एक भारलेला संगीतकार

By Admin | Updated: May 31, 2014 16:31 IST2014-05-31T16:31:21+5:302014-05-31T16:31:21+5:30

ज्याच्या नावातूनसुद्धा संगीत वेगळं होऊ शकत नाही, असा प्रयोगशील संगीतकार म्हणजे आनंद मोडक! त्यांचा प्रत्येक श्‍वास आणि ध्यास हा संगीतासाठीच होता. या मनस्वी कलावंताला सुरेल संगीत सहजतेने देण्याची दैवी देणगी लाभलेली होती. कविमित्र सुधीर मोघे यांच्या निधनाने सावरतो न सावरतो, तोच अवघ्या कलाविश्‍वाला हा आणखी एक धक्का बसला. संगीतकार आनंद मोडकही आपल्यातून गेले. अखंड संगीत साधनेत रमलेल्या या कलावंताच्या आठवणींना त्यांच्या मित्रांनी दिलेला उजाळा..

A loaded composer | एक भारलेला संगीतकार

एक भारलेला संगीतकार

 अरुण नूलकर 

केवळ संगीत हाच ज्याचा अखेरपर्यंत ध्यास आणि श्‍वास होता, आयुष्यभर या संगीतासाठीच त्यानं स्वत:ला अक्षरश: वाहून घेतलं होतं आणि मिळेल तिथून ते गोळा करून सातत्याने ऐकून कानात साठवून ठेवलं होतं, तो प्रयोगशील संगीतकार आनंद मोडक! २३ मे रोजी त्याचं आकस्मिक निधन झालं आणि सुधीर मोघे-आनंद मोडक या कवी-संगीतकार जोडीतला आनंद आपल्या कविमित्राला, नव्हे त्याच्याच भाषेत सांगायचं, तर ‘मितवा’ला भेटायला इतक्या घाईघाईने निघून गेला. सगळ्या संगीत क्षेत्राला आणि आमच्यासारख्या मित्रांना धक्का देऊन गेला!
सुधीरसारखाच आनंदचा आणि माझा गेल्या ४0-४५ वर्षांचा स्नेहबंध! १९७0 साली आम्ही ‘स्वरानंद’तर्फे ‘आपली आवड’चा मराठी गाण्यांचा आद्य वाद्यवृंद सुरू केला. त्या कार्यक्रमांना नुकताच, अकोल्याहून पुण्यात आलेला आनंद आवर्जून येत असे. आमचा व्हायोलिनवादक रमाकांत परांजपेच्या वादनाला, त्यातल्या म्युझिक पीसेस्ना काँट्रामेलडीला भरभरून दाद देत असे, अगदी त्याची अत्युच्च दाद असली, की चक्क रमाकांतच्या तो पाया पडत असे!
अशा वेळच्या गप्पांतून आणि विशेषत: सुधीर मोघेबरोबर भेटल्यावर कळायचं, की आनंद हा एक तद्दन् संगीतवेडा आहे! खरं तर अकोल्यातच त्याच्यावर संगीताचे संस्कार डॉ. शकुंतला पळसोकरांकडे झाले होते; पण ते ८-१0 महिनेच! पुढे मात्र, हा पठ्ठय़ा जबरदस्त कानसेन झाल्यामुळे श्रवणभक्तीतून त्याने संगीत ग्रहण केलं! ‘रेडिओ हाच माझा गुरू’ असं तो नेहमी म्हणायचा. त्यातही रेडिओ सिलोन, हे तर दैवतच. शिवाय रात्री १२ ला. उठून रेडिओ पाकिस्तान ऐकणे हे त्याला सहज जमायचं! हे कमी पडलं, तर तो रेडिओ कुवेतही ऐकायचा!
अकोल्याला शाळेत असताना त्याने स्वागतगीताला चाल लावली, ती त्याने लावलेली पहिली चाल! याच्या जोडीला शाळेत त्याचा नेहमी पहिला नंबर असायचा, त्यामुळे आनंदची हुशारी सर्व क्षेत्रांत दिसली! कॉलेजच्या तिसर्‍या वर्षात म्हणजे एस. वाय. बी. एस्सी.ला तो पुण्यात आला आणि एस. पी. कॉलेजात दाखल झाला. पुण्यात खोली घेऊन राहत असताना प्रा. बी. एम. गोरेंकडे तो टायपिस्ट म्हणून काम करीत होता. अर्थात त्याची संगीताची आवड, ते झपाटलेपण त्याला स्वस्थ बसू देत नव्हतंच! आनंद म्हणायचा, ‘मी, ‘स्वरविहार’, ‘फ्रेंड्स म्युझिक सेंटर’ इथे पडीक असायचो! त्यांच्याकडे मी संगीताची माधुकरी मागायचो!’
कॉलेजात त्याला मोहन गोखले भेटला आणि त्याच्यामुळेच तो पी.डी.ए. या संस्थेत आला! यथावकाश त्याला बँकेत नोकरी मिळाली, थोडंफार आर्थिक स्थैर्य आलं; पण घरच्या जबाबदार्‍या होत्याच, त्याही तो धडपडून, जबरदस्त कष्ट करून पार पाडत होता!
आज हे सगळं आठवतंय; कारण संगीतकार आनंद मोडकची मी नंतरच्या काळात बर्‍याच वेळा मुलाखत घेतली! खरं तर, तो खूप बोलका, आणि भरपूर बोलायचा. त्यामुळे माझं काम त्याला फक्त ट्रॅकवर ठेवणे एवढंच उरायचं आणि त्यामुळे त्याचं बोलणं नीट ऐकता यायचं! प्रत्येक वेळी तो अतिशय भरभरून बोलायचा, मग ‘घाशीराम’च्या तालमी असोत, त्याने नवीन बांधलेली चाल असो, ती गाणार्‍या आशाबाई असोत, ते शब्द लिहिणारा सुधीर मोघे असो, रेकॉर्डिंगच्या वेळी ललवाणीचा व्हायोलिनचा पीस असो, नाहीतर दुसर्‍या बाजूला त्याने ऐकलेली कुमारजींची मैफल असो किंवा लतादीदींचं जुन्या काळातलं गाणं असो! आनंद अगदी भारावून, मनापासून बोलायचा!
बहुश्रुतता हा आनंदचा मोठा गुण होता! त्यामुळेच त्याचं संगीतही बहुरंगी झालं! लावणी, कीर्तन, अभंगापासून ते पॉप संगीतापर्यंत सर्व बाज त्याने हाताळले. संगीताचं इतकं जबरदस्त वेड आणि कलासक्त दृष्टी असल्याशिवाय हे होत नाही!
थिएटर अँकॅडमीने आनंदमधल्या संगीतकाराला भरपूर वाव दिला. ‘घाशीराम’मध्ये तो चक्क एक भूमिका करायचा आणि पेटीची साथही करायचा. नंतर ‘महानिर्वाण’, ‘तीन पैशाचा तमाशा’, ‘पडघम’ या टी. ए. च्या नाटकांना त्याने संगीत दिलं! त्याशिवाय ‘म्युनिसिपालिटी’, ‘तुमचे आमचे गाणे’, ‘अफलातून’, ‘अलिबाबाची हीच गुहा’ याही नाटकांना त्याचं संगीत होतं!
थिएटर अँकॅडमीमुळे गायक रवींद्र साठेशी आनंदचे सर्व बाबतींत सूर जुळले. आनंदच्या बहुतेक चित्रपटांतून रवी गायलाय; पण तरीही ‘७-८ चित्रपटांतून आनंदने मला एकही गाणं दिलं नाही’, असं रवी सांगतो! अर्थात ही त्याची तक्रार मुळीच नाही; पण इतर गायकांना वाटतं, की संगीत आनंद मोडक म्हणजे रवी नक्कीच असणार! पण यावरून आनंदचं संगीतकार म्हणून एक वैशिष्ट्य नेहमीच जाणवलंय, ते म्हणजे त्याने त्याच्या गाण्यांसाठी केलेली गायक-गायिकांची नेमकी निवड! मग त्या आशाबाई असोत, रवी साठे असो, ‘दोघी’साठी अंजली मराठी असो किंवा अगदी नुकतीच त्याच्याकडे गायलेली ऊर्मिला धनगर असो! पुणे आकाशवाणीचं त्याने केलेलं एक स्वरचित्र तर वीणा सहस्रबुद्धे गायल्यात!
सतत नवीन करत राहणे, हे त्याचं ध्येय होतं; म्हणून तर त्याला आपण प्रयोगशील संगीतकार म्हणतो. हे करताना, तो वेडवाकडं काहीच करत नसे! शब्दतत्त्व, भावतत्त्व हे त्याने नेहमीच जपलं; म्हणून तर प्रतिभावान कवींच्या रचनाच तो स्वरबद्ध करीत असे किंवा त्याने आधी चाल केली, तर त्यावर शब्द देण्यासाठी त्याला सुधीर मोघेच हवे असायचे!
नवनवीन करण्यात त्याने अनिल कांबळेचं ‘दूर रानातून हलके बासरीचा सूर आला’, हे गीत अनुप जलोटांकडून गाऊन घेतलं! त्यामुळे, आनंद जेव्हा अमेरिकेला गेला होता, तेव्हा आम्ही त्याला म्हणायचो, की हा आता मायकेल ज्ॉक्सनकडूनसुद्धा मराठी गाणं गाऊन घेईल!! पण इथे ‘चौकट राजा’साठी त्याने दिलीप प्रभावळकरांना गायला लावलंय, तर ‘कळत नकळत’मध्ये ‘नाकावरच्या रागाला औषध काय?’ हे गाणं चक्क अशोक सराफ गायलेत!
चाकोरी सोडून वेगळं करणं हे आनंदचं पहिल्यापासून आहे. त्याच्या आईला आणि बहिणीला संगीताची आवड! ५८ साली अकोल्यात असताना घरात रेडिओ आला, तर हा रेडिओवर फक्त शास्त्रीय संगीत न ऐकता सगळ्या प्रकारचं संगीत ऐकत असे! अगदी कर्नाटक संगीतसुद्धा! हिंदी चित्रपटांतली गाणी ऐकताना त्यातली अवघड गाणी आनंदला जास्त आवडायची. 
गाण्याचे शब्द, चाल अनेक जण ऐकतात; पण त्यातले म्युझिक पीसेस्ही तो लक्षपूर्वक ऐकायचा! मला वाटतं, त्यामुळेच एखादं गाणं कसं ऐकावं, त्याचा रसास्वाद कसा घ्यावा, हे आनंद फार छान सांगायचा! अगदी ते तो (त्याच्या ‘खास’ आवाजात) म्हणूनही दाखवायचा! 
आनंदची सांगीतिक कामगिरी चौफेर आहे. सर्व माध्यमांतून ती पुरेपूर बहरली. चित्रपट, रंगमंचीय कार्यक्रम, संगीतिका, नाटके, आकाशवाणी, ध्वनि-प्रकाश योजना (शनिवारवाडा) अशा सगळ्या माध्यमांतून आनंद मोडकची गाणी आपण ऐकत असतो. हे सगळं त्याने बँकेतली नोकरी सांभाळून केलं हे महत्त्वाचं! त्यासाठी बँकेकडून ‘खास सवलती’ न घेता हे विशेष! थोडक्यात काय, तर बँकेनी आनंदच्या या कलागुणांवर ‘निर्व्याज’ (?) प्रेम केलं!
इतकं सगळं गाठी असूनही आनंद आजच्या काळातसुद्धा प्रसिद्धीपराड्मुख राहिला. त्याच्या ठाम मतांमुळे असेल; पण तो कोणत्याही रिअँलिटी शोमधे दिसला नाही, अगदी परीक्षक म्हणूनसुद्धा! 
आनंदचं सगळंच विलक्षण असायचं! नव्या पिढीतल्या गायक, गायिका, संगीतकारांना त्याची मनापासून दाद असायची! स्वत: फोन करून तो बोलायचा! हल्ली तो ज्येष्ठ संगीतकार या वर्गात मोडत असे, त्यामुळे कुठे-कुठे प्रमुख पाहुणा असायचा! त्याच्या हस्ते सीडी प्रकाशन असेल तर तिथल्या तिथे ती विकत घेऊन रसिकांना तसं आवाहन करायचा! तीच गोष्ट पुस्तकाच्या बाबतीत! त्याच्याकडे अनेक दिग्गज गायक-गायिकांची गाणी, मैफिली यांच्या ध्वनिफिती कपाटं भरभरून आहेत. ‘हाच माझा खजिना’ असं तो म्हणायचा!
त्यामानाने अलीकडच्या काळात त्याने गाडी घेतली. नाही तर त्याची एक स्कूटर होती, ती फक्त तोच चालवू जाणे! कारण सुधीर मोघे म्हणायचे, ‘याचा हॉर्न सोडून बाकी सगळं वाजतं’! कदाचित आनंदला त्यातही र्‍हीदम सापडत असेल! पण सगळंचं वेगळं याचं आणि संगीतावरच्या अफाट प्रेमाचं उदाहरण म्हणजे त्याने आपल्या मुलींची नावं अंतरा आणि आलापिनी अशी ठेवली होती!
ज्या-ज्या बाबतीत त्याने त्याचं, ‘मोडकपण’ जपलं ते सगळं प्रत्यक्षात आणलं! म्हणून तर ‘नवीन काय चाललंय?’ या टिपिकल समीक्षकांच्या प्रश्नाला त्याच्याकडे भरीव उत्तर असायचं! म्हणून आदल्या दिवसापर्यंत गजानन महाराजांच्या पोथीच्या श्लोकांच्या ध्वनिमुद्रणात तो व्यग्र होता आणि पुढे चित्रपटाच्या गाण्यांचीही ध्वनिमुद्रणं ठरलेली होती. त्याचं हे सतत सुरांनी भारावलेलं आणि भारलेलं व्यक्तिमत्त्व गदिमांच्या या ओळीत सार्थ व्यक्त होतं,
चंद्रभारल्या जिवाला नाही कशाचीच चाड
मला कशाला मोजता, मी तो भारलेलं झाड!
तो म्हणायचा, ‘पैसा मिळवणं हे माझं साध्य नाही. लोक माझी जी गाणी स्मरतील तीच माझी खरी कमाई!’
हे अगदी खरंय; पण आनंदला फोन केल्यावर रिंगटोन म्हणून सुधीर मोघ्यांचं आनंदनेच संगीत दिलेलं गाणं ऐकू येतं (होतं!)
‘एक झोका, एक झोका
चुके काळजाचा ठोका.. 
ही ओळ चटका लावते आता!
(लेखक ज्येष्ठ निवेदक आहेत.)

Web Title: A loaded composer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.