बहुमान! - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं पोट्र्रेट काढणारे कलावंत विजेंद्र शर्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 06:01 AM2020-09-06T06:01:00+5:302020-09-06T06:05:06+5:30

देशाच्या सर्वोच्च पदावरच्या व्यक्तीशी बोलताना, भेटताना अवघडलेपण येतंच. राष्ट्रपती भवनात पोट्र्रेट लावण्यासाठी, प्रणव मुखर्जी यांच्याशी दोनदा भेट झाली. पण प्रत्येक वेळी त्यांचा भाव असा होता, जणू एखाद्या मित्राला आपण भेटतो आहोत. त्यांचा तोच उमदा भाव मग त्यांच्या पोट्र्रेटमध्येही उतरला. 

Memories of former President Pranab Mukherjee by artist Vijendra Sharma who had the privilege of drawing his portrait | बहुमान! - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं पोट्र्रेट काढणारे कलावंत विजेंद्र शर्मा

बहुमान! - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं पोट्र्रेट काढणारे कलावंत विजेंद्र शर्मा

googlenewsNext
ठळक मुद्देप्रत्येक राष्ट्रपतीचं पोट्रेट राष्ट्रपती भवनात लावण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. हे पोट्र्रेट काढायला मिळणं ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. 

- विजेंद्र शर्मा

प्रत्येक नव्या राष्ट्रपतीचं पोट्रेट राष्ट्रपती भवनात लावण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. प्रणव मुखर्जी राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांचे पोट्र्रेट काढण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली होती. एकूण दोन पोट्र्रेट काढायची होती. एक उभं आणि दुसरं बसलेल्या स्थितीत.
त्या दिवशी मी गेलो राष्ट्रपती भवनात. सगळी तयारी केली. कंपोझिशन तयार केलं. राष्ट्रपती मुखर्जी यांचीच वाट पाहात होतो. पण मनात असंख्य विचारांनी कल्लोळ माजला होता. कशी होईल त्यांच्याबरोबरची भेट. कसा असेल त्यांचा स्वभाव? कसे वागतील ते आपल्याशी? थोडं टेन्शनच होतं. 
अर्थात याआधी माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचंही पोट्र्रेट मी काढलं होतंच. तो अनुभवही अतिशय छान होता. मी विचारांच्या तंद्रीत असतानाच राष्ट्रपती मुखर्जी आले. ते माझ्याशी भेटले. बोलले. त्यांच्या बोलण्यात इतकी विनम्रता होती, की देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीशी मी बोलतोय, असं चुकूनही वाटलं नाही, इतकी आपुलकी त्यांच्या वागण्या-बोलण्यात होती. 
जणू एखाद्या जवळच्या मित्राशी बोलावं इतकं हसून खेळून आणि जुनी ओळख असल्यासारखं ते वागत होते. तुम्ही अशी पोज द्या, पोजसाठी अशा पद्धतीनं उभे राहा, असे बसा. जे जे काही मी त्यांना सांगत होतो, त्या त्या पद्धतीनं ते अगदी आनंदानं करत होते. थोडाही त्रासिक भाव त्यांच्या चेहर्‍यावर नव्हता. 


दुसर्‍या पोजमध्ये बसून फोटो घ्यायचा होता. या स्थितीत फोटो कसा येईल याची मला चिंता होती. बर्‍याचदा आपण काळजीत असतो, पण एखाद्या क्षणी अचानक असं काही होतं की, आपल्या अपेक्षेपेक्षाही चांगला क्षण आपल्या पुढय़ात येऊन उभा राहतो. यावेळीही तेच झालं. राष्ट्रपती मुखर्जी यांनी आपल्या चेहर्‍यावर असं काही एक्स्प्रेशन आणि स्माइल दिलं की मी त्याची कल्पनाही केली नव्हती. उभ्या असलेल्या फोटोपेक्षा हे एक्स्प्रेशन अगदी वेगळं आणि हटके होतं. केवळ एका काही क्षणांसाठी हे एक्स्प्रेशन होतं, पण माझ्या कॅमेर्‍यानं हा क्षण नेमका टिपला.
मुखर्जी आणि माझी भेट दुसर्‍यांदा झाली तीही राष्ट्रपती भवनात. पेंटिंग दर्शनी भागात लावण्यात येणार होतं आणि त्याच दिवशी त्यांचा वाढदिवसही होता. त्यांची शालीनता आणि विनम्रता पावलोपावली आणि वाक्यागणिक दिसून येत होती. यावेळीही जुनी ओळख असावी, अशा पद्धतीनं त्यांनी माझ्याशी हस्तांदोलन केलं. गप्पा मारल्या. मी त्यांच्या या कृतीनं खूपच प्रभावित झालो. त्यांच्याबरोबरची भेट आणि गप्पा माझ्या स्मृतीत कोरल्या गेल्या आहेत. 
एखादी कलाकृती जर जिवंत, अस्सल उभी करायची असेल, तर त्यासाठी या गोष्टीही खूप महत्त्वाच्या आहेत. तरच त्या त्या व्यक्तीचं व्यक्तित्व त्या कलाकृतीतून ठसठशीतपणे उठून दिसतं. त्यासाठी अभ्यास आवश्यक असतो, त्या कलेवरचं तुमचं प्रभुत्व महत्त्वाचं असतं, पण त्यापेक्षाही निर्णायक गोष्ट असते, ती म्हणजे त्या त्या व्यक्तीचे भाव. पोट्र्रेट करताना बुद्धिच्या दोन पावलं पुढे तुम्हाला जावं लागतं. ते जर साधलं तर मिळणारा आनंद अवर्णनीय असतो.

सन्मानाची गोष्ट..
राष्ट्रपती भवनात प्रत्येक राष्ट्रपतीचं पोट्र्रेट लावण्याची परंपरा आहे. संपूर्ण देशभरात जे अतिशय नामांकित चार-पाचशे  कलावंत आहेत, त्यातील एखाद्यालाच राष्ट्रपतींचे पोट्र्रेट तयार करण्याचा मान मिळतो. कोणत्या कलाकाराला हा सन्मान मिळेल, यासाठीचे मापदंडही अतिशय कठीण आहेत. बागपत येथील मूळ रहिवासी आणि सध्या दिल्लीत राहात असलेले कलावंत विजेंद्र शर्मा यांना तर दोनदा हा बहुमान मिळाला आहे. प्रणव मुखर्जी यांच्या आधी माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचेही पोट्र्रेट विजेंद्र शर्मा यांनी काढले होते. विक्रम वेताळ, रामायण, महाभारत यासारख्या गाजलेल्या मालिकांमधील टायटल पेंटिंगही त्यांचेच होते.
देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान असलेल्या व्यक्तीचं पोट्र्रेट काढायला मिळणं, ही खरोखरच मोठय़ा सन्मानाची गोष्ट. माजी राष्ट्रपती आर. के. नारायणन यांचं पोट्र्रेट काढण्याचा मान नागपूरचे कलावंत प्रमोद रामटेके यांना तर प्रतिभाताई पाटील यांचं पोट्र्रेट काढण्याचा बहुमान मुंबईच्या वासुदेव कामत यांना मिळाला होता. 
(शब्दांकन : मंथन टीम)

Web Title: Memories of former President Pranab Mukherjee by artist Vijendra Sharma who had the privilege of drawing his portrait

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.