भीती पळवणारी श्वासाची जादू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2021 06:01 AM2021-10-03T06:01:00+5:302021-10-03T06:05:01+5:30

कधी खूप भीती वाटते, कधी संताप, चिडचिड, तर कधी नकारात्मक भावनांचा अस्वस्थ गदारोळ. खरंतर, भावनांच्या या बदलत जाणाऱ्या गलक्यातच खोलवर दडलेला असतो होकारात्मकतेचा हुंकार. तोच आपल्याला शोधायचा आहे.

The magic of breathing.. | भीती पळवणारी श्वासाची जादू

भीती पळवणारी श्वासाची जादू

googlenewsNext
ठळक मुद्देमानवी मनातल्या भावना हा फार मोठा मानसिक प्रपंच असतो. अनेक राग-रागिण्या, आलाप, आरोह, अवरोह असतात. वादी-संवादी सूर असतात. तसंच भावभावनांची गुणवत्ता असते.

- डॉ. राजेंद्र बर्वे

काय सांगू काही कळत नाही बघा! मी तर आता टेकीस आले आहे. या कोविडनं पिच्छा पुरवलाय!! म्हणजे सुरुवातीला यांचं कसं होतं? छे, मला काय होतंय? काहीसुद्धा व्हायचं नाही. मास्क घालायला कंटाळा करायचे! किती मागे लागावं लागयचं.. ही पहिली स्टेज.

नंतर यांचा एक मित्र अचानक गेला. त्याला काही कोविडबिविड नव्हता; पण तेव्हापासून यांचं गाडं बिघडलं. सारखी भीती, सारखी भीती!! दिवसाला शंभरदा हाताला तो ऑक्सिमीटर लावून बघायचा. रात्री उठूनसुद्धा! सतत सांगत राहावं लागायचं, अहो नका भिऊ इतकं..

पण आता, काही तरी नवंच. सारखी चिडचिड आणि येता-जाता डाफरायचं - रागवारागवी करायची. म्हटलं, नका चिडू इतकं! बीपी वाढेल. त्यावर पुन्हा रागराग. कधी कधी यांचं बघून बघून माझाही पारा चढतो.

‘दमले आता मी!’

- वर्षानं टेबलावर हात टेकून म्हटलं.

वर्षाचा नवरा वसंत. वसंताच्या भावनेचा आलेख इथे त्यांनी अगदी नेमक्या शब्दात मांडला.

मानवी मनातल्या भावना हा फार मोठा मानसिक प्रपंच असतो. अनेक राग-रागिण्या, आलाप, आरोह, अवरोह असतात. वादी-संवादी सूर असतात. तसंच भावभावनांची गुणवत्ता असते. आनंद, दु:ख, तिरस्कार, आश्चर्य, संताप, भीती अशा काही मूलभूत भावना असतात; पण त्यांचे सूर कधीच शुद्ध नसतात. भावना सदैव संमिश्र आणि गुंतागुंतीच्या असतात. आपल्या मुलावर रागावणारी आई, पत्नीवर संशय घेणारा पती, प्रेमभंग झालेला तरुण, अशा मंडळीच्या भावनांचा आलेख पाहिला तर त्या क्षणोक्षणी बदलताना दिसतात. म्हणजे सखेद आश्चर्याचं रूपांतर रागात, रागाचं तिरस्कारात, तिरस्काराचं अतितीव्र दु:खात, त्यातून पुन्हा संताप यामध्ये रूपांतर होतं.

कोविडच्या या दिवसांत केवळ व्यक्ती-व्यक्तीची नव्हेतर, सामाजिक मानसामध्येही या सर्व भावनांची प्रतिबिंबं दिसली. अनेकदा भावनांची अशी वादळं का उसळतात, असा प्रश्न पडतो. त्याचं कोविडनं थेट उत्तर दिलंय.

साऱ्या नद्या आणि वाहतं पाणी अखेर समुद्राकडं धावतं, तसं या नकारात्मक भावना आपल्या मनातल्या मृत्यूच्या भीतीला भिडलेल्या असतात. त्याचं भडक थैमान आपण पाहिलं. अजूनही त्याचे अधूनमधून भडके उडतात.

वसंताचा सुरुवातीचा बिनधास्तपणा हेदेखील भीतीचंच रूप होतं. मानसशास्त्रीय भाषेत, त्याला ‘डिनायल’ अथवा नाकारणं असं म्हणतात. मला मुळी भीती वाटतच नाही, असा माणूस शांत असतो. योग्य काळजी घेतो; पण वसंताला त्याचं भान नव्हतं.

नंतर वाटणारी भीती म्हणजे बाटलीत दाबून ठेवलेला राक्षस अचानक बाहेर आला आणि चक्क मानगुटीवर बसला. ती ठसठशीत भीती अर्थात मृत्यूची. आणि आता होणारी चिडचिड? रागाचा उद्रेक? तेही भीतीचंच रूप, त्याला भीतीमुळे आलेली असाहाय्यतेची भावना.

संताप, चिडचिड आणि उद्रेक जितके वर्षावर आणि कुटुंबावर निघत होते, तितके स्वत:वरही. वसंतला तसं विचारल्यावर तो म्हणाला,

मला खरं स्वत:ची चीड येते. आपण कुठेतरी कमी पडलो! कुचकामी ठरलो, असं वाटतं. याबद्दल स्वत:ची कीव वाटते. आपण उगाचच भीत होतो. कळत होतं; पण भीतीचा तडाखा इतका जबरदस्त की त्यातून मार्गच निघत नव्हता. आताही कळतं, आपण उगीच रागावतोय वर्षावर आणि मुलांवर. त्यांचा काय दोष? उलट तेच मला सांभाळून घेत आहेत!! वसंतला राहावेना. आता भावना शब्दांतून नाही, अश्रूंवाटे वाहात होत्या.

वर्षानं वसंताचा हात हातात घेतला, दोघंही रडवेली झालेली होती.

अशावेळी, त्यांना फक्त नि:शब्द पाठिंब्याची गरज होती.

तुमच्या भावना अगदी स्वाभाविक आणि नैसर्गिक आहेत. इतकंच काय, दहापैकी सात-आठ घरांतून हेच चित्र दिसत असेल आणि उरलेल्या दोन-तीन घरांतून ‘डिनायल’चा पहिला अंक संपलेला नसेल!!!

दोघांना थोडं हसू आलं. बघितलंत? या सर्व नकारात्मक भावनांच्या मनाच्या गदारोळात खोलवर दडलेला असतो होकारात्मकतेचा हुंकार. तोच तुमच्या चेहऱ्यावर उमटला. तोही तितकाच खरा आहे.

पण, या भावनांमध्ये आम्ही होरपळून निघालो हो!! दोघेही म्हणाले. यावर काही उपाय??

अगदी शाळेत शिकवलेला उपाय आहे. काळाच्या धबडग्यात आपण तो विसरून गेलो! दोघांच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती!

दहा आकडे मोजा!! मी म्हटलं. त्यांच्या चेहऱ्यावरच्या कुतूहलाचा फुगा एकदम फुटला. दहा आकडे? रागावलो की शंभर, दोनशे, हजार आकडे म्हणून झाले तरी राग आवरता घेत नाही! वसंत म्हणाला.

याचं कारण दहा आकड्यांचं गुपित आपल्याला कोणी शिकवलेलं नसतं!! पुन्हा उत्सुकता.

दहा आकडे म्हणजे दहा श्वास मोजायचे आणि पहिले दहा पुरले नाहीत तर पुन्हा पुन्हा श्वास मोजायचे. दहा या आकड्यांत जादू नाहीये. जादू श्वासात आहे.

आपण भावनाशील झालो की श्वासाची गती बदलते, श्वासाची खोली आणि गुणवत्ता बदलते. अगदी आपल्या नकळत. आणि मनात म्हणजे मेंदूत भावनांची वादळं उसळत असतात तेव्हा मेंदूला प्राणवायूची विशेष गरज असते. मन म्हणजे मेंदूमध्ये अनेक आठवणी, विचार, चित्रं, उद्गार, संवाद अचानक उद्भवतात. त्यांचा कोलाहल सुरू होतो.

बिच्चारा आपला मेंदू, त्याला हवा असतो प्राणवायू. मेंदूला शरीराचं तत्परतेनं व्यवस्थापन करायचं असतं. रक्ताभिसरण, हृदयाची धडधड, स्नायूंचं चलनवलन या सर्वांत सुरळीतपणा आणायचा असतो. त्यासाठी त्याला म्हणजे मेंदूला हवी असते उसंत आणि प्राणवायू. याचा पुरवठा आपला श्वासोच्छ्वास करीत असतो.

आणि आपण त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. दहा आकडे मोजतो म्हणजे दहावेळा आपण प्राणायामाद्वारे नियंत्रित करतो. किती सोपं आणि साधं आहे ना! इतकं सहजसाध्य की त्याची आपण दखल घेत नाही. पण, ती जादू आजमवायलाच हवी. तयारी आहे ना?

श्वासाच्या नियंत्रणासाठी तीन गोष्टी

1) ताठ बसा म्हणजे पाठीचा कणा ताठ; पण ताठर नको. खांदे मागे खेचून घ्या आणि तरी ढिले राहू द्या.

2) श्वासावर लक्ष केंद्रित करा. म्हणजे श्वासाचा शरीरातला नासिकेद्वारे प्रवेश आणि निर्गमन यावर लक्ष ठेवा.

3) श्वासापेक्षा उच्छवास अधिक लांबायला हवा.

प्रत्येक श्वासाला अवसर द्या. श्वास येताना किंवा सोडताना जराही हवेचा आवाज होता कामा नये. श्वास घेताना सोईसाठी चार आकडे मोजा (पूरक), श्वास धरून (कुंभक) चार आकडे आणि नि:श्वास मात्र सहा, सात किंवा आठ आकडे मोजा; पण त्यासाठी स्वत:ला दमवू नका. घाई करू नका. या गोष्टी सहज होतात, दहावेळा श्वास म्हणजे दहा आकडे. अर्थात, आयत्या वेळी जमणार नाही, त्यासाठी मन शांत असताना सवय करा. कितीही वेळा!!

(ख्यातनाम मनोविकारतज्ज्ञ)

drrajendrabarve@gmail.com

Web Title: The magic of breathing..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.