नव्वदी गाठलेल्या सुलोचनाबाईंचा चित्रपटक्षेत्रातला संयमित आणि संयत प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 03:00 IST2018-07-29T03:00:00+5:302018-07-29T03:00:00+5:30
सुलोचनाबाईंनी सुमारे दोनशे वेळाआईची भूमिका पडद्यावर साकारली आहे. - पण दरवेळी त्यांची ‘आई’ निराळी दिसली ! डोळ्यामध्ये अश्रू आले; पण पापणीवरून ओघळले नाहीत. तो संयम आणि संयतपणा केवळ त्याच दाखवू शकल्या. चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या या प्रवासाविषयी..

नव्वदी गाठलेल्या सुलोचनाबाईंचा चित्रपटक्षेत्रातला संयमित आणि संयत प्रवास
-चंद्रकांत जोशी
आई, वहिनी, भावजय, नणंद, बहीण, जाऊ.. ही नाती आणि त्यांतील जिव्हाळा, प्रेम, वात्सल्य अशा भावना कशा जपाव्यात, याचा वस्तुपाठच जणू पडद्यावरून चार-पाच दशके ज्यांनी दिला, त्या घराघरांतील प्रत्येकाच्या मनात घर करून राहिलेल्या दीदी. ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना!
वास्तवातील वर उल्लेखित व्यक्तिरेखा अभिनयाने संपन्न करणा-या सुलोचना दीदींचा जीवनपट दीर्घ आहे. ‘रंगू’ कोल्हापूर जिल्ह्यातील एका लहानशा खेडेगावात जन्म घेते आणि अख्ख्या भारतीय रसिकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करते, हे समाजसंस्कृतीचं उत्तम उदाहरण आहे. ही खेड्यात जन्मलेली-वाढलेली रंगू मध्यमवर्गीय, साध्यासुध्या राहणीमानात राहून बालसुलभ कुतूहलातून गावच्या तंबूत येणारे सिनेमे आवर्जून बघते. त्यातून तिचं बोलक्या पडद्याविषयीचं कुतूहल वाढत जातं. तिथली नाच-गाणी, संवाद सारं तिच्या मनात उतरत राहातं. ही उत्सुक नजरेची मुलगी नकळत त्या हलत्या, बोलत्या चित्रांतून स्वत:ला डोकावून पाहते. ही कल्पनाही सिनेमॅॅटिक आहे; पण दीदींच्या बाबतीतील हे सत्य आहे. नियतीने ते स्वप्न सत्य, वास्तवात उतरवलं खरं !
या रंगूचा प्रवास सोपा नव्हता. लहानपणी आईवडिलांचं छत्र हरपलं. शाळा-दप्तर कधीचं सुटून गेलं. आणि योग असे, परिस्थिती अशी, की मावशीचं बोट धरून रंगू कोल्हापूरला आली. या सत्यातील घटना आज सिनेमातील योगायोगाच्या गोष्टींसारख्या वाटतात; पण हे सगळं असंच घडलं..
मनात रुजलेला सिनेमा रंगूच्या वागण्यातही सतत डोकावत असे, हे लक्षात येताच घरच्यांनी ओळखी काढल्या आणि रंगूला मा. विनायकांच्या कंपनीत ‘प्रफुल्ल’मध्ये आणलं. पहिली भूमिका मिळाली ती ‘चिमुकला संसार’मध्ये ! त्या चित्रपटातल्या चिमुकल्या भूमिकेतच रंगू सगळ्यांच्या नजरेत भरली. बोलके डोळे, सहजभाव, चुणचुणीतपणे व्यक्त होण्याची क्षमता हे सारं या मुलीमध्ये पुरेपूर होतं. प्रारंभाचं निमित्त ठरलेला तो ‘चिमुकला संसार’ पुढे तब्बल सत्तर वर्षं अभिनयाचा आदर्श प्रपंच ठरला.
दैवावर विश्वास की परिस्थितीवर? असा संभ्रम आपल्याला पडतो; परंतु विधिलिखितांनी त्यांना योग्य अशा स्थानी आणलं हे निश्चित.
खेड्यातून शहरात येताना चालणं, बोलणं, भाबडेपणा, समोरच्या माणसाकडे आदराने पाहणं, संकोचणं, शहरी वातावरणात बुजून संकोचून असणं हे सुरुवातीला होतंच. ते दीदींच्याही बाबतीत झालं; पण त्यांची आकलनशक्ती मोठी. हे सारं हळूहळू बदलत गेलं. स्टुडिओतील वातावरणात अनेक मोठय़ा सहृदयींच्या सहवासात मन आणि शरीर संस्कारित झालं.
भालजी पेंढारकरांसारख्या व्यक्तीने या ग्रामीण ‘रंगू’ला निरखलं आणि ‘महारथी कर्ण’ या हिंदी चित्रपटात पृथ्वीराज कपूर, दुर्गा खोटे यांच्यासमोर, बरोबर एका छोट्या भूमिकेत उभं केलं. रंगूच्या बोलक्या डोळ्यांचं ‘सुलोचना’ असं नामकरण भालजींनीच केलं. सासुरवास, जयभवानी, मीठभाकर अशी चढती मार्गाक्रमणा सुरू झाली. भालजी पेंढारकरांच्या त्या शिष्या झाल्या. त्यांना मराठी भाषा, संस्कार यांचे शिक्षण मिळालं, सोबत मिळत गेली. त्यात ग. दि. माडगूळकर, दत्ता डावजेकर, राजा गोसावी, दामूअण्णा मालवणकर, दिनकर द. पाटील, मीनाक्षी, सुमती गुप्ते अशी मोठी माणसं भेटली. त्यांचा ‘मीठभाकर’ जळितामध्ये जळून गेला. या दरम्यान ‘मंगल पिक्चर्स’च्या ‘जिवाचा सखा’साठी त्यांची निवड झाली.
या चित्रपटाचं थोडं वेगळेपण आणि महत्त्व नमूद करायला हवं. सुधीर फडके, माडगूळकर आणि राजा परांजपे ही त्रयी एकत्र आली. तिघांनी एकत्र येऊन केलेला हा पहिलाच चित्रपट रौप्यमहोत्सवी ठरला. पुढे सुमारे पन्नास वर्षांत या त्रयीने मराठी चित्रपटांमध्ये स्वत:ची ठसठशीत मुद्रा असलेलं एक युग निर्माण केलं, तसाच नायिका म्हणून दीदींचा बोलबाला झाला. एकापाठोपाठ चित्रपट आले आणि सुलोचना, मा. विठ्ठल, चंद्रकांत यांच्यासह मराठीतील अव्वल अशा जोड्या प्रेक्षकांना आवडत गेल्या. ‘मीठभाकर’ नव्याने केला. सुलोचना दीदींच्या सात्त्विक अभिनयाने त्यांच्याबद्दलचा आदर वाढला.
‘भाऊबीज’ या सिनेमात त्यांनी नर्तिका रंगवली; पण प्रेक्षकांना या सत्शील, सोज्वळ वळणाच्या अभिनेत्रीचं बोर्डावर नाच करणं रुचलं नाही. लोकांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. त्यानंतर मात्र त्यांनी अशा भूमिका केल्या नाहीत.
घरातील स्त्रीबद्दल प्रत्येकाच्या मनात एक खास भावना असते. स्वत:च्या व्यक्तिगत आयुष्यात अशी वेगवेगळ्या नात्यातली स्त्री वाट्याला आलेला/अनुभवलेला प्रेक्षक, आपलं ते प्रत्यक्षातलं नातं पडद्यावरच्या सुलोचनाबाईंमध्ये शोधत असे. अशी स्नेहाची नाती ज्यांच्या नशिबात नसत, असे स्त्री-पुरुष तर सुलोचनाबाईंच्या रूपात ही नाती पाहात ! मला वाटतं असं भाग्य लाभलेल्या स्त्री-कलावंतांमध्ये दीदींचं स्थान प्रथम आहे; किंबहुना एकमेवच.
वहिनीच्या बांगड्या, ओवाळणी, सांगत्ये ऐका, मी तुळस तुझ्या अंगणी, सतीची पुण्याई, प्रपंच, बाळा जो जो रे, स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी, साधी माणसं, धाकटी जाऊ, हिंदीमध्ये विमल रॉय यांचा ‘सुजाता’ असे अनेक चित्रपट आहेत. हिंदी चित्रपटांची यादी तर खूपच मोठी आहे. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, ग्रामीण, कौटुंबिक या सर्व स्वरूपांत त्या तत्कालीन वास्तव सहज, लीलया जगल्या. दीदींना निसर्गानंच दिलेली एक देणगी आहे. भरतमुनींनी नाट्यशास्त्रात नायक, नायिकांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलचं जे सूचन दिलं आहे, ते दीदींना पूर्ण लागू पडतं.. उंची, बांधा, मुद्रा, डोळे, अंतर्यामीची सात्त्विकता आणि रूप, अभिव्यक्तीची सक्षमता, लयपूर्ण हालचालींतील सौंदर्य आणि वावर.. मला वाटतं, मराठी स्त्री-कलावंतांमध्ये अशी बोटांवर मोजता येणारी उदाहरणं असतील. पण दीदी या त्यातील एकमेव ठरू शकतात. त्यांची जिजाऊ, येसूबाई जितकी निग्रही, कणखर, स्वराज्य प्रेमाची शिकवण देणारी; पण वत्सल माता, तितकीच सावित्रीबाई फुले यांची भूमिका ! समाजाचा रोष, टीका सहन करीत प्रसंगी अंगावर उडविलेलं शेणही ज्यांनी सोसलं त्या सावित्रीबाईंचा महात्मा फुले यांच्यावरील विश्वास, निष्ठा, अपमानित होतानाही निश्चयाची पडणारी पावलं आणि स्त्रीचं सार्मथ्यपूर्ण व्यक्तिचित्र दीदींनी अतीव ताकदीने उभं केलं.
‘एकटी’ मधली आई आणि ‘मोलकरीण’मधील आई. दोन्ही ठिकाणी आईचीच भूमिका; पण या दोघींच्या वाट्याला त्यांच्या मुलांकडून आलेले अनुभव भिन्न ! या दोन्ही भूमिका रंगवताना दु:ख, करुणा, प्रेम, मातृवात्सल्य यांच्या छटा अभिनित होताना डोळे भरून येतात. सहनशीलता, सोशिकपणा आणि संस्कारित सोज्ज्वळता यांची त्या मूर्तिमंत साक्ष होतात.
‘श्यामच्या आई’नंतर प्रेक्षकांच्या मनात ‘आई’ ख-या अर्थाने दीदींनी उभी केली. लहानपणीच आईचं छत्र हरपलेले काही भेटले ते डोळ्यांत पाणी आणून सांगत, ‘आम्ही आईला इथेच भेटतो हो.’
तर ‘एकटी’ आणि ‘मोलकरीण’ बघणार्या काहींनी खाली मान घालून कबुली दिली, ‘सर, आईशी असं वागायला नको होतं आम्ही.’
- मला वाटतं यापेक्षा दीदींचं मोठेपण कशात आहे?
दोन क्षण करमणूक करून घेण्यासाठी येणारा प्रेक्षक जर हरवलेली आई, वहिनी, बहीण, बरोबर घेऊन जात असेल तर दीदी, तुम्हाला त्रिवारच काय शतवार प्रणाम!
कलावंत काय देतो याची आणखीही उदाहरणं देता येतील. सुमारे दीडशेहून अधिक मराठी, तर दोन-अडीचशेहून हिंदी चित्रपटांत दीदींनी भूमिका केल्या. अमिताभ, शशी कपूर, मनोजकुमार, विनोद खन्ना अशा नायकांची आई होतानादेखील त्या प्रत्येकाची आई त्यांनी किती वेगळी दर्शविली ! सुमारे दोनशे वेळा आई पडद्यावर साकारताना प्रत्येक वेळी प्रत्येकाची वेगळी, वेगळ्या संस्कृतीतील ती आई स्वतंत्रच राहिली. या नायकांबरोबरच्या दृश्यांत त्या सरसच ठरल्या. पापणीवरचे अर्शू ओघळले नाहीत. तो संयम आणि संयतपणा केवळ त्याच दाखवू शकल्या. स्वत: सोसत असता ती आतली घुसमट आम्ही खुर्चीत सोसत डोळे पुसत राहिलो.
चीनच्या आक्रमणावेळी भारतीय सेनेला घरचं सोनं-नाणं, चांदी सगळं देऊन वाच्यता न करता दीदींनी साहाय्य केलं हे अनेकांना माहिती नसेल. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, विशेष अभिनेत्री, जस्टीस ऑफ पीस, व्ही. शांताराम, चित्रभूषण, लाइफटाइम अचिव्हमेंट, फिल्म फेअर, पद्मर्शी, महाराष्ट्रभूषण असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले.
.. आता त्यांना सर्वोच्च मानाचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ लाभावा आणि त्यांचा शंभरावा वाढदिवस साजरा करण्याचं भाग्य आम्हाला लाभावं, एवढंच आता वाटतं..
(लेखक ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आहेत)
chandrakantjoart@gmail.com