चमत्कार

By Admin | Updated: August 9, 2014 14:21 IST2014-08-09T14:21:18+5:302014-08-09T14:21:18+5:30

निराशेचा पगडा आपणच झटकून टाकायचा आणि लढायला उभे राहायचे. दैव नेहमीच प्रतिकूल असेल असे नाही. कुणी सांगावे, एखाद्या वेळी आपल्यालासुद्धा अनुकूल शक्ती मागे उभ्या राहिल्याचा अनुभव येईल. मात्र, आपण जबाबदारी झटकून टाकून नुसतेच चमत्काराची वाट पाहत राहिलो, तर काहीच साधणार नाही.

Miracle | चमत्कार

चमत्कार

 भीष्मराज बाम

 
प्रश्न : आपल्या देशात सगळीकडे भ्रष्टाचार माजला आहे. आशेचा किरणसुद्धा कोठे दिसत नाही. वर्तमानपत्र, रेडिओ, टीव्ही काहीही पाहिलं तरी तेच दिसतं. यातून बाहेर निघण्यासाठी एखादा चमत्कारच घडायला हवा. आपण काहीही केलं तरी उपयोग होणार नाही असं वाटून निराशाच मनाचा कब्जा घेते. खरेच काही होऊ शकेल, असं वाटतं तुम्हाला?
माझ्या एका मित्राने ई-मेलवर पाठवलेला एक किस्सा तुम्हाला सांगतो.
- अमेरिकेतील एक छोटे शहर! ५ वर्षांची चिमुरडी टेस एका मेडिकल शॉपमध्ये शिरली. दुकानदार एका गृहस्थाशी बोलण्यात गुंतला होता. तिने त्याचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला; पण त्याने तिच्याकडे पाहिलेसुद्धा नाही. शेवटी तिने हातातले एक नाणे काउंटरच्या काचेवर जोरात वाजवले. दुकानदार तिला म्हणाला, ‘माझा भाऊ मला खूप वर्षांनी भेटला आहे. मला त्याच्याशी जरा बोलू तर देशील?’ तिने सांगितले, ‘मी पण माझ्या भावासाठीच औषध घ्यायला आले आहे. मला चमत्कार हे औषध हवे आहे. त्याला किती पैसे पडतील?’ दुकानदार म्हणाला, ‘असे काही औषध मी तरी ऐकलेले नाही. काय झालंय तुझ्या भावाला?’ तिचे डोळे भरून आले. ती म्हणाली ‘मला माहीत नाही. डोक्यात काहीतरी झाले आहे. त्याचे डोके खूप दुखते आहे. माझे बाबा माझ्या आईला सांगत होते, की आता त्याला वाचवायला चमत्कारच हवा. माझ्याजवळ पुरेसे पैसेसुद्धा नाहीत, असेही ते म्हणाले. म्हणून मग मी साठवलेले सगळे पैसे घेऊन आले आहे.’
दुकानदारांबरोबर बोलणारे गृहस्थ म्हणाले, ‘मला माहीत आहे हे औषध. किती पैसे आहेत तुझ्याजवळ?’ तिने आपल्या मुठीत सांभाळून आणलेली नाणी त्यांच्या समोर धरली आणि म्हणाली, ‘एक डॉलर अकरा सेंट आहेत. आता एवढेच साठले आहेत माझ्याजवळ.’ त्यांनी ती नाणी घेऊन खिशात टाकली आणि म्हणाले ‘एवढे पुरतील. चल आपण तुझ्या भावाला कोणत्या प्रकारचा चमत्कार लागेल ते पाहू या.’ ते गृहस्थ अमेरिकेतले एक जगप्रसिद्ध न्यूरोसर्जन होते. त्यांनी तिच्या भावाला तपासले, त्याचे ऑपरेशनसुद्धा केले आणि फी घेतली नाही. उपचाराचा सारा खर्चही त्यांनी केला. पूर्ण खर्च आणि माझी फी मला मिळाली आहे, असे ते म्हणाले. टेसचा भाऊ आजारातून बरा झाला. तिच्या आईवडिलांना हा चमत्कार घडल्याचे नवल वाटले. टेसनेसुद्धा त्यांना काही सांगितले नाही. ते तिचे आणि त्या डॉक्टरांचे गुपित होते.
आपली अवस्था खरंच त्या छोट्या मुलीसारखीच असते. भोवताली दाटून आलेलं मळभ हे कशामुळे निर्माण झाले आहे, ते दूर कसे होऊ शकेल, आपण त्यासाठी काय करायला हवे आहे, यातले काहीच आपल्याला स्पष्ट झालेले नसते. पण आपणसुद्धा काहीतरी करायला हवे आहे, ही ओढ मनात निर्माण होणे खूपच महत्त्वाचे आहे. आपल्याला जे जे शक्य आहे, ते मुळीच हातचे न राखता करीत राहायला हवे. हे सुधारण्याची जबाबदारी आपल्यावरही आहे. आपण परिस्थितीबद्दल तक्रार करतो, तेव्हा इतर लोकांवर सारा दोष टाकून मोकळे होण्याचा प्रयत्न करीत असतो.
भ्रष्टाचाराच्या मुळाशी समाजात बोकाळलेला आत्यंतिक स्वार्थ असतो. स्वार्थाची भावना ही नैसर्गिक आहे. आपले स्वत:चे कसे होईल, ही काळजी प्रत्येकालाच असते. व्यवहारात तिला मुरड घालून इतरांचाही विचार झाला तरच समाज टिकू शकतो. ‘सर्वे सन्तु निरामया:’ सर्वांचा मार्ग निष्कंटक होवो, ही भावना जर मनात रुजली तर स्वार्थाचे थैमान कमी होऊ शकते. लहान मुलांना स्वप्ने पाहायची आवड जास्त असते. तशीच त्यांची मी आणि माझे ही भावनादेखील प्रबळ असते. म्हणूनच ती आपल्या वस्तू सहजासहजी दुसर्‍यांना देऊन टाकायला तयार होत नाहीत. आपल्या भावासाठी आपण काहीतरी करायला हवे, हा विचार तिच्या मनात प्रकर्षाने निर्माण झाला. म्हणून तिने खाऊसाठी मिळालेल्या पैशातून वाचवलेले सारे पैसे खर्च करून त्याचा इलाज करण्यासाठी औषध आणायचे ठरवले. तिचा प्रयत्न अतिशय प्रामाणिक होता यात शंकाच नाही.
मलासुद्धा अनेक वेळा निराशेने घेरले आहे. पण मी जेव्हा प्रतिकूल परिस्थितीतही श्रद्धेने लढत राहणारी माणसे पाहतो, तेव्हा ती निराशा नाहीशी होऊन परत उत्साह वाटायला लागतो. माझा अनुभव असा आहे, की वाईट माणसे जेवढी असतील, त्यांच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने चांगल्या माणसांची संख्या असते. पण त्यांच्यामध्ये भले व्हावे यासाठी झगडण्याची तेवढी तीव्र इच्छा नसते. ती जर जागी करता आली तर साधी साधी माणसे उभी राहतात आणि काळ बदलून टाकणारी शक्ती निर्माण होते. निराशेचा पगडा आपणच झटकून टाकायचा आणि लढायला उभे राहायचे. दैव नेहमीच प्रतिकूल असेल असे नाही. आपल्यालाही समविचारी माणसे भेटून मोठे कार्य उभे राहू शकेल. तसे नाही झाले तरी अन्यायाविरुद्ध लढण्याचे समाधान तरी नक्की मिळेल. आणि कुणी सांगावे, एखाद वेळी आपल्यालासुद्धा अनुकूल शक्ती मागे उभ्या राहिल्याचा अनुभव येईल. मात्र, आपण जबाबदारी झटकून टाकून नुसतेच चमत्काराची वाट पाहत राहिलो तर काहीच साधणार नाही. सर्वस्व पणाला लावण्याचीच तयारी ठेवायला हवी. बघा बरं तुमच्याजवळ किती शिल्लक साचली आहे ते!
(लेखक ज्येष्ठ क्रीडाप्रशिक्षक व 
सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

Web Title: Miracle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.