एक जादूई सिक्सर आणि त्यानंतरची १० वर्षे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 06:03 AM2021-04-04T06:03:00+5:302021-04-04T06:05:10+5:30

२५ जून १९८३ आणि २ एप्रिल २०११. भारतीय क्रिकेटची परिभाषा बदलणारे हे दोन दिवस. देशातल्या तरुण महत्त्वाकांक्षांना त्यांनी बळ दिलं. ‘आपण जिंकू शकतो’ हा आत्मविश्वास खेळाडू आणि देशांत जागवला, पण या दोन्ही ‘इव्हेण्ट्स’मध्ये मोठा फरक आहे. काळाचा आणि वास्तवाचाही...

A magical six and the next 10 years ... | एक जादूई सिक्सर आणि त्यानंतरची १० वर्षे...

एक जादूई सिक्सर आणि त्यानंतरची १० वर्षे...

Next
ठळक मुद्दे१९८३ आणि २०११च्या वन डे विश्वचषकानं भारतीय क्रिकेटचा चेहरा-माेहराच बदलून टाकला. त्या यशानं केलेली रुजुवात आज २०२१ मध्येही जिंकण्याचा वेग वाढवत आगेकूच करत आहे...

- राजदीपसरदेसाई

(ख्यातनाम पत्रकार आणि ‘डेमोक्रसीज इलेव्हन, भारतीय क्रिकेटची महान गाथा’ या क्रिकेट आणि भारतीय समाज यावर आधारित पुस्तकाचे लेखक)

२५ जून १९८३ आणि २ एप्रिल २०११. भारतीय क्रिकेट कायमचं बदलवून टाकणारे हे दोन दिवस. भारतीय वनडे क्रिकेटसाठी तर फारच महत्त्वाचे. २००७ मध्ये भारतीय टी-ट्वेण्टी संघानेही विश्वचषक जिंकला, तोही मोलाचाच. मात्र एकदिवसीय क्रिकेटसाठी १९८३ आणि २०११ हे दोन मोठे इव्हेण्ट्स आहेत. या दिवसांनी भारतीय एकदिवसीय क्रिकेटची परिभाषा, त्याचा प्रभाव, लोकप्रियता, क्रिकेट देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा वेग आणि देशातील तारुण्याच्या महत्त्वाकांक्षांना दिलेलं बळ हे सारं कित्येकपट मोठं आणि विलक्षण आहे. मात्र तरीही या दोन ‘इव्हेण्ट्स’मध्ये मोठा फरक आहे. त्या त्या काळाचा आणि तत्कालीन वास्तवाचाही. १९८३ साली भारतीय संघानं एकदिवसीय विश्वचषक जिंकला ते एक ‘सरप्राइज’ होतं. मोठं आश्चर्यच! हा संघ विश्वचषक जिंकेल असं कुणाला वाटलंही नव्हतं, ना कुणाची तशी अपेक्षा होती, ना एक दिवसीय क्रिकेटला तसं काही फार देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठं मोल होतं. (ग्लॅमर तर सोडाच.)

भारतात रंगीत टीव्ही आला तो ८३च्या एशियन गेम्सच्या निमित्ताने. मात्र टीव्ही ही गोष्टच उच्च मध्यमवर्गीय घरात जेमतेम पोहोचत होती. सामान्य घरात तर टीव्ही पोहोचणं बाकी होतं. बाजारपेठ मोठी नव्हती. त्या काळातला भारत हा समाजवादी भारत होता. इंडिया ऑफ सोशलिस्ट एरा. त्यामुळे ग्राहककेंद्री बाजारपेठा, उपभोगवाद, स्पॉन्सरर्स असं काही नव्हतं. तो विश्वचषकही इंग्लंडमध्ये होता, भारतापासून दूर. क्रिकेटच्या, विशेषत: एकदिवसीय क्रिकेटच्या जगात तर भारतीय संघ ‘आउटसाइडर’ होता. त्यांनी वेस्ट इंडिजच्या संघाला हरवलं हा एक मोठा सुखद आश्चर्याचा धक्का होता. संघ जिंकून आला, एकदिवसीय क्रिकेटचा गाजावाजा झाला; मात्र त्या संघात खेळणाऱ्यांना बक्षीस-कौतुक म्हणून मिळाले जेमतेम १ लाख रुपये. कपिलदेव नावाचा फोक हीरो-गावठा रांगडी हीरो या विश्वचषकाने भारतीय क्रिकेटला दिला. मात्र, त्या काळचं क्रिकेट हे शहरी, महानगरीय, मध्यमवर्गीय वर्तुळातच होतं. त्या विजयाने एक मात्र केलं क्रिकेट हा खेळ लोकप्रिय व्हायला, एकदिवसीय क्रिकेटला गांभीर्याने घ्यायला सुरुवात झाली. आपण जिंकू शकतो ही भावना त्या विजयानं निर्माण केली.

त्यानंतर २८ वर्षांत हा देश बदलला. क्रिकेट बदललं.

२०११ चा विश्वचषक सुरू झाला तो भारतात. जे ८३ ला ‘आउटसायडर’ होते ते २०११ ला क्रिकेटची सुपर पॉवर म्हणून निर्विवाद वर्चस्व सांगत होते. २०११ उजाडलं तेव्हा देशात उदारीकरणाचे वारे वाहूनही बराच काळ लोटला होता. एरा ऑफ लिबरलायझेशन ॲण्ड फ्री मार्केट या काळात देश पोहोचलेला होता. मॉल्स छोट्या शहरांपर्यंत पोहोचलेले होते. कन्झ्युमरीझमने वेग घेतलेला होता. वीज, इंटरनेट, मोबाइल, कॉम्प्युटर, खासगी वाहिन्या, लाइव्ह सामने टीव्हीवरचं हे सारं लहान खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेलं होतं. क्रिकेट स्वत:ही एक मोठ्या उद्योगाचं रूप घेऊन विस्तारलेलं होतं. आयपीएल येऊन रुजलेलं होतं. आयपीएलमध्ये खेळणारे खेळाडू कोट्यवधी रुपये सहज कमवू लागले होते. जो तो आपापल्या घरात बसून क्रिकेटचा बिग इव्हेण्ट लाइव्ह पाहत होता. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे अंतिम सामन्यात भारत पोहोचला, तो अंतिम सामना, मुंबईत-वानखेडेवर खेळवला जात होता. तोवर क्रिकेटचं दैवत झालेला मुंबईकर मध्यमवर्गीय घरातला सचिन तेंडुलकर मैदानात उतरणार होता. ज्या सॅटेलाइट टीव्हीने तेंडुलकर नावाचा ‘ब्रँण्ड’ मोठा केला तेच सॅटेलाइट टीव्ही हा सामना कोट्यवधी लोकांना दाखवत होते. तेही होम टर्फवरून. तोपर्यंत विश्वचषक स्पर्धा आयोजक एकही देश, आपल्याच देशात, आपल्याच मातीवर अंतिम सामना जिंकलेला नव्हता. देशभरात एकच प्रश्न होता, भारत विश्वचषक जिंकेल का? एकच मोठा इव्हेण्ट होता क्रिकेट.

तोपर्यंत क्रिकेटची क्रेझ प्रचंड वाढलेली होतीच. मल्टीमिलिअन डॉलर्सची ही इंडस्ट्री जगज्जेता होण्याचं स्वप्न पाहत होती. आणि संघ कप्तान होता महेंद्रसिंग धोनी. स्मॉल टाऊन इंडियाचा प्रतिनिधी. त्यानं शेवटचा षटकार मारून साऱ्या दुनियेला सांगितलं की, आम्ही कुठून आलो हे पाहू नका, आम्ही जिंकू शकतो, आम्ही विश्वविजेते होऊ शकतो. त्याची नजर, त्याचा नीडर ॲटिट्यूड, जिंकण्याची - स्वप्न पाहण्याची नवी गोष्ट सांगत होतं. ती गोष्ट एकाचवेळी वैयक्तिक यशाची होती तशीच सांघिक यशाचीही! त्या विजयानं क्रिकेटच्या जगालाही हे सांगितलं की महानगरी, मध्यमवर्गीय वळणाचं क्रिकेट आता यापुढे छोट्या शहरात, खेड्यापाड्यातली गुणवत्ता घेऊनच मोठं होणार आहे.

२०११ च्या विजयाने भारतीय क्रिकेटवर काय दूरगामी प्रभाव पाडला याविषयी बोलूच, पण त्या विजयाची पार्श्वभूमी पाहू.

त्या काळात ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ ही चळवळ सुरू होती. अण्णा हजारे आंदोलन करत होते. देशात भ्रष्टाचाराविषयी प्रचंड असंतोष होता. ‘सब नेता चोर है’ अशी एक लोकभावना तयार हाेत होती.

त्या काळात हा भारतीय संघ आपल्या गुणवत्तेवर खेळत होता. तो भारतीय समाजाचं लघुरूप होता. रांचीचा धोनी, सर्वसामान्य घरातला मुलगा, जहीर खान, मुनाफ पटेल, हरभजन सिंग, युवराज सिंग, गंभीर-सेहवाग-कोहली, केरळचा श्रीसंत आणि मुंबईचा मध्यमवर्गीय पोस्टरबॉय तेंडुलकर हे सारे विविध जातीधर्मप्रांताचे फक्त भारतीय म्हणून खेळत होते. ना कुणाच्या खानदानाची पूर्व पुण्याई, ना वशिला, ना भाईभतिजा, ना कोटा. त्यांचा धर्म एकच होता, क्रिकेट! त्यांचं स्वप्न एकच होतं, भारतासाठी जिंकणं! हजार शकलं असलेल्या, होऊ घातलेल्या भारतीय समाजात शुद्ध भारतीय होऊन क्रिकेट संघ जिंकतो ही फार आश्वासक, उमेद देणारी मोठी गोष्ट होती. आहे.

पैसे, प्रसिद्धी, बॉलिवूड स्टार्सपेक्षा खेळाडूंनी मोठं होणं हे सारं तर आहेच; मात्र त्या पलीकडे या विजयानं हे सिद्ध केलं की, भारतीय क्रिकेट हे निर्विवाद नंबर वन आहे. आणि २०११ ने केलेली ही यशाची रुजुवात आज २०२१ मध्येही जिंकण्याचा वेग वाढवत आगेकूच करत आहे...

२०११ च्या विजयानं भारतीय क्रिकेटमध्ये काय बदललं?

१. धोनीच्या त्या विजयी षटकारानं खेड्यापाड्यापर्यंत तरुण मुलांना हे स्वप्न कायमचं दिलं की आपण जिंकू शकतो, आपण कुणाहीपेक्षा कमी नाही. आपली गुणवत्ता हीच आपली ताकद आणि ओळख आहे.

२. भारतीय क्रिकेटमध्ये आयपीएलने पैसा आणला होताच, मात्र पुढच्या दहा वर्षांत लहान शहरं, गावं इथले खेळाडू कोट्यधीश झाले. दहा वर्षांपूर्वी त्यांनी क्रिकेट खेळण्याचं स्वप्न ज्या मुलांनी पाहिलं त्याला या विजयाने बळ दिलं होतं.

३. समाजमाध्यमी काळात क्रिकेटर होणं हे जिंकण्याचं एक पारदर्शी रूप जगासमोर आलं.

४. सगळ्यात महत्त्वाचं, अगदी अलीकडच्या ऑस्ट्रेलियातल्या धाडसी विजयापर्यंत भारतीय क्रिकेटमध्ये गुणवत्ता आणि सातत्य, खेळाडू घडवणं, संघ सर्वोत्तम असणं या साऱ्याची पायाभरणी २०११ च्या विजयानं केली.

शब्दांकन - मेघनाढोके

Web Title: A magical six and the next 10 years ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.