संगीतकार ‘स्वामी’ यशवंत देव..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 06:09 IST2018-11-04T06:09:00+5:302018-11-04T06:09:00+5:30
संगीतकार यशवंत देव काही वर्षे ‘ओशों’च्या प्रभावाखाली होते. आश्रमातील कफनी ते वापरायचे, वर रजनीशांचा फोटो असलेली माळ. त्यांनी आपलं नावही बदललं होतं. ओशोंच्या महानिर्वाणानंतर सर्व थांबलं; पण त्यांचं ते नाव मात्र कायम राहिलं!...

संगीतकार ‘स्वामी’ यशवंत देव..
दिलीप कुलकर्णी
१ नोव्हेंबर हा संगीतकार यशवंत देव यांचा जन्मदिन! गेली ३० - ३५ वर्षे तरी मी त्यांच्या संपर्कात होतो; म्हणजे वारंवार भेटत होतो असं नाही. अलीकडे कित्येक महिने त्यांची आठवणसुद्धा नव्हती. करुणा देव गेल्यापासनं आमचा संपर्क कमी झाला आणि आता तर तो कायमचा थांबला.
१९८२-८३ साली कवी अनिल कांबळे कुठल्याशा दैनिकाच्या साप्ताहिक पुरवणीसाठी संगीतकार/ गायकांच्या मुलाखती असलेलं एक सदर चालवित होता. पं. जितेंद्र अभिषेकी, श्रीनिवास खळे, अनुप जलोटा असे अनेकजण त्याच्या ‘हिटलिस्ट’वर होते; पण त्यानं सदराची सुरुवात केली ती यशवंत देव यांच्यापासून. ‘ब्लॅक अॅण्ड व्हाइट’चा जमाना होता तो. वर्तमानपत्रात सर्रास रंगीत छायाचित्रे त्यावेळी येत नव्हती. मुलाखत सजते ती छायाचित्रांमुळे आणि ते काम माझ्याकडे होतं.
‘मुलाखत संपली की तुम्ही फोटो घ्या. मध्येच रसभंग नको’, देवांनी माझी ओळख होण्यापूर्वीच सांगितलं. मुलाखतीसाठी ते पुढ्यात हार्मोनियम घेऊन बसले होते. मधून मधून त्यांनी काही चिजा ऐकविल्या.
मुलाखत संपली.
काही दिवसांनी मला एक पत्र आलं. सुरुवातीला मला ते अनोळखी वाटलं, कारण त्यावर पत्ता होता : ‘स्वामी आनंद यशवंत, रामदास भुवन, शिवाजी पार्क, दादर, मुंबई’! पत्रात मुलाखतीत छापलेल्या फोटोंची खूप प्रशंसा केली होती. पुढे हा सिलसिला वाढतच गेला. इतका की, पुण्यात ते आले की हमखास त्यांची भेट व्हायची. पुण्यातलं त्यांचं वास्तव्य ठरावीक ठिकाणीच असायचं. सदाशिव पेठेतले सुभाष बापट हे त्यापैकीच एक.
त्यांचा ७०वा वाढदिवस नरेंद्र जाधव यांच्या घरी साजरा झाला होता. यशोदा, मंगेश पाडगावकर, उषा, शशी मेहता, उत्तरा केळकर, पद्मजा फेणाणी, रंजना पेठे (जोगळेकर) अशी त्यांच्या अतिशय निकटची मंडळी तिथं हजर होती. नानासाहेबांनी (खाजगीत त्यांना ‘नाना’ असं संबोधत) पुण्याहून आम्हा दोघांना बोलविलं होतं. मी आणि प्रा. प्रकाश रणछोड भोंडे ! ३१ आॅक्टोबरला रात्रीच सगळे जाधवांच्या घरी जमले होते. आम्ही पोहचलो तेव्हा मैफल सुरू झालेली होती. पाडगावकर त्यांच्या खास शैलीत कविता म्हणत होते. कविता, गाणी, गप्पा, नकला असा विविधरंगी कार्यक्रम अगदी पहाटेपर्यंत सुरू होता. मध्यरात्री एकच जल्लोष झाला. ‘स्वामीं’नी केक कापला आणि पुन्हा कार्यक्रम सुरू झाला.
पहाटे कार्यक्रम संपला आणि आपापल्या वाहनाने सर्वजण परतली. मी आणि भोंडे फक्त उरलो. आम्ही चालत चर्चगेटला जाण्याचा विचार करत होतो. करुणा देवांनी ते बघितलं आणि त्यांच्या गाडीत पुरेशी जागा नसतानाही आम्हा दोघांना त्या आपल्या घरी घेऊन गेल्या.
काही वर्षे ते ‘ओशो’च्या प्रभावाखाली होते. त्यावेळी ‘ओशो’ हे ‘भगवान रजनीश’ या नावाने प्रसिद्ध होते. आश्रमातील कफनी ते वापरायचे. वर रजनीशांचा फोटो असलेली माळ. कुतूहलापोटी मी एकदा त्यांच्याबरोबर आश्रमात गेलो होतो. नंतर स्वतंत्रपणे पाच-सहा वर्षे मीही नित्य तिथं जात असे. आश्रमातल्या बुद्ध हॉलमध्ये गुरुपौर्णिमेला मोठा उत्सव होत असे. त्या हॉलमधल्या स्टेजचं गुरुपौर्णिमेचं डेकोरेशन ह्या ‘स्वामीं’मुळे मला मिळालं होतं.
याच अवधीत त्यांनी ‘ओशो’वर काही कविता लिहिल्या. मराठी आणि हिंदी! पुढं त्या कवितांची दोन पुस्तकं निघाली. त्याचंही काम ‘स्वामीं’नी माझ्यावर सोपवलं. ओशोंची तत्त्वप्रणाली त्यांना भिडली होती. त्यामुळे त्या कविता त्यांना उत्स्फूर्तपणे सुचल्या होत्या. पुढं त्यांनी त्यांना चाली दिल्या की नाही ते कळलं नाही. ओशोंच्या महानिर्वाणानंतर त्यांची कफनी गेली, आश्रमातलं जाणं-येणं कमी झालं. पुढं पुढं ते थांबलंही; पण ते ‘स्वामी - आनंद यशवंत’ बनले ते कायमचे!
१ नोव्हेंबरला त्यांची भेट व्हायचीच. पुढं पुढं भेटी कमी झाल्या; पण कुठंही असलो तरी १ नोव्हेंबरला त्यांना फोन करण्याचा माझा नेम कधी चुकल्याचं मला आठवत नाही. ७४वा का ७५वा आता नीटसं स्मरत नाही. पण हा त्यांचा वाढदिवस ‘पुलं’च्या साक्षीनं झाला होता.
पु. ल. देशपांडे यांचे खास स्नेही मधू गानू यांच्या डोक्यातून ही कल्पना निघाली. गानू राहात होते पुण्यात प्रभात रोडला; पण औंधमध्येही त्यांचं मोठं घर होतं. तिथं ही प्रात:कालीन मैफल करायची ठरली. उत्सवमूर्ती होते पं. यशवंत देव; पण कार्यक्रमाचे ‘अध्यक्ष’ होते ‘पुलं.’ अनेक प्रथितयश गायक/ वादक त्या मैफलीला हजर होते; पण मुख्य ‘परफॉर्मन्स’ होता यशवंत देव यांचा. ते विडंबन काव्यही करत. तिथं त्याचंही सादरीकरण झालं.
नटवर्य दिलीप प्रभावळकरही ह्या मैफलीला हजर होते. उत्सवमूर्तींना त्या कार्यक्रमाला नेण्याची आणि परत आणण्याची जबाबदारी संयोजकांनी माझ्यावर सोपविली होती. मधू गानूंनी एक छोटंसं निमंत्रण छापून घेतलं होतं. कार्यक्रमाच्या गडबडीत मला ते देण्याचं राहिलं होतं. प्रवासात मी नानासाहेबांना म्हटलं की, ‘मी आज तुमचा वाहनचालक म्हणून कार्यक्रमाला येत आहे, कारण मधुभाऊंचं रितसर निमंत्रण मला नाही’. मी जरी हे हळूच बोललो असलो तरी मागच्या सीटवर बसलेल्या करुणा देव यांना ते ऐकू गेलं, त्या लगेच म्हणाल्या, ‘अहो, मलाही त्यांचं निमंत्रण नाही; पण यशवंत देव यांची पत्नी म्हणून मी या कार्यक्रमाला चालले आहे आणि तुम्हीही चालला आहात ते आमचे मानसपुत्र म्हणूनच.’ चार वर्षांपूर्वी माझे वडील गेले, ती तारीख होती २३ आॅक्टोबर. परवा ३० आॅक्टोबरला नाना गेल्याची बातमी आली तेव्हा असं वाटलं की अरे, ते माझे वडील चार वर्षांनी पुन्हा एकदा मरण पावले...
(लेखक ख्यातनाम प्रकाशचित्रकार आहेत.)
manthan@lokmat.com