अलौकिक स्पर्शज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 06:04 AM2019-06-02T06:04:00+5:302019-06-02T06:05:08+5:30
महात्मा गांधी, नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद, विन्स्टन चर्चिल, लॉर्ड आणि लेडी माउण्टबॅटन, बालगंधर्व, योगी अरविंद, स्वामी चिन्मयानंद, ओशो. अशा वेगवेगळ्या क्षेत्नांतील दिग्गजांना आपल्या अलौकिक मसाजाद्वारे वेदनामुक्त करणार्या डॉ. राम भोसले यांच्याशी वैयक्तिक कारणानं माझा परिचय झाला. त्या व्यक्तिमत्त्वाचं गारुड आजही मनावर कायम आहे..
- सतीश पाकणीकर
संध्याकाळी 4ची वेळ. मी ऑफिसमध्ये काही फोटोंवर एडिटिंगचे काम करीत बसलो होतो. नेहमीप्रमाणेच अर्जंट असलेले. घरून माझ्या पत्नीचा वैशालीचा फोन आला. ताबडतोब घरी ये. असा जर फोन आला तर मला लगेच टेन्शन यायचे. त्याचे कारण म्हणजे माझा लहान मुलगा ऋतू. त्याला जन्मानंतर जडलेला ‘स्पास्टिसिटी’चा आजार. पण आत्ता तिच्या आवाजात काळजी जाणवली नाही तर काहीतरी लगेचंच सांगण्याची उत्सुकता होती. माझं ऑफिस आणि घर यात फक्त दोन मिनिटांचं अंतर. मी हातातील काम तसेच ठेवून घरी पोहोचलो. वैशालीने माझ्या हातात एक पुस्तक दिले. आणि म्हणाली - ‘हे लगेच वाच. आपल्याला यांना भेटायला जायचे आहे.’ ही घटना आहे 2004 सालातील.
वैशालीच्या मावशीने वर्तमानपत्नात आलेली पुस्तकाची एक जाहिरात वाचून माझ्या सासूबाईंना फोन केला होता. मग त्या त्वरित ते पुस्तक घेऊन आल्या. त्यांनी ते वाचले. मग वैशालीला त्याबद्दल सांगितले. ऋतूच्या उपचारासाठी त्याआधी आम्ही जवळ जवळ सर्व प्रकारचे दवाखाने पालथे घातले होते. त्यामुळे स्वाभाविकच वैशाली वैतागलेली असायची. रोज कोणी न कोणी नवे नाव सुचवायचे. पण आता स्वत:च्या आईनेच आग्रह केल्यामुळे तिने ते पुस्तक घेतले. वाचायला उघडले, एक मिनिटही खाली न ठेवता संपूर्ण वाचले आणि मला फोन केला. मी ते पुस्तक हातात घेतले आणि जरासे चाळले. मग माझीही अवस्था तीच झाली. पुस्तकाचे नाव होते ‘दिव्यस्पर्शी’. मुंबई हायकोर्टचे एक न्यायाधीश र्शी. धनंजय देशपांडे यांनी लिहिलेले, असामान्य दैवी कृपा लाभलेले,
हजारो व्यक्तींना आपल्या मसाजविद्येने व्याधीमुक्त करणारे डॉ. राम भोसले यांचे जीवनचरित्न.
हे चरित्न लिहिताना डॉ. राम यांचे वय होते 84.
आणि त्याच्यानंतर दोन वर्षांनी आम्ही ते वाचत होतो. मग शंका आली की, डॉ. राम भोसले हयात असतील का? असले तर कोठे राहत असतील?
ते आपल्याला भेटतील का? ते ऋतूूला मसाज करतील का?
पुस्तकाचे प्रकाशक ‘प्रसाद प्रकाशन’च्या ऑफिसवर मी फोन केला. त्यांच्याकडून मला दोन दिवसांनी डॉ. राम भोसले यांचा फोन नंबर मिळाला. मी तो नंबर डायल केला. पलीकडून विचारणा झाली. डॉक्टरांशी बोलायचे आहे असे मी सांगितले. काही सेकंदानी पलीकडून आवाज आला. - ‘मी डॉ. भोसले बोलतोय.’ मी धीर करून ऋतूच्या आजाराबद्दल थोडक्यात माहिती दिली. ती शांतपणे ऐकल्यावर ते म्हणाले, ‘नजीकच्या काळात दोन ग्रहणे आहेत. ती झाल्यावर ऋ तूला घेऊन या. मी पाहीन त्याला.’ त्यांच्या बोलण्यानेच मला आश्वस्त झाल्यासारखे वाटले.
साधारण दीड महिन्याने मी परत त्यांना फोन केला. त्यांनी वेळ आणि पत्ता दोन्ही सांगितले. पत्ता होता - वीर भवन, रिट्झ रोड, मलबार हिल, मुंबई. त्यादिवशी आम्ही दिलेल्या वेळेच्या आधीच पोहोचलो. वीर भवन ही एक चार मजली इमारत होती. गेटच्या बाहेर पाटी होती ‘मेहता’. आवारात चार-पाच आलिशान गाड्या उभ्या होत्या. भल्यामोठय़ा लाउंजमध्ये लिफ्टपाशी आम्ही उभे असताना बाहेरून एक तरुणी तिच्या दोन छोट्या मुलांना घेऊन आली. तिला कुठे तरी पाहिल्यासारखे वाटत होते. आणि माझी ट्यूब पेटली. ती तरुणी म्हणजे सिनेतारका जुही चावला होती. मग पुन्हा प्रकाश पडला की, तिचे आताचे नाव जुही चावला - मेहता आहे. अरे, म्हणजे यांच्याकडे राहतात डॉ. राम भोसले. हा विचार मनात चालू असतानाच ऋ तूूकडे पाहत तिने मला विचारले, ‘आपको डॉक्टरसाबसे मिलना है? वो चौथें मालेपे मिलेंगे.’ आम्ही चौथ्या मजल्यावर पोहोचलो. आत गेलो. एका मोठय़ा खोलीत बसण्याची व्यवस्था केली होती. आम्ही तेथे विसावलो. त्या खोलीत फक्त आम्हीच होतो. आतील बाजूस जी खोली होती ती खोली डॉ. राम भोसले यांची. अध्र्या तासाने आतील पेशंट बाहेर आले. आता आमचा नंबर. आम्ही आत गेलो.
समोरच एका मोठय़ा बेडवर डॉ. राम भोसले बसलेले होते. त्यांचा एक सहाय्यक शेजारी उभा होता. मी आमची सर्वांची ओळख करून दिली. डॉ. राम भोसले यांचे डोळे उघडे होते; पण आता त्यांची दृष्टी पूर्ण गेलेली होती. त्यांनी अंदाजाने ऋतूला तपासायला सुरुवात केली. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद, सर्वपल्ली राधाकृष्णन, वल्लभभाई पटेल, लॉर्ड आणि लेडी माउण्टबॅटन, आयसेन हॉवर, विन्स्टन चर्चिल, जोसेफ स्टॅलिन, जॉर्ज बर्नार्ड शॉ, येहुदी मेनूहीन, बालगंधर्व, पं. खापूमामा पर्वतकर, उ. बिस्मिल्लाह खान, पं. रविशंकर, उ. अहमदजान थिरकवाँ, महावतार बाबाजी, शंकर महाराज, योगी अरविंद, स्वामी चिन्मयानंद, ओशो अशा विविध क्षेत्नांतील महान प्रभृतींना आपल्या अलौकिक मसाजाद्वारे वेदनामुक्त करणार्या डॉ. राम भोसले यांची जादुई बोटे आता ऋतूच्या पाठीवरून हळुवारपणे मसाज करीत होती. जणू ते एखादे वाद्य नजाकतीने वाजवत आहेत.
‘सर जो तेरा चकराये. या दिल डूबा जाये’ या प्यासा चित्नपटातील गाण्यात असे वर्णन येते की, ‘प्यार का होवे झगड़ा, या बिज़नस का हो रगड़ा, सब लफड़ों का बोझ हटे. जब पड़े हाथ इक तगड़ा’. आपली मसाजबद्दलची तगड्या हाताची कल्पना त्याने जास्तच दृढ होते. पण इथे तर वेगळाच मसाज होता. बोटे तर जणू एखादे मोराचे पिस फिरवल्याप्रमाणे फिरत होती. आमच्या समक्ष एका ‘अलौकिक स्पर्शज्ञा’च्या जादुई बोटांचे नर्तनच सुरू होते. हा मसाज चालू असतानाच डॉक्टर ऋतूशी बोलत होते. त्यांची आणि ऋतूची एकदम गट्टी जमली. त्यांनी त्याला ‘मिठू’ हे नाव बहाल केले. तर तो त्यांना ‘रामआबा’ हाक मारायला लागला. थोड्या वेळाने त्यांनी मसाज थांबवला. मग म्हणाले, ‘मोठा गोड आहे हा मुलगा. म्हणूनच मी त्याला मिठू हाक मारली. याला पंधरा दिवस रोज घेऊन या. मी मसाज करीन.’ त्याप्रमाणे वेळ व तारखा ठरल्या आणि आम्ही तेथून निघालो.
8 मे ते 21 मे 2004 या पंधरा दिवसात डॉक्टरांनी रोज ऋ तूला मसाज केला. रोज नवी मैफल असे. रोज नव्या गप्पा. रोज एखादी नवी आठवण. एकदा वैशालीचा पाय मुरगळला. बोलण्याच्या ओघात तिने ते डॉक्टरांना सांगितले. त्यांनी तिच्या पायावर मोजून अर्धा मिनिट मसाज केला आणि तिच्या वेदना गायब झाल्या. आपल्या मुलाला मसाज केल्यावर त्याला कोणती अनुभूती येत असेल याची एक छोटीशी झलकच जणू.
मला वेळ मिळाला की, मी पुण्याहून तेथे जात होतो. ‘दिव्यस्पर्शी’ वाचलेले असल्याने त्यातील काही मजकुराबद्दल मला रामआबांकडून काही जाणून घ्यायचे होते. तसे ते गप्पीष्ठही होतेच. एकदा बोलताना संधी साधून मी विचारले, ‘डॉक्टर, तुम्ही रोज व्हिस्कीची एक बाटली, तीन तोळे अफू, तीन तोळे गांजा, तीन तोळे भांग, शंभर सिगारेट आणि दीडशे तंबाखूची पानं असं सेवन करायचात असा उल्लेख पुस्तकात आहे. कोणीही व्यक्ती या सगळ्यांनी काहीच तासांत संपेल, असं असताना तुम्ही ते सर्व कसं पचवलं?’’ त्यांच्या चेहर्यावर मंद हास्य आलं. ही शंका त्यांना आधीही विचारली गेली असणार. ते एवढंच म्हणाले, ‘बेटा, मी साधनाही त्याच प्रमाणात करीत होतो ना?’
त्यानंतर स्वत:ला झालेल्या अहंकाराबद्दलचा एक किस्साही त्यांनी सांगितला. तो त्यांच्याच शब्दात. ‘‘एकदा माझे गुरु महावतार बाबांकडे एक सिद्धपुरुष आले. बाबांनी त्यांना सांगितले की - यह बच्चा मसाज अच्छा करता है’. झालं. मला खूप आनंद झाला. अहंकारानी मन भरून गेलं. मी त्या महात्म्याला मसाज करू लागलो. काही तास मी मसाज केला तरी त्यांच्या तोंडून एक साधा हुंकारही येऊ नये? माझी दहाही बोटं थकून काम करेनाशी झाली. हे लक्षात आल्यावर ते महात्मा मला म्हणाले, हं. बस करो अभी. मला हायसे वाटले. मी त्यांना नमस्कार करायला वाकलो. त्यांनी माझ्या कानाच्या मागे एका ठिकाणी त्यांच्या बोटांनी असा काही झटका दिला की, माझ्या सर्वांगातून झिणझिण्या आल्या. माझा काही तासांचा सर्व थकवा त्या क्षणी नाहीसा झाला. मी त्या महात्म्यांच्या पायाशी लोळण घेतली व विचारले, ‘यह आपने क्या और कैसे किया? मुझे भी सिखायीये.’ यावर ते म्हणाले, ‘हम किसीके गुलाम नहीं है.’ असं म्हणून ते निघून गेले. पण या प्रसंगानी माझ्या स्वभावातला अहंकार मात्न नाहीसा केला.’’
पंधरा दिवसांच्या मसाजने ऋतूच्या स्पास्टिसिटीमध्ये बराच फरक पडला होता. त्यांनी मसाज कसा करायचा हेही वैशालीला दाखवले होते. पण आपला हात आणि त्यांचा हात, तसेच त्यांची त्यामागची साधना यात महदंतर असणारच ना? एक मात्न झालं की आमच्या मनाला त्यांच्यामुळे उभारी आली. या प्रोब्लेमकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी मिळाली.
मी नेहमी म्हणतो की, कॅमेर्याच्या संगतीमुळे मला अनेकानेक महान लोकांच्या जवळ जाण्याची संधी मिळाली. हे तर खरं आहेच. पण ऋतूमुळे आम्हाला वेगवेगळ्या क्षेत्नातल्या असाधारण व्यक्तींशी परिचय झाला. मग ते ‘निम्हान्स’ या बेंगलोर येथील संस्थेचे डायरेक्टर डॉ. नागराज असोत, हैदराबाद येथील भाऊमहाराज निटूरकर असोत, प्राणिक हिलिंग या शास्रातले गुरु चो आ कोक्सुई असोत, वासा कन्सेप्टच्या निर्मात्या डॉ. राजूल वासा असोत, की स्पंदन मसाजचे जनक डॉ. राम भोसले असोत. या सर्वांच्या अलौकिक शक्तींचा अनुभव आम्ही घेतला. कोणास ठाऊक की असे अनुभव देण्यासाठी तर आमच्या पोटी ऋतूचा जन्म झाला नसेल?
sapaknikar@gmail.com
(लेखक प्रसिद्ध प्रकाशचित्रकार आहेत.)