भगवान गोपालकृष्ण

By Admin | Updated: May 24, 2014 13:35 IST2014-05-24T13:35:57+5:302014-05-24T13:35:57+5:30

भगवंतांच्या लीलाचरित्रामध्ये तत्त्वज्ञान, योग्यांकरिता समाधान, सज्जनांचा सांभाळ, दुर्जनांचा संहार, भक्तांना दिलासा आहे. तसेच जीवनाकडे पाहण्याची प्रेममय, मधुर दृष्टी आहे.

Lord Gopalakrishna | भगवान गोपालकृष्ण

भगवान गोपालकृष्ण

- आत्मदीप

- स्वामी मकरंदनाथ

श्री. एकनाथमहाराजांचा अभंग आहे, 

‘मुरली मनोहर रे माधव। 
मुरली मनोहर रे।। 
श्रीवत्सलांछन हृदयविलासन। 
दीनदयाघन रे।।१।।
सुरवर किन्नर नारद तुंबर। 
गाती निरंतर रे ।।२।।
एका जनार्दनी त्रिभुवन मोहन। 
राखीत गोधनु रे।।३।।
माधव मुरली मनोहर रे।।’
हा अभंग ऐकल्यानंतर तीव्रतेने गोपालकृष्णांची आठवण होते. त्यांचे मनोहर लीलाचरित्र डोळ्यांसमोर येते. नाथ म्हणतात, ‘हे माधवा, तुझी मुरली अत्यंत मनोहर आहे. तिचे स्वर ऐकले, की मन नाहीसे होऊन जाते आणि मन नाहीसे झाल्यावरच खरा आनंद होतो.’ भगवंतांच्या लीलाचरित्रामध्ये तत्त्वज्ञान आहे, योग्यांकरिता समाधान आहे, सज्जनांचा सांभाळ आहे, दुर्जनांचा संहार आहे, भक्तांना दिलासा आहे. या सर्व गोष्टींबरोबरच एक विलक्षण गोष्ट आहे, ती म्हणजे जीवनाकडे पाहण्याची एक मधुर, प्रेममय दृष्टी; जी दृष्टी प्रत्येकाच्या अंत:करणात जणू सुरेल संगीत निर्माण करते, हास्याची लकेर निर्माण करते.
भगवंतांच्या हातातील मुरलीने तर त्रिभुवनाला भुरळ पाडली. मुरली ही भगवंतांच्या वैभवाची खूण झाली. भगवंतांच्या शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेल्या रूपाने जितके भक्तगण आकृष्ट झाले, त्यापेक्षा किती तरी पटींनी अधिक भक्त त्यांच्या मुरलीधारी रूपाने आकृष्ट झाले. आपल्या जीवनाचे संगीत सुरेल करून घेतले पाहिजे, असेच ही मुरली सुचविते. बासरी हे असे वाद्य आहे, की ते संपूर्ण पोकळ, रिकामे असावे लागते. रिकामे असेल तरच त्यातून स्वर येतात. भगवंतांची मुरली आपल्याला असेच सांगते, की आपले मन सर्व विकारांपासून मोकळे असावे. बासरीचा स्वर अतिगोड आणि मोहवून टाकणारा असतो. अत्यंत मोकळ्या श्‍वासातून, मोकळ्या मनातून भगवंतांची बासरी वाजविली गेली. बासरी वाजविणाराही अतिशय नि:संग होता, मोकळा होता, अगदी त्याच्या बासरीसारखाच! तेथे कोणत्याही विकाराचा, कामनेचा स्पर्श नव्हता.
असे वाटते, आज जर भगवंत परत अवतरले, तर कदाचित ते पुन्हा भगवद्गीता सांगणार नाहीत, उद्धवाला उपदेश करणार नाहीत, पांडवांसाठी शिष्टाई करणार नाहीत; पण एक गोष्ट मात्र ते नक्की करतील, ती म्हणजे ते गोकुळात जातील. आपल्या भोवती गोपगोपींना जमवतील आणि आपली मधुर बासरी वाजवतील. सर्वांना मोहवून टाकतील. आपल्या सवंगड्यांबरोबर क्रीडा करतील. त्यांच्या डोक्यावर मुकुट नसेल, तर त्यांनी आपल्या कुरळ्या केसांना शेल्याने बांधून त्यावर मोरपीस खोचलेले असेल. गाईगुरांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवीत ते त्यांना चरायला डोंगरात घेऊन जातील. ते सर्वांना प्रेम देतील, सर्वांवर प्रेम करतील. त्या प्रेमाला कोणत्याही कामनेचा स्पर्श नसेल. ते आपल्या भक्तांकडे आवर्जून जातील, विदुराकडील साधे, रुचकर भोजन ग्रहण करतील. सुदाम्याची आठवण त्यांना नक्की असेल. या जीवनात आपल्या अलौकिकतेचा आणि अमानवी शक्तीचा प्रत्यय ते कदाचित पुन्हा देणार नाहीत; पण प्रत्येकाला प्रेमाची शिकवण जरूर देतील.
मला तर वाटते, की अशा भगवंतांना आपण पाहिले आहे, आपल्या सद्गुरूंच्या रूपात. एवढेच नव्हे, तर त्यांच्या प्रेमाच्या राज्यात आपल्याला स्थान मिळालेले आहे. त्यांच्या रूपाचे नावदेखील माधवच होते. त्यांच्या रूपाने सर्व जीवन बासरीसारखे संगीत फुलवणारे कसे असते ते आपण अनुभवले आहे. आपल्या भाग्याला सीमा नाही.
(लेखक पुणेस्थित असून, नाथ संप्रदायातील स्वामी स्वरूपानंदांचे उत्तराधिकारी स्वामी माधवनाथ यांचा वारसा पुढे चालविणारे आध्यात्मिक अधिकारी आहेत.)

Web Title: Lord Gopalakrishna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.