‘हास्यरेषांचा आनंदयात्नी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 06:05 AM2020-03-15T06:05:00+5:302020-03-15T06:05:08+5:30

लोकांना कायम हसवत ठेवणं सोपं काम नाही. त्यातही हास्यचित्नकाराचं काम जास्तच अवघड.  कल्पकता, रेषेवरचं प्रभुत्व, विनोदबुद्धी. अशा अनेक गोष्टी त्या व्यक्तीकडे असाव्या लागतात. गेली सत्तर वर्षे लोकांना हसवणारे शि. द. फडणीस हे या सर्वांचे धनी आहेत.  पुलंनी आपल्याला विविध माध्यमांतून आनंद दिला,  तर शि. दं. नी त्यांच्या निर्विष चित्नांतून.  चित्नांतून आनंद वाटत जाणार्‍या या आनंदयात्नीला  स्वामित्वहक्कासाठीही जोरदार लढा द्यावा लागला, पण तरीही कोणतीही कटुता त्यांच्या मनात नाही. आयुष्याच्या या टप्प्यावर ते अगदी शांत, मुक्त व तृप्त आहेत.

Memories of great artist Shi. Da. Phadnis by Sateesh Paknikar | ‘हास्यरेषांचा आनंदयात्नी’

‘हास्यरेषांचा आनंदयात्नी’

Next
ठळक मुद्देचित्नांतून आनंद वाटत जाणार्‍या या आनंदयात्नीला स्वामित्वहक्कासाठीही जोरदार लढा द्यावा लागला आहे.  

- सतीश पाकणीकर 

अचानकपणे जुन्या फोटोंच्या खजिन्यातून मला आलेलं एक ग्रीटिंग कार्ड अवचित हातात आलं. त्यावर एक फोटो चिकटवलेला होता. तो फोटो पाहून मन एकदम अठ्ठावीस वर्षे मागे गेलं. चित्नकार, हास्यचित्नकार, सिद्धहस्त लेखक व साक्षेपी संपादक र्शी. शंकरराव वासुदेव किलरेस्कर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त झालेल्या एका कार्यक्रमातील फोटो होता तो. पुण्यातील प्रभातरोडच्या आतील गल्लीत असलेल्या ‘संपादन’ नावाच्या र्शी. मुकुंदराव व सौ. शांताबाई किलरेस्कर यांच्या बंगल्यातील झोपाळ्यावर स्वत: मुकुंदराव किलरेस्कर यांनी टिपलेला होता तो फोटो. दृश्यमाध्यमांविषयी झालेल्या कार्यशाळेच्या प्रसंगात डॉ. भय्यासाहेब ओंकार, उमेश गुप्ते, मुरली लाहोटी, रवि परांजपे, चित्नलीला निकेतनच्या सौ. सुनीती जाधव-आंबिलढोक, श्याम देशपांडे, मी आणि ग्रुपच्या मध्यभागी सर्वात सीनिअर असे र्शी. शि. द. फडणीस असा तो फोटो. दिनांक होता 12 जुलै 1992. त्याचं ग्रीटिंग करून मुकुंदरावांनी त्यांच्या खास शैलीत एका पत्नासोबत तो मलाही पाठवला होता. 
आपल्या मनाची एक गंमत आहे. एवढय़ाशा धाग्यावरून ते आपल्याला एका क्षणात किती मोठा प्रवास घडवून आणेल याचा काही नेम नाही. ती अठ्ठावीस वर्षे मागे सारत मला पुढच्याच क्षणी गेल्या वर्षीचा एक दिवस आठवला. सोमवार, 29 जुलै 2019. मी माझ्या मोबाइलवरून फोन लावला होता. पलीकडून ‘हॅलो’ ऐकू आल्यावर मी ‘जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!’ असं आधी म्हणून टाकलं आणि मग सांगितलं की मी सतीश बोलतोय. पलीकडची व्यक्ती त्यादिवशी बरोबर चौर्‍याण्णव वर्षांची झालेली होती; पण त्याच क्षणी त्या व्यक्तीने मला लगेचच विचारले- ‘हं.. काय म्हणतीय तुमची फोटोग्राफी? कॅलेंडरची तयारी सुरू झाली का?’ जुलै 1992 मधील त्याचं बोलणं व जुलै 2019 मधील बोलणं काहीच फरक जाणवत नव्हता. तोच त्वरित असा रिस्पॉन्स. तीच तरतरी. ते होते आजही अत्यंत तरुण असलेले हास्यचित्नकार र्शी. शि. द. फडणीस. कुठून आणत असतील ही मंडळी त्यांच्यातील ऊर्जा?
आपल्याला सगळ्यांना अक्षर ओळख करून दिली जाते ती चित्नांच्या माध्यमातूनच. अ- अननसाचा, आ- आगगाडीचा वगैरे. मग अक्षरांपासून शब्द अन् मग भाषा. हा अभ्यास होताना नंतर बर्‍याच जणांच्या बाबतीत चित्नकलेची ही जमलेली मैत्नी कमी कमी होत जाऊन जवळजवळ लुप्तच होते; पण काहीजण शब्दांचा जरासुद्धा सहारा न घेता फक्त कुंचल्याच्या आधारे आपली कारकीर्द घडवतात. महान चित्नकार होतात. त्यातही हास्यचित्नकाराचे काम जास्तच अवघड. त्याला फक्त रेषेवर प्रभुत्व असून चालत नाही तर कल्पकता असावी लागते, विनोदबुद्धीची देणगी असावी लागते, तरच सृजनाचा जन्म होतो. हास्यचित्नकार शि. द. फडणीस हे या सर्वांचे धनी आहेत. त्यामुळे त्यांची सोपी, उत्तम रंगसंगतीची, मथळ्याशिवायची हास्यचित्नं भाषा, प्रदेश किंवा वर्गांच्या सीमा ओलांडून दैनंदिन जीवनात आनंदाची पखरण करतात. आणि हे थोडी थोडकी नव्हे तर गेली जवळ जवळ सत्तर वर्षे!
लताबाईंच्या आवाजातील ‘नौजवान’ या चित्नपटातील साहिर लुधियानवी यांनी लिहिलेलं आणि सचिनदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं एक अप्रतिम गाणं आहे.
‘ठंडी हवाएँ, लहरा के आयें, रुत है जवां 
तुमको यहाँ,  कैसे बुलाएँ, ठंडी हवाएँ..’ 
हा चित्नपट 1951 सालचा. हे गाणं आजही इतकं  ताजं आणि टवटवीत आहे की कोणत्याही वेळी ते ऐकलं की मन प्रसन्न होऊन जातं. शि. द. फडणीस यांचीही चित्नमुशाफिरी त्यावेळपासूनचीच. त्या काळातील त्यांची चित्नं पाहिली की आजही त्या गाण्यातल्या प्रमाणेच थंड हवेची झुळूक आपल्याला अंतर्बाह्य लपेटून राहाते. ‘चाँद और तारे, हँसते नज़ारे, मिल के सभी, दिल में सखी, जादू जगाये’ अशीच अवस्था होऊन जाते.
त्यांचं एक चित्न आहे 1952 सालातील ‘मोहिनी’ या दिवाळी अंकासाठी केलेलं. त्यांनी केलेलं दिवाळी अंकाचं पहिलं मुखपृष्ठ. बस स्टॉपवर एक युवती व एक युवक उभे आहेत. त्याच्या निळसर बुशशर्टवर काळ्या उंदरांचे पळतानाचे छाप आहेत, तर युवतीच्या लाल रंगाच्या साडीवर पांढर्‍या रंगातील मांजरांचे दबा धरून बसलेले छाप आहेत. ती मांजरे जणू त्या उंदरांच्या मागे पळत आहेत. त्या दोघांच्याही चेहर्‍यावरील भाव, तिच्या हातातील पर्स अन् त्याच्या हातातील छत्नीला लटकवलेला आकाशकंदील, वार्‍याची दिशा, कंदिलाच्या हलणार्‍या झिरमिळ्या या सर्वांना उठाव आणणारी ‘लेमन यलो’ रंगातील पार्श्वभूमी. चित्न पाहताच कोणाच्याही चेहर्‍यावर हसू न आले तरच नवल. अशी त्यांच्या चित्नांची मोहमयी दुनिया गेली सत्तर वर्षे रसिकांना मोह घालत आलेली आहे.
1992 साली शि. द. फडणीस यांना पहिल्यांदा भेटण्याचा योग आला. त्यानंतर अनेकवेळा त्यांना भेटत गेलो. कधीही घरी गेलं तरी फडणीस आणि त्यांच्या पत्नी सौ. शकुंतला नेहमी चकाचक आवरून तयार असलेले. जणू आत्ता त्यांना कुठे बाहेर जायचे आहे. नेहमीच हसतमुखाने स्वागत. प्रकाशचित्नकलेविषयी आपुलकीने चौकशी. ‘नवीन काय करताय? हा ठरलेला प्रश्न.’ प्रकाशचित्नकला ही काळाला गोठवून ठेवते. प्रत्येक चांगला फोटोग्राफ हा एखाद्या शिलालेखासारखा असतो’ असे ठाम मत. कोणाबद्दलही कणभरही कटुता नाही. कायम प्रसन्न भाव. असे असल्यावर मग का नाही ते सर्व त्यांच्या चित्नातून पाझरणार?
बरेच दिवस त्यांचा फोटोसेशन करण्याचे माझ्या मनात होते. एकदोनदा तसे बोलणेही झाले होते; पण तो योग काही जमत नव्हता. 2018 च्या ऑगस्ट महिन्यात हा योग जुळून आला. त्यांची मुलगी रूपा देवधर हिनेही मनावर घेतल्याने फोटोसेशन ठरला. 16 ऑगस्ट 2018 रोजी शि. द., सौ. शकुंतला देवधर आणि त्यांच्या लीना व रूपा या दोन्ही मुली माझ्या स्टुडिओत आले. 
शि. द. यांच्या हातात एक मोठे पॅक होते. दोन फोल्डेबल इझल होती. जागा ठरवून घेत त्यांनी स्वत: एकेक साहित्य बाहेर काढायला सुरुवात केली. नेटकेपणाने इझल तयार करून त्यावर एक चित्नही लावले. व मला म्हणाले, ‘पाकणीकर, वेळ वाया जायला नको म्हणून मी आधी काढलेलीच दोन-तीन चित्नं बरोबर घेऊन आलो आहे. ही पाहा.’ असे म्हणत त्यांनी मला पहिले चित्न दाखवले. एका युवतीच्या मागे तिचा प्रियकर धावतोय. तिला देण्यासाठी त्याच्या हातात गुलाबाचे फूल आहे; पण ती त्याच्याकडे ढुंकूनही न पाहता पुढे निघालीय. त्यामुळे युवकाने त्याच्या डोळ्यांसकट त्याचा चष्मा तिच्या पुढे फेकला आहे. आणि ते डोळे आता तिच्याकडे पाहत आहेत, असे ते चित्न. मग म्हणाले- ‘मी चित्न खरोखरी काढणार नसलो तरी मला जरा थोडेसे पाणी लागेल. वातावरण तर जमायला पाहिजे ना?’ मग त्यांनी रंग काढून त्या चित्नामध्ये असलेली एक शेड बनवली. आणि जणू आत्ताच ते चित्न पूर्ण झालंय अशा रीतीने त्यावर शेवटचा हात फिरवतानाची ‘पोझ’ घेतली. सच्चा परफॉर्मर काय असतो याचं ते प्रात्यक्षिक होतं.
‘आता दुसरं चित्न.’ असं म्हणत अत्यंत मिश्किलपणे त्यांनी ते चित्न माझ्यासमोर धरलं. एका फोटोग्राफरकडे फोटोसाठी जाताना किती समयसूचकता? त्या दुसर्‍या चित्नात एक फोटोग्राफर इमारतीच्या गच्चीवरून समोरच्या इमारतीच्या एका खिडकीत असलेल्या युवतीचा फोटो काढण्याच्या तंद्रीत आहे. हे करताना आपण गच्चीच्या टोकावर आलोय याचेही त्याला भान नाही. त्यामुळे त्याची पत्नी पाठीमागून येऊन तिने त्याला आपल्या हातांच्या विळख्यानी ओढून धरलंय. म्हटलं तर साधा अर्थ, म्हटला तर किती गहन अर्थ. कमीत कमी रेषा व उत्साही रंग. कोणत्याही भाषेतील हजारो शब्द जे व्यक्त करू शकणार नाही ते सर्व त्या चित्नात उतरून आलेलं. 
त्यांच्या नंतर सौ. शकुंतला यांचीही काही प्रकाशचित्ने मी टिपली. हास्यचित्नकाराबरोबर त्याच्या लेखिका असलेल्या पत्नीचाही फोटोसेशन पार पडला. दोन–अडीच तास त्यांच्या प्रसन्न उपस्थितीचा अनुभव हा फोटोसेशनच्या अनुभवापेक्षा कधीही जास्त स्मरणात राहील असा.
एक रुखरुख मनात राहिली होती. त्यांनी फोटोसेशनच्या वेळी प्रत्यक्ष चित्न काढले नव्हते ही; पण माझी इच्छाशक्ती जबरदस्त होती. त्यामुळे पुढे सव्वा वर्षात माझी ती इच्छाही पूर्ण झाली. पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीचा सांगता कार्यक्र म होता. डॉ. दिनेश व सौ. ज्योती ठाकूर यांनी आयोजित केलेला. पुलंच्याच मालती-माधव या इमारतीच्या पार्किंगमध्ये. पुलंचे आप्त-स्वकीय जमलेले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि शि. द. फडणीस यांची प्रमुख उपस्थिती. दोघेही नव्वदी पार केलेले; पण तरीही चैतन्याचा अखंड झरा. ‘जरे’चा जराही स्पर्श न झालेले. शिवशाहिरांनी त्यांच्या खास शैलीत पुलंच्या व सुनीताबाईंच्या आठवणींचा फड जमवला. त्यानंतर होते शि दं चे प्रात्यिक्षक. इथेही त्यांनी त्याच नेटकेपणाने इझल उभारणी केली. अगदी त्याच्यावरील वेष्टण व त्याची दोरीही व्यवस्थित ठेवून दिली. सर्वजण श्वास रोखून बसलेले. 23 इंच बाय 36 इंच आकाराचा पांढराशुभ्र कागद शि दं चा कुंचला टेकण्याची वाटच पाहत होता जणू. त्यांनी स्पंजचा वापर करून स्वत:च तयार केलेला जाड रेषा देणारा तो कुंचला. अंदाज घेत तो ब्रश फिरू लागला. आणि पाचच मिनिटात त्या जादूच्या रेषांनी कागदावर साक्षात पु. ल. अवतरले. ते एवढय़ा मोठय़ा कागदाच्या एका बाजूला अवतरले होते. बाकी भाग रिकामाच. शि दं नी झोकात एस. पी. अशी त्यांची स्वाक्षरी केली आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. शि दं च्या चेहर्‍यावर परत तेच मिश्कील भाव. अजून चित्न पूर्ण झालेले नाही हे सांगणारे. मग त्यांनी कागदाच्या उजव्या रिकाम्या जागेत एक आडवी रेष काढली आणि त्यावर उभे लेखणीचे चित्न. पुन्हा एकदा टाळ्या. परत तोच मिश्कील भाव.. आता थोडं थांबा सांगणारा. शेवटी त्या लेखणीच्या निबमधून उडू लागले आनंदाचे कारंजे. शि दं नी त्या दिवशीची तारीख टाकली 8-11-2019. आता मात्न टाळ्या थांबेचनात. पुलंनी दिलेल्या आनंदाचे काही मोजक्याच रेषांच्या साहाय्याने झालेले ते प्रकटीकरण त्यावेळच्या उपस्थितांपैकी कोणीच कधीच विसरू शकणार नाहीत. पुलंनी आपल्याला विविध माध्यमांतून आनंद दिला, तर शि दं नी त्यांच्या निर्विष चित्नांतून. 
चित्नांतून आनंद वाटत जाणार्‍या या आनंदयात्नीला स्वामित्वहक्कासाठीही जोरदार लढा द्यावा लागला आहे.  कलेचे विश्व हे भलेही मानवी पातळीच्या वर असेल तरीही कलाकाराला जगणं हे दैनंदिन आहे. त्याला लागणार्‍या गरजा त्याच्या कलेतूनच जर भागणार असतील तर त्याचे न्याय्यहक्क त्याला मिळालेच पाहिजेत. कलाविश्व कितीही मोठं असलं तरी त्याचा निर्मिक याला ऐहिक जीवन आहे आणि ते सन्मानाने जगण्यासाठी लागणारं त्याचं र्शेय त्याला दिलंच पाहिजे. मग असे लढे देऊनही इतकी उर्जा हे आणतात कुठून? या माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं ते त्यांच्याच ‘रेषाटन’ या पुस्तकाच्या वाचनातून. शि दं च्याच शब्दात सांगायचं तर ‘आयुष्यात सुंदर, संपन्न, निकोप दृष्टिकोन काय असावा याविषयी जगभरातील संत-माहात्म्यांनी भरपूर लिहून ठेवलं आहे. माणूस हे सारं विसरतो. जळमटं साठतात. ती दूर करण्यासाठी व या विचारांची उजळणी व्हावी म्हणून शंभर-दीडशे वर्षांनी आणखी कोणीतरी संत जन्माला येतो. सुविचारांची कमतरता कधीच नसते. आपण यातून शोषून किती घेतो एवढंच उरतं. मला जेवढं जमलं तेवढं घेतलं.  आयुष्याच्या या टप्प्यावर आपण अगदी शांत, मुक्त व तृप्त आहोत. परमेश्वराकडे काहीही मागणं नाही. कशाच्याही मागे धावायचं नाही. पूर्वीप्रमाणेच आता आणि पुढेही चिरतरुण आस्वादक दृष्टीने सर्व गोष्टींचं स्वागत करायचं आहे.’

sapaknikar@gmail.com                                 
(लेखक प्रसिद्ध प्रकाशचित्रकार आहेत.)

Web Title: Memories of great artist Shi. Da. Phadnis by Sateesh Paknikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.