत असे. आम्ही एकमेकांना काहीही विचारू शकत होतो. 
खाण्याच्या बाबतीत तो चोखंदळ होता, वेगवेगळ्या ठिकाणी मिळणारे स्पेशल पदार्थ खायला त्याला मनापासून आवडत असत. एखाद्या ठिकाणी मिळणारा कोणता पदार्थ आवडला तर तो पुढे जिथे जाणार असेल, त्यांच्यासाठी तो घेऊन जात असे. मांसाहारामध्ये मासे त्याला अतिशय मनापासून आवडत. तो मुंबईत आला किंवा मी पुण्यात आलो की रात्री मासे खायला जाण्याचा आमचा कार्यक्रम ठरलेला असायचा. 
जिथे वेगळं काही असेल तिथे आनंद कायम असायचा. टी.व्ही आणि रेडिओसाठीही त्याने वेगळ्या प्रकारच्या कलाकृतींची निर्मिती केली होती. ओंजळीत स्वर तुझे या मी आणि आनंदने केलेल्या अल्बमला चांगला प्रतिसाद मिळाला. टीव्ही आणि रेडिओ तसेच काही खासगी कार्यक्रमांत आम्ही दोघांनी मिळून सादर केलेल्या आणि कुठेही उपलब्ध नसलेल्या काही निवडक गाण्यांचा यामध्ये समावेश आहे. रामदास स्वामींपासून ते संदीप खरेपर्यंतच्या कवींच्या ८ कविता यामध्ये आहेत. 
गेल्या ४0 वर्षांपासून वैविध्यपूर्ण संगीत देणार्‍या संगीतातील बहुआयामी संगीतकाराला आपण गमावले आहे. मी काय आणि कशा पद्धतीने गाऊ शकतो, माझ्या आवाजाचा आवाका काय आहे हे त्याला व्यवस्थित माहीत होते. माझ्यातले उत्तम बाहेर काढण्याचा त्याचा कायम प्रयत्न असे. मी गायक म्हणून प्रगल्भ होण्यात त्याचा मोठा वाटा होता. मी मुंबईत आणि तो पुण्यात राहत असल्याने आमचे आठवड्यातून जवळपास दोन वेळा फोन होत असत. संगीतातील अनेक विषयांवर आम्ही एक-एक तास गप्पा मारत असू. मी एक अतिशय जवळचा मित्र गमावला, याहीपेक्षा आपण एक खूप उत्तम संगीतकार गमावला आहे. आमचं गेल्या जन्मीचं काही एक नातं होतं, असं मला कायम वाटत आलंय. आमच्यात एकदाही कोणत्याच गोष्टीवरून वाद झाला नाही. तो मला समृद्ध करत होता आणि मी त्याला काही गोष्टींत माझे मत देत होतो. 
आता दासगणू यांनी लिहिलेल्या ‘श्री गजानन विजय’ या पोथीचे संगीतरूप करण्याचे काम चालू असून, त्याने त्यासाठी चाली करून ठेवल्या होत्या. येत्या महिन्याभरात हे काम पूर्ण होईल; पण ते प्रत्यक्षात कसे साकारले, हे पाहायला तो आता या जगात नाही. रमणबाग शाळेचे माजी मुख्याध्यापक आणि संस्कृतचे प्राध्यापक कै. प्र. शं. जोशी यांनी संस्कृतमधून आंबेडकरांच्या जीवनावरील भीमायन हा ग्रंथ लिहिला. त्यातील प्रसंगांवर आधारित एकूण २५ गाण्यांच्या प्रोजेक्टचे कामही आम्ही करत होतो. त्यातील ४ गाणी झाली असून, त्याच्या तोडीचा संगीतकार मिळाल्यास हे राहिलेले पुढील काम मी पूर्ण करणार आहे, माझ्याकडून त्याच्यासाठी हीच श्रद्धांजली ठरेल.  
(लेखक प्रसिद्ध गायक आहेत.)
(शब्दांकन : सायली जोशी)

Web Title: Music in each and every breath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.