मैहर बँड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 06:00 AM2021-05-09T06:00:00+5:302021-05-09T06:00:02+5:30

१९१७ सालच्या महामारीत माणसे टपटप मरून पडत असताना, बाबा अल्लाउद्दिन खां यांनी उभ्या केलेल्या एका संगीत चमत्काराची कहाणी..

Maihar Band | मैहर बँड

मैहर बँड

googlenewsNext
ठळक मुद्देकाळोखाने दाही दिशा दाटून फुटणार असे वाटत असताना उद्याचा इतिहास लिहिणाऱ्या, आज आकार घेत असलेल्या वाद्यवृंदाचे नवे जोमदार स्वर कुठून तरी तरंगत कानी येतायत. तुम्ही ऐकताय का ते? 

- वंदना अत्रे

ही गोष्ट महामारीमध्ये घडलेली...! पक्ष्यांनी दाणे टिपावे, तशी माणसे टिपत जाणाऱ्या संकटाची, पण तरीही या कथेतला नायक मात्र तो नाही. ही कथा एका संगीतवेड्या आजोबांची आणि त्यांच्या अनेक अनाथ नातवांची. मृत्यूचे तांडव सुरू असतांना विविध जातीची अन् स्वरांची वाद्य घेऊन नवे राग आणि त्यात नव्या बंदिशी रचून जगाला रसरशीत उमेद देणारे असे काही निर्माण करणारे आजोबा आणि त्यांच्या दीडशे नातवांची. कदाचित फिल्मी किंवा काल्पनिक वाटावी अशी, पण अगदी खरीखुरी..

गोष्ट मध्य प्रदेशातील मैहर नावाच्या संस्थानातली! बाबा अल्ला उद्दीन खां नावाच्या अवलिया गुरूचे आणि ब्रजनाथ सिंग नावाच्या सहृदय संस्थानिकाचे मैहर. बाबा हे या संस्थानचे राजगायक. संगीताचे शिक्षण घेण्यासाठी वयाच्या आठव्या वर्षी घरातून पळून गेल्यावर देशभर आडवी-उभी भटकंती करीत रस्त्यावरचे आयुष्य जगत अनेक गुरू आणि अनेक वाद्य याचे शिक्षण घेत समृद्ध होत गेलेला हा गुरू. ... १९००च्या आगेमागे मध्य प्रदेश आणि आसपासच्या राज्यांमध्ये लाल ताप नावाच्या एका विचित्र तापाची साथ आली. ती कशी आटोक्यात आणायची, यावर विचार करेपर्यंत भांबावलेल्या समाजात हा-हा म्हणता बळी टिपत गेली. शेतात कामावर जाणारी पुरुष मंडळी आणि बायाबापड्या या तापाला बळी पडत होते, मागे उरत होती अनाथ, एकाकी सैरभैर झालेली मुले... जगायचे कसे आणि कोणाच्या आश्रयाने याचे उत्तर ठाऊक नसलेली. संस्थानिक ब्रजनाथ सिंग तेव्हा बाबांकडून संगीताचे शिक्षण घेत होते.

एका अस्वस्थ दिवशी, गाणे थांबवत ते बाबांना म्हणाले, “अवेळी अनाथ होण्याचा शाप ज्यांच्या माथी लिहिला गेलाय, त्या मुलांना शिकवायचे का गाणे?”

- बघता-बघता दीड-दोनशे अनाथ मुले राजवाड्यावर जमली. बाबांनी प्रत्येकासाठी मनात काही वाद्यांची योजना केली होती. हार्मोनियम, बासरी, सतार, इस्रज, जलतरंग, ढोलक, पखवाज अशी बरीच भारतीय वाद्य, शिवाय राजांच्या वाड्यावर एक भला मोठा पियानो होता. व्हायोलीन आणि क्लॅरिनेट मागवले गेले. झोपडीत राहणारे अनार खान, तान्सू प्रसाद, झुरेलाल, बैजनाथ सिंग, महीपत सिंग, चुन्नेलाल, लालची सूरदास, रामस्वरूप वाद्य शिकू लागले. काही मुली पण असाव्या बहुदा.

बाबांचा दिवस सुरू व्हायचा, तो राजाच्या शिक्षणाने आणि मावळायचा तो मुलांच्या सहवासात. आठ तास राजाचे शिक्षण आणि चार तास या मुलांसाठी. मनात आकार घेत असलेल्या एका योजनेसाठी बाबांचीही तयारीही सुरू होती! तरुण वयात हबू दत्ता नावाच्या एक संगीत संयोजकांकडे बाबा काम करीत असत. अनेक वाद्यांवर वाजणाऱ्या विविध बंदिशींचा वाद्यमेळ तेव्हा बाबांनी बघितला होता. असा मुलांचा वाद्यमेळ, देशातील पहिला-वहिला बँड त्यांच्या मनात होता..! संगीत शिक्षणाचा गंधही नसलेल्या आणि महामारीने ज्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले आहे, अशा अनाथ मुलांमधून बाबा तो उभा करीत होते. शास्त्रीय संगीताला बाबांनी तोपर्यंत हेमंत भैरव, मांज खमाज, गांधी बिलावल, मदनमंजिरी अशा कितीतरी नव्या रागांची देणगी दिली होती. आता या मुलांच्या वाद्यवृंदासाठी बाबा रागावर आधारित सोप्या बंदिशी तयार करू लागले, शिवाय काही पाश्चिमात्य सुरावटीही मनात होत्याच....जोमाने सराव सुरू झाला. असह्य दुःखाच्या काळात देशातील पहिला वाद्यवृंद उभा राहत होता!

वेदनेचा डंख असतांना निर्मितीच्या, सृजनाच्या आशीर्वादाचा विसर न पडणारी माणसे इतिहास घडवतात. मैहर बँड हा तो इतिहास आहे. बाबा अल्ला उद्दीन खां नावाच्या एका वेड्या कलाकाराने आपल्या संस्थानिकाच्या मदतीने निर्माण केलेला अनाथ मुलांचा मैहर बँड. देशातील पहिला वाद्यवृंद. महामारीच्या थैमानाला वेगळ्या भाषेत दिलेले उत्तर आहे ते. माणसाचे आयुष्य असे आहे-नाहीच्या टोकदार काट्यावर टांगलेले असते, उद्याचा भरवसा नसतो, अशा वातावरणातही भविष्याचे आश्वासन देणारे हिरवे कोंब त्या काट्याला फुटू शकतात हे सिद्ध करणारे.

बाबांच्या आणि त्यांच्या नातवंडांच्या या वाद्यवृंदाने पुढे त्या संस्थानात येणाऱ्या अनेक देशी-परदेशी पाहुण्यांना आपल्या वादनाने चकित केले. बाबांनी या वाद्यवृंदासाठी किमान तीनशे सोप्या बंदिशी तयार केल्या होत्या. या मुलांच्या पुढच्या पिढ्यांनी आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी त्या आत्मसात केल्या. आपल्या हयातीत बाबाच या वाद्यवृंदाचे संचलन करीत. कितीतरी संगीत महोत्सवांमधून या वाद्यवृंदाला आमंत्रणे आली. २०१७ साली या वाद्यवृंदाने आपली शताब्दी थाटात साजरी केली. आजही हा मैहर बँड कार्यरत आहे.

---

काळोखाने दाही दिशा दाटून फुटणार असे वाटत असताना उद्याचा इतिहास लिहिणाऱ्या, आज आकार घेत असलेल्या वाद्यवृंदाचे नवे जोमदार स्वर कुठून तरी तरंगत कानी येतायत. तुम्ही ऐकताय का ते? या महामारीचा काळा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा बहराचे नवे रंग असलेल्या या स्वरांची नोंद त्यात होईलच...

(लेखिका संगीत आस्वादक आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

vratre@gmail.com

Web Title: Maihar Band

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.