केरळचा पूर झूम लेन्समधून बघताना..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 07:00 IST2018-09-02T07:00:00+5:302018-09-02T07:00:00+5:30
केरळमध्ये पूरप्रभावित भागात गेल्यावर पहिल्यांदा वाटलं, पुरानं एवढं काही नुकसान झालेलं दिसत नाहीए.मदत घ्यायला येणारी माणसंही चांगली र्शीमंत दिसत होती.चुकीच्या माणसांना मदत दिली जातेय, असं वाटून भ्रमनिरास झाला; पण एका अण्णानं शांतपणे सांगितलं, जरा तुमचा दृष्टिकोन बदलून बघा. म्हणून मग गावात शिरलो, भटकलो, तेव्हा कळलं, पाऊस येऊन जाणं म्हणजे काय? सोन्याची चेन घालणारेही हात का पसरताहेत आणि ब्रश, पेस्टपेक्षा त्यांना नेमकं काय हवंय?.

केरळचा पूर झूम लेन्समधून बघताना..
-योगेश गायकवाड
सारा देश 72वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना केरळ मात्र पाण्यात बुडत होता. केरळातला हा महापूर तीन ठिकाणी आला. एकदा प्रत्यक्ष मलबारच्या भूमीवर, दुस-यादा न्यूज चॅनलवर आणि तिस-यादा सोशल मीडियावर. प्रत्यक्ष आलेल्या पुरापेक्षा हा चॅनेलवाल्यांनी आणि नेटकर्यांनी आणलेला पूर जास्त भयानक होता.
आपला दिवस भरण्यासाठी वाट्टेल त्या व्हिडीओला वाट्टेल ती माहिती चिकटवून न्यूजवाले गोंगाट करत होते. आणि आमच्याच धर्माची माणसं मदत करण्यात कशी अग्रेसर आहेत हे रंगवून रंगवून सांगण्यात सोशल मीडिया बुडून गेला होता. अशात फक्त टूर पॅकेज म्हणून केरळची माहिती असलेल्या सामान्य माणसाला समजतच नव्हतं की प्रत्यक्षात मलबारी माणसाची परिस्थिती काय आहे.
तो बापडा आपल्या लुंगीवाल्या बांधवांसाठी हळहळ व्यक्त करत होता आणि मनोमन फक्त प्रार्थना करत होता. साधारण अशाच हतबल मन:स्थितीत मीदेखील सोशल मीडियावरील ‘आमच्याच लोकांनी फक्त मदत केली’च्या टिमक्या वाजवणा-याशी भांडून थकलो होतो. हजारो किलोमीटर दूर सुरक्षित घरात बसून केरळच्या पुराबद्दल पोकळ वाद घालत बसण्याचीपण लाज वाटू लागली होती. पण करणार काय? अशातच अचानक मला प्रत्यक्ष केरळमध्ये जाऊन पूर प्रभावित भागात काम करण्याची एक संधी चालून आली.
छे छे! मदत कार्य, सेवा-बिवा काही नाही. एका मोठय़ा कॉर्पोरेट उद्योगसमूहाला ते पूरग्रस्तांसाठी करत असलेल्या मदतकार्यावर डॉक्युमेण्ट्री तयार करायची होती. आणि त्यासाठी व्यावसायिक डॉक्युमेण्ट्रीमेकर म्हणून आमच्या कॅमेरा टीमबरोबर मला केरळला जाण्याचा योग आला. आणि इतका वेळ दुरुन लाँग शॉटमध्ये बघत बसलेल्या मला झूम लेन्समधून केरळच्या पुराकडे बघता आलं.
कोची विमानतळ पाण्याखाली असल्याने गैरसोयीच्या त्रिवेंद्रमच्या विमानतळावर उतरून पाच तास गाडीतून उलटा प्रवास करून कोचीला पोहचावं लागणार होतं. विमानाच्या खिडकीतून खाली गढूळ पाण्याने भरलेली काही गावं आणि त्यातून डोकावणारे नारळाच्या झाडाचे तुरे बघत मी बर्ड्स आयव्ह्यूने पुराचे शॉट्स किती भारी येतील, असा विचार करत होतो. त्रिवेंद्रम ते कोची प्रवासात एक विचित्र भकासपण जाणवत होतं. दुकानं बंद, रस्त्यावर सामसूम.. या आसमानी संकटाने केरळी माणूस हादरून गेला असेल, गाळात फसलेले संसार, सुन्न झालेली माणसं, डॉक्युमेण्ट्रीची सुरुवात करायला आपल्याला मस्त व्हिज्युअल्स मिळतील अशी आशा वाटत होती. पण ड्रायव्हरने पुरवलेल्या माहितीने त्या आशेवर लगेच पाणी फेरलं गेलं. ओणम या मोठय़ा केरळी सणाची सुट्टी असल्याने सगळीकडे सामसूम दिसते आहे, असं त्याने सांगितलं. कोचीच्या मोठय़ा हॉटेलात गरम पाण्याचा मनसोक्त शॉवर घेऊन मिनरल वॉटरचाच आग्रह धरत आम्ही एकमेकांकडे खंत व्यक्त करत होतो की महाराष्ट्रात बसून वाटत होतं तेवढं काही इथे नुकसान झाल्याचं दिसत नाहीये.
दुस-या दिवशी संस्थेच्या कार्यकर्त्यांसोबत अलाप्पुझा जिल्ह्यातील पूर प्रभावित गावी जायला निघालो. अजूनही मी वाइड अँँगलमधूनच केरळच्या परिस्थितीकडे बघत होतो. संस्थेने त्या गावात ‘फ्लड रिलिफ कॅम्प’ लावला होता. त्याआधी पंचायत सदस्यांच्या मदतीने गावात सर्वेक्षण करून खरे गरजू लोक त्यांनी शोधून काढले होते. त्यांच्या घरी जाऊन त्यांना टोकन दिलं होतं. आणि प्रत्यक्ष वाटपाच्या दिवशी टोकन घेऊन येणा-याना सर्व्हायव्हल कीट दिलं जात होतं. पूरपीडित मल्याळी गरजू लोक शूट करायच्या तयारीत आम्ही कॅमेरे सरसावून बसलो होतो. पण समोरचं चित्र भलतच होतं. एक गरजू बुलेटवर आला, गळ्यात भरपूर सोनं असलेली एक गरजू महिला आली, गॉगल, टी शर्ट आणि लुंगी नेसलेली, हातात स्मार्ट फोन असलेली तरुण मुलं गरजू म्हणून आली आणि मदतीचं कीट घेऊन मजेत निघून गेली. मधूनच एखादी परकर ब्लाऊजमधली खरी गरजू वाटणारी म्हातारी आली तर आम्ही स्कॅन केल्यासारखे चारही बाजूंनी तिला शूट करत होतो. पण तरीही हवे तसे गरजू, पूरपीडित, गोरगरीब सापडत नव्हते. साठीचा एक माणूस घरचा टेम्पो घेऊन आला. त्याने कूपन दाखवून मदतीचं कीट घेतलं आणि उत्सुकतेने तिथेच उघडून बघितलं. एवढय़ा मोठय़ा कंपनीच्या सीएसआरमधून काय मिळाले आहे हे बघण्याची उत्सुकता तो लपवूच शकला नाही. पण पोत्यातून पेस्ट, ब्रश, साबण, फिनायल आणि तांदूळ, मीठ, तेल, साखर असा बेसिक किराणा माल निघालेला बघून त्याचा भ्रमनिरास झाला होता. फुकट काहीतर मिळतंय म्हणून अतिउत्साहाने रांगेत उभे असलेले बरेच जण दिसत होते. शेवटी माझा पेशन्स संपला आणि मी संस्थेच्या अधिका-याना जाब स्वरूपात विचारलं की ‘तुम्ही लोकांनी काय सव्र्हे. केलाय? रांगेतली बरीचशी माणसं ही चांगली परिस्थिती असलेली आहेत. गरिबांना सोडून यांना का मदत करताय तुम्ही? त्यावर ते अधिकारी अण्णा शांतपणे उत्तरले, ‘सर, यू शूड चेंज युवर लेन्स अँण्ड हॅव अ क्लोजर लूक अँट द सिच्युएशन.’
‘जरा दृष्टिकोन बदलून बघा’, या त्यांच्या सल्ल्याने माझ्यातल्या फिल्ममेकरचा इगो दुखावला गेला खरा; पण बदला घेण्याआधी प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे म्हणून मी माझी लेन्स (दृष्टिकोन) बदलून बघायचं ठरवलं. कॅम्पमधील खैरात वाटपाचा सोहळा कॅमेरा टीमवर सोपवून मी एकट्यानेच गावात चक्कर मारायला निघालो. स्वत:ची लेन्स बदलणं हे कॅमे-याची लेन्स बदलण्याइतकं सोपं नक्कीच नसतं. म्हणजे आपली धारणा, विचार, तत्त्व सगळं गुंडाळून बाजूला ठेवायची आणि एकदम वेगळ्या नजरेने बघण्याचा प्रयत्न करायचा. स्वत:साठी एक आव्हान म्हणून मग इतका वेळ लावलेली वाइड लेन्स बदलून झूम लेन्स लावून गावात आत आत शिरत गेलो. तीन तास एकटाच भटकलो. आधी निरीक्षण करू, लोकांशी बोलू आणि मग वेगळं काहीतरी सापडलं तर ते शूट करू असा विचार होता. झूम लेन्समुळे आता मी तिथल्या लोकांच्या अधिक जवळ पोहचत होतो. त्यांच्या घरात, डोळ्यात, मनात डोकावू शकत होतो. आणि यातून पूर येऊन जाणे म्हणजे काय हे वेगळ्याने समजत होतं.
गावातल्या बर्याच लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली असली तरीही ते कॅम्पच्या दारात हात पसरवून का उभे होते?
कारण रात्री घरात पाणी शिरत असताना ते फक्त जीव वाचवू शकले. घरातलं सगळं सामान ओलं झालेलं होतं. गावातल्या तीनही वाण्याच्या दुकानातला मालसुद्धा पाण्यात बुडालेला होता. गावात कसलाच सप्लाय होऊ शकत नव्हता. त्यामुळे पैसे असूनही रोज जगायला लागणा-या गोष्टी त्यांच्याकडे नव्हत्या. आणि म्हणून नाइलाजाने ते संस्थेकडून मिळणारी मदत घेत होते. मघाशी कीटमधलं समान बघून नाराज झालेला माणूस त्याच्या घराच्या पायरीवर बसलेला दिसला. एवढय़ा मोठय़ा कंपनीच्या मदतीच्या कीटमध्ये मोबाइलसारख्या चांगल्या वस्तू असतील आणि त्या विकून आपण गाद्या आणि नवीन कपडे घेतले असते, असं त्या खेडुताला वाटलं होतं. म्हातारा जरा खुळचट वाटला; पण त्याच्या घरातल्या भिंतीवरचा पाच फुटावरचा पाण्याचा मार्क बघून त्याच्या म्हणण्याचं गांभीर्य लक्षात आलं. याचा अर्थ टेबलावरच्या टीव्हीपासून खालचं सगळं 10-12 दिवसांपासून पाण्यात भिजत होतं. त्यामुळे त्याच्या गरजा या दात घासायला पेस्ट आणि ब्रशपेक्षा खूपच वेगळ्या होत्या. माझी लेन्स अजून थोडी स्वच्छ आणि झूम इन करत गावातल्या मुख्य रस्त्यावर आलो. गावातील तो एकमेव डांबरी रस्ता पांढ-या वह्या पुस्तकांनी बहरून गेला होता. गावात तेवढीच एक कोरडी जागा होती म्हणून मुलांनी आपली भिजून गेलेली वह्या आणि पुस्तकं तिथे वाळत घातलेली होती. नववीत शिकणारा जीनू वह्यांची पानं उलटी पालटी करत बसला होता. पुस्तकांचं तसं फार विशेष नाही, पानं इस्त्री करून घेता येईल म्हणाला; पण मोठय़ा मेहनतीने लिहिलेल्या नोटबुकमधल्या नोट्स पुसल्या गेल्याने तो अधिक वैतागलेला होता.
मस्त शॉट मिळेल म्हणून लगेच कॅमेरा टीमला तिकडे बोलावून घेण्याची लबाडी मी केलीच; पण स्वत:च्या भविष्याचं असं वाळवण घालून बसलेला जीनू बघून मला वाईट वाटत होतं. चांगला शॉट मिळाला म्हणून लगेच पुढे निघून जायला पाय निघत नव्हता. पण आपण इथे लोकांची मदत करायला नाही तर पैसे घेऊन एका विशिष्ट कामासाठी आलेलो आहोत याचं भान माणुसकीच्या फार मध्ये मध्ये येत होतं. रस्त्यावर पसरलेल्या त्या अर्ध्या ओल्या कागदांचा फोटो सवयीने सोशल मीडियावर पोस्ट केला. 15 मिनिटात गोव्यातल्या एका मैत्रिणीचा मेसेज आला, ‘केरळमधल्या पूरग्रस्तांना छोटीशी मदत करायची इच्छा आहे; पण कसे ते समजत नव्हते. तुझी पोस्ट वाचली. त्या मुलाला मी मदत करू का? माझं बजेट तीन हजार रु पये आहे.’
वह्या पुस्तकांसाठी मदत मिळाली तर जीनूला हवी आहे हे शेजारी-पाजारी चौकशी केल्यावर समजलं. गोव्याच्या मैत्रिणीने माझ्या खात्यावर पैसे जमा केले आणि ते मी पंचायत समितीचे सदस्य असलेल्या सैन्तील अण्णांकडे सोपवले. त्याचा अपव्यय न होता जीनूला नवीन पुस्तकं आणून देण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. आपल्याला मदत करणा-या गोव्याच्या ताईला जिन्या पुस्तकं मिळाल्यावर त्यांचा फोटो पाठवणार आहे. वाइड अँँगलमधून वरवर पाहता पुराचं पाणी ओसरलेलं दिसत होतं; पण झूम लेन्समधून पाहता केरळकरांच्या डोळ्यातलं पाणी आणि मदत करणार्यांच्या मनातला ओलावा स्पष्ट दिसत होता.
(लेखक फिल्ममेकर, दिग्दर्शक आहेत.)
yogmh15@gmail.com