द मेकिंग ऑफ अ मुंबई टेररिस्ट
By Admin | Updated: December 31, 2016 13:22 IST2016-12-31T12:18:41+5:302016-12-31T13:22:43+5:30
टाइम साप्ताहिकाची ज्योती थोट्टम रिगल सिनेमाजवळच्या रेस्टॉरंटमध्ये भेटली. मला म्हणाली, ‘कसाब जिथे बोटीतून उतरला तिथून तो जिथे पकडला गेला तिथवर, त्याच रस्त्यावरून आपल्याला चालत जायचे आहे, चल!’- आणि आम्ही निघालो..

द मेकिंग ऑफ अ मुंबई टेररिस्ट
- ते आणि आपण
- शशिकांत सावंत
1991 साली जागतिकीकरणाच्या प्रवाहात सामील होऊन भारताने आपल्या बंद खिडक्या उघडल्या. या उघड्या दारांमधून जसे भांडवल आत आले, मनोरंजन आणि मूल्ये आली, तसे पत्रकारही आले.
त्याआधी परदेशी दैनिके, साप्ताहिके यांना भारतात ‘रस’ होता, पण तो तोंडी लावण्यापुरताच! नव्या बदलानंतर भारत हा केवळ एक ‘देश’ न राहता ती जगातली प्रबळ होऊ घातलेली मोठ्ठी बाजारपेठ झाली आणि जगभरच्या माध्यमसंस्थांचे इंटरेस्ट बदलत गेले. आता त्यांना भारतातले विषयच नव्हे, तर भारतातले वाचकही हवे होते आणि भारतातून मिळू घातलेला महसूलही!
भारतातल्या विषयांच्या आणि माणसांच्या शोधात परदेशातून येणारे पत्रकार. त्यांना थांबे लागत. भाषेचे अडसर पार करायला मदत करणारे, योग्य माणसांच्या गाठीभेटींसाठी ‘सोर्स’ गाठून देणारे आणि पूर्व-पश्चिमेतल्या सांस्कृतिक फरकांमुळे होणारे गोंधळ निस्तरायला मदत करणारे ‘सहायक’ म्हणजे हे भारतातले ‘थांबे’. मी त्यातला एक होतो आणि आहे.
भूक, दारिद्र्य यांच्याशी अकल्पित अशी थेट भेट घडल्यावर विमनस्क झालेले, झोपडपट्टीत समोर आलेला चहाचा (अस्वच्छ) कप नाकारल्याने पुढल्या अख्ख्या ‘स्टोरी’ला मुकलेले आणि छोट्या तपशिलासाठी रात्रंदिवस कष्टणारे अनेक विदेशी पत्रकार आणि लेखकही मी पाहिले. त्यांच्याबरोबर भारतात कुठे कुठे फिरलो. त्यातल्या काही ठळक आठवणींची ही कहाणी आहे.
सुरुवात एका मैत्रिणीपासून! ‘टाइम’ या साप्ताहिकासाठी काम करणारी ज्योती थोट्टम!
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काही दिवसांत ज्योती मुंबईत धडकली. ज्योती मूळ भारतीय, पण लहानपणापासून अमेरिकेतच वाढलेली! तिने मला रिगलच्या शेजारच्या रेस्टॉरंटमध्ये बोलवले. इथेच २६/११ ला हल्ला झाला होता. इतकेच नव्हे तर आजही त्या गोळीबारातल्या खुणा ते बाळगून होते. ज्योतीला पहिल्यांदाच भेटत होतो. टाइमच्या साउथ ईस्ट एशिया विभागाची प्रमुख म्हणजे कोणीतरी जबरदस्त व्यक्तिमत्त्व असणार असे वाटत होते. प्रत्यक्षात ज्योती पाच फूट उंचीची कुरळ्या केसाची सावळी तरुणी होती, तिशीच्या घरातली. इंग्रजी उच्चार कळणे अवघड असे.
मला म्हणाली, ‘चल, कसाब ज्या रस्त्याने गेला; त्या रस्त्याने आपण जाऊ!’
- तिला काय करायचे आहे, ते ऐकून मी थक्क! मग कळले, हा ‘टाइम’च्या एकूण प्लॅनचा एक भाग असणार आहे. कसाब ज्या मार्गाने भारतात पोहोचला त्या पूर्ण मार्गावरून - त्याच्या गावापासून ते मुंबईपर्यंत - ‘टाइम’चे पत्रकार प्रवास करणार आहेत. त्यात पाकिस्तानात आयन बेकन, तिथला स्थानिक स्ट्रिंगर आणि भारतात ज्योती थोट्टम, मी आणि हुसेन झैदी.
प्राथमिक बोलणी झाली, आणि आम्ही थेट निघालोच. कसाब जिथे उतरला ती जागा पाहिली. बधवार पार्कजवळची जेट्टी. आम्ही गेलो तर ती जागा ज्योतीला वरून पाहायची होती. फोटो काढायचे होते. त्यामुळे जेनन भंडारी या माझ्या मैत्रिणीच्या घरी गेलो. जेनन कवयित्रीे. शंकर एहेसान लॉय मधल्या एहेसानची ती सासू. मुळातली ब्रिटिश, त्यामुळे तिचे घर अगदी खानदानी आणि सजवलेले आणि पुस्तकांनी भरलेले. ज्योती ते घर पाहून खूप खूश झाली. जेनच्या घरातून आम्ही जेट्टीचे आणि आसपासचे फोटो काढले. ज्योती तीन चार दिवस राहणार होती. या दिवसांमध्ये कसाब जिथून आला आणि तो जिथे जिथे गेला तिथली ठिकाण े- कामा हॉस्पिटल, सीएसटी, तो टॅक्सीने ज्या मार्गाने गेला तो मार्ग, चर्नीरोडला जिथे त्याला पकडण्यात आले ते ठिकाण... असे सारे स्पॉट आम्ही कसाबच्याच क्रमाने फिरलो. ज्या पोलिसांनी त्याला पकडले आणि कसाबच्या सहकाऱ्याला गोळी घातली त्या पोलिसांपर्यंत आम्ही सर्वांना भेटलो. एका अधिकाऱ्याने आपले रिव्हॉल्व्हर ज्योतीला दाखवत म्हटले, ‘मी ह्या रिव्हॉल्व्हरने त्याला (कसाब सोबत असलेल्या अतिरेक्याला) गोळी घातली.’ या सगळ्या भेटीगाठींमधून, प्रवासातूनच ‘द मेकिंग आॅफ अ मुंबई टेररिस्ट’ ही ‘टाइम’ची गाजलेली कव्हरस्टोरी तयार झाली. त्यातला तपशील फार रंजक होता. महंमद आमीर अजमल कसाबचा जन्म आणि वास्तव्य फरीदकोटचे. २००७ मध्ये डिसेंबरमध्ये रावळपिंडी इथे त्याने लष्कर-ए-तोयबाच्या स्टॉलला भेट दिली. तिथे त्याला शस्त्रास्त्रे विकत घ्यायची होती. पण नुसती शस्त्रे काय कामाची? म्हणून तिथून तो कार्यालयात गेला, तेव्हा कसाब हा २१ वर्षाचा तरुण होता. तो फारसा शिकलेलाही नव्हता की धार्मिकही नव्हता.
फरीदकोटला काश्मीरमध्ये अतिरेकी पाठवण्याचा इतिहास आहे. त्यातलेच कसाबचे गाव. हे छोटेसेच आहे. मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर अनेक पत्रकार कसाबच्या गावात धडकले पण गावकरी त्यांना उत्तरे देत नव्हते. ‘टाइम’ने कसाबच्या पोलीस कबुलीजबाबाची प्रत मिळवली होती. २००५ मध्ये घर सोडून गेल्यावर कसाब लाहोरला गेला. तिथे असे घर सोडलेले अनेकजण राहात. तेथे दोन वर्षे राहून छोटेसे काम करून मग कसाब रावळपिंडीला निघाला. लाहोरजवळ असलेल्या मुरीद्के इथे लष्कर-ए-तोयबाचे प्रशिक्षण केंद्र होते. इथेच त्याचे प्रशिक्षण झाले. वहाबी पंथीयांनी सुरू केलेले हे केंद्र. इथून पुढे खरे प्रशिक्षण पाकव्याप्त काश्मीरमध्ये होत असे. त्यामुळे कसाबला तिथे पाठवण्यात आले आणि त्याचे बंदूक चालवायचे स्वप्न तिथे साकार झाले. प्रशिक्षणानंतर त्याला मान्सेरा इथे नेण्यात आले आणि २१ दिवस प्रशिक्षण देण्यात आले असे कसाब सांगतो. पिस्तुलापासून एके ४७ तसेच हातबॉम्ब, छोटी तोफ हे चालवणे तसेच भारतीय संरक्षण व्यवस्था यांचे शिक्षण इथे देण्यात आले. या जिहादींना एकच आश्वासन होते ते म्हणजे त्यांना स्वर्ग मिळेल! भारतात, मुंबईत होऊ घातलेल्या आॅपरेशनसाठी १६ जणांना निवडण्यात आले. त्यातील तीन पळून गेले. उरलेल्यांना परत मुरीद्के इथे नेण्यात आले आणि पुन्हा एक महिना पोहण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. नंतर कराचीजवळच्या एका घरात ठेवण्यात आले. इथपर्यंतचा भाग ‘टाइम’च्या पाकिस्तानातल्या टीमने कव्हर केला होता.
पुढली जबाबदारी ज्योतीवर होती. ती आणि मी.
२२ नोव्हेंबरला पहाटे ४.१५ मिनिटांनी कराचीहून निघाल्यापासूनचा कसाब आणि त्याच्या साथीदारांच्या प्रवासाचा माग काढत मी आणि ज्योती नंतर मुंबईभर फिरत होतो. बधवार पार्क इथे असलेल्या जेट्टीवर उतरल्यापासून अखेर तुकाराम ओंबळेंच्या हातून कसाब पकडला गेला, त्या गिरगाव चौपाटीपर्यंतचा परिसर आम्ही पिंजून काढला. तिथे तिथे त्या त्या क्षणी जी माणसे होती; त्यांना गाठले. त्यांच्याबरोबर त्या त्या ठिकाणच्या त्या त्या घटना जणू पुन्हा जगलो. जणू त्या रात्रीचा सिनेमाच सरकत होता नजरेसमोरून! जे झाले ते जणू पुन्हा प्रत्यक्ष घडत असल्यासारखे ‘ऐकणे’ हा एक विलक्षण अनुभव होता.
दोन-तीन दिवस आम्ही असे कसाबच्या मार्गावरून वेड्यासारखे भटकत मुंबईत फिरत होतो.
मी तसा लेखनाला सरावलेला. त्यामुळे समोरचा काय म्हणतो, ते त्याने म्हणायच्या आधीच आजूबाजूच्या संदर्भांवरून समजून घेऊन माहिती म्हणून टिपण्याची सवय होती. पण ज्योती आणि तिचे सहकारी समोरचा माणूस प्रत्यक्ष बोलेपर्यंत कागदाला पेन लावीत नसत. ‘असे बोलले जाते’, ‘असे समजते’ या प्रकाराला वाव शून्य! ज्योतीला मराठीचा, हिंदीचाही गंध नव्हता. त्यामुळे मराठी-हिंदीत बोलणाऱ्याचे भाषांतर करून तत्क्षणी तिला ऐकवणे हे माझे काम. त्यात मी एकदोनदा भल्यामोठ्या संवादाचा थोडक्यात तर्जुमा सांगायला गेलो, तर तिने अडवले. मला म्हणाली, ‘शशिकांत, मला पूर्ण वाक्य ऐकायचे आहे. जे बोलले गेले ते सगळे ऐकायचे आहे.’
ज्योतीने मला ‘शिकवले’च! माझी आधीची पाटी कोरी करायला लावली.
असे एकेक अनुभव ऐकत, प्रत्यक्ष जागा पाहत दोनतीन दिवसात ही स्टोरी पूर्ण झाली. स्टोरीसाठीच्या दिवसांचे, त्या दिवसातल्या प्रत्येक तासाचे अचूक नियोजन आणि ठरवलेले काम ठरवल्या वेगाने उरकण्याची ‘टाइम’च्या मंडळींची हातोटी विलक्षण होती. आम्ही केलेल्या कसाबवरच्या या स्टोरीला ‘टाइम’ साप्ताहिकाचे अंतर्गत हेन्री लूस अवॉर्ड मिळाले.
- त्यावेळी ज्योतीने लिहिलेल्या पत्रात म्हटले होते 'कुडोस टू स्ट्रिंगर्स'!
(दीर्घकाळापासून परदेशी लेखक - पत्रकारांचे मार्गदर्शक असलेले लेखक पुस्तकाच्या दुनियेतले जाणते मुशाफिर आहेत.) shashibooks@gmail.com